नवीन लेखन...

अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग ५

सू सेंटरला आल्यावर काही दिवसांतच आम्हाला एक अपार्टमेंट भाड्याने रहायला मिळालं, ते गावातल्या रहिवासी (residential) भागात. मिडवेस्टमधल्या एका छोट्याशा गावात, १०० टक्के जुन्या वळणाच्या अमेरिकन पद्धतीशी आणि जाज्वल्य अशा ख्रिश्चन विचारसरणीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, आमचे दिवस चालले होते. आमची कंपनी गायींमधे कृत्रिम गर्भारोपण आणि तत्सम विषयांमधे काम करणारी असल्यामुळे, ऑफिस, लॅब वगैरे सर्व एका मोठया फार्मवरच होते. उंच प्रशस्त इमारती, चकचकीत ऑफिस वगैरे काही प्रकार नव्हता. किंबहुना अख्या सू सॆंटरमधे दोन मजली घरंच मुळी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी. बिल्डींग असा प्रकारच नाही, सारी बंगलेवजा घरं. किंबहुना एखादी ५-६ मजली इमारत पाहायची तर आम्हाला चक्क तासभर प्रवास करत, सू सिटी किंवा सू फॉल्ससारख्या मोठ्या गावी जावं लागायचं. तिकडे देखील अशा इमारती मोजक्याच. त्यामुळे मुंबईमधे ३-४ वर्ष काढलेल्या आणि नरीमन पॉइंट वगैरे ठिकाणी फिरलेल्या आमच्या ६ वर्षाच्या सिद्धार्थला, आपण अमेरिकेत आहोत हे खरंच वाटत नसे. त्याच्या दृष्टीने अमेरिका म्हणजे मुंबईपेक्षा मागासलेली आणि फक्त शेता-कुरणांनी भरलेली अशीच होती. पुढे दोन वर्षांनी जेव्हा आम्ही कनेक्टिकटला रहायला गेलो आणि न्यूयॉर्क शहराला भेट दिली तेव्हा कुठे आपण अमेरिकेत आहोत यावर त्याचा विश्वास बसला.

आमच्या कंपनीचं ऑफिस, लॅब वगैरे बैठया इमारतीमधेच होतं. आजूबाजूला शेतकी अवजारं दुरुस्त करण्याच्या शेडस, धान्य साठवायच्या मोठया कणग्या, गायींची ने आण करण्यासाठी आणि त्यांना ट्रक्समधून उतरवून घेण्यासाठी बांधलेले सिमेंटचे उतरते धक्के आणि जवळपास ३००० गायींना सामावून घेणारा मोठ्ठा फार्म. आजूबाजूला चारी दिशांना पसरलेली मक्याची आणि सोयाबीनची शेतं.

गावापासून कंपनीचा फार्म ७ मैलांवर होता. गावातून येणार्‍या डांबरी रस्त्यावर ४ मैल गेलं की हा डांबरी रस्ता सोडायचा आणि कच्च्या रस्त्याला लागायचं. पहिल्यांदा जेंव्हा मी हा कच्चा रस्ता पाहिला, तेंव्हा माझा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अमेरिकेत आणि कच्चा रस्ता? रस्ता चक्क मातीचा आणि त्यावर खडी टाकलेली. मग पुढे लक्षात आलं की इथे आतले सगळेच रस्ते असे कच्चे आहेत. मिडवेस्टच्या बर्‍याच मोठ्या भागात शेतजमीन ही मैला मैलाच्या चौरस तुकड्यांमधे विभागलेली असते. आकाशातून पाहिलं तर जणू एखादा प्रचंड मोठा बुद्धीबळाचा पट उघडून ठेवलेला असावा तसं वाटतं. मैला मैलाच्या अंतरावर, सरळसोट जाणारे उभे, आडवे कच्चे रस्ते, हा शेतजमीनीचा अजस्त्र बुद्धीबळाचा पट तयार करतात. मधे मधे एखादा डांबरी रस्ता असतो. पण बाकी सर्व रस्ते माती आणि खडीचे.

या रस्त्यांवरून गाडया जातात त्या धुरळा उडवत. त्यामुळे गाडया स्वच्छ ठेवायच्या म्हणजे पंचाईत. किंबहुना कुणी गाडया स्वच्छ ठेवण्याच्या भानगडीतच पडत नाही. तुमची गाडी धुळीनं, चिखलानं भरलेली असली, की न सांगताच तुम्ही कुठे काम करता हे समजतं. सगळ्यांच्याच गाडया तशा, त्यामुळे कुणालाच पर्वा नाही. मग कधी कधी कुठे लग्नाला वगैरे जायचं असलं किंवा सू सिटी, सू फॉल्स सारख्या आसपासच्या मोठया गावांमधे जायचं असलं की तेव्हढयापुरत्या त्या गाडया धुवायच्या.

बहुतेक सगळ्या गाडया म्हणजे pickup trucks किंवा SUVs. ह्या रस्त्यांवर ना रोड साईन्स ना रोड डिव्हायडर्स. त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या गाडया, धुरळ्यातून इतर गाडया दिसतील, इतपत अंतर ठेवून जाणार्‍या. अर्थात या रस्त्यांवर तशी रहदारी देखील तुरळक. पण येणार्‍या जाणार्‍या गाड्यांनी रस्त्यावरचे छोटे छोटे दगड उडणं आणि त्यामुळे गाड्यांच्या windshields ना तडे जाणं, हे देखील नित्याचंच. गावात रहाणार्‍या बहुतेकांचा शेतीशी काही ना काही कारणाने संबंध हा असायचाच. काही थोडी फार मंडळी जी शाळा कॉलेजांमधे शिक्षक किंवा प्रोफेसर म्हणून काम करायची किंवा बॅंक, दुकानं, रेस्टॉरंटस वगैरे ठिकाणी काम करायची त्यांच्या गाड्या तेवढ्या स्वच्छ आणि नजरेत भरण्यासारख्या असायच्या पण एकदा का शेतीवाडी कडे जाणं झालं आणि गाडी कच्च्या रस्त्यावर उतरली, की धुळवड खेळून आल्यासारखी झालीच म्हणून समजावं.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..