अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग १

मी पेशाने पशुवैद्यक (Veterinary doctor) आहे. मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून १९८६ साली, ‘पशुप्रजनन’ शास्त्रामधे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, बरीच वर्षं गुजरातमधे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ह्या प्रसिद्ध संस्थेच्या, ‘गाई म्हशींमधे कृत्रिम गर्भारोपण’ (Embryo Transfer), ह्या प्रकल्पावर डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करत होतो. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती, पण प्रयत्न करूनही योग जमत नव्हता. शेवटी २००० सालच्या अखेरीस, युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट मधे Ph.D. करण्यासाठी संधी मिळाली. डॉ. जेरी यॅंग सारखा, ‘क्लोनिंग’च्या क्षेत्रातला नावाजलेला संशोधक, गाईड म्हणून मिळत होता आणि असिस्टंटशिप द्यायलाही तयार होता. अशी संधी परत मिळणार नव्हती. घरच्यांच पाठबळ होतं. मी नोकरीचा राजीनामा दिला आणि ४ जानेवारी २००१ ला, वयाच्या चक्क अडतिसाव्या वर्षी, Ph.D. करण्यासाठी अमेरिकेत येऊन दाखल झालो.

पहिली सेमीस्टर झाल्यावर, माझ्या संशोधन प्रकल्पासाठी, डॉ यॅंगने मला आयोवा राज्यातल्या, ‘गायींमधे कृत्रिम गर्भधारणा’ करण्याच्या क्षेत्रातल्या, अमेरिकेतील सर्वात मोठया कंपनीत पाठवायचा निर्णय घेतला. अमेरिकेतील बहुतेक भारतीय, पूर्व किंवा पश्चिम किनारपट्टी किंवा दक्षिणेकडच्या मोठमोठया शहरांत रहात असल्यामुळे,‘आयोवा’ म्हटल्यावर त्यांना नकाशाचा आधार घ्यावा लागतो. पूर्व/पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रगत राज्यांच्या आणि मोठमोठ्या शहरांच्या तुलनेत, अमेरिकेच्या मध्य भागातील (midwest) राज्ये, ही कमी प्रगत आहेत. दक्षिणेला टेक्सास राज्याच्या निमुळत्या मुठीसारख्या (pan handle) भागापासून, उत्तरेला कॅनडापर्यंत आणि पश्चिमेला रॉकी पर्वतराजीपासून पूर्वेकडे इंडियाना राज्याच्या सीमेपर्यंत, अमेरिकेचा प्रचंड मोठा भाग सपाटसा आहे. यात अमेरिकेच्या सोळा राज्यांचा आणि कॅनडाच्या तीन प्रॉव्हीन्सेसचा समावेश होतो. १४९२ साली जेंव्हा कोलंबसची गलबतं या नवीन जगाच्या किनार्‍यावर येऊन थडकली, तेंव्हा युरोपियनांना अनभिज्ञ अशा अमेरिका या प्रचंड भूखंडाचा एक तृतीयांश भाग (सुमारे १० लाख चौरस मैल) -आजचा ‘मिडवेस्ट’ – कुरणांनी आच्छादलेला होता.

अमेरिकेचं भौगोलिक वैविध्य असं आहे की तिच्या पूर्वेकडच्या निम्या भागाकडे बघून, पश्चिमेकडच्या उरलेल्या निम्या भूभागाची अजिबात कल्पना येत नाही. इंडियाना राज्यामधून आपण पश्चिमेकडे जाऊ लागलो की विस्कॉनसीन, मिनेसोटा, इलिनॉय, आयोवा, मिसुरी, अर्कान्सास ही दक्षिणोत्तर पसरलेली राज्ये लागतात. यांचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे, उंच सळसळणार्‍या गवताळ कुरणांनी आच्छादलेल्या, सर्वदूर पसरलेल्या छोटेखानी टेकडया. हा भूभाग म्हणजे ‘प्रेअरी’. एकेकाळच्या उंच सळसळणार्‍या गवताची जागा, आता तशाच उंच मक्याच्या पिकाने घेतली आहे. त्यामुळे प्रेअरीचं आताचं स्वरूप म्हणजे मका आणि सोयाबीनच्या पिकांनी भरलेली शेतं आणि त्यात मधे मधे विखुरलेले गायी आणि डुकरांचे फार्मस्‌. अशाप्रकारे मका, सोयाबीन, गो-पालन आणि वराह-पालन ह्या चार मजबूत खांबांवर प्रेअरीचा सारा भूभाग तोललेला आहे.

इथून आणखी पश्चिमेकडे सरकावं आणि नॉर्थ डकोटा, साउथ डकोटा, नेब्रास्का, कान्सास, ओक्लाहोमा आणि टेक्सास अशी पुढची, उत्तर दक्षिण पसरलेली राज्यांची फळी लागते. या राज्यांचा पूर्वेकडील साधारण एक तृतीयांश भाग देखील प्रेअरीमधेच मोडतो. या सार्‍या राज्यांतून, १०० अक्षांश उत्तर दक्षिण जातं आणि या नैसर्गिक भौगोलिक सीमेपाशी, अचानक भूभागात बदल जाणवायला लागतो. या अक्षांशापासून जसजसं पश्चिमेकडे जावं तसतशा छोटेखानी टेकड्या नाहीशा होतात आणि जमीन सपाट होत जाते. सळसळत्या गवताची जागा खुरट्या गवताने घेतली जाते. या राज्यांचा पश्चिमेकडचा भाग आणि त्याही पलीकडची मॉंटेना, वायोमींग, कोलोरॅडो, न्यू-मेक्सिको ही राज्ये म्हणजे ‘ग्रेट प्लेन्स’. पूर्वी या भागात बायसनचे क्षितीजापर्यंत पसरलेले कळप असायचे. आता तिथे मुख्यत्वे बीफ गायींचे मोठमोठे चराऊ रॅंचेस आहेत. त्यामुळे ‘प्रेअरी’च्या भागात मुख्यत्वे शेती आणि ग्रेट प्लेन्सच्या भागात मुख्यत्वे ‘चराऊ कुरणे’ अशी सध्याची विभागणी दिसून येते.

बदलणार्‍या भूभागानुसार केवळ शेती / पशूपालनाच्या पद्धतीत फरक पडतो असं नाही. जसजसं आपण अधिक पश्चिमेकडे जावं, तसतशा counties (जिल्हे) मोठ्या होत जातात, रस्ते अधिक सरळसोट होत जातात, गावं तुरळक होत जातात. गावकर्‍यांच्या टोप्यांकडे बघून देखील थोडाफार अंदाज बांधता येतो. शेतकरी साधारणपणे शेतकी अवजारांच्या कंपन्यांच्या किंवा जनावरांच्या breeding कंपन्यांच्या बेसबॉल कॅप्स वापरतात. मोठमोठ्या कुरणांचे मालक (ranchers) बहुदा काउबॉय हॅट्स वापरतात. साधारण १०० अक्षांशाच्या आसपास सुरू झालेल्या या अमर्याद सपाट जमिनीचा चढ, पश्चिमेकडे दर मैलामागे १० फुटांनी वाढायला लागतो तो थेट रॉकी पर्वतराजी सुरू होईपर्यंत.

अमेरिकेच्या अतिप्रगत अशा पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांच्या दृष्टीने, हा सारा भूभाग म्हणजे फक्त विमानात बसून, माना वाकड्या करून खिडक्यांतून खाली बघून पाहाण्यापुरता. त्याच्यावरून ३०,००० फूटांवरून उडत जायचं म्हणून त्याला कुत्सितपणे ‘Fly over country’ असं म्हटलं जातं. उगाच नाही आयोवा किंवा मिडवेस्ट म्हटलं, की इतर अमेरिकन लोकं नाकं मुरडत ! मुंबईच्या खार, पार्ल्याच्या किंवा पुण्याच्या डेक्कन, कर्वे रोडच्या लोकांना इचलकरंजी, वीटा किंवा बुलढाण्याचं नाव ऐकून कसं वाटतं, साधारण तसंच बाकी अमेरिकन्सना मिडवेस्टबद्दल वाटतं.

आयोवाच्या उत्तर पश्चिम कोपर्‍यात, ‘सू सेंटर’ नावाचं एक छोटंस गाव आहे. बर्‍याचशा नकाशांत त्याचं नामोनिशाणही नसतं. उच्चाराप्रमाणे स्पेलिंग लिहिताना हमखास चुकायला होतं. खरं स्पेलींग आहे Sioux. गोर्‍या लोकांनी अमेरिकेचा कब्जा घेण्यापूर्वी, या भागात Sioux जमातीचे रेड इंडियन लोकं रहात होते. त्यावरून या सर्व भागाला (आयोवाचा उत्तर-पश्चिम भाग, मिनेसोटाचा थोडासा दक्षिण भाग आणि साउथ डाकोटा राज्याचा दक्षिण-पूर्व भाग) Sioux land म्हणतात. त्यामुळे या भागात सू सेंटर, सू सिटी, सू फॉल्स, सू रॅपीड्स अशी बरीच गावं / शहरं आहेत. या भागातून वहाणार्‍या नदीचे नाव देखील big Sioux river असंच आहे. तर अशा या सू सेंटरची वस्ती आहे केवळ सहा हजार. पण या छोट्याशा गावात, गायींमधे कृत्रिम गर्भधारणा आणि तत्सम क्षेत्रामधे संशोधन व काम करणारी, Trans Ova Genetics नावाची, अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी आहे. माझ्या प्रकल्पाच्या कामाच्या निमित्ताने, मी या कंपनीत २००१ च्या जुलै महिन्यात दाखल झालो. माझ्य़ा पाठोपाठ दोन आठवडयात, माझी बायको मृणालिनी आणि आमचा ६ वर्षांचा मुलगा सिद्धार्थ, मुंबईहून सरळ सू सेंटरला आले; आणि बघता बघता, १४ दशलक्ष लोकवस्तीच्या मुंबई शहरात आयुष्य काढलेलं, एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंब, अमेरिकेच्या मध्यावर, गाईगुरांच्या कुरणांमधे आणि मक्या-सोयाबीनच्या शेतांमधे, सहा हजार लोकवस्तीच्या एका खेडेवजा गावकुसाचं रहिवासी झालं.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....