नवीन लेखन...

कावळू

जरासं कुठे उजाडलं तर,लगेचच कावळ्याच्या पिल्लाची “कावकाव किवकीव” सुरू झाली.।
इकडे तिकडे हुसहुस सुरू झाली. चळवळ वळवळ सुरू झाली.
“आईच्या पायाला चोचीने खाजव. नाहीतर घरट्याच्या काड्या चोचीने उपस.”
कावळूच्या ह्या कावकावीने आणि असल्या उद्योगाने कावळीण जाम करवादली.
कावळीणीने आपली चोच घरट्यांच्या काड्यांवर कराकरा घासली. मान डावीकडे करुन पंखात चोच खुपसली. उजवा पाय वर घेऊन त्यावर पण चोच घासली.
मग चोचीने आपल्या कावळूचं डोकं खजवत ती कुरकुरत म्हणाली,“जरा कुठे डोळा लागला होता आत्ता.. .. तर सुरू झाली तुझी कावकीव! !
हे म्हणजे अगदी त्या माणसांच्या छोट्या मुलां सारखं! दिवसभर गारेगार झोपायचं आणि पहाटे-पहाटे टँऽऽ टँऽऽ रडायचं. आमच्या झोपेचं नुसतं सुकं गवत करुन टाकायचं.
अं.. काय बरं पाहिजे आहे माझ्या कुकुल्या कावळू बाळूला?”
आईच्या असल्या बोलण्याचा कावळूला भारी राग आला. त्याने रागारागाने आईला पिसं फुलवून दाखवली.
आईनं दचकून मान वाकडी करुन एका डोळ्याने कावळूकडे पाहिलं.
कावळू कुरकूरत म्हणाला,“आऽऽई मला जाऽऽम भूक लागलीय हां. आणि मला व्हेज खाऊन-खाऊन पण कंटाळा आलाय ग. रोजच ती सडलेली भाजी, मरगळलेली पानं आणि शिळ्या भाताची शितं खाऊन मी जाम फन गेलोय.
बाबांना सांग, “आज मला प्लीऽऽज,काहीतरी नॉन-व्हेज घेऊन या. एकदम चमचमीत!
चमचमीत म्हणजे अगदी मेक्सिकन फूडच पाहिजे असं काही नाही. ते परवा सारखं साधं चायनीज चालेल. पण मंचूरीयन किंवा शेजवान आणि सोबत कोवळा-कोवळा उंदीर कबाब.”
कर्कश आवाजात कावळीण म्हणाली,“हे बघ कावळू, हे जरा फारच होतंय! उजाडल्या-उजाडल्या उगाच माणसांच्या मुलंासारखे हट्ट करू नकोस. आणि “हे दे आणि ते दे सांगत मला हॉटेलची मेन्यू काड़र् वाचून दाखवू नकोस.“
अरे कावळू, उद्या महिन्याचा पहिला रविवार आहे. म्हणजे, त्या समोरच्या जोशी काकू नक्की नॉन व्हेज आणतील. मग काहीतरी गडबड करत त्या ते नॉनव्हेज साफ करतील. नंतर त्या त्यातलं थोडसं खातील आणि खूपसं टाकतील! त्यातलंच मी तुला घेऊन येईन बरं…..”
“पण आई तुला काय माहित? उद्याच्या रविवारी असं काही झालंच नाही तर? जोशी काकूंनी नॉन व्हेज आणलंच नाही तर?” असं म्हणत कावळूने मान टाकली. त्याचा चेहरा रडवेला झाला.
कावळूला पंखाने थोपटत आई म्हणाली,“अरे वेडा की काय तू? अरे इतके दिवस या फांदीवर बसून एका डोळ्याने मी रोज पाहतेय ते काय? माझं जजमेंट चुकणार नाही! अरे ते जोशी काका अगदी तुझ्या बाबांसारखे आहेत. एकदम “शाना कौआ“ आहेत ते!!”

बायकोची कावळू सोबतची किर्रकुर्र ऐकून,समोरच्या फांदीवर बसलेले कावळे बाबा झपकन आले.
कावळे बाबांनी पंख फडफडवले. कावळूची पिसं थरथरली.
बाबा येताच,कावळू बाबांजवळ सरकला.
कावळूने बाबांच्या पंखावर हळूच चोच घासली. बाबांच्या मानेवरुन हळूवार चोच फिरवली.
बाबा कावळूच्या कानात उगाचंच “किर्रऽऽऽऽऽऽ काऽऽऽव” करून कुसकन ओरडले.
कावळू घाबरला! त्याची मान थरथरली. त्याच्या चोचीचा “चाऽऽ“ झाला!
तो पटकन लांब सरकला. घाबरुन मान तिरकी करुन बाबांकडे पाहू लागला.
नवऱ्याला पंखाने ढकलत कावळीण म्हणाली,“काय हे ओरडणं? काय हे वागणं? दचकलं ना माझं पोर!
शोभतं का तुम्हाला हे असं वागणं?
आणि म्हंटलं, लेकाचा आजचा नवीन हट्ट ऐकलात का?..”

कावळे बाबा कौतुकाने कावळूकडे पाहू लागले.
कावळूने बाबांना पिसं फुलवून दाखवली. एका पायावर उभं राहून दाखवलं. मग..
कावळूने खास लाडीक आवाजात,मघाचचीच नॉन व्हेजची कुरकूर पुन्हा बाबांकडे केली.

बाबा म्हणाले,“किर्रऽऽ कावकाव कॅव! अरे एव्हढंच ना माझ्या कावळू? त्या रविवार पर्यंत कोण कशाला थांबेल? आणि रविवारी हवं तर स्पायसी खा पण आज फ्रेशच खा!
थांब, आत्ताच घेऊन येतो,तुझ्यासाठी फक्कड फ्रेश नॉन व्हेज!
अरे, “फ्रेश नॉन व्हेज खाशील तर स्पायसी फूड विसरशील“ असं आपल्यात म्हणतात ते काय उगीच नाही बरं!…”
एक डोळा बारीक करून मान तिरकी करत कावळीण म्हणाली, “हे पाहा,उगाच ते मेनरोडवरचं घाणेरडं, उघड्यावरचं,गटारातलं काही-बाही आणू नका.
रस्त्यावरचं ते स्पायसी चायनीज तर अजिबात आणू नका.
अहो, मोठा झाला की खाईल तो हे सर्व.पण उगाच आत्तापासून ह्या भलत्या सवयी नकोत.
नाहीतर आपल्या कावळूची तब्येत नाही का बिघडायची?
“लहान पिल्लांना थोडचं द्यावं पण चांगलं फ्रेश द्यावं“ असं आपल्यात म्हणतात ते जरा लक्षात असू द्या.

म्हणून म्हणते, कुणाच्या तरी घरातून नाहीतर चांगल्या हॉटेलातूनच घेऊन या. आणि… . आणणारच आहात तर…. थोडसं जास्तीच आणा की…..म्हणजे….!”

“कावकाऽऽव, कावकाऽऽव!! कळलं मलाठमान तिरकी करत कावळा प्रेमाने म्हणाला.

कावळूला काही कळलंच नाही!
तो आळीपाळीने आई बाबांकडे पाहातच राहिला.
त्याने बाबांच्या चोचीला चोच घासली. आणि तो आईच्या जवळ सरकला.

कावळा कावकावला,“हे बघ,मी बाळासाठी नॉन व्हेज मेनरोडवरून आणणार नाही. गटारातलं घाणेरडं आणणार नाही.
रस्त्यावरचं स्पायसी चायनीज आणणार नाही.
कुणाच्या ही घरातून पळवून आणणार नाही.
आणि कुठल्याही चांगल्या हॉटेल मधून सुध्दा अजिबात आणणार नाही.
समजलं?”

कावळीण रागाने काळी-जांभळी झाली!!
तिने पिसं फुलवली.
घरट्यावर कराकरा चोच घासली.
जराशी वर उडून पुन्हा घरट्यावर बसली.
तिने रागावून मान तिरकी करत घशातून “ कूर्रऽऽकाऽऽव, कूर्रऽऽकाऽऽव” असा करकरीत आवाज काढला.
आई जवळ बसलेला कावळू दचकला!
घाबरुन बाबांकडे सरकत आणि चोचीचा चाऽऽव करून तो आईकडे पाहू लागला.
कावळीण कावळ्यावर कावणारच होती.

इतक्यात कावळूच्या चोचीवर चोच घासून कावळा म्हणाला,“अगं तू आपल्या कावळूला काही बावळट समजू नकोस!
तेऽऽऽ बघ,तिकडे समोर पाहा.”
कावळीणीने मान तिरकी-तिरकी करून पाहिलं. पुन्हा-पुन्हा पाहिलं.
पण तिला काहीच दिसलं नाही!!
तिने रागारागाने मान उडवली आणि चोच उघडली!
कावळा बायकोला समजावत म्हणाला,“अगं समोर म्हणजे आपल्या कावळू बाळाच्या समोर आणि तुझ्या पाठीमागे! हं… आता दिसलं का?”

कावळीण उडी मारुन घरट्याच्या कडेवर बसली.
मग मागे मान वळवून तिने पानांच्या मधून पाहिलं .
झाडांच्या पलिकडे पाहिलं.
समोरच्या रस्त्यावर पाहिलं.
आणि ती खूप खूप आनंदाने कावकावली!!

समोरच्या रस्त्यावर एक नवीनच दुकान सुरू झालं होतं.
त्या दुकानात काळे मासे.
पांढरे मासे.
रंगीत मासे.
छोटे मासे,
मोठे मासे व्यवस्थित मांडून ठेवले होते.
दुकान नवीनच असल्याने फार गर्दी पण नव्हती.

गेले चार दिवस आईचं सगळं लक्ष बाळाकडे. म्हणजे कावळूकडे.
म्हणजे आईचं तोंड कावळूकडे आणि आईची शेपटी दुकानाकडे! तिला तर इकडे तिकडे पाहायला वेळच नाही. टाइमपास करायला टाइमच नाही.
त्यामुळे हे नवीन दुकान सुरू झाल्याचं तिला माहीतच नाही.
आणि गंमत म्हणजे,
कावळूचं सारं लक्षं मात्र त्या दुकानाकडेच.
त्यामुळे त्याच्या चोचीला सारखं पाणी सुटायचं!
“नॉन व्हेज खातोय,फ्रेश खातोय“ असली स्वप्नं त्याला पडायची!

कावळूचे बाबा कावळूला म्हणाले,“हं कावकाव. आत्ता जातो आणि एक मस्त ताजा-ताजा फडफडीत मोठा रंगीत फ्रेश मासा घेऊनच येतो.
ओळख पाहू कावळू,हा फ्रेश फडफडीत मासा कुणासाठी?”

कावळू जोरात ओरडला, “माझ्यासाठी… आणि…. माझ्या-माझ्या लाडक्या आईसाठी!!”
राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..