नवीन लेखन...

मोबाईलचा पहिला काॅल

आज त्रेचाळीस वर्ष झाली. माणसाने पहिल्यांदा मोबाईलवर बोलल्याला!! दूरसंचार क्षेत्राच्या इतिहासातील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा! त्या पहिल्या मोबाईलचे नाव होतं ‘डायनाटेक’. एक किलोहून त्याचं वजन जरा जास्तच होतं. त्याची लांबी १३ सें.मी. व रुंदी ५ सें.मी. होती. तो चार्ज होण्यासाठी तब्बल दहा तास लागायचे. पूर्ण चार्ज झाल्यावर तो फक्त अर्धा तास वापरता यायचा. मोटोरोला कंपनीचे संशोधक मार्टिन कूपर यांनी हा पहिला काॅल त्यांचे प्रतिस्पर्धी डाॅ. जोएल एंगेल यांना केला होता.
या मोबाईल विषयीच्या बातम्या आपण वर्तमानपत्रातून, मासिकातून वाचत होतो. आपल्या भारतात हा मोबाईल फार उशीरा म्हणजे १९९५च्या सुमारास आला.
आम्ही महेश मांजरेकरच्या ‘आई’ चित्रपटाचे काम करीत होतो. तेव्हा त्याने संपर्कासाठी त्याचा पंधरा आकडी मोबाईल नंबर दिला होता. एसटीडी बूथवर जाऊन मी एकदा हा पंधरा आकडी नंबर फिरवून त्याला काॅल केला. दोनच मिनिटांच्या बोलण्यासाठी त्यावेळी सोळा रुपये लागले.
स्मिता तळवलकरचे काम करीत असताना मी मुंबईला जात असे. त्या सतत त्या मोठ्या वाॅकिटाॅकीसारख्या दिसणाऱ्या मोबाईलवर बोलत असायच्या. एकदा अशाच टॅक्सीच्या प्रवासात त्या मोबाईल हरवून बसल्या. तो मोबाईल तेव्हा फार किंमतीचा होता. ती बातमी सिनेसृष्टीत बरेच दिवस फिरत होती.‌
स्मिताच्याच ‘सातच्या आत घरात’ चित्रपटाचे स्थिरचित्रण मी करीत होतो. त्यातील नायिका, गौतमी गाडगीळची हेअर ड्रेसर, कायम फोनवर बोलत रहायची. शाॅट टेक होण्याच्या आधी गौतमीला आरसा दाखवला, केसांवरुन कंगवा फिरवला की, पुन्हा ही मोबाईलमध्ये तासनतास डुबून जायची.
नाटकांची डिझाईन करून घेण्यासाठी प्रवीण बर्वे आमच्या ऑफिसमध्ये नेहमी येत असे. त्यांचा एक फायनान्सर मित्र सोबत असायचा. त्यानं कधीही नवीन मोबाईल घेतला की, तो जास्त दिवस त्याच्या हातात टिकत नसे. हरवायचा, चोरीला जायचा किंवा हाच कुठेतरी विसरायचा. त्याला त्याचे कधी वाईट वाटलं नाही, दुसऱ्या दिवशी नवीन मोबाईल त्याच्या हातात हजर असायचा.
माझा एक तापट स्वभावाचा मित्र आहे. त्याला राग अनावर झाला की, आपण काय करतोय याचं भान त्याला रहात नाही. एकदा तो बाहेरगावी गेलेला असताना त्याचा मोबाईल हॅन्ग झाला.त्याला ते न समजल्याने, रागाच्या भरात दगडाने मोबाईल ठेचून काढला. दुसरे दिवशी नवीन मोबाईल खरेदी करुन त्याने आपला राग शांत केला.
मी पहिल्यांदा पेजर वापरत होतो. नंतर रिलायन्स कंपनीचा छोटा कृष्णधवल मोबाईल पहिल्यांदाच मार्केटमध्ये आला. त्यावेळी बॅन्केचे EMI भरत मी तो खरेदी केला. स्टॅण्डच्याच आकाराचा त्याचा चार्जर होता. काही वर्षांनंतर तो कालबाह्य ठरला. त्यानंतर बटणाचेच अनेक मोबाईल हाताळून झाले.
स्मार्ट मोबाईल सर्रास वापरले जात असताना मी बटणाचाच मोबाईल वापरत होतो. नुकतंच व्हाॅटसअप सुरु झालं होतं. ते वापरणारे बोलू लागले, किती दिवस जगाच्या मागे रहाणार? नवीन स्मार्ट फोन घ्या.
शेवटी एकदाचा 2G स्मार्ट फोन घेतला. व्हाॅटसअपवरुन केलेल्या डिझाईनचा फोटो ग्राहकाला पाठवू लागलो. कामामध्ये प्रगती होऊ लागली. कामाच्या मजकुराची देवाणघेवाण होऊ लागली.
2G नंतर 3G आलं. तशाच कंपन्या बदलत राहिल्या. रिलायन्स, एअरटेल, बीएसएनएल, व्होडाफोन असे खांदेपालट करीत राहिलो.
एकदा गणेश कला क्रीडा येथे एका कार्यक्रमात माझा मोबाईल मी विसरुन बाहेर पडलो. आठवल्यावर जाऊन पाहिलं तर मोबाईल सीटवर नव्हता. कधी हातातून पडून बिघडला, पुन्हा दुरुस्त केला. मोबाईलमध्ये नवनवीन सोयी येत राहिल्या. वर्षांतच आधीचा मोबाईल जुनापुराना वाटू लागला. कुणा मित्राचा काॅम्प्युटरच्या किंमतीचा ॲ‍पलचा मोबाईल पाहून त्याचा हेवा वाटू लागला.
मोबाईल आता जीवनावश्यक गरज होऊन राहिली. रोटी, कपडा, मकान और मोबाईल! आज या चारही गोष्टींशिवाय माणूस जगूच शकत नाही. पूर्वी टाईमपास करणारी बेरोजगार माणसं ठळकपणे दिसून यायची. आता बेरोजगार असला तरी तो चोवीस तास ऑनलाईन असतो.
या मोबाईलने कितीतरी जणांचे रोजगार बुडवले. उत्तम मेगापिक्सेलच्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटोग्राफरांचा धंदा पार बुडाला. त्यातच घड्याळ असल्याने आता घड्याळाची दुकानं शोधावी लागतात. पूर्वी रस्त्यावर एखादा माणूस पत्ता विचारायचा, आता गुगल मॅप वरुन कोणीही इच्छित स्थळी पोहोचू शकतो. आता स्वतंत्र कॅल्क्युलेटर कोणीही विकत घेत नाही, यातच कॅल्सी आहे. कॅल्क्युलेटर दुरुस्ती करणारी दुकानं आता बंद झालीत. यातील इंटरनेटमुळे काॅम्प्युटरचं जड ओझं न बाळगता ई-मेल करता येतो, गुगलवरुन हवी ती माहिती क्षणार्धात मिळते. पत्रव्यवहार संपला, शुभेच्छा कार्डचा व्यवसाय संपला. रात्री बारा वाजताच वाढदिवसाच्या इलेक्ट्रॉनिक शुभेच्छा देऊन माणूस मोकळा होऊ लागला. कुणाचं सांत्वन करण्यासाठी RIP किंवा ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ टाईप करुन कोरड्या भावना पोहोचवू लागला.
लहान मुलांना पूर्वी पैशाचं, नोटांचं आकर्षण होतं, आता मोबाईल हातात दिला की, रडणारं मूल हसायला लागतं. दहा बारा वर्षांच्या कित्येक मुलांनी आई-वडीलांनी मोबाईल खरेदी करुन दिला नाही म्हणून आत्महत्या केल्याचे वाचलेले आहे.
शेवटी काय, जशी काडेपेटीतील एका काडीने आपण निरंजन पेटवू शकतो किंवा आगही लावू शकतो.तसंच मोबाईलचं आहे, त्यांचा मर्यादित वापर हा उत्तमच आहे. चुकीच्या पध्दतीने वापरल्यास तो राक्षसाहून भयंकर आहे. निवड करणं आपल्याच हातात आहे.
आज मोबाईलला ४३ वर्ष झाली, अजूनही नवीन तंत्रज्ञान येतच राहिल. आपण किती आहारी जायचं हे आपणच ठरवायचं!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
४-४-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..