नवीन लेखन...

देवा तुझ्या दारी आलो

‘उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे. विविध वाहिन्यांवरील संगीत स्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वतः अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच  परिमाण मिळाले.

‘नटरंग’ या चित्रपटातील ‘आता वाजले की बारा’, ‘अप्सरा आली’, ‘नटरंग उभा’ या लोकप्रिय झालेल्या गाण्यांप्रमाणेच घ त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’, ‘अगबाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘साडेमाडे तीन’, ‘एक डाव धोबीपछाड’ या चित्रपटातील गाण्यांनाही रसिकांची दाद मिळाली. ‘जोगवा’ या चित्रपटासाठी अजय-अतुल यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय व पुरस्कारही मिळाला आहे.

संगीतकार अजय-अतुल हे दोघे भाऊ असून त्यांनी संगीत दिलेला ‘विश्वविनायक’ हा आल्बमही खूप गाजला. श्रीगणेशावरील असलेल्या या आल्बममधील गाणी एस.पी. बालसुब्रह्मण्यम, शंकर महादेवन यांनी गायली आहेत.

‘उलाढाल’ चित्रपटातील हे गाणे ऐकताना आपणही त्यात रंगून जातो. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली अनेक गाणी, लावण्या मराठी संगीत रसिकांच्या मनात घर करून आहेत. ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेले ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांचा महिमा सांगणारे गीत खेबुडकर यांनीच लिहिले आहे. ‘उलाढाल’ मधील ‘देवा तुझ्या दारी आलो’ हे गणपतीवरील त्यांचे आणखी एक गाजलेले गीत साधी, सोपी परंतु सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी आणि गुणगुणायला लावणारी शब्दरचना हे खेबुडकर यांच्या आजवरच्या गीतांचे प्रमुख वैशिष्ट्य. तीच परंपरा खेबुडकर यांनी ‘देवा तुझ्या दारी आलो’ मध्येही जपली आहे.

अजय-अतुल गोगावले बंधूंमध्ये अजय हे गातातही. ‘नटरंग’मधील ‘खेळ मांडीयेला’, ‘सावरखेड एक गाव’मधील ‘आई भवानी तुझ्या कृपेने’, ‘मल्हारवारी’ ही त्यांनी गायलेली गाणी रसिकांना परिचयाची आहेतच. त्यात ‘देवा तुझ्या दारी आलो’चाही समावेश होतो.

हे गाणे ऐकताना प्रत्येकजण गणपतीच्या भक्तीत अक्षरशः न्हाऊन निघतो. गाण्याच्या सुरूवातीला अजय यांनी आपल्या आर्त स्वरातून गणपतीला घातलेली ‘देवा तुझ्या दारी आलो’ ही साद आणि ‘मोरया मोरया’ हा गजर गणेशभक्तांच्या मनाचा ठाव घेतो. ‘शिवगर्जना’ या प्रसिद्ध ढोल पथकाच्या साथीने अजय-अतुल यांनी या लोकप्रिय ठरलेल्या गाण्याचे ध्वनीमुद्रण केले आहे. गाण्याचा शेवट ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी’ या पारंपारिक श्लोकाने करण्यात आला आहे.

गाण्यातील ढोल ताशा मोरया मोरयाचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’ हा जयजयकार, तुतारीचा निनाद आणि शेवटचा गजर आपल्याही मनात नकळत वीररस आणि गणेशभक्ती निर्माण करतो. खेबुडकरांचे शब्द, अजय-अतुल यांचे संगीत आणि अजय यांचा स्वर असा सुंदर मिलाफ या गाण्यात झाला आहे.

हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे-

देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्याइना माणसाचा जन्म जाई वाया
ए देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया, तुझी समिंदराची माया
मोरया, मोरया- १

ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाडं, येली, पानासंग फुल तू सुगंधी
भक्तांचा पाठीराखा, गरिबांचा वाली
माझी भक्ती, तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया – २ –

आदि अंत तूच खरा तूच बुद्धिदाता
शरण आलो आम्ही तुला पायावर माथा
डंका वाजे दहा दिशी गजर नामाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया-३

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी-४

-शेखर जोशी, डोंबिवली

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मध्ये प्रकाशित झालेला  श्री शेखर जोशी यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..