नवीन लेखन...

ओंकार प्रधान रूप गणेशाचे

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेश देवतेचे आपल्या लेखणीद्वारे अनेकांनी गुणगान केले आहे. कवी, गीतकार, शाहीर यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनीही आपल्या अभंगातून आणि काव्यातून गणपतीचे वर्णन केले आहे.

संत ज्ञानेश्वरांनी गणपतीचे वर्णन ‘ओम नमोजी आद्या वेद प्रतीपाद्या’ असे केले आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणेच अन्य संतांनीही गणेशाला वंदन केले असून त्यात संत तुकारामही आहेत. संत तुकाराम यांनी ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना गणपतीचे भक्त आणि संगीतप्रेमी रसिकांनाही परिचयाची आहे. याचे संगीत कमलाकर भागवत यांचे असून स्वर सुमन कल्याणपूर यांचा आहे.

कमलाकर भागवत हे जुन्या पिढीतील प्रतिभावान संगीतकार. त्यांची खूप गाणी गाजली. अनेक वर्षानंतरही भागवत यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत. यात ‘उठा उठा चिऊताई’, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’, ‘दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट’, ‘देह जावो अथवा राहो’ आदी तसेच इतरही अनेक गाण्यांचा समावेश आहे.

खरे तर तुकाराम, नामदेव, एकनाथ आदी सर्व संतांनी विठ्ठलाची भक्ती आणि स्तुती केली. या सर्व संतांनी विठ्ठलाला आपला सखा मानले. आपले सुखदुःख त्याला सांगितले. ज्ञानेश्वर आणि तुकारामांसह सर्व संतांचे अभंग मराठी भाषा आणि संस्कृतित अढळ स्थान मिळवून आहेत.

इतक्या वर्षानंतरही त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरा, जातीभेद, विषमता यांच्यावरही संतांनी आपल्या अभंगांतून आसूड ओढले आहेत. तुकारामांचे ‘सुंदर ते ध्यान’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, ‘कन्या सासुरासी जाये’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी काठी’,

‘जे का रंजले गांजले’ आणि इतरही अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम यांचे बहुतांश अभंग ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी ‘अभंग तुकयाचे’ या कॅसेटमध्ये संगीतबद्ध केले आहेत. लता मंगेशकर यांच्या आवाजात ते प्रसिद्ध आहेत.

‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही तुकारामांची रचना संगीतकार कमलाकर भागवत आणि गायिका सुमन कल्याणपूर यांच्यामुळे अधिक प्रसिद्ध झाली आहे. गणपतीची स्तुती असलेला तुकारामांचा हा अभंग अवघ्या चार कडव्यांचा आहे. ‘ओम’ हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा अ, उ आणि म हे स्वर म्हणत आपण ‘ओम’चा उच्चार करतो. ओंकार हेच गणेशाचे मुख्य स्वरूप असून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन प्रमुख देवांचे ते जन्मस्थान आहे. हे तीनही देव अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक आहेत. सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. गणपती किंवा गजानन हा मायबाप असल्याचेही तुकाराम या अभंगात सांगतात.

मन प्रसन्न करणारा सुमन कल्याणपूर यांचा स्वर आणि कमलाकर भागवत यांचे संगीत यामुळे हे गाणे ऐकताना आपणही अगदी तल्लीन होऊन जातो.

हा अभंग पुढीलप्रमाणे-

ओंकार प्रधान रूप गणेशाचे
गे तिन्ही देवांचे जन्मस्थान -धृ-

अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला -१

ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप-२

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणे व्यासाचिया-३

-शेखर जोशी, डोंबिवली

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मध्ये प्रकाशित झालेला  श्री शेखर जोशी यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..