नवीन लेखन...

चिमूटभर आनंद

एकदा रूक्मिणी आणि सत्यभामा दोघीजणी कृष्णाला जेवायला वाढत होत्या. म्हणजे बरीच मोठी पंगत बसली होती पण त्या दोघींचं लक्ष कृष्णाला काय हवं-नको याकडेच लागलं होतं. सत्यभामा अगदी आग्रहाने कृष्णाला श्रीखंड वाढत होती आणि कृष्णही तितक्याच प्रेमाने तिनं वाढलेलं श्रीखंड खात होते. आपण केलेला आग्रह कृष्णाला आवडतोय. आपल्या हातून कृष्ण पुन: पुन: श्रीखंड घेतायत.. हे बघून सत्यभामेला आनंद तर होत होताच पण थोडासा अहंकारही झाला होता. कारण श्रीखंड खाण्याच्या नादात रूक्मिणीने विचारलेल्या बहुतेक पदार्थांना कृष्ण नाही म्हणत होते.. यामुळे आनंद होणं स्वाभाविकच होतं. सत्यभामाच कृष्णाला अधिक आवडते हे रूक्मिणीला यातून कळेल असंही तिला वाटत होतं.. पण नुसत्या या विचाराने सत्यभामेचं समाधान होत नव्हतं. हे शब्दांतून वदवून घ्यावं असं तिला वाटत होतं शेवटी तिनं भर पंक्तीत कृष्णाला मोठ्याने विचारलंच, ‘काय हो मी तुम्हांला आवडते ना?’ हो तर कृष्ण हसत म्हणाले..

‘मग किती आवडते सांगा बरं,’ सत्यभामेनं लाडानं विचारलं. कृष्णाने क्षणभर विचार केला आणि उत्तर दिलं, ‘खूप आवडतेस म्हणजे.. श्रीखंडाएवढी आवडतेस..’

हे उत्तर ऐकून सत्यभामेला स्वर्गही अगदी दोन बोटे उरला. आता हे ऐकून तरी सत्यभामेचं समाधान व्हायला हवं होतं.. पण तिचं समाधान झालं नाही.. सार्या पंक्तीला कळलं की सत्यभामा कृष्णाला श्रीखंडाएवढी आवडते.. रूक्मिणीलाही कळलं.. पण आता रूक्मिणी किती आवडते हेही कळायलाच हवं या हट्टाने सत्यभामेने पुढचा प्रश्न भर पंक्तीत विचारला.. बरं मग आता सांगा, ‘ही रूक्मिणी किती आवडते तुम्हांला?’ कृष्णाने एक लबाड कटाक्ष रूक्मिणीकडे टाकला आणि म्हणाले.. ‘रूक्मिणी? अं? रूक्मिणी.. मला आवडते मिठाएवढी..’ सत्यभामेला इतकं खळखळून हसू आलं.. ती नुसती खळखळून नाही तर रूक्मिणीला खिजवणारं हसली.. रूक्मिणीचा चेहरा पडला, नजर जमिनीला मिळाली.. कृष्ण म्हणाले, ‘अगं रूक्मिणी वाईट कशाला वाटून घेतेस? माझ्या उत्तराने तुला आनंद व्हायला हवा.. अगं श्रीखंड एखाद्या दिवशीच खायचं असतं.. आणि तेही नाही खाल्लं तर कोणाचं काही बिघडत नाही पण मीठ? चिमूटभर मिठाशिवाय सगळं जेवण अळणी लागतं.. आलं लक्षात? .. तुझ्याशिवाय माझं जीवन अळणी आहे रूक्मिणी!’ रूक्मिणीच्या ओठावर अलगद हसू उमललं.

किती साधी पण सुंदर गोष्ट! आणि खूप काही सांगून जाणारी.. लहानपणी ही गोष्ट वाचताना सत्यभामा, रूक्मिणी, कृष्ण ही सगळी फक्त पात्रं वाटायची. पण आता या गोष्टीचा विचार करताना वाटतं.. ही पात्रं नाहीत तर या वृत्ती आहेत. आपलं दु:ख, आपला पराभव,समोरच्याचं खिजवणारं हसू काही न बोलता शांतपणे पचवण्याची एक वृत्ती,कुणाला दुखवायचं नाही पण योग्य वेळ आल्यावर गोड शब्दांत संबंधित व्यक्तीला योग्य ती समज देण्याची एक वृत्ती.

आणि भरभरून समाधान मिळत असतानाही आनंद मिळत असतानाही त्याचा शांतपणे उपभोग न घेता, त्याची चारचौघात वाच्यता व्हावी, ते शब्दांतून व्यक्त व्हावं, ते उपस्थितांना कळावं, त्याद्वारे आपण ज्याच्याशी स्पर्धा करतोय त्याला खिजवावं.. असं वाटणारी एक वृत्ती!आपण वाढलेलं श्रीखंड श्रीकृष्ण आवडीने खातायत.. हीच खरी समाधानाची गोष्ट! याच गोष्टीत आनंद, समाधान मानलं असतं तर पुढचा प्रसंग घडताच का नि खजील व्हायची वेळ येतीच का ? पण हाच आपला मनुष्यस्वभाव आहे. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद, आपल्याला दिसतच नाही, जाणवतच नाही. आपल्याला अगदी गच्च ओंजळ भरून आनंद हवा असतो.. पण आनंदाची ओंजळ आपल्याला हवी तशी गच्च कधीच भरत नाही.. जावई, जातवेद (अग्नि) आणि जठर यांना कितीही दिलं तरी त्यांची तृप्ती होतच नाही.. तसंच आपल्या मनाचं आहे. कितीही मिळाला तरी आनंदाची ओंजळ पूर्ण भरतच नाही. आणि चुकून भरली कधी तर आपली ओंजळ तो पूर्ण धरून ठेवण्याएवढी समर्थ नसते. ओंजळीतल्या फटीतून आनंदाचे काही क्षण आपण सहज दवडत असतो. एक अगदी वैयक्तीक प्रसंग सांगते.. लहानपणी माझ्या आणि माझ्या भावाच्या वाढदिवसाला नेहमीसारखं स्वयंपाकघरात जेवायला न बसता मधल्या खोलीत छान पंगत मांडली जायची. ज्याचा वाढदिवस असेल त्याला चांदीचं ताट वाटी आणि पानाभोवती महिरप असा थाट असायचा.. माझा सातवा किंवा आठवा वाढदिवस असेल, मला आवडणारे गुलाबजाम, बटाट्याची भाजी, पुर्या असा बेत आईनं आणि आऊनं (आजीनं) केला होता. जेवणाची वेळ झाली. आता मधल्या खोलीत आई पानं घेईल, रांगोळी काढेल म्हणून मी वाट बघत होते.. पण त्यादिवशी का कुणास ठाऊक आईनं स्वयंपाकघरातच पानं घेतली. मला चांदीचं ताट वाटी ठेवली. पानाभोवती रांगोळी काढली.. आजोबा, बाबा, काका, भाऊ सगळे आपापल्या पाटावर जेवायला बसले. मला सगळ्यांनी हाक मारली पण मी जेवायला आले नाही. मी मधल्या खोलीत धुसफुसत रडत बसले होते.. आजी येऊन समजावून गेली.. भाऊ येऊन समजावून गेला.. पण त्याने माझी धुसफूस आणखीनच वाढली. शेवटी चला पानं वाढायला घ्या, सगळ्यांनी जेवायला सुरुवात करा असा आदेश आजोबांनी दिला.. बाबांनी सनईची कॅसेट लावली.. जेवणं आतमध्ये सुरू झाली.. मी बाहेर लक्ष वेधून घेण्यासाठी आदळआपट सुरू केली. सगळ्यांची जेवणं झाली. बाबांनी सगळ्यांसाठी गुलकंद, खोबरं घालून विडे केले होते.. ते सगळ्यांनी खाल्ले.. माझा संताप इतका अनावर झाला होता.. आई आणि आऊचंही जेवण झालं.. माझा वाढदिवस नि मी मात्र उपाशी ! हळूहळू राग, भूक यामुळे मला रडायला यायला लागलं.. स्वयंपाकघर आवरून आई बाहेर आली.. माझ्याकडे पाहून म्हणाली, ‘एवढं चिडण्याचं कारण काय? मधल्या खोलीत पानं घेतली नाहीत.. एवढंच ना ? पण आतही चांदीचं ताट वाटी होती, रांगोळी काढली होती, तुझ्या आवडीचे पदार्थ केले होते, बाबांनी, काकाने तुझ्यासाठी रजा घेतली होती, टेपरेकॉर्डर दुरूस्त करून घेतला बाबांनी खास तुझ्यासाठी सनई लावायला, मीही शाळेत अर्ध्या दिवसाचं कन्सेशन घेतलं होतं.. बाबांनी तुला आवडतं म्हणून गुलकंदाचं पान तयार केलं होतं.. सगळे किती आनंदात होते.. पण छोट्याशा कारणानं तू चिडून बसलीस नि जेवताना सगळे गप्प झाले.. आम्ही कुणाला आग्रह करू शकलो नाही, नि तू जेवत नसल्यानं कुणी मनापासून जेवू शकलं नाही.’ रडता रडता माझा चेहरा हे ऐकताना गंभीर झाला होता. त्या माझ्या लहानग्या वयात मला आनंद मिळावा म्हणून खरोखरच घरातल्या प्रत्येकानं माझी आनंदाची ओंजळ भरावी म्हणून चिमूट चिमूट आनंद वेचून आणला होता.. पण एका क्षुल्लक कारणाची भेग माझ्या ओंजळीला पडली नि सगळा आनंद त्या भेगेतून सांडून गेला.. आनंद ओंजळीच भरून घेता येत नाहीच !

कृष्णानं त्या गोष्टीत हेच नाही का सांगितलं, जेवण रुचकर होण्यासाठी.. वाटीभर श्रीखंडच लागतं असं नाही तर चिमूटभर मीठ लागतं.. आनंद असा चिमटीनंच वेचायचा असतो.. चिमूट चिमूट वेचून मूठ भरायची असते.. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद टिपायचा असतो.. पण त्यासाठी आधी हा लपलेला आनंद दिसायला हवा.. जसं लशर्रीीूं श्रळशी ळप ींहश शूशी ेष लशहेश्रवशी म्हणतातं तसं आनंदही डोळ्यातच असायला हवा.. म्हणजे आपल्या वृत्तीत असायला हवा.. समाधान आपल्या मनात असायला हवं.अंधशाळेत मेघदूताचा कार्यक्रम ठरला! मेघदूत म्हणजे उत्साहाला उधाण येतं मनात.. त्याच उत्साहात कार्यक्रम स्वीकारला. जसजसा कार्यक्रमाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसं मन अस्वस्थ व्हायला लागलं. कसली तरी टोचणी मनाला लागली.. काय होतंय? कसली हुरहुर आहे? मग जाणवलं.. मेघदूत म्हणजे कालिदासाची चित्रशाळाच जणू.. एकेका श्लोकात एकेक चित्र रंगवलेलं.. रंगांचा सुंदर गोफ विणलेला.. प्रत्येक श्लोक म्हणजे कॅलिडोस्कोप.. कोन बदलला की सौंदर्याची नवी छटा दाखवणारा.. मेघदूताचं हे लावण्य मला नवीन नव्हतं. आत्तापर्यंत अनेक ठिकाणी बोलले होते. मग आताच एवढी हुरहुर का? लक्षात आलं.. कार्यक्रम अंधशाळेत आहे. हा रंगांचा पट आपण त्यांच्यासमोर उलगडायचाय.. ज्यांनी निळं आकाश पाहिलं नाही, काळा ढग पाहिला नाही, गवताचं हिरवं पातं पाहिलं नाही.. कसा उलगडू त्यांच्यासमोर हा सगळा पट? किती निष्ठुरपणा होईल हा! हे कार्यक्रम स्वीकारण्यापूर्वी का लक्षात आलं नाही? मेघदूतावरील प्रेमाने इतके बेभान झालो आपण? आता काय करायचं? घाबरतच शाळेतल्या बाईंना फोन केला. माझ्या मनाची हुरहुर बोलून दाखवली.. विषय बदलण्याचा पर्यायही सुचवला.. पण बाईंनी सांगितले, ‘पत्रकं छापून झाल्येत.. आता काही करता येणं अवघड आहे.’ म्हटलं, ठीक आहे.. विचार केला.. मी कसा पट उलगडू? मी कसे रंग सांगू? मी कसं चित्र उभं करू? यातल्या ‘मी’ मुळे गोंधळ होत होता.. ‘मी?’.. हे कर्तृत्व मी का घेऊ? लिहिलंय मेघदूत कालिदासांनी, ऐकणार आहेत ती मंडळी.. मी फक्त मधला दुवा आहे.. कालिदासांच्या भाषेत ती ताकद नक्कीच असणार.. आपण फक्त मनापासून सांगू.. मेघदूतासारखं कालिदासाच्या काव्याचं दूतत्व करू. दौत्य करू बस! या विचाराने बळ आलं नि कार्यक्रमाला गेले. समोर ७०/८० अंध श्रोते, डोळ्यात कमालीच्या उत्सुकतेने बसले होते. मी सांगायला सुरुवात केली.. जाणवलं त्यांचे डोळे बोलतायत, प्रतिसाद देतायत.. एरवी नाट्यगृहात प्रेक्षकांवर उजेड नसला की त्यांचे डोळे दिसत नाहीत नि बोलताना अस्वस्थता येते.. सुरुवातीला निस्तेज वाटणार्या डोळ्यात हळूहळू कालिदासांच्या शब्दचैतन्याने जणू ज्योति उजळतायत असा भास होऊ लागला.. आकाशातून मेघाला पृथ्वी कशी दिसेल, पर्वत, आमराया, वृक्ष, नद्या, नगरी कशा दिसतील याचं इतकं सुंदर वर्णन.. कालिदासांनी जणू ही पृथ्वी आकाशातून पाहिली असावी. वर्णन करत, कथा सांगत मेघदूत संपलं.. त्या सगळ्या मंडळींना खूप आनंद झाला होता. तो आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता.. एवढ्यात एका अंधश्रोत्याने मला विचारलं, ‘ताई, कालिदास आमच्यासारखा होता का हो?’ त्या प्रश्नाने मन एकदम चरचरलं.. म्हटलं.. ‘का हो असं विचारलंत?’ ते म्हणाले, ‘तुम्ही किती वेळा म्हणालात कालिदासाने हे सगळं आपल्या प्रतिभाचक्षुंनी, मनश्चक्षुंनी पाहिलं असेल.. आज आम्ही मेघदूत कुठल्या चक्षुंनी पाहिलं? मनश्चक्षूंनीच ना? आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं ताई..’

मी पहातच राहिले त्यांच्याकडे वाटलं खरं मेघदूत अनुभवलं यांनी.. दृष्टी असून जो अनुभव आपल्याला येतोच असं नाही, तो अनुभव तो आनंद, दृष्टी नसूनही यांनी घेतला.. आनंद हा कसा मनातच असावा लागतो.. मग डोळ्यांमध्येही तो स्पष्ट दिसायला लागतो.. आपल्या अंतरिक्षात हा मेघदूताचा चिमूटभर आनंद त्यांनी किती उत्कंठेने मिळवला होता..

छोटे छोटे खडे भरलेल्या माठात पाणी घातलं तर आधी ते पाणी खाली जातं आणि मग खड्यांच्या फटीतून वाट काढत काढत ते हळूहळू पृष्ठभागावरती येतं.. आनंदाचंही असंच आहे.. प्रश्न, समस्या, शंका, अडचणी, अडथळे या सार्या खडकांच्या फटीफटीतूनच तो शोधावा लागतो.. मग तो आपसूक मनभर पसरतो, चेहर्यावर दिसतो.. आणि असा चिमूट चिमूट आनंद मिळवू शकणार्याने समोरच्या चिंतातुर खुशाल विचारावं, इस चुटकीभर आनंद की किंमत तुम क्या जानो, चिंतातुर बाबू?

-धनश्री लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..