नवीन लेखन...

“छत्री धर”

पूर्वी पावसाळा सुरु झाला की, माळ्यावर ठेवलेल्या छत्र्यांचा शोध घेतला जायचा. त्या नादुरुस्त असतील तर त्यांची दुरुस्ती केली जायची. प्रत्येक पेठेतील एखाद्या चौकात छत्री दुरुस्ती करणारा दिसायचाच. काही फिरते छत्री दुरुस्ती करणारे गल्लीतून ‘ए छत्रीऽऽवाला’ असं ओरडत जाताना दिसायचे. जुन्या काळ्या छत्र्या, मोठ्या आणि दणकट असायच्या. तिची मूठ लाकडी असायची. कापडही चांगल्या दर्जाचं असायचं. दहा वीस वर्षांचे पावसाळे त्या आरामात सहन करायच्या.

त्याकाळी कित्येक शिक्षक, सरकारी नोकरीतली माणसं बाराही महिने छत्री जवळ बाळगत असत. धोतर, कोट, टोपी व छत्री हीच त्यांची ओळख असे. वयस्करांना छत्रीचा उपयोग चालताना आधाराच्या काठीसारखा होत असे. काहीजण छत्री आपल्या पाठीवर शर्टाच्या काॅलरमध्ये अडकवून चालत असत. काहीजण सायकलवरुन जाताना छत्री सायकलच्या हॅण्डलला अडकवत किंवा सायकलच्या आडव्या दांडीला अडकवून ठेवत.

त्याकाळात वर्तमानपत्रात एका सहलीची बातमी आली होती..एक शिक्षक मुलांना घेऊन वीज निर्मिती प्रकल्प दाखविण्यासाठी सहलीला घेऊन गेले. ते नेहमी छत्री जवळ बाळगत. एका वीजेच्या यंत्रापुढे उभे राहून छत्रीचा छडीसारखा वापर करुन ते मुलांना माहिती सांगत होते, नकळत त्यांनी आपल्या हातातील लोखंडी छत्रीचे टोक त्या यंत्रावर टेकविले. क्षणार्धात वीजेचा प्रवाह छत्रीतून त्यांच्या शरिरात गेला व ते मृत्युमुखी पडले.

कालांतराने या मोठ्या काळ्या छत्र्या इतिहासजमा झाल्या. नवीन बटन दाबले की, उघडणाऱ्या फोल्डिंगच्या छत्र्या प्रत्येकाच्या हातात दिसू लागल्या. पुरुष मंडळी काळ्या रंगाच्या व स्त्रिया रंगीत फुलाफुलांच्या डिझाईनच्या छत्र्या वापरु लागले. यांचा टिकाऊपणा कमी होता, एक पावसाळा गेला तरी पैसे वसूल, अशीच त्यांची योग्यता होती.

काही वर्षांनी पर्समध्ये बसेल अशी दोन फोल्डची छत्री मिळू लागली. या तैवान किंवा चीनमधून आयात केलेल्या असायच्या. या नाजुक छत्र्यां, सोसाट्याच्या पावसामध्ये उलट्या होत असत आणि एकदा बिघडल्यावर दुरुस्ती करणे जिकिरीचे असायचे.

आमच्या लहानपणी घरात दोनच छत्र्या असायच्या. त्यांचा वापर मोठी माणसंच करायची. शाळेत जाताना मी कधीही छत्री नेल्याचं आठवत नाही. शाळा सुटल्यावर पाऊस पडत असेल तर तो उघडण्याची वाट पहायचो. थोडा कमी झाला की, कडेकडेने पळत घर गाठायचो. बहुधा वह्या पुस्तकंही भिजायचीच. रेनकोटचे चोचले कधी केलेच नाहीत. काॅलेजला मात्र मी छत्री वापरु लागलो.

छत्री ही हमखास विसरण्याची वस्तू आहे. आपण जर पावसातून छत्रीचा वापर करुन कुठे गेलो. काही वेळ तिथे थांबलो. परतताना पाऊस पडत नसेल तर शंभर टक्के छत्री बरोबर घेतल्याचे लक्षात रहात नाही.

एकदा रात्रीच्या शोला आम्ही दोघे बंधू ‘अलका’ टॉकीजला गेलो होतो. जाताना पाऊस होता म्हणून शेजाऱ्यांची छत्री बरोबर घेतली होती. काढलेल्या तिकीटाच्या सीटवर बसून चित्रपट पाहिला. रात्री बारा वाजता चित्रपट संपला. आम्ही उठून सरळ घरी आलो. आल्यावर छत्रीची आठवण झाली, तडक पळत टॉकीजवर गेलो. त्या डोअरकिपरला तिकीट दाखवून छत्री विसरल्याचं सांगितलं. नशीबाने सीटवरील ‘छत्री’, आमचीच वाट पहात होती.

भर पावसात छत्री हातात घेऊन रस्त्याने जाताना अनेकदा कसरत करावी लागते. शेजारुन जाणाऱ्या छत्रीला धडक बसून नये म्हणून छत्रीला समोरच्या माणसाच्या उंचीनुसार खाली वर करावे लागते. पुढून येणाऱ्या माणसाला आपल्याला चुकवायचे असेल तर छत्रीने तोंड झाकून पुढे जाता येते.

कित्येकदा आपण पाऊस पडतोय म्हणून छत्री उघडून चालत असतो, काही वेळाने पाऊस उघडल्याचे आपल्या लक्षातही येत नाही व आपण पाऊस नसताना छत्री तशीच उघडी ठेवून ‘कोंबडा’ होतो.

आता निसर्ग बदलून गेलाय. पाऊस फक्त पावसाळ्यातच नाही तर उन्हाळ्यात व हिवाळ्यातही पडतो. त्यामुळे छत्री हाताशीच ठेवावी लागते. आता चालणाऱ्यांचं प्रमाण फारच कमी झालं आहे. जे चालतात, तेच छत्री वापरतात.. बाकीचे रेनकोट, रेनसूट घालतात.

आता मिळणाऱ्या छत्र्या या वापरा आणि फेकून द्या, अशा स्वरुपाच्या आहेत. त्या बिघडल्यावर दुरुस्ती करणारे आता कुठेही दिसत नाहीत. दुरुस्ती करण्यापेक्षा ती टाकून नवीन घेण्याची मनाची तयारी असते.

मी देखील परवाच एक नवीन छत्री घेतली आहे, या सीझनपुरती जरी ती टिकली तरी ‘पैसे वसूल’!!!

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

१३-६-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..