नवीन लेखन...

स्वतःला घडविताना !

प्रत्येकाला स्वतःमधील कोणीतरी असा “स्वतः “घडविता आला पाहिजे, ज्याचा इतरांना अभिमान वाटेल, स्वतःची मान गर्वाने उन्नत करता येईल आणि जे डोळ्यापुढे असेल, ते हाताच्या आवाक्यात आणता येईल. त्या वाटेवरील काही पायऱ्या –

१) स्वानुभवांना सर्वोच्च प्राधान्य देणे

जेव्हा काहीतरी करावे असे उसासून वाटेल, तेव्हा ते लगेच करावे. त्यांत चालढकल करू नये. स्वामी शिवानंद सरस्वती म्हणत – डीन (डू इट नाऊ) अशावेळी आपली अंतःस्फूर्ती, बुद्धीपेक्षा अधिक सकस ठरते आणि फलदायिनी असते.

अतिविचार करणे काहीवेळी त्रासदायक ठरू शकते. ” मी चूक केली, लोक काय म्हणतील, सगळे माझ्याकडेच बघताहेत, मला जमेल नं हे ? ” या आणि अशा विचारांच्या ओझ्याखाली आपण दबून जाऊ आणि कृतिहीन होऊ. अशावेळी शांतपणे “आतल्या स्वराकडे ” वळावे, तो सहसा फसवत नाही. हे विचारचक्र धीमं करायचं असेल आणि योग्य निर्णय (व त्याद्वारे कृती) घ्यायचा असेल तर – ज्यात -त्यात परिपूर्णतेचा अट्टाहास सोडावा, डोळ्यांसमोरील प्रसंगाचे /घटनेचे योग्य मूल्यमापन करावे, अंतःप्रेरणेला वाव द्यावा, निर्णय प्रक्रियेत येणारा थकवा बाजूला करावा आणि सकारात्मक सर्जनाची बांधणी करावी.

परिपूर्णतेचा ध्यास कधीकधी वेळखाऊ असतो, संयमाची परीक्षा घेणारा ठरतो आणि त्याचे वेळ या  घटकाशी वैर असते. त्यामुळे सतत हा ध्यास तारतम्याच्या तराजूत तोलून बघायचा असतो. घडण्याच्या प्रक्रियेला खीळ बसणार असेल तर स्वतःला विचारावे – एक कोणते पाऊल टाकले की मी माझ्या ध्येयाच्या जवळपास जाऊ शकेन? माझ्याजवळ उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आता काय करता येईल? अवघड निर्णय घ्यायच्या वेळी, कधी वेळ अथवा माहिती कमी असेल तर सरळ अंतःस्फूर्तीवर विसंबून राहावे. अंतःस्फूर्ती आणि विचक्षणा ही जोडगोळी आपणास नक्कीच आपल्या गंतव्यापाशी नेऊन सोडते. फक्त बुद्धीवर सगळं सोडण्यापेक्षा हा रस्ता अधिक आत्मविश्वास देतो. आणि शेवटचा मुद्दा – सर्जनात्मक बंधने स्वतःवर घालणे ! उदा. किती तारखेपर्यंत निर्णय घेणार, हे कोठेतरी ( दिनदर्शिकेवर) नोंदवून ठेवावे, म्हणजे स्वतःवर नजर ठेवता येते.

२) मूल्यमापनाचा केंद्रबिंदू आतमध्ये ठेवावा

प्रत्येकाने जगण्याची मानके स्वतः ठरवावीत, स्वतःचे मूल्य स्वतः ठरवावे, आणि स्वक्षमतांनुसार जगण्याची दिशा ठरवावी. मला सुखावणाऱ्या, समाधानी करणाऱ्या मार्गांनी मी जगतोय का, आणि त्यातून मी पुरेसा व्यक्त होतोय का? हे नियोजनच भावी ताणतणाव कमी करण्याचे एक प्रभावी हत्यार असते. वरकरणी ही अस्तित्ववादी संकल्पना वाटू शकते आणि हे सारं नियत असतं आणि कोणीतरी ठरवून दिल्यानुसार होत असतं अशी विचारसरणी असलेल्यांचे लक्ष्य होऊ शकतं. मात्र येथील अर्थ एवढाच आहे की इतरांची मते आणि अपेक्षा यांनी आपल्या आयुष्याची दिशा ठरवू नये. आपले निर्णय स्वतः घ्यावेत. स्वतःचे मूल्यमापन स्वतः करावे, त्याची मोजपट्टी स्वतःकडे ठेवावी आणि परिणामांची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी. त्यासाठी इतरांवर दोषारोपण करू नये.

३) घडण्याच्या प्रक्रियेचे तटस्थ निरीक्षक व्हा

आपण प्रक्रियेतून घडत जातो. आणि इंग्रजीत एक म्हण आहे – “कोणतीही चांगली प्रक्रिया कधीच वाईट /चुकीचे फळ निर्माण करीत नाही.” मग जसे आपण घडत असतो, तीच प्रक्रिया इतरांनाही लागू असते. म्हणजे आपल्या उणीवा, चुका या कायमच्या नसतात, त्या सुधारता येतात. अर्थात त्यांना मदत केलीच पाहिजे असे नसते पण किमान त्यांना निश्चल, न बदलू शकणारे तरी मानू नये. घडण्या-बिघडण्याची प्रक्रिया सतत सुरु असते. हात असावेत दिशानियंत्रण करणाऱ्या सुकाणूवर! “रफ्तार” मध्ये मुकेशच्या सुंदर ओळी आहेत –

“चलते हुए जीवन की, रफ़्तार में इक लय है I

  इक राग में इक सुर में, सँसार की हर शय है I

  इक तार पे गर्दिश में, ये चाँद सितारे हैं I”

आपलं बाह्यरूप जगाला दिसत असतं आणि ते चित्ताकर्षक असावं याचा स्वाभाविक प्रयत्न सर्वजण करत असतात. पण आतमधील रूपाचे काय? त्याच्या सहवासात सतत राहायचे असते, ते अधिक चांगले घडवायचा प्रयत्न करायला हवा. ते भलेही इतरांना दिसत नसले तरी ते देखणे ठेवायलाच हवे.

४) परिस्थितीचा स्वीकार

आपण बरेचदा “योगायोग” असे गोंडस नांव देतो, पण खरंतर जे व्हायचं असतं ते होऊन जातं. परिस्थिती आपण निवडत नसतो. ती सांगून येत नसते आणि सांगून जात नसते. फक्त ती कालांतराने बदलत असते. काळाप्रमाणे परिस्थितीही स्थिर नसते. सावली मिळाली की उन्हासाठीही तयारी ठेवायची असते. निवड आपल्या हातात नसते. “ज़िन्दगी मेरे घर आना, आना ज़िन्दगी!” असं परिस्थितीचं हसून स्वागत करावं. स्वीकार अनेक प्रकारचे असतात – भावनिक, सशर्त, विनाअट, स्वतःचा आणि इतरांचाही! मग परिस्थिती सुधारण्याची अविरत धडपड आणि प्रयत्नांना पूर्णविराम देता येतो.अंतःकरणात मळ असलाच तर तो दूर करता येतो. आतला खरेपणा जसजसा आणि जितका उघड होतो तितकाच दुसऱ्यांमधील खरेपणा जाणवू लागतो. त्यासरशी अवकाश गवसतो- स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी! दुसऱ्या व्यक्तीला त्याचे “स्व “शोधायला मदत करणे आणि त्यासाठी घडण्याच्या प्रक्रियेची तोंडओळख करून देणे ही किती सुंदर भेट आहे. मानसशास्त्र हेच काम तर करीत असते. स्वतःला आपण जाणत असतो (तेही आपल्या मानण्यावर अवलंबून असते) पण कितपत ओळखत असतो?

५) आयुष्याला स्वतःची गती आणि केव्हा/कसे उमलायचे याचे स्वातंत्र्यही असू देत

वरील स्वीकाराचा नियम येथील पाया असतो. आपण मालक असल्याच्या आविर्भावात जीवनाला दिशा, वेग देत असतो, त्याच्यावतीने निर्णय घेत असतो. जीवनाशी सल्लामसलत करण्याची आपणाला गरज वाटत नाही. मग ते आपल्या मागे फरफटत, निमूटपणे येते. आणि मग आपल्याला सर्वशक्तिमान वगैरे झाल्याचा भास होतो. याचा पुढील भाग म्हणजे आपण इतरांना संदेश, उपदेश द्यायला लागतो, विशेषतः आपल्या मुलांचे सर्वाधिकार कोणीही न सोपविता हक्काने हाती घेतो. प्रवाही/ वाहतं आयुष्य दोन्ही हातांनी ओंजळी भरभरून देत असतं. आणि त्याला स्वतःची गती असली, ते स्वतःमध्ये गुंतलेलं असलं की आपोआप देखणं होतं. तेव्हा रोजच्या श्वासावर जितकं कमी नियमन /नियंत्रण असेल तितकं हायसं /मोकळं वाटतं. कधीतरी सकाळी उठल्यावर दिवसाचं नियोजन खिडकीतून आयुष्याबाहेर भिरकावून द्यावं, “काय करायचं आहे” याची यादी विसरून जावं. दूरध्वनी नसावेत, नियोजित भेटी नसाव्यात. याचा अर्थ उत्पादकता शून्य असा होत नाही.हे एकप्रकारचं पुढे जाणंच असतं. फक्त अनुभवाचा हात धरायचा, चौकटी अमान्य करायच्या आणि जगत राहायचं.

६) आयुष्यात थोडीबहुत संदिग्धता, संभ्रमावस्था असावी

पटकन हा मुद्दा कदाचित गळी उतरणार नाही, पण सध्याच्या समाजासाठी तो आवश्यक बनलेला आहे. ही पायरीसुद्धा स्वीकार तत्वावर आधारित आहे. संदिग्धता, द्विधावृत्ती, अनिश्चितता हे सगळे अनुभव वाट्याला येत असतात /यावेत. सत्य फक्त काळ्या-पांढऱ्या रंगांमध्ये गुरफटलेले नसते. किंवा संगणकीय भाषेप्रमाणे वास्तव “द्वि-अंकी ” (बायनरी) नसते. याहून वाईट असे की बरेचदा उत्तरही नसते. आपल्या आयुष्याचे काहीतरी चांगले करण्याच्या प्रयत्नात बव्हंशी उत्तरे मिळूनही जातात.

ती पटतीलच असे नाही, पण वास्तवाचे प्रतिबिंब नक्कीच असतील तेव्हा त्यांना कवटाळायलाच हवे. ही मनोभूमी जणू आपली सहनिवासी आहे हे सत्य असते आणि ते आपल्या घरात केव्हाही आणि कोठेही डोकावू शकते. तेव्हा या सत्याबरोबर गट्टी करायला हवी.

७) इतर कोणी असणे —- नको रे बाबा!

स्वतःचे कठोर मूल्यमापन करताना स्वतःच्या ठायी इतर कोणाला ठेवून करू नका. चौकट स्वतःभोवती घट्ट रोवा. इतर कोणी असणे, दुरून कितीही चांगले ,आल्हाददायी वाटत असले तरी त्या व्यक्तीचा सदरा परिधान करून बघितला की दूरचे डोंगर साजरे वाटू लागतात. स्वतःला स्वीकारण्यात निराशा नसते, पण स्वतःच्या ठायी इतरांना कल्पण्यात असते. अस्सलपण नाकारणे म्हणजे विश्वासघात, स्वतःला फसविणे ! मी जसा आहे,तसा आहे ही निवड सगळ्यांत अवघड असते  आणि म्हणून जबाबदारीही असते.

प्रेम आणि उजेडाच्या प्रकाशात दुर्लक्षिले जाण्यात अर्थ नाही. स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रत्येक ज्वाळेने विश्व चेतवावे, हे उचित! या घडण्याच्या प्रवासात कधी ना कधी आपल्या अलौकिकत्वाचा कप्पा गवसून जातो. तुमचे श्रेष्ठत्व कशात असते आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी समाधान /संतोष देत असतात. तरीही स्वतःला जोखण्यासाठी काही प्रश्न विचारावे असं वाटलं तर खाली काही प्रश्न देत आहे. यांच्या उत्तरात घडण्याचा प्रवास प्रकाशमान होतो. बरेचदा असे प्रश्न इतरजण विचारत असतात, अशावेळी साहजिकच खरी (कदाचित बोचरी, दुखावणारी) उत्तरे देण्यापेक्षा आपला कल समोरच्याला सुखावणारा असू शकतो. पण काहीवेळा हे प्रश्नांचे टोकदार भाले आत वळवावेत आणि प्रामाणिकपणे उत्तरे द्यावीत-

१) एखाद्या क्षणी आत्मविश्वास खच्ची झाल्यासारखे वाटते त्यामागे काय कारणे असतात?

खरं तर कधी ना कधी आपणा सर्वांना आत्मविश्वासाची उणीव भासत असते. पण यामागची कारणे आपण कधीच शोधत नाही. बऱ्याचदा यामागे अतार्किक भीती असते, कोणतेही भक्कम असे कारण नसते.

२) इतरांच्या मतांनुसार /मर्जीनुसार आपण कितीवेळा निर्णय घेतो?

सतत इतरांचा विचार करत,त्यांना काय वाटेल,काय आवडेल असेच आपण वागत असतो. बाकीच्यांच्या नजरेत आपले स्थान कसे उंचावेल याच्याच विचारात आपण असतो. कधीतरी छोटे-मोठे निर्णय आतल्या आवाजाला विचारून आपण घेतो का? घरच्यांना हवे ते कार्यक्षेत्र निवडायचे, निवडलेल्या वधू – वराशी विवाहाला होकार देणे असा स्वार्थत्याग आपण करत असतो (आणि कदाचित नंतर पश्चात्ताप करीत राहतो.)

३) कोणतीही गोष्ट करण्यापासून एखादी भीती आपल्याला मागे खेचत असते कां?

खूप काही करावेसे वाटते- स्टेजवर गाणे म्हणावेसे वाटत असते, नवरात्रीच्या गरब्यात किंवा एखाद्या मिरवणुकीत नाचावेसे वाटते, चित्रपटगृहात सणसणीत शिट्टी वाजवाविशी वाटते पण “लोक काय म्हणतील?” किंवा संस्कार आपली पावले मागे ओढत असतात. बरेचदा जे करण्याची सगळ्यात जास्त भीती वाटत असते, तीच गोष्ट आपल्याला खुलं /मोकळं करते.

४) कशाप्रकारची आव्हाने पेलायला आवडेल?

दिलेल्या समस्या आणि रोजची सामान्य आव्हाने आपल्याला पारखत नाहीत. खरं तर आपल्या क्षमता तपासणाऱ्या घटनांना सामोरे जायला हवे, यातून आपली वाढ,आपला विकास याचा अदमास लागू शकतो.

५) आपला प्रभाव इतरांवर कशाप्रकारचा पडावा? (आपण कोणत्या कारणांसाठी लक्षात ठेवले जावे?)

आपली प्रतिमा सद्गृहस्थाची असावी, आपण सहृदयी म्हणून ओळखले जावे, दानशूर म्हणून परिचित असावे की कंजूस, फटकळ, स्वार्थी याचा दीर्घकालीन विचार आधीच केलेला बरा !

या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक मिळाली तर विसोबा खेचरांच्या भाषेत “मडकं घडलंय” म्हणायला आपण मोकळे ! मग आपल्या आत दडलेल्या माणसावर सगळेच प्रेम करू लागतील.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..