इन्स्पेक्टर शर्मांचा फोन आला तेव्हा पंत , रेल्वे स्टेशनच्या स्वच्छतागृहात होते .
तसे ते ‘मोकळे ‘ झाले होते .
पण बेसिन जवळच्या ज्येष्ठ नागरिक म्हणता येईल अशा माणसाकडे ते पहात होते .
गेली सात ते आठ मिनिटे तो माणूस चेहरा धूत होता . नॅपकिन ने कोरडा करत होता . स्वतःभोवती सगळीकडे फिरून चेहरा निरखित होता . पुन्हा चेहरा धूत होता . पुन्हा कोरडा करत होता . पुन्हा… पुन्हा…
सुरुवातीला ते गमतीने या प्रकाराकडे पहात होते . पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे .
त्यांच्या लक्षात आलं , तो माणूस वेगवेगळ्या अँगलने उभा राहून नुसतं आरशात पहात नव्हता . तर वेगवेगळ्या अँगलने मोबाईलवर सेल्फी घेत होता . मनासारखा सेल्फी आला की लगेच सोशल मीडियावर टाकत होता . पंधरावीस सेकंदाने किती लाइक्स मिळाल्या ते चेक करत होता आणि लाइक्सचा मनासारखा आकडा दिसला नाही की पुन्हा तोंड धूत होता . पुन्हा सेल्फी … पुन्हा सारखा सारखा मोबाईल चेक करणं …
असं त्याचं कितीतरी वेळ चाललं होतं .
पंत स्थळकाळ विसरून त्याच्याकडे पहात होते .
जसजसा वेळ जात होता तसतसा तो अधिकाधिक निराश होताना दिसत होता .
शेवटी त्याची सहनशीलता संपली असावी .
काहीशा अनिच्छेनं तो तिथून हलला आणि पाय ओढत निघाला .
पंतांना राहवलं नाही .
ते वयाला न शोभणाऱ्या चपळतेनं त्याच्या जवळ गेले .
” वय किती तुमचं ? ”
त्यांनी विचारलं आणि तो एकदम दचकला . पावसाळ्यात रस्त्यावरच्या पाण्याचा अंदाज येऊ नये आणि अचानक पाय खड्ड्यात जावा . तसं त्याचं झालं .
” काय म्हणालात ? वय ? सत्तर आहे वय माझं ! ”
पंत हसले .
” सहज चौकशी केली . ”
” सहज नाही . मला तुम्ही न्याहाळत होता , हे मी बघितलंय आरश्यात . तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना ? स्वाभाविक आहे . मी सेल्फी काढतो आणि सोशल मीडियावर टाकतो . लाइक्स आणि कमेंट्स साठी . पण कुणी काळा कुत्रा सुद्धा ढुंकून बघत नाही . तरीही मी सेल्फी काढतो , टाकतो . ”
” कशाकरता ? ”
” अं ? ”
क्षणभर तो गोंधळला .
त्याला काही सुचेना .
” मला माझी प्रतिमा उजळायची आहे . लोकांच्या मनात घर करून बसेल असं काहीतरी करून दाखवायचं आहे . ”
तो म्हणाला .
” अशाने साध्य होईल असं वाटतं तुम्हाला ? ”
” म्हणजे ? सध्याचा जमानाच असा आहे . जितका वेळ तुम्ही त्यांच्या समोर असाल तितके तुम्ही लोकप्रिय व्हाल . ”
” गेली किती वर्षे हा उद्योग करताय ? ”
” निवृत्त होण्याच्या आधीपासून. . तेव्हा मला बरेच लाइक्स मिळायचे . बॉस असल्याने अनेकजण मस्त कॉमेंट्स करायचे . शेअर करायचे . पण रिटायर्ड झालो नि सगळा ओघ आटला . मग जिद्दीनं मी पुन्हा फोटो पाठवू लागलो . पण कुणी ढुंकून बघेनासं झालं . ओळखीचे समोर दिसले की ते तोंड फिरवू लागले . मग मी अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू लागलो . तर अनेकजण मला ब्लॉक करू लागले . तुम्हाला सांगतो माझी झोप उडून गेली . डोक्यात केवळ लाइक्स , शेअर , कमेंट्सचा भुगा पाठी लागला . मग मी नवीन युक्त्या शोधल्या . गर्दीच्या ठिकाणी लोकांना थांबवून मी फोन नंबर्स द्या म्हणून सांगू लागलो . कधी गयावया करून , कधी खोटं बोलून त्यांचाच फोन घेऊन माझ्या नंबरवर मिसकॉल देऊन त्यांचा नंबर मिळवू लागलो . वेळ प्रसंगी मार सुद्धा खाल्ला आहे . ”
पंत बघत बसले .
अत्यंत निर्लज्जपणे समोरचा सत्तरीतला माणूस सांगत होता . वेळप्रसंगी मार सुद्धा खाल्ला आहे .
” भल्या माणसा , तुझी माझी ओळख नाही तरीही विचारतो , घरचे लोक काही बोलत नाहीत ? त्यांना काही सांगत नाहीस ? ”
पंतांनी विचारलं .
तो हसला .
अगदी कोडग्यासारखा .
” मी घरात असेन तर सांगणार ना ?”
” म्हणजे ? ”
” मला माझं घर आठवतच नाही . माझी माणसं , नातेवाईक आठवत नाहीत . म्हणजे कधीतरी सगळं आठवतं . मग जातो घरी . कुणीतरी हातात जेवण आणून देतं . माझ्याशी कुणी बोलत नाही . सगळ्यांच्या कपाळावरच्या आठ्या मला स्पष्ट दिसतात . मी बघतो आणि सोडून देतो . माझी मुलगी तेवढी विचारपूस करते . अंदाजाने मोबाईलचा रिचार्ज मारते . घरी गेलो की बरेचसे पैसे खिशात ठेवते .मला आठवत नाही पण बहुतेक मी तिला एटीएम चे कार्ड दिले असावे . ती मुलगी लाडकी असावी बहुधा माझी . पण तिचे नाव आठवत नाही . बायको जिवंत असावी बहुधा , कारण भिंतींवर तिचा किंवा माझा हार घातलेला फोटो दिसत नाही . घरात बरीच माणसं दिसतात , लहान मुलं दिसतात . पण कुणाची ते आठवत नाही . कदाचित माझीच असावीत नातवंडं . आणि तुम्हाला सांगतो , मला भरपूर सन्मान मिळाले असावेत . भरपूर पैसे मिळाले असावेत पण कुणी दिले ते आठवत नाही . पैसे , मानसन्मान याचा विचार करण्यात रात्र संपून जाते . झोपच लागत नाही . सुरवंट मेंदूला कुरडत असावेत . मला काहीतरी होतंय असं वाटत राहतं. पण कुणाला सांगावं ते कळत नाही . घरातले सगळे मेले किंवा माझ्या वागण्यानं आत्महत्या केली असावी . मग मी मन कुणाजवळ मोकळं करणार ? मग मी सेल्फी काढतो . माझा मलाच न्याहाळतो . सोशल मीडियावर टाकतो . आणि पुन्हा पुन्हा चेक करतो कुणाच्या कमेंट्स आल्या आहेत का ? पण सगळे बिझी असतात . माझ्यासारख्या महान व्यक्तीला डावलणाऱ्या लोकांच्या मेंदूत केमिकल लोच्या झाला असावा . तुम्ही म्हणाला महान कसा , तर परवा दिल्लीतून मला फोन आला . कुणाचा माहितेय ? कुणाचा बरं ? आणि तुम्ही कोण ? मी तुमच्याशी का बोलतोय ? मला तुमचा फोन नंबर देता का ? फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकतो .आणि व्हॉटसॲपला ॲड करून घेतो . आणि हो मी वेडा नाही . व्यवस्थापकीय संचालक होतो मी कंपनीत . गैरसमज करून घेऊ नका . ”
बोलता बोलता त्याने पुन्हा मोबाईलवर स्क्रोल करायला सुरुवात केली .
तरीही तो अखंड बोलत होता . संदर्भ घेऊन . संदर्भाशिवाय . अनाकलनीय .
अचानक तो निघाला . पंत बघत बसले . आणि दहा पावलं चालल्यावर काहीतरी आठवण झाली तसा तो पाठी फिरला . खिशातून व्हिजिटिंग कार्ड काढलं .
” हा माणूस आणि त्याच्या नावाखालचा पत्ता तुम्ही शोधून काढू शकाल का ? मी त्याला ओळखतो . पण आत्ता तो कुठे असेल ते सांगता यायचे नाही . जरा त्याच्या घरी जाऊन येतो . ”
” तुमचं नाव काय ? ” पंतांनी विचारलं . त्यानं नाव सांगितलं . त्याने दिलेले कार्ड पंतांनी नीट पाहिले . त्या कार्डावर त्याचेच नाव होते .
त्याला हे सांगण्यासाठी त्यांनी मान वर केली .
तो माणूस समोर नव्हता . झपाझप चालत निघाला होता .
पंतांनी एकदा कार्डाकडे नजर टाकली आणि त्या जाणाऱ्या माणसाकडे पाहिलं .
दिशांचं भान नसणाऱ्या आणि अनोळखी वाट दिसल्यावर चाचपडत जाणाऱ्या माणसासारखा वाटला तो.
त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिलं .
आता त्यांच्या मेंदूत केमिकल लोच्या निर्माण होऊ लागला .
सत्तरीतल्या सुशिक्षित माणसाची मोबाईलच्या वेडाने केलेली दैना बघून त्यांना गलबलून आले .
त्यांनी डोळे टिपले .
इतक्यात फोन वाजला . स्क्रीनवर इन्स्पेक्टर शर्मा असं नाव दिसलं .
” दहा मिनिटात येतोय मी . ”
त्यांनी सांगितलं आणि समोरच्या रिक्षाला थांबवलं .
हॉस्पिटलचा पत्ता सांगितला .
आणि त्यांनी डोळे मिटून घेतले .
नजरेसमोर अजूनही त्यांच्याच वयाचा पण मेंदूचा लोच्या झालेला ‘तो ‘ माणूस उभा होता .
( वास्तवात घडत असलेली तुमच्या आमच्या अवतीभवतीची कथा !)
——-
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१


Leave a Reply