१ : अनावर
हातात हातोडी .
चेहऱ्यावर प्रचंड संताप .
वय वर्षे सत्तर , पण देहबोलीतून जाणवणारा निग्रह स्पष्ट दिसत होता .
त्यांच्या पाठून धावणाऱ्या आणि ते सापडले की त्यांना ठेचून काढण्याची भाषा करणाऱ्या तरुण पोरांची एव्हाना दमछाक झालेली .
पंत पुढं पळत जात होते .
नेमकं कुठं जायचं हे त्यांना माहिती होतं .
पण त्यांच्या पाठून पळणाऱ्या आणि डोळ्यात खून चढलेल्या तरुणाईच्या लक्षात येत नव्हतं, की पंत त्यांना घेऊन पोलिस स्टेशनच्या आवारात घुसले आहेत .
एखाद्या झंझावातासारखे पंत स्टेशनमध्ये घुसले आणि हातातली हातोडी इन्स्पेक्टरच्या टेबलावर ठेवली .
इन्स्पेक्टर दचकून उभे राहिले .
आणि बघतच राहिले .
घामाने निथळणाऱ्या आणि फुललेला श्वास आवरणारे पंत काहीतरी सांगू इच्छित होते .
इन्स्पेक्टरनी त्यांना बसायला सांगितलं . प्यायला पाणी दिलं .
” काय झालंय काका ? ”
त्यांनी विचारलं .
पंतांनी दीर्घ श्वास घेतला .
” गार्डन मधल्या तरुण पोरांचे आठ दहा मोबाईल या हातोड्याने ठेचून , फोडून टाकलेत . आणि हा गुन्हा असेल तर मला अटक करा . हे सांगायला आलोय . ते तरुण माझ्या पाठी लागलेत . मला मारणार आहेत . त्या मरणाला मी घाबरत नाही . पण मोबाईल पायी स्वतःचा मेंदू कुजवून ब्रेन रॉट ची शिकार होण्यापासून ते सगळे तरुण वाचले पाहिजेत . ”
” ब्रेन रॉट ? म्हणजे काय ? ”
इन्स्पेक्टर नी कुतुहलानं विचारलं आणि पंत सांगू लागले …
त्याचं बोलणं थांबलं .
इन्स्पेक्टरनी मनाशी निर्णय घेतला .
त्याच क्षणी ते तरुणांचं टोळकं स्टेशनमध्ये शिरलं.
” या म्हाताऱ्यानं आमचे महागडे मोबाईल फोडून टाकले आहेत . याला अटक करा नाही तर आमच्या ताब्यात द्या . ”
त्यातल्या एकानं गुर्मीत सांगितलं .
” तुझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते . अरे जारे करतोस ? ”
इन्स्पेक्टरनी त्याच्या पाठीत रट्टा हाणला .
तो कळवळला .
” मोबाईल यांनीच फोडले याचा काही पुरावा आहे? ”
” आम्ही सांगतोय ना .”
” कोण तुम्ही ? इथे बेकायदेशीरपणे जमा होऊन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून लॉकअप मध्ये टाकेन . गुमान घरला जावा . आणि या काकांना त्रास दिलात तर माझ्याशी गाठ आहे . ”
त्यांनी दम भरला .
सगळ्यांना हाकलून दिलं .
” सहाशे दोन , काकांना घरी सोडून ये . आणि काका आज तुम्हाला आम्ही वाचवलंय , पण नेहमी आम्ही असू असं नाही . सांभाळून काय करायचं ते काम करा . तुमचा उद्देश चांगला आहे , पण तो वर्तमानातल्या सगळ्यांना पटेल , पचेल , रुचेल असं नाही . आम्हाला पटलंय तुमचं काम . आम्ही आहोतच तुमच्या पाठीशी . पण तरीही सावध रहा .”
पंत उठले .
” तुमचं म्हणणं खरं आहे , पण ब्रेन रॉट पासून वाचवायला कुणी तरी पुढाकार घ्यायला हवाच ना . ते काम मी करतो . मी खूप अनुभवलं आहे साहेब . यातले धोके आणि जागतिक स्तरावरील या सगळ्याचं प्लॅनिंग मला कसं कुणास ठाऊक , पण जाणवतंय . पण तुमचं म्हणणं लक्षात ठेवीन . आणि हो मदतीबद्दल आभार . ”
पंत उठले . त्यांनी हस्तांदोलन केलं आणि सहाशे दोन बरोबर बाहेर पडले .
पंत सवयीनं चालत होते पण समोर कोळ्याचं जाळं त्यांना दिसत होतं . आणि दबा धरून बसलेला कोळीसुद्धा दिसत होता .
अनावर झालेला !
( वास्तवात घडत असलेली तुमची आमची कथा )
———
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१
———-
ब्रेन रॉट ही कथामालिका आजपासून सुरू करीत आहे .
ब्रेन रॉट पासून समाजातल्या सर्वांना वाचवायचं असेल तर ही कथा मालिका सर्वांनी वाचायला हवी आणि नावासह सर्वत्र पाठवायला हवी .
आपल्याला एका भयंकराशी सामना करायचा आहे , याची जाणीव असो द्यावी .


Leave a Reply