नवीन लेखन...

ब्रेन रॉट – २ : ‘ ते ‘ पंधरा सेकंद !

२ : ‘ ते ‘ पंधरा सेकंद !

पंतांच्या निग्रही चालण्याकडे पाहणारे इन्स्पेक्टर शर्मा एकदम दचकले .

त्यांना पंतांचे शब्द आठवले .
” ब्रेन रॉटची शिकार …”

ते पटकन उठले .
काहीतरी वेगळी जाणीव झाली .
त्यांनी ड्रायव्हरला हाक मारली . तो धावतच आला .

” आपल्याला कालच्याच हॉस्पिटलला जायचंय , अर्जंट .”

बोलता बोलता त्यांनी कॅप हाती घेतली . आणि धावतच निघाले .

अर्ध्या तासात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले .
गाडी थांबताच जवळ जवळ धावतच निघाले .

स्पेशल वॉर्ड मध्ये कॉटवर ‘ तो ‘ बसला होता .
शेजारच्या कॉटवर त्याचे आईबाबा , आजी आजोबा संचित होऊन बसले होते .एकटक त्याच्याकडेच बघत होते .
त्याला कसलीच जाणीव नव्हती .

भकास कोरड्या चेहऱ्यानं तो बसला होता .
डोळे खोल गेले होते .
कितीतरी दिवसांचा उपाशी असावा , तसा तो दिसत होता .

तो पंचवीस वर्षांचा होता हे सांगून कुणाला पटलं नसतं .
वीस लाखांचं पॅकेज असणारी नोकरी .
मेट्रो सिटीत थ्री बी एच के चा फ्लॅट .
ऑडी आणि थार सारख्या गाड्या .
वडिलोपार्जित संपत्ती आणि एकुलता एक .

इन्स्पेक्टर शर्मांना हे सगळं योगायोगानं कळलं .
ड्युटी संपवून घरी जाताना , नो पार्किंग झोन मध्ये पार्किंग लाईट लावून उभी असणारी ऑडी त्यांना दिसली .
त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितले .
ते उतरले . गाडीत त्याच्याशिवाय आणखी चार जण होते . बहुधा त्याचे आईवडील, आजीआजोबा असावेत .
त्यांनी त्याला काच खाली करायला सांगितली .
त्यानं वैतागून काच खाली केली . पण लक्ष हातातल्या मोबाईल कडे होतं . तो स्क्रोल करत होता . वर खाली . स्क्रीनवर सतत बोटं फिरत होती . आणि काही दिसलं नाही की मोबाईल आपटत होता . स्वतःचे केस उपटत होता . आतले चौघेही धास्तावल्यासारखे बसून होते . त्याच्याकडे बघत होते . केविलवाणे झाले होते . हे त्याचं वागणं केव्हा थांबणार हा भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता .
शर्मांनी त्याला खुणेनं गाडी पुढं घ्यायला सांगितलं .
त्यानं गाडी सुरू केली .
आणि पाठच्या सीटवरच्या आजोबांनी काच खाली करून त्यांच्या हातात एक कागद दिला .
शर्मा बघत राहिले . गाडी पुढं गेली .
त्यांनी चुरगळलेला कागद उघडला .
” आम्हाला आपली मदत हवी आहे , प्लीज सोबत दिलेल्या नंबरवर फोन करा , मी येऊन भेटतो . ”
शर्मांनी जाणाऱ्या गाडीकडे पाहिलं .
ते आजोबा पाठच्या काचेतून पहात होते . शर्मांनी आंगठा उंचावला . आणि ते आपल्या गाडीकडे आले .

महिनाभरात सगळं बदलून गेलं होतं.
तो तरुण पिसाळल्यासारखा झाला होता . सतत मोबाईलवर स्क्रोल करत होता . त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं . मोबाईलवर रिल्स दिसली नाहीत की वेडापिसा होत होता . दर पंधरा सेकंदाला स्क्रोल करत होता . स्क्रीनवर सारखं काहीतरी दिसायला हवं होतं . नवीन काहीतरी हवं होतं . पंधरा सेकंदात काही नवीन दिसलं नाही तर त्याचा मेंदू सैरभैर होत होता . त्याचं वागणं चमत्कारिक झालं होतं . जेवणखाण , अंघोळ , स्वच्छता यात अनियमितता आली होती . स्वभाव तुसडा झाला होता . ऑफिसात तोडफोड , सर्वांशी भांडण , वेडगळ वागणं यामुळं नोकरी सुटली होती . मोबाईलच्या बाहेर जग असतं हे ते विसरून गेला होता . सगळं घर धास्तावलं होतं .

आजोबा , आजी , आई वडील सगळ्यांनी , इन्स्पेक्टर शर्मांना सर्व काही सांगितलं .

त्यांनी हॉस्पिटलला ऍडमिट करण्याचा सल्ला दिला आणि चांगला मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा दिला .

स्पेशल रूम मध्ये प्रवेश करताना शर्मांना सगळं काही आठवलं .
त्या कुटुंबाला मदत करणं हा काही त्यांच्या ड्युटीचा भाग नव्हता . पण एक कुटुंब मोबाईलच्या वेडापायी उद्ध्वस्त होताना बघून त्यांचा जीव आतून तुटू लागला होता .

ते आत आले .
त्याच्या पाठीवरून हात फिरवला .
ते नेहमी येत असल्यामुळं ओळखीचा भाव त्याच्या चेहऱ्यावर आला .
” आयxxxx काही नवीन टाकत नाहीत भोxxxxx. ”
त्यानं कचकचीत शिव्या घालायला सुरुवात केली .
शर्मांनी त्याला जवळ घेतलं .
त्याचे हात हातात घेतले आणि त्यांना धक्का बसला .
हातात मोबाईल नसताना तळहातावर नखानं स्क्रोल केल्यासारखं केल्यामुळं डावा तळहात रक्तबंबाळ झाला होता .
त्यांनी बेल वाजवली . ड्यूटीवर असणारी नर्स तत्परतेने आली . त्यांनी तिला त्याचा रक्तबंबाळ झालेला हात दाखवला .
ती गेली आणि ड्रेसिंगचा ट्रे घेऊन आली .

” तुला कसलीच जाणीव नाही झाली ? ”
नर्स गेल्यावर शर्मांनी त्याला विचारले .
त्याचं लक्ष नव्हतं .
तो बँडेज बांधलेल्या हातावर स्क्रोल करत होता .
शिव्या घालत होता आणि हळूहळू बेभान होऊ लागला होता .
थोड्या वेळाने थकून तो तिथेच आडवा झाला .

घरचे सगळे अगतिक होऊन बसले होते .
शर्मांना पुन्हा एकदा पंतांची आठवण आली .
ते म्हणाले होते ;
” माणसाचा मेंदू , मोबाईलच्या ताब्यात जाण्यासाठी सुरुवातीचे पंधरा सेकंद महत्वाचे असतात . ते सांभाळले तर मोबाईल आपल्याला हवा तसा वापरता येतो . पण पंधरा सेकंदाच्या रील्स , स्क्रोल करून पाहताना भान सुटलं तर आयुष्यभर केवळ पश्चात्ताप वाट्याला येतो . कारण त्या पंधरा सेकंदानी मेंदूवरचा ताबा जायला सुरुवात होते . माणूस डोपामिनच्या खोल गर्तेत अडकत जातो . सगळं काही उद्ध्वस्त होऊन जातं . ”

त्यांना पंतांची तीव्रतेनं आठवण झाली .
या तरुणाला ते कदाचित सावरू शकतील आणि कुटुंबाला आधार मिळू शकेल .

ते आजी आजोबा , आईबाबा यांच्याजवळ आले .
” काळजी करू नका , मी पंतांना बोलावून घेतो , ते सर्वकाही ठीक करतील .”
त्यांनी पंत कोण हे सांगितलं . ते कोणतं काम करतात हे सांगितलं .
आणि ते निघाले .

ओळख ना पाळख , पण हा माणूस स्वतःच्या वर्दीच्या ड्युटीबाहेर जाऊन आपल्यासाठी धडपडतोय या जाणिवेनं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.

रुम बाहेर पडताना शर्मानी पाठी वळून बघितलं . कॉटवरचा तरुण त्यांना अधिकच अगतिक वाटला .

त्यांनी पंतांना फोन लावला …

( वास्तवात घडत असलेली तुमच्या आमच्या अवतीभवतीची कथा ! )
——-
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१
——–
ब्रेन रॉट ही नवी कथामालिका आपल्याला कशी वाटली ?
ब्रेन रॉट पासून आपल्या समाजातल्या समाजातल्या सर्वांना वाचवायचं असेल तर ही कथामालिका सर्वांनी वाचायला हवी आणि नावासह सर्वत्र पाठवायला हवी .

आपल्याला एका भयंकराशी सामना करायचा आहे , याची जाणीव असो द्यावी .
हा कथालेखन प्रपंच कसा वाटला ते कळवालच . अर्थात अभिप्राय अपेक्षित आहे …

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

1 Comment on ब्रेन रॉट – २ : ‘ ते ‘ पंधरा सेकंद !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..