समर्थ रामदास सार्थ दासबोधातील एकोणिसाव्या दशकातील राजकारणनिरूपणनाम या समासात राजाच्या किंवा नेत्याच्या गुणधर्मांचे वर्णन करताना म्हणतात :
ज्ञानी आणि उदास । समुदायाचा हव्यास ।
तेणे अखंड सावकाश । एकांत सेवावा ॥१॥
समर्थ रामदासांच्या मते, राजा ज्ञानी (विवेकी) आणि उदास (सांसारिक हव्यास नसलेला) असावा. लोकसंग्रहाचा (समुदाय वाढवण्याचा) हव्यास असला तरी प्रथम एकांतात बसून गहन चिंतन करावे. एकांत चिंतनाने देश-काल परिस्थितीचे खरे वास्तव उलगडते आणि समस्यांचे टिकाऊ समाधान स्वतःच उद्भवते.
जेथे तजवीजा कळती । अखंड चाळणा निघती।
प्राणीमात्राची स्थिती गती । कळून येते ॥२॥
राजा आळशी नसावा. जर तो राजकीय काम बाजूला ठेवून मनोरंजन व विश्रांतीत वेळ घालवू लागला, तर राजकारभार ढासळेल आणि सत्ता हातातून जाईल. म्हणून राजाने कधीही आळस किंवा अति विश्रांती करू नये. उदाहरणार्थ, असे म्हटले जाते की पंतप्रधान मोदीजी कधीही सुट्टी घेत नाहीत.
मुख्य सूत्र हातीं घ्यावे । करणे ते लोकांकरवी करवावे।
कित्तेक खलक उगवावे । राजकारणामध्ये ॥१८॥
राजाने स्वतः मुख्य निर्णय घ्यावेत, मात्र त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी इतरांना दिली पाहिजे. परंतु असे करताना तो सतत दक्ष राहून त्यांच्या कामावर नजर ठेवली पाहिजे. जिथे भ्रष्टाचार किंवा गैरव्यवस्था दिसेल, तिथे त्वरित आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणतात :
जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला।
जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥१६॥
दुर्जनांचे महत्त्व आणि त्यांचा उपयोग समर्थ स्वामी बारकाईने सांगतात. तेवीसाव्या ओवीत ते म्हणतात :
दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे।
सज्जनापरीस आळवावे । महत्त्व देऊनी ॥२३॥
राजकारणात दुर्जन लोकांचेही वेगळे महत्त्व असते. असे लोक सतत अडथळे निर्माण करतात. म्हणून त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित न करता, त्यांच्या स्वभावाचा योग्य उपयोग करून घ्यावा. मात्र योग्य वेळ आली की त्यांच्या काटा निर्धाराने काढून टाकायचा.
जनामध्ये दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट
याकारणे ते वाट । बुझूनि टाकावी ॥२४॥
राज्याचे अहित करणार्यांचा काटा काढताना कुणाला कळू दिले नाही पाहिजे. राजावर शंका येऊ नये. देशहिताचे राजकारण करताना, राजाने मोठा समुदाय तयार केला पाहिजे, पण त्यातील संबंध बळकट आणि सुसंवादी ठेवले पाहिजेत. फक्त बाह्य दिखावा न करता परस्पर विश्वास आणि एकजूट टिकवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर राजा शत्रूंच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणारा, सजग आणि परमार्थासाठी कार्य करणारा असावा—जणू परमार्थासाठी उडणारा पक्षीच.
समाजाची एकजूट, राजाची सजगता आणि दुर्जनांचा योग्य उपयोग ही राजकारणातील तीन महत्त्वाची तत्त्वे आहेत.
समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचे उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. ते ज्ञानी आणि उदास असूनही देशहितासाठी अविरत परिश्रम करतात. मुख्य सूत्रे हाती घेऊन ते स्वतः निर्णय घेतात आणि अंमलबजावणी इतरांना सोपवतात. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, डिजिटलायझेशन आणि स्वच्छ भारत योजनांमध्ये क्रांती घडली. आत्मनिर्भरतेच्या मार्गावर भारताने संरक्षण उत्पादनात झेप घेतली आहे. दुर्जनांचा चतुराईने उपयोग करून ते विरोधकांना राष्ट्रीय हितासाठी सामावून घेतात. एकांत चिंतनाने ते दीर्घकालीन धोरणे आखतात, जसे की आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल. दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई करून त्यांनी देशाची ताकद जगासमोर दाखवली.
त्यांच्या नेतृत्वाने भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे. समर्थांच्या शिकवणीप्रमाणे ते कैपक्षी परमार्थी आहेत – सांसारिक हव्यास नसलेले, पण लोककल्याणासाठी स्वतंत्रपणे उडणारे. अशा नेत्यामुळे दासबोधाची शिकवण केवळ ग्रंथात न राहता प्रत्यक्ष जीवनात उतरते आणि राष्ट्राची उन्नती सुनिश्चित होते.
– विवेक पटाईत


Leave a Reply