चहा घेतांना कोणा कोणाला फोन करायचे असे ठरवतच होते फोन हातात घेतला, विचार केला की कामात लागल्यावर विसरुन जाईन. अलिकडे बरेच वेळा विसरायला होते. पण अचानक फोन करण्याची इच्छाच निघून गेली.
प्रत्येक वेळेस Get-together चा फोन सगळ्यांना करतांना काय उत्साह, धावपळ असायची कसे बसे घरातले काम संपवून फोन करणे सुरु व्हायचे. सगळ्यात पहिला फोन माधुरीला करायचा कारण जोशी बरेच वेळा बाहेर असायचे म्हणून तीला पहिला फोन करुन ते कधी आहेत ते बघून दिवस ठरायचा.
Get-together असले की माधुरीचा उत्साह अगदी ओथंबून व्हायचा. मग ती चार वेळा आठवण करणार, कोणा-कोणाला फोन केला ते विचारणार, मेनु साठी तीचे तीन-चार फोन असायचे. वेगळ्या वेगळ्या आणि सीझनच्या मेनूंची तर तीच्याकडे जणू लिस्टच असायची. ठरल्यापेक्षा एखादा पदार्थ जास्त करुन आणण्याची पण तीची कायम तयारी असायची. एखाद्या महिन्यात दुसऱ्या कोणाचा नंबर असेल आणि तिच्याकडे आयत्या वेळेस काही अडचण आली तर ती ही turn मी करते असे उत्साहाने म्हणत माधुरी पुढे असायची. स्वभावाने अतिशय निरागस, मन -मोकळी, आनंदी, उत्साही, कोणाचीही हेवा – देवा नाही, कसलीही घमेंड नाही, निस्वार्थी, कितीही पाहुणे आले तरी न थकणारी न कंटाळणारी माधुरी किती गुण होते तिच्यात कदाचित ते वर्णन करण्याची माझी क्षमताही नाही.
सदैवी आनंदी, शेवटी दुखण्यातही आपल्या वेदना, दुःख काळजी कधीही तीने दाखविली नाही. मला आठवते तीच्या पहिल्या किमोच्या वेळेस मी आणि शुभा दवाखान्यात गेलो होतो. माधुरी आमच्याशी इतकी हसून गप्पा मारीत होती की आम्ही तर विसरूनच गेलो की आपण कशाला इथे आलो ते. प्रीतीने तर कमालच केली होती भरपूर चहा बिस्किटस् खाकरे घेवून चार वाजता kitty पार्टीसारखी हजर होती. प्रीतीचा हा नियम तिच्या सगळ्या किमोना चालू होता. मी तर अजून एखादया वेळेस गेले. पण नंतर घरांतल्या कारणांमुळे जाणे झाले नाही. कधीही फोन केला तु कशी आहेस असे विचारले की “मी छान आहे. खूप बरी आहे.” असे उत्तर असायचे. फक्त जाण्याच्या आदल्या दिवशी खोल आवाजात बोलली “नाही गं बिलकूल बरे वाटत नाही” तो आवाज आजही कानांत तसाच ऐकू येतोय.
निसर्ग बघण्याची तिला भरपूर आवड. डिसेंबर माहिना आला की आमचे Plainning सुरु व्हायचे थोल, नलसरोवर, की L. R. K.? पक्षी बघायला आम्हाला खूप आवडायचे. L. R. K. ची एक खूप छान आठवण आहे आम्ही तीघी मैत्रीणी म्हणजे मी, शुभा आणि माधुरी. आपल्या गप्पांच्या आवाजाने कोणाला त्रास होऊ नये, म्हणून शुभाच्या गाडीत बसून खूप उशीरापर्यंत गप्पा मारीत होतो. रात्रीचे दोन तर नक्कीच वाजले असतील आमच्या गप्पा कधी संपायच्याच नाहीत. विषय कुठे चालू व्हायचे आणि कुठे जायचे, कळावयाचे नाही त्यांच्या प्रवासाला कधी दिशा, मार्ग, आणि अन्त नसायचाच. आम्ही फक्त बोलतच असायचो. हा प्रवास मधेच कुठेतरी लवकर थांबणार आहे हयाची आम्हाला त्या रात्री कल्पनाही नव्हती. आणि अचानक ती नसतांना तिच्या वाढदिवसाला तीच्या घरी जाण्यासाठी फोन करतांना मन हादरून गेले. पण वास्तविकता तर माणसाला स्वीकारावीच लागते. तिची दोन्ही मुले आणि यजमान त्यांनी तर ती स्वीकारलीच नां मग आम्ही तर काय मैत्रीणी.
आयुष्याच्या वळणांवर एक गोष्ट निश्चित, दुःख आणि आठवणी ह्यांना आपल्या आयुष्यातुन जितके दूर ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो नां तितक्या त्या जवळ येतात, आणि घट्ट चिटकून राहतात.
ही माझ्या लाडक्या मैत्रिणीला एक तीच्या वाढदिवसाची छोटीशी भेट.


Leave a Reply