नवीन लेखन...

आशीर्वाद

लहान लहान म्हणता म्हणता लेकरू कॉलेजकुमार झाला आणि सहाजिकच बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यातलाच एक बदल म्हणजे अभ्यासाची पुस्तकं घेण्याचं दुकान. शालेय पुस्तकं पाठ्यपुस्तक मंडळाची. सगळी अगदी ठरलेली. त्यामुळे एकदा घेतली की पुस्तकांसाठी एकदम पुढच्या वर्षी दुकानात जायचं. ती सुद्धा लहानपणी पालकच जाऊन आणायचे आणि थोडं मोठं झाल्यावर त्यांच्यासोबत जाऊन खरेदी करायची. पण कॉलेजच्या पुस्तकांचं तंत्र थोडं वेगळं असतं. विशेषतः बारावी नंतरच्या अभ्यासक्रमाचं. अशी पुस्तकं घ्यायची आपल्या चिरंजीवांची पहिलीच वेळ असल्यामुळे हा सहज म्हणून त्याच्याबरोबर पुस्तकांच्या दुकानात गेला. शहरातलं अनेक वर्ष जुनं आणि खूप नावाजलेलं दुकान होतं ते.

आत शिरताच त्याला एकदम जुने दिवस आठवले. त्याचं महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर फार फार वर्षांनंतर त्याने या दुकानात पाऊल ठेवलं होतं. तरीही सगळं अगदी ओळखीचं वाटत होतं. लांबच्या लांब दुकान असूनही आत जायला जेमतेम जागा, समोर पडलेला पुस्तकांचा ढीग, मागे लावलेली थप्पी, काऊंटरवर बसलेले काका आणि त्यांचा धाकटा भाऊ. सगळं तसंच. विशेष म्हणजे इतक्या वर्षांनी येऊनसुद्धा त्या दोघांनीही त्याला नावानी नसलं तरी चेहऱ्यानी मात्र लगेच ओळखलं.

“ काय दादा ? आज बऱ्याच वर्षानी वाट चुकला ?”
“ हाहा ..हो मग !!.. आमचं झालं आता.. पुढच्या पिढीला घेऊन आलोय !”
“ या या ss. आम्ही तर स्टुडंट लोकांसाठीच बसलोय इकडे. बोल बाळा कुठली पुस्तकं देऊ? “

दोन्ही भावांचे पांढरे झालेले केस वगळता त्यांचा उत्साह आजही अगदी पूर्वीसारखाच होता. एकंदरीत तिथला माहोलच वेगळा होता. म्हणजे तसा तो नेहमीच असतो तिथे. इतक्या सगळ्या शिक्षणाच्या शाखा.आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा , शिवाय पुढे इंजिनियरिंग, डिझाइनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, मास मीडिया, एमबीए वगैरे वगैरे अशी अनेक क्षेत्र आणि त्यातल्या अनंत उपशाखा. पुन्हा प्रत्येक कॉलेजातून तिथल्या शिक्षकांनी सुचवलेली विविध तज्ज्ञ मंडळींची म्हणजे मुलांच्या भाषेत सांगायचं तर वेगवेगळ्या ऑथर्सची बुक्स. तरीही या सगळ्या पुस्तकांची नावं आणि कुंडली त्या दोन्ही काकांची अगदी तोंडपाठ.

इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या तेवढ्यात दोघे जण गेल्यावर्षीची नको असलेली पुस्तकं विकायला घेऊन आले. हे कॉलेजच्या पुस्तकांचं अजून एक वैशिष्ट्य. वर्षं संपलं की ती पुस्तकं परत द्यायची. त्याच्या स्थितीनुसार त्याचे पैसे परत देणार. ते मागच्या पानावर लिहून ठेवणार. जुने काही आकडे लिहिलेले असतील तर ते खोडणार. मग त्यांच्या सांकेतिक भाषेत नव्याने काहीतरी लिहिणार. पुढच्या वर्षाचं कोणी आलं की ते पुन्हा सेकंड हँड पुस्तकाची मागणी करणार आणि ती पुस्तकं त्यांच्या ताब्यात जाणार. असं सगळं चक्र वर्षानुवर्ष सुरू असतं. त्यामुळे या दुकानात सतत काही ना काही घडत असतं.
“ काय काका? ही सगळी आमच्यावेळची सिस्टिम अजून अशीच सुरू आहे वाटतं ?

“ मग काय ? तुमचं किती पण ऑनलाईन वगैरे आलं तरी हे सुरूच राहणार !”.

“ हे बाकी खरं !! इतकी वर्ष दुकान आहे तुमचं. तीसेक वर्ष तर मीच बघतोय. पण आजही पुस्तकं म्हंटल्यावर सगळेजण पहिलं इकडेच धावतात. ग्रेट !!”.
दुपारची वेळ असल्याने तशी गर्दी कमी होती म्हणून काका सुद्धा एकदम गप्पांच्या मूड मध्ये होते आज.

“ अरे हे सोडून दुसरं काही येतंच नाही आपल्यालाss. आता तुझ्यापासून काय लपवायचं ? आम्ही सगळे भाऊ फक्त पाचवी-सहावी पर्यंत शिकलो. मी तर चौथी नापास. त्यामुळे आपोआपच आमच्या वडिलांनी सुरू केलेल्या या पुस्तकाच्या धंद्यात आलो सगळे !”.
ते काका समोर लावलेल्या आपल्या वडिलांच्या आणि त्या बाजूच्या देवाच्या तसबीरीला मनोभावे हात लावत, नमस्कार करत म्हणाले.
“काय सांगताय काय ?” .. त्याला एकदम धक्काच बसला
“ पण तुला सांगतो दादा .. आज इतकी हजारो मुलं …. नाही नाहीss इतक्या वर्षात लाखात आकडा गेला असेल इतकी मुलंमुली इथली पुस्तकं वाचून शिकली, मोठी झाली. यात खूप आनंद आहे. पैसा पण कमावला. शेवटी व्यवसाय आहे आमचा. आमच्या सगळ्यांची लग्न, मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न , हे शेजारचे तीन गाळे सगळं या दुकानानीच दिलं पण इतक्या मुलांना शिकून मोठं होताना बघतो ना तेव्हा पैशापेक्षा जास्त समाधान मिळतं. गल्ल्यावर बसलोय. खोटं नाही बोलणार !!

“ कमाल आहात तुम्ही सगळे ! आजपर्यंत इतके वेळा अभ्यासक्रम बदलले असतील, काही जुन्या आवृत्त्या असतील, आता तर इतके नवीन नवीन कोर्सेस निघाले आहेत, बाहेरच्या परीक्षा आहेत पण तरीही एकदम खडान् खडा सगळं माहिती असतं तुम्हाला !”.

“अरे नाही रे !! आम्हाला फक्त पुस्तकांच्या कव्हरची माहिती. त्याच्या आत काय लिहिलंय त्याचा अभ्यास तुम्ही मुलं करता. नाव कमावता. इतक्या वर्षात कितीतरी डॉक्टर-इंजिनियर झाले असतील. कोणी मोठे शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, मोठे व्यावसायिक, वकील, आर्किटेक्ट झाले असतील, कोणी मोठ्या कंपनीचे सीईओ असतील. पण तुम्ही मुलं काssय , एकदा शिकून झालं की एकतर उडून तरी जाता किंवा तुमचं करियर करण्यात बिझी होता त्यामुळे एरव्ही आम्हाला कोणाची काही खबरबात कळत नाही. हांss तुझ्यासारखा असा कोणी आला तर त्यांची प्रगती सांगतात. गेल्यावर्षी एकजण असाच भेटला तो आता नासा मध्ये मोठ्या पोस्टवर आहे. कष्ट तुम्ही करता पण मनातल्या मनात आमची पण कॉलर ताठ होते उगाच. हाहा ss !.. मस्करी सोड पण अशा चांगल्या बातम्या कळल्या तर बरं वाटत नारे आम्हाला !. हाच पोटापाण्याचा धंदा असला तरीही मनापासून सांगतो तुला, आम्हाला सगळ्या भावंडांना आणि घरच्या सगळ्यांनाच हे आमच्या हातून घडणारं सेवा कार्य वाटतं. म्हणूनच बहुतेक नियतीने आमच्या नशिबात शिक्षण कमी ठेवलं असावं. चांगले शिकलो असतो तर कदाचित वडिलांच्या या व्यवसायात न पडता कुठेतरी नोकरीत चिकटलो असतो आणि ही सेवा घडली नसती !”.

“ खरं आहे काका !! इतक्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं पुण्य अप्रत्यक्षपणे तुमच्या पदरात पडलंय. खूप भाग्यवान आहात !!”.

“ असेल रे दादा .. तू म्हणतोस तसं बहुतेक त्याच पुण्याईच्या जोरावर असेल म्हणून की काय आम्हा भावंडांमधला एकही जण कमी शिकूनही वाईट मार्गाला नाही लागला. उलट तो बघ, तो हँडसम स्टूलावर चढून पुस्तक काढतोय ना ss ?? “
काका समोरच्या काऊंटरवर उभ्या असलेल्या एक तरुण देखण्या मुलाकडे बोट दाखवत म्हणाले.

“ तो माझ्या थोरल्या भावाचा मुलगा. चांगला शिकलाय. बँकेतली लाखभराची नोकरी सोडून दिली. मी पण हेच दुकान पुढे चालवणार म्हणतोय !. इथे काम करणारी सगळी माणसं पण चांगली मिळाली आम्हाला. हीच खरी पुंजी म्हणायची ”
हा थक्क होऊन, काहीसा भारावून त्यांचं बोलणं ऐकत होता.

“ कधीकधी काही जण येतात. त्यांना परवडत नाही महागडी पुस्तकं घ्यायला. अगदी सेकंड हँड सुद्धा शक्य नसतं. त्यांना नाही म्हणायला आम्हालाही वाईट वाटतं पण व्यवहारसुद्धा बघायला लागतो. म्हणून आम्ही काही वर्षांपासून एका सामाजिक संस्थेला वेगवेगळ्या कोर्सेसची आणि ठराविक रकमेची पुस्तकं देणगी म्हणून देतो. ते योग्य त्या गरजूंपर्यंत पोचवतात आणि इथे कोणी असं आलं की आम्ही त्यांना तिथेच पाठवतो. आजच सकाळी एक मायक्रोबायोलॉजीची मुलगी आली होती. बिचारीचे आई वडील दोघेही मागच्या वर्षी कोव्हिडनी गेले. तिला पण दिलाय पत्ता संस्थेचा. असं व्यवसाय सांभाळून जे करता येईल ते करायचं !.

इतक्यात दुकानातला एक कर्मचारी आला. “भाऊ .. हे घ्या !! तुमचा गठ्ठा !”..
मुलाच्या पाठीवर थाप मारत काका म्हणाले ..

“बेटा . तू काय आमचं हे सगळं ऐकू नको. ही पुस्तकं घे. भरपूर अभ्यास कर आणि नाव काढ चांगलं !
समोरच्या गठ्ठ्यातलं एक पुस्तक हातात घेत, झरझर पानं उलटत तो म्हणाला.

“ काय गंमत आहे बघा ss .. इथून पुढची काही वर्ष माझा मुलगा किंवा आत्ताची पिढी जी पुस्तकं वाचेल, न जाणो त्याच पुस्तकांवरून आजच्या एखाद्या प्रथितयश, महान व्यक्तीने अभ्यास केला असेल !. ख्यातनाम व्यक्तींचा स्पर्श झाला असेल या पुस्तकांना!”
बोलता बोलता काका एकीकडे पुस्तकं पिशवीत भरू लागले.

“ असेल असेल ! नक्कीच असेल दादा .. नकळत त्यांचे आशीर्वाद यां मुलांनाही मिळतील. अरे सगळ्यांना थोरामोठ्यांचे आशीर्वाद असतात. आमच्याकडे थोडं उलट आहे. आम्हाला थोरामोठ्यांचे आहेतच पण त्यापेक्षा जास्त या सगळ्या आमच्यापेक्षा वयाने लहान तरुण मंडळींचे आशीर्वाद वर्षानुवर्ष लाभतायत. या छोट्या दोस्तांच्या आशीर्वादावर हा डोलारा उभा आहे. आधी तुझे आशीर्वाद होते आता तुझ्या छोकऱ्याचे आशीर्वाद मिळतील!”.
“ अहो आशीर्वाद वगैरे काय काका ?? “

असं सगळं अनपेक्षित असलेलं संभाषण संपलं आणि एक वेगळाच दृष्टिकोन घेऊन बापलेक दुकानातून बाहेर पडले. तेव्हाच त्याने मनोमन ठरवलं की आपल्या मुलाचं शिक्षण जेव्हा पूर्ण होईल आणि पुढील वाटचालीसाठी सज्ज होईल तेव्हा त्याला पेढे घेऊन या दुकानात नक्की पाठवायचं. पण काका म्हणाले तसे आशीर्वाद द्यायला नाही तर त्या काकांचे, त्यांच्या परिवाराचे, तिथे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे, विविध क्षेत्रांत आजवर नकळतपणे अनेक नामवंत व्यक्ती घडवणाऱ्या त्या वास्तूचे “आशीर्वाद” घ्यायला !!

— क्षितिज दाते, ठाणे

 

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

1 Comment on आशीर्वाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..