नवीन लेखन...

भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!

काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली.

मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत – शिंदे सर – त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?”


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला – “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं मी इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली.

त्या कार्यक्रमात मी मराठी का बोलली गेली पाहिजे. या विषयावर इंग्रजीतून भाषण केलं. पुण्याचे अनिल गोरे ज्यांना आज महाराष्ट्र शासनाचा भाषासंवर्धन पुरस्कार दिला जाणार आहे, ते एकदा जे म्हणाले होते तेच मी या मुलांना इंग्रजीतून सांगितलं. आपण इंग्रजी बोलतो. उदा. आपण म्हणतो – “Virat Kohli is riding on a wave of popularity.” किंवा “I was surfing channels on my TV.” ही भाषा कुठून आली? तर ही भाषा समुद्रातून आणि नौकायनातून आली आहे. कारण इंग्लंड हा देश पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे औरंगाबादला राहणारी मुलगी जेव्हा riding on a wave म्हणते तेव्हा ती second hand अनुभवातून बोलत असते. लाटेवर स्वार होणं म्हणजे काय हे कळायला तो अनुभव स्वतःच्या इंद्रियांनी अनुभवायला हवा! आपली भाषा आपल्या मातीतून उगवते. म्हणूनच हिंदीत – “अफ़वाहों की बाढ़ आती है” आणि मराठीत “अफवांचं पीक येतं”. म्हणूनच मराठीत “पिकतं तिथे विकत नाही” आणि पत्रकार “घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढतात”. लोक म्हणतात भाषा केवळ एक संवादाचं माध्यम आहे. भाषा संवादाचं माध्यम आहेच पण ‘केवळ’ नव्हे! भाषा संस्कृतीची वाहक आहे.

आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं.

मला ठाऊक नाही की माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला पण दोन वर्षांपूर्वी मला झेवियर्स महाविद्यालयात पुन्हा बोलावलं. या वेळी संपूर्ण कार्यक्रम तर मराठीत झालाच पण मीही माझं भाषण पूर्णपणे मराठीत केलं. पुन्हा एकदा माझं आवडतं वाक्य म्हणतो आणि थांबतो.

वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!

© कौशल इनामदार

कौशल इनामदार
About कौशल इनामदार 3 Articles
श्री. कौशल इनामदार हे प्रख्यात मराठी संगीतकार असून त्यांनी मराठीतल्या अनेक उत्तमोत्तम गीतांना संगीत दिले आहे. मराठी अभिमान गीत ही त्यांची रचना मराठी भाषेसाठी अमूल्य देणगी आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..