नवीन लेखन...

अमानवी गुणवत्तेची अष्टपैलू खेळाडू बेब डिड्रिक्सन

बेब डिड्रिक्सन हिने अल्पायुष्यात अनेक खेळांत प्रावीण्य दाखवून ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक मिळवून जागतिक उच्चांकही निर्माण केले होते.

बेब डिड्रिक्सन म्हणजे क्रीडा जगतातील निसर्गाचा एक चमत्कारच ‘सुपर मॅन’ प्रमाणे ती ‘सुपर वुमन’ होती! मराठीत ‘युगपुरुष’ म्हणण्याची पद्धत आहे; परंतु ‘युग-स्त्री’ असे कुणी कुणाला म्हटल्याचे माझ्यातरी ऐकिवात वा वाचण्यात नाही! बेब डिड्रिक्सन ही विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकातील ‘ग्रेटेस्ट फिमेल अॅथलेट’ म्हणून असोसिएटेड प्रेसने गौरविलेली अद्भुत खेळाडू होती. एखादा सुप्रसिद्ध खेळाडू एखाददुसऱ्या, बहुधा एकाच खेळात प्रावीण्य दर्शवितो. तसे कुठल्यातरी एका खेळात असामान्यत्व दाखविणे हे योग्यच ठरते. परंतु बेबबाबत साऱ्याच गोष्टी अनैसर्गिक, अविश्वनीय आणि आश्चर्यकारक होत्या. अॅथलेटिक्स म्हणून आपल्या अल्पायुष्यात अत्यंत उच्च श्रेणीचे यश मिळवून आयुष्याच्या अखेरीस क्रमांक एकची गोल्फ खेळाडू म्हणून तिने वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

पाच फूट पाच इंच उंचीची, १४५ पौंड वजनाची, पुरुषी बांध्याची, पीळदार स्नायूंची बेब डिड्रिक्सन ही तरुणी सगळ्यात खेळात अग्रभागी होती. बास्केट बॉल, ट्रॅक, गोल्फ, बेसबॉल, टेनिस, स्वीमिंग, डायाव्हिंग, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, बोलिंग, हॅण्डबॉल, बिलियर्डस, स्केटिंग आणि सायकलिंग या सर्व खेळांची तिला नुसती आवड नव्हती, तर त्या प्रत्येक खेळात तिने प्रावीण्य मिळविले होते असे सांगितले तर ते कुणालाही अतिशयोक्ती वाटेल. परंतु ही अतिशयोक्ती नसून वस्तुस्थिती आहे हे ज्यांना ठाऊक होते अशा जाणकारांनी तिला एकदा विचारले रले होते, ‘बेब, तू खेळली नाहीस एखादा खेळ होता का?’

बेबने या प्रश्नाला दिलेले उत्तर तिच्या व्यक्तिमत्त्व दर्शनाचेच होते. बेब म्हणाली होती, “मी माझ्या आयुष्यात खेळले नाही असा एक खेळ आहे!”

“कोणता?”
“बाहुलीचा!”

प्रत्येक मुलगी साधारणपणे आपल्या बालपणी साऱ्या मुली खेळतात तो बाहुलीचा खेळ खेळतेच. पण बेब ही सर्वसाधारण मुलगीच नव्हती! किंबहुना ती मुलीसारखी दिसतही नसे नि वागतही नसे. आयुष्यभर मुलासारखेच कपडे तिने बहुधा घातले. नाही म्हणायला आयुष्याच्या अखेरीस काही काळ ती स्त्रियांच्या वस्त्रात आणि स्त्रियांप्रमाणे वावरल्यासारखी दिसली होती!

बेब ज्या काळात अॅथलेट म्हणून प्रसिद्धीस आली त्या काळात मुलीने अॅथलेट असावे ही अनैसर्गिक व अस्वीकारणीय गोष्ट मानली जात होती. तिच्यातील पुरुषी व्यक्तिमत्त्वाची चर्चा तिच्या काळात खूप झाली होती. बेबला क्रीडा समीक्षकांची उलटसुलट टीकाही सहन करावी लागली होती. विल्यम जॉन्सन आणि नान्सी विल्यमसन यांनी ‘व्हॉट अ गल! दि बेब डिड्रिक्सन स्टोरी’ या ग्रंथात बेबसंबंधी लिहिताना म्हटले होते, “ती स्त्रीवादी नव्हती, अतिरेकीही नव्हती, लैंगिक स्वातंत्र्याच्या चळवळीची ती पुरस्कर्तीही नव्हती! ती अॅथलेट होती आणि तिचे शरीर हीच तिची संपदा होती. ”

काही लेखकांनी तिच्या पुरुषी व्यक्तिमत्त्वाची निर्भत्सना केली होती. “बेबने आपल्या घरात बसून थोडी रंगभूषा वगैरे करून स्त्रीसारखे सुंदर दिसण्याचा प्रयत्न करीत कुणाच्या तरी फोन कॉलची रिंग वाजेल म्हणून वाट पाहावी!” अशा आशयाचे उपरोधिक लेखन तिच्याविषयी ‘न्यूयॉर्क वर्ल् टेलिग्राम’मध्ये ज्यो विलियम्स यांनी केले होते. कुणी काहीही टीका केली तरी तिच्यावर आणि तिच्या पीळदार आणि वजनदार नसलेल्या व्यक्तिमत्त्वाव लुब्ध असणारा फार मोठा वर्ग समाजात होता.

सुप्रसिद्ध क्रीडासमीक्षक ग्रँटलँड राईस याने लिहिले होते, “बेबचा प्रत्यक्ष खेळ पाहीपर्यंत तिच्याविषयी गैरसमज असू शकतात. तिचा खेळ पाहताच ती सर्व गैरसमजांच्या पलीकडे गेलेली असते! जगातील क्रीडाविश्वातील मानसिक आणि शारीरिक शक्तींचा झालेला सुंदर दुर्मीळ मेळच आप पाहत आहोत असे तुम्हाला तिचा खेळ पाहताना जाणवते.’

बेब ही नॉर्वेचे नागरिक असलेल्या आई-वडिलांच्या पोटी १९११ साली जन्मास आली होती. बेबने मात्र आपल्या आत्मचरित्रात आपली जन्मतारीख २६ जून १९१४ अशी लिहिलेली आहे. परंतु तिचा जन्म १९११ सालीच झालेला असावा. कारण तिच्या बाप्तिस्माच्या दाखल्यावर आणि विशेष म्हणजे तिच्या मृत्यूनंतर तिच्या थडग्यावरील दगडावर तिच्या जन्माचे वर्ष १९११ हेच नोंदविलेले आहे.

बेबचा जन्म टेक्सास येथील पोर्ट आर्थर गावी झाला होता. तिचे मूळचे नाव मिलड्रेड एला डिड्रिक्सन असे होते. १९१४ मध्ये फोर्ट आर्थरचा परिसर चक्रीवादळाने उद्ध्वस्त झाल्याने बेबचे आईवडील आपल्या कुटुंबासह ब्युमाँट येथे स्थायिक झाले होते.

‘बेब’ हे टोपण नाव बेबच्या बरोबरीच्या मुलांनी तिच्या मुलांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे, वागण्यामुळे आणि दूर अंतर धावण्यामुळे तिला दिले होते, असा ‘बेब’नेच उल्लेख केलेला आहे. तिचे मूळ नाव विसरल जाऊन ‘बेब’ या नावानेच ती जगप्रसिद्ध झाली.

१९३० मध्ये ब्युमाँट हायस्कूलच्या बास्केटबॉल संघातून खेळत असताना दरमहा पंच्याहत्तर डॉलर्स मानधनावर ‘एम्प्लॉयर्स कॅज्युअल्टी कंपनी ऑफ डलास’ या संस्थेचे काम करण्यासाठी आणि मुख्यतः त्यांच्या संघातून बास्केटबॉल खेळण्यासाठी बेबची नियुक्ती झाली. तिला जर खेळाडू म्हणून मानधन देण्यात आले असते तर तिला अॅमॅच्युअर खेळाडू म्हणून खेळता आले नसते; म्हणूनच तिला कागदोपत्री सेक्रेटरीपद देऊन त्याबद्दलचे म्हणून मानधन दिले गेले होते.

पूर्वी डलासमध्ये राहत असतानाच ट्रॅकवर धावण्यास तिने प्रारंभ केला होता आणि प्रारंभापासूनच तिने आपले क्रीडानैपुण्य दाखविले होते. १९३० मध्ये ‘एएयू’ स्पर्धांतील चार गटांत ती विजयी ठरली होती. १९३२ मध्ये ‘एएयू’ची विजेतेपद मिळविल्यामुळे बेब १६ जुलै १९३२ रोजी इव्हॅन्स्टन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. एम्प्लॉयर्स कॅज्युअल्टी संघाचे एकटीनेच प्रतिनिधीत्व करून आपल्या संघाला तिने तीस गुण मिळवून दिले होते. विशेष म्हणजे त्या वेळी उपविजेती संघात बावीस खेळाडू (अॅथलेट्स) असूनही त्या संघापेक्षा बेबने एकटीने आठ जादा गुण मिळविलेले होते. दहापैकी आठ गटांतील खेळांच्या स्पर्धांत केवळ तीन तासांच्या अवधीत सहभागी होऊन पाच गटात तिने निर्विवाद यश मिळविले होते.

उंच उडी स्पर्धा, ऐंशी मीटर अडचणीची स्पर्धा, जावेलीन थ्रो स्पर्धा आणि बेसबॉल स्पर्धा अशा चार स्पर्धांत तिने जागतिक विक्रम तोडले होते, असे शिकागो येथील ऑलम्पिक ट्रायल्स स्पर्धेत दिसून आले. घाईघाईने बेबला पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकसाठी पाठविण्यात आले होते.

१९३२च्या लॉस एंजिलिस येथील ऑलिम्पिकमधील पाच स्पर्धांसाठी बेबची निवड करण्यात आली असता तिला ती स्त्री असल्याने त्या वेळच्या नियमांनुसार फक्त तीनच स्पर्धांत सहभागी होता आले. त्या तीनही स्पर्धांत तिने जागतिक विक्रम नोंदवून दोन सुवर्णपदके व एक रौप्यपदक जिंकले होते. १४३ फूट ४ इंच इतक्या अंतरावर जावेलीन थ्रो करून, ११ मिनिटे आणि ७ सेकंदांत ८० मीटर अडचणींच्या शर्यतीत धावून आणि ५ फूट व ५ इंचांपेक्षा जास्त उंच उडी मारून बेबने जागतिक विक्रम प्रस्थापित केले होते.

बेब आणि जीन स्माईली या दोघींनीही उंच उडी मारण्यातील विक्रम प्रस्थापित केले होते. तरीही, बेबच्या दुर्दैवाने बेबचे डोके तिच्या सर्व शरीराच्या अगोदर बारच्या वर गेल्याचा निर्णय अधिकारीवर्गाने दिल्यामुळे बेबला प्रथम क्रमांक न देता दुसरा क्रमांक देऊन रौप्यपदक दिले गेले होते. विशेष म्हणजे तत्पूर्वी झालेल्या कुठल्याही स्पर्धेत बेबच्या उंच उडी मारण्याच्या पद्धतीला अयोग्य ठरविले गेले नव्हते.

इ.स. १९३३ मध्ये बेबने नवे आव्हान स्वीकारले. हायस्कूलमध्ये शिकत असताना खेळलेल्या गोल्फच्या खेळाकडे तिने आता आपला मोर्चा वळविला होता. तिने गोल्फमध्ये दोन वर्षांतच १९३५ मधील ङ्गटेक्सास वुमेन्स ॲमॅच्युअरफ पद जिंकले. बेब ही इतर खेळांत व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळली असल्याने तिला ॲमॅच्युअर म्हणून गोल्फ खेळता येणार नाही, ‘केवळ खेळाच्या अंतिम हितासाठी’ यू.एस. गोल्फ असोसिएशनने एक नियम लगेच जाहीरही करून टाकला होता. १९४३ पर्यंत हा नियम अंमलात होता. त्यानंतर बेब पुन्हा अॅमॅच्युअर म्हणून गणली गेली. इ.स. १९३५ ते १९३९ पर्यंत चार वर्षांत बेबने चाळीस स्पर्धा जिंकल्या होत्या. सातत्याने वा लागोपाठ तिने जिंकलेले सतरा सामने या ४० स्पर्धांत समाविष्ट होते.

पुरुषी व्यक्तिमत्त्वाच्या बेबला स्त्री म्हणून १९३८ सालापर्यंत कोणत्याही पुरुषाचे आकर्षण वाटले नव्हते असे दिसते. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मात्र तिची विकेट गेली. ‘लॉस एंजिलिस ओपन टेनिस स्पर्धे’त जेव्हा १९३८ साली तिने खेळण्यासाठी जार्ज झहारिस यास जोडीदार म्हणून निवडले तेव्हा ती त्याच्या कुस्तीगीर असलेल्या २३५ पौंडी शरीराच्या आणि माणसांत रमणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्त्वाला भुलूनच गेली! अकरा महिन्यांच्या प्रेमाच्या गाठीभेटीचे पर्यवसान विवाहात होऊन बेबचे नाव बेब डिड्रिक्सन झहारिस असे झाले होते.

मात्र झहारिसबरोबरचे वैवाहिक जीवन बेब फार वर्षे टिकवू शकली नाही. लवकरच ती गोल्फ खेळाडू आणि उत्तम अॅथलेट असलेल्या बेटी डॉड नामक तरुण मित्राच्या सहवासात राहू लागली होती.

१९४६ मध्ये बेब सातत्याने तेरा सामने जिंकली होती. १९४७ मध्ये तर उन्हाळ्यात झालेल्या १८ पैकी १७ गोल्फचे सामने ती जिंकली होती. इ.स. १९४८ मध्ये प्रथमच तिने तिच्या आयुष्यात यू.एस. वुमेन्स ओपन स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद आणि ऑल अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकल्या होत्या.

बेबचे वजन १४५ पौंडांपेक्षा जास्त नसतानाही ती नियमितपणे २५० याडौंवर बॉल ढकलत असे. याबाबत आश्चर्य वाटून बेबला काहीजणांनी स्पष्टीकरण विचारले होते. बेब म्हणाली होती, “अंगातले घट्ट कपडे सैल केले की तसे करता येते!”

बेबला सुचवायचे होते की, आपल्या पोटातील स्नायूंवर नियंत्रण ठेवून आणि आवश्यक तेव्हा सैल कपडे घालून बॉल दूरवर फेकता येतो किंवा गोल्फमध्ये बॉल दूरवर ढकलता येतो.

१९४५, ४६ आणि ४७ या तीन वर्षांत सातत्याने ‘फिमेल अॅथलेट ऑफ दि इयर’ म्हणून तिची निवड असोसिएटेड प्रेस उर्फ ए.पी. तर्फे जाहीर करण्यात आली होती.

आपण क्रीडाक्षेत्रात उतुंग यश कसे मिळवितो आणि टीकाकारांविषयी आपल्यास काय वाटते या प्रश्नांना सामोरे जाताना बेब म्हणाली होती, “टेक्सासमधील एका मुलीविषयी अद्वातद्वा बोलणे सोपे असते. बोलणारांच्या दृष्टीने भडक भाषेत बोलणे कदाचित योग्यही असेल. मला एवढेच ठाऊक आहे की, मी उडी मारू शकते आणि हातातील वस्तू उंच उडवू शकते.त्याचप्रमाणे पिस्तुलातील गोळी उडवून शर्यत सुरू झाल्याचा इशारा मला जेव्हा मिळतो तेव्हा मी स्वतःला बजावते की, “मुली, ही आणखी एक स्पर्धा तुला जिंकायची आहे!” आणि मी बहुधा स्पर्धेत यश मिळवतेच!”

अशा या विजिगीषू अद्भुत क्रीडापटू बेबच्या शरीरात कॅन्सरने प्रवेश केलेला आहे हे १९५३ मध्ये लक्षात आले. तिच्या शरीरातून कॅन्सरची गाठ डॉक्टरांनी काढली होती; परंतु शरीराच्या अन्य भागात कॅन्सर पसरला होता. शस्त्रक्रिया करणे अशक्य ठरले. तरीही चौदा आठवड्यांनी बेबने गोल्फच्या स्पर्धेत भाग घेतला. तिसऱ्यांदा यू. एस. वुमन्स ओपन स्पर्धेत ती जिंकली होती. सहाव्यांदा ‘ए.पी. फिमेमल अॅथलेट ऑफ दि इयर’ हा पुरस्कार तिला लाभला होता.

१९५५ मध्ये तिच्या पाठीच्या मणक्यातील खालील भागात कॅन्सरमुळे विलक्षण दुखू लागले होते. वेदना असह्य होत्या. वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी २७ सप्टेंबर १९५६ रोजी टेक्सासमधील गालव्हेस्टन गावी ती निधन पावली. गुणी तरुण माणसांना अकालीच कॅन्सरसारखा रोग का होतो हे नियतीलाच ठाऊक! विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना कॅन्सरने हरविले आहे!

बेबने आयुष्यात अनेक सामने अद्भुत शक्ती दाखवून जिंकले होते. कॅन्सरवर मात्र तिला मात करता आली नाही. विसाव्या शतकातील पहिल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ महिला खेळाडू आपल्या आयुष्याचे अर्धशतकही पूर्ण करू शकली नव्हती!

वय वर्षे पंचेचाळीस हे का कर्तबगार माणसाचे मरणाचे वय होते? नियतीला हे कळत का नव्हते? कर्तबगार माणसांना अल्पायुष्य देण्यात का नियतीची कर्तबगारी ठरते?

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..