नवीन लेखन...

आपटेआजींचा जीभखवळू बटाटावडा 

काही दिवसांपूर्वी, ठाण्याच्या आपटे आजींची बटाटा वड्याची गाडी पुन्हा सुरू झाल्याची पोस्ट फोटोसहित fb वर मंदार जोशीने टाकलेली वाचनात आली आणि स्मृती जाग्या झाल्या, जीभ खवळून उठली.

गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे.

१९८८ साली मी बोहोल्यावर चढलो आणि चतुर्भुज झालो. एकदा संध्याकाळचे फिरत फिरत आम्ही त्या बाजूने जाताना खमंग स्वाद नाकात शिरला. आमचे पाय काही केल्या पुढे जाईचनात. गंधाचा वेध घेत गेलो तर तिथे एक बटाटे वडा, बटाटा भजीची गाडी उभी होती. स्थूल अंगाच्या, लहानखुऱ्या उंचीच्या, गोऱ्यापान प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या आणि हसऱ्या डोळ्यांच्या आपटे आजी ग्राहकांना हवं नको ते तत्परतेने पहात होत्या. आजूबाजूच्या परिसरात वडे भजीचा “जीभखवळू” स्वाद भरून राहिलेला होता. आम्ही अगदी नाईलाजाने….बटाटे वड्याची ऑर्डर दिली. गोड हसत आजींनी दिलेल्या वड्याचा पहिला घास जिभेवर ठेवला, आणि अहो काय सांगू ?….आता एक तर बटाटे वडा म्हणजे माझा कमकुवत बिंदू (weak point) आणि त्यात अस्सल मराठी बनावटीचा वडा “जी.ख.” स्वादासहित मुखात गेल्यावर दुसरं काय होणार सांगा ???
“ब्रह्मानंदी लागली टाळी (आणि पुढे नम्रपणे थोडा बदल करून म्हणतो) जिव्हेते कोण सांभाळी” अशी अवस्था होऊन गेली. एक प्लेट संपल्यावर, अजून एका प्लेटची मागणी करणं साहजिकच होतं म्हणा. आणि देवाशपथ सांगतो, आम्ही अगदी तसच केलं. दुसरा वडा खात असतानाच गरमागरम बटाटा भजींचा घाणा कढईतून अगदी अलगद समोर उतरला. कसं आवरायचं जिभेला सांगा बरं ??? म्हणून आपली, एक प्लेट ती पोटात गेली, आणि मग मात्र गाडीभवती घिरट्या घालणाऱ्या मनाला आणि नाकाला आवरलच अगदी आणि पैसे देऊन पुढे निघालो ते जिभेवर वडा भज्यांची चव घोळवत. त्यानंतर अगदी नित्यनेमाने नाही, पण आठवड्यातून दोनेक वेळा तरी पाऊलं आपटे आजींच्या गाडीकडे अगदी सहज वळू लागली. आजी सुद्धा अगदी हसतमुखाने प्रेमाने समोर आलेल्या खवैय्यांच्या हाती वडा ठेवायच्या.

१९८४ साल, म्हणजे ज्या काळात ठाण्यात तरी अशा रस्तोरस्ती वडा भजी विकणाऱ्या गाड्या….आणि त्याही स्त्रियांनी चालवलेल्या फारशा दृष्टीला पडत नव्हत्या. त्या काळात ब्राम्हण वर्गातील, सुशिक्षित घरातल्या एका स्त्रीने, त्यांचे यजमान नोकरी करत असलेली कंपनी बंद पडल्यामुळे, वडा, वडा पाव, भजी विक्रीची गाडी सुरू करण्याचं धारिष्ट्य दाखवलं हे खरंच कौतुकास्पद आहे.

१९८८ मध्ये मी लग्न होऊन पश्चिम उपनगरात राहायला आलो, आणि इकडचाच होऊनही गेलो. अधूनमधून ठाण्याला जाणं व्हायचं पण तेव्हढ्यापुरतच. हळुहळु आपटे आजींच्या वड्याची आठवण अंधुक होत गेली, आणि पुन्हा खवळून जागी झाली ती लेखाच्या सुरवातीला मी उल्लेख केलेल्या पोस्टमुळे. आणि गंमत म्हणा किंवा योगायोग, पण त्यानंतर अगदी काही दिवसातच ठाण्याला जाण्याचा योग आला. माझा एक घट्ट मित्र ठाण्यात रहातो. पायाच्या दुखण्यामुळे तो बाहेर वगैरे एकटा पडत नाही. दोन चार महिन्यांनी मी त्याच्याकडे एक मुक्कामाची फेरी मारतो. भरपूर गप्पा मारत एकत्र जेवण खाण होतं. यावेळच्या फेरीत मी आपटे आजींची गाडी शोधत शोधत गेलो, पण त्यांच्या पूर्वीच्या जागी काहीच दिसेना. बातमी पक्की होती म्हणून, जरा बाजूच्या गल्लीत डोकावलो तर एक चार चाकी हातगाडी उभी दिसली. वय विसरून उत्साहाने धावत गेलो, आणि अहो, आपटे आजी आणि आणि त्यांची वड्याची गाडी दोन्ही सापडल्या…..पण गरमागरम जी.ख. स्वाद येईना की तळणीच्या काही खुणाही दिसेनात. निराश होऊन विचारलं,
“संपले का वडे ?”

त्यावर पूर्वीसारख्याच गोड हसून आजी उत्तरल्या,
“आहेत ना ! किती हवे होते ?”
आनंदाने पुढचा प्रश्न विचारला,
“बटाटा भजी पण आहेत का ?” तर नाही म्हणाल्या.

म्हटलं जाऊदे, वडा तर मिळालाय ना. आजी दुसऱ्या एका ग्राहकाला वडे बांधून देत होत्या. मी गाडीचं निरीक्षण करत होतो. पावाने भरलेली पिशवी, गोड चटणीचा, लसणाच्या चटणीचा आणि मिरचीच्या ठेच्याचा असे तीन छोटे डबे आणि आजींची पर्स सोडली, तर महत्त्वाच्या स्टोव्ह, कढई, झारा, तेल या गोष्टी कुठेच दिसत नव्हत्या. तिथे ठेवलेल्या एका प्लास्टिक डब्यातून वडे काढून आजी देत होत्या. मग कळलं की गाडीच्या समोरच्या इमारतीत त्या रहातात, आणि किचन त्यांनी तिकडे ठेवलं होतं. इकडून हात करून सांगितलं की गरमागरम वडा भजी हजर. मी दोन वडापाव आणि एक प्लेट वडा घेतला. आजींनी अगदी व्यवस्थित पाव मध्ये कापून गोड चटणी लावली, वडे आणि लसूण चटणी भरली. ठेचा हवा का विचारत होत्या, म्हटलं नको. छान बटर पेपर आणि वर्तमानपत्रात बांधून पार्सल माझ्या हाती दिलं. पार्सल बनत असताना आमच्या गप्पा सुरू होत्या. कुठे राहता ? पश्चिम उपनगरात दहिसर म्हटल्यावर तिकडच्या त्यांच्या नातलगांचे पत्ते सांगितले. आणि पुन्हा ठाण्यात आल्यावर येण्याचं आमंत्रण दिलं. त्यावर म्हटलं, की हे सांगायलाच नको. आता ठाण्यात आल्यावर इकडे पावलं वळणारच. आम्ही बोलत असताना, एक बाई जाता जाता आजीना पाहून थांबल्या, म्हणाल्या,

“अरे, आता इथे गाडी लावता का ? पूर्वी बाहेरच्या रस्त्यावर असायची ना त्यामुळे कळलंच नाही. आज इकडून आले म्हणून कळलं.” (पण आता त्यांची गाडी पूर्वीच्या जागीच आलेली आहे)

आजींच्या गाडीचा शोध लागल्याचा आनंद जाताना त्यांच्या मुखावर दिसत होता.

इतक्यात एक व्यक्ती आली, एक वडा पाव घेतला, खाऊन झाल्यावर दुसऱ्याची ऑर्डर दिली आणि त्यानंतर तिसरा खाऊन अगदी समाधानाने मार्गस्थ झाली.

मी ही हातातलं पार्सल जीवापाड सांभाळत (पावसापासून) मित्राकडे परतलो आणि हात धुवून दोघांनी वडापाव आणि वड्याचा फन्ना उडवला.
ठाण्याने स्मृतीत जपून ठेवण्यासारख्या अनेक गोष्टी, आठवणी मला दिल्या, त्यातली ही एक अंधुक झालेली जी.ख. आठवण पुन्हा एकदा ठळक झाली.

या वेळची ठाणा फेरी आपटे आजींच्या आणि त्यांच्या वड्याच्या पुनर्भेटीमुळे आणि सेवनामुळे सार्थकी लागली एव्हढं मात्र खरं……

अनेक वाचक लोकेशन विचारतात, केवळ म्हणून…

आपटे आजी बटाटा वडा
A.k Joshi शाळेच्या पुढे
अंकित स्पोर्ट्स, जैन मंदिर जवळ
घंटाळी , ठाणे पश्चिम ( संध्या. ४.३० ते ८)

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..