नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय पंधरावा – पुरुषोत्तमयोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे
पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
पुरुषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय


श्रीभगवानुवाच ।
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १

श्रीभगवान म्हणाले,
वेदवाक्य ही पाने ज्याची‚ मुळे वरी‚ खाली फांद्या
या अविनाशी वृक्षा जे जाणति त्यां वेदज्ञ हि संज्ञा १

अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा
गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ २

त्रिगुणांच्या पारंब्या फुटती इतस्तताच्या फांद्यांना
येती खाली कर्मबंधनीं जखडायाला मनुजांना २

न रूपमस्येह तथोपलभ्यते
नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूलं
असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ ३

अशा स्वरूपी वृक्षाचे प्रत्यक्ष इथे दिसणे न घडे
आरंभ नि अस्तित्व अंतही ना त्याचा दृष्टीस पडे
घट्ट मुळाच्या या वृक्षाची हवी समाप्ती करावया
विरक्ततेच्या तलवारीने मुळासहित त्या छाटुनिया ३

ततः पदं तत्परिमार्गितव्यं
यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये ।
यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ ४

अन् त्यानंतर ध्यास धरावा ब्रह्म-सनातन तत्वाचा
ज्याच्या पासुन उपजे प्रवृत्ती त्या आदीपुरूषाचा
या करण्याने होइल प्राप्ति परम अशा त्या मोक्षाची
जेथुन घ्यावी ना लागे फेरी फिरफिरुनी जन्माची ४

निर्मानमोहा जितसङ्गदोषा
अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्-
गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ ५

मान‚ मोह‚ आसक्तीपासून खरोखरीने जे मुक्त
अध्यात्माचे ज्ञाते आणिक निरिच्छ बुध्दीने युक्त
सुखदु:खाच्या कल्पनांमधी सदैव राखिति स्थिरमती
असे ज्ञानिजन‚ धनंजया‚ अव्ययस्थानाजवळी जाती ५

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ६

जिथुन परतुनि यावे नलगे जन्माला‚ ऐसे स्थान
अग्नि‚ चंद्र वा सूर्य न लागे उजळाया ते मम सदन ६

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ ७

पार्था माझा अंश राहतो व्यापुनि या इहलोकात
शरिरांमध्ये जीवरूपाने मनाइंद्रियांसमवेत ७

शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥ ८

जिवा लाभता शरीर, होतो षडेंद्रियांमधि रममाण
शरीर सुटता त्यांना संगे घेउन करितो निर्गमन
जैसा वारा पुष्पांपासुन गंधाला वाहुन नेतो
तसा जिवात्मा पाच इंद्रियांसवे मना घेउन जातो ८

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥ ९

कान‚ नेत्र‚ कातडी‚ जिव्हा‚ अन् नाक‚ तसे मन मनुजाचे
यांच्या योगे भोग घेई जिव शरीरामधुनी विषयांचे ९

उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम् ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १०

हा शरिरामधि राहणारा अन निघून जाणारा जीव
विषयभोग घेई होता मनि त्रिगुणांचा प्रादुर्भाव
अशा जिवाला अज्ञानी जन कदापिही जाणु न शकती
ज्ञानचक्षुनी पाहू बघती तेच तयाला ओळखती १०

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ ११

प्रयत्न करता योगी या जीवात्म्याला ओळखतात
लाख प्रयत्नांनंतरही ना जाणति जे ते असंस्कृत ११

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १२

सूर्य‚ चंद्र‚ अग्निचे तेज जे समस्त जगता उजळितसे
धनंजया‚ ध्यानि घे‚ तेज ते माझ्यामधुनिच उपजतसे १२

मामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १३

त्या तेजायोगे भूमीमधि प्रवेश मी करितो पार्थ
चंद्ररसाच्या रूपाने, रे, वनौषधींच्या पुष्टयर्थ १३

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १४

जठराग्नीच्या रूपाने मी प्राण्यांच्या देहात वसे
प्राण‚ अपान ऐशा वायूंने अन्न चतुर्विध पचवितसे १४

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो
मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो
वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५

सर्वांच्या हृदि मी‚ मजपासुन मति‚स्मृती‚ अन् विस्मृतिही
वेदांमधले ज्ञान मीच‚ अन् मी वेदांचा कर्ताही १५

द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १६

क्षर अन् अक्षर दो प्रकारचे पुरूष इथे इहलोकात
जीव ‘क्षर’‚ अन मूलतत्व जे ‘अक्षर’ या नावे ख्यात १६

उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ।
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १७

पुरुषोत्तम वेगळा दोन्हिहुन‚ त्याला म्हणती परमात्मा
त्रिलोक व्यापुन राहे आणि पोषि तयांसी तो आत्मा १७

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १८

क्षरापलिकडे आहे मी‚ अन् अक्षराहुनिही श्रेष्ठ
तरीच पुरूषोत्तम मज म्हणती त्रिलोकात अन् वेदात १८

यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १९

पुरूषोत्तम मी‚ हे जो जाणी नि:शंकपणे‚ धनंजया
सर्वज्ञानी होउनि मजसि भजे भक्तिने पूर्णतया १९

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ ।
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ॥ २०

गुपितामधले गुपीत ऐसे शास्त्र तुला जे कथिले मी
ते समजुन घेण्याने होइल कृतकृत्य बुध्दिमंतही २०

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे
पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी पुरुषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय पूर्ण झाला.

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..