नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय चौथा – ज्ञानकर्मसंन्यासयोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय.


श्रीभगवानुवाच ।
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १

श्री भगवान म्हणाले‚
हा सांगितला योग प्रथम मी विवस्वान सूर्याला‚
त्याने मनुला‚ मनुने नंतर स्वपुत्र ईक्ष्वाकूला १

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप॥ २

तदनंतर मग परंपरेने इतराना कळला
काळाच्या उदरात पुढे तो गेला विलयाला २

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३

तू माझा प्रिय भक्त अन् सखा असेच मी मानतो
म्हणुनी तोच पुरातन उत्तम योग तुला सांगतो ३

अर्जुन उवाच ।
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति॥ ४

अर्जुन म्हणाला‚
विवस्वान हा असे पुरातन‚ तुझा जन्म तर नवा
कसा भरवसा व्हावा त्याला कथिला योग तुवा ? ४

श्रीभगवानुवाच ।
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप॥ ५

श्री भगवान म्हणाले‚
तुझे नि माझे जन्म अर्जुना झाले रे अगणित
ज्ञात मला ते सर्व परंतु तुज नाही माहित ५

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ६

सर्व जिवांचा ईश्वर मी, ना जन्मत अथवा मरत
तरी प्रसव स्वेच्छेने घेतो याच प्रकृतीत ६

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७

जेव्हा जेव्हा अवनीवरती धर्मऱ्हास होतो
अधर्मनाशास्तव मी तेव्हा जन्माला येतो ७

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥ ८

सज्जनरक्षण‚ कुकर्मनाशन‚ धर्मस्थापनार्थ
युगा युगातुनि जन्म घेउनी मी येतो‚ पार्थ ८

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन॥ ९

दिव्य असे मम जन्म‚ कर्म हे जाणवती ज्याला
पुर्नजन्म ना लागे त्याला, मिळे येउनी मला ९

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ १०

माया भय अन् क्रोध त्यागुनी ठेवुनि विश्र्वास
विशुध्द बनलेले ज्ञानी मज आले मिळण्यास १०

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ११

करती माझी भक्ति अशी जे त्यांवरती प्रीती
करतो मी‚ ते येती सर्वश: मम मार्गावरती ११

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२

इहलोकातच त्वरीत व्हावी सिध्दीची प्राप्ती
इच्छुनिया हे फल‚ पूजा देवांचि इथे करती १२

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥ १३

गुणकर्माअनुसार निर्मिले मी चारी वर्ण
त्यांचा कर्ता‚ तसेच हर्ता मीच असे जाण १३

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते॥ १४

कर्मबंध ना मजला‚ वा मी ना ठेवि फलाशा
हे जो जाणी त्या न बांधिती कर्म नि अभिलाषा १४

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५

पूर्वी जैसी मोक्षेच्छूनी कर्मे आचरिली
तशिच अर्जना‚ तूहि करावी ती कर्मे आपुली १५

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६

काय करावे‚ काय करू नये कठिण जाणण्यास
दाखवीन मी अशुभमुक्तीप्रद कर्मे करण्यास १६

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः॥ १७

कर्माकर्मामधिल भेद ना सोपा समजावा
कर्म‚ अकर्म नि दुष्कर्मातिल फरक कळुन घ्यावा १७

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्॥ १८

ज्याला दिसते कर्म अकर्मासम वा अकर्म कर्म
तो ज्ञानी बुध्दिमान जाणी कर्मामधले मर्म १८

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः॥ १९

ज्याची सारी कर्मे असती कर्मफलेच्छेविना‚
जाळी ज्ञानाग्नित कर्मे तो ‘पंडित’ सकलजनां १९

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः॥ २०

फलप्राप्तीची आस सोडुनी निरिच्छ अन् तृप्त
कर्म करी तरि प्रत्यक्षामधि राहि तो अलिप्त २०

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥ २१

आशाविरहित‚ चित्तसंयमित‚ शरीरधर्माची
कर्मे करि जो त्या न लागती पापे कर्माची २१

यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते॥ २२

हर्षशोक‚ हेवेदावे अन् यशअपयश दोन्ही
समान समजुन कर्तव्य करी असा पुरूष ज्ञानी
दैवेच्छेने मिळे त्यात तो मानि समाधान
पापपुण्य कर्मातिल त्याला ना ठरते बंधन २२

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ २३

निरिच्छ अन् समबुध्दी ज्ञानि जे करी यज्ञकार्य
त्या कर्मातिल गुणदोषांचा होइ पूर्ण विलय २३

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ २४

यज्ञार्पणहवि‚ यज्ञाग्नी‚ अन् हवन यज्ञकर्म
ब्रह्मरूप हे तिन्ही जो करी त्यास मिळे ब्रह्म २४

दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति॥ २५

देवांसाठी कोणी योगी यज्ञकार्य करिती
तर कोणी यज्ञाची पूजा यज्ञाने मांडती २५

श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ २६

नाक कान अन् दृष्टी यांचा संयम पाळुनिया
उच्चारण करि त्या जिव्हेला आवर घालुनिया
एक प्रकारे या सर्वाचे असे हवन करुन
कोणी योगी आचरिती जे तेहि असे यजन २६

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते॥ २७

सर्व इंद्रियांच्या कर्मांचे ज्ञानाग्नित हवन
करिति कोणि तो असतो आत्मसंयमन यज्ञ २७

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः॥ २८

धन‚ तप‚ आत्माभ्यास असे कितितरी विविध यज्ञ
करीत असती पूर्णव्रताचरणी ऐसे सूज्ञ २८

अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः॥ २९

श्वासोच्छवासावरी ठेवती ताबा मुनि काही
प्राणायामाच्या स्वरूपातिल यज्ञाचे आग्रही २९

अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ३०

अन्ननियोजन हेही कुणाला यज्ञासम ज्ञात
सर्व यज्ञकर्मी ऐसे हे असति पुण्यवंत ३०

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ३१

यज्ञानंतर उरते अमृत तेच फक्त भोगिती
ते पुण्यात्मे परलोकामधि ब्रह्मस्थान मिळविती
यांपैकी एकही यज्ञ ना करती जे लोक
इहलोकातहि नाहि स्थान त्यां कुठून परलोक ? ३१

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ३२

वेदांमध्ये या साऱ्या यज्ञांचे वर्णन आहे
कर्मामधुनी जन्म तयांचा सत्य जाण तू हे
ब्रह्ममुखाने सांगितलेल्यावरती दे लक्ष
या सत्याचे आकलन होता पावशील मोक्ष ३२

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ३३

धनयज्ञाहुन मोठि श्रेष्ठता ज्ञानयज्ञाची
ज्ञानसाधना करून होते प्राप्ती मोक्षाची ३३

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ३४

वंदन आणिक सेवा करूनि विचार ज्ञानिजनां‚
उपदेशाने देतिल तुजला ज्ञान‚ कुंतिनंदना ३४

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ३५

त्या ज्ञानाच्या योगे होशिल तूहि मोहमुक्त
समाविष्ट दिसतील सर्व जिव तुझ्या नि माझ्यात ३५

अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ३६

आणि मानले जरि पाप्यांहुन तू पापी असशी
ज्ञानाच्या जोरावर जातिल विरुन पापराशी ३६

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ३७

समिधा अग्नीमधी टाकिता होति भस्मसात
तशा प्रकारे ज्ञान करी कर्मांचा नि:पात ३७

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ३८

या अवनीवर पवित्र ज्ञानाहून नसे काही
सिध्दयोगि पुरूषाला याची जाणिव मग होई ३८

श्रद्धावांल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९

ज्ञान हे मिळे समत्वबुध्दी श्रध्दावंताना
ज्या योगे ते अखेर जाती चिरशांतिनिधाना ३९

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४०

अज्ञ आणि अश्रध्द संशयात्म्यांचा हो नाश
इहपरलोकी त्या न मिळे शांतीचा लवलेश ४०

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४१

आत्मज्ञान मिळवून फलेच्छा जो टाकी त्यजुनी
कर्मयोगि तो होइ मुक्त मग कर्मबंधनातुनी ४१

तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४२

अज्ञानातुनि जन्मुनि वसतो मनात जो संशय
ज्ञानाच्या खड्गे छिंदुनि तो उठि रे धनंजय ४२

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला.

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..