नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय चौदावा – गुणत्रयविभाग योग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय.


श्रीभगवानुवाच ।
परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।
यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥ १

उत्तमातले उत्तम ऐसे ज्ञान सांगतो पुन: तुला
जे मिळता किति मुनिवर गेले परमसिध्दिच्या मोक्षाला १

इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥ २

या ज्ञानाचे सहाय्य घेउन मजसि पावती तादात्म्य
जन्ममृत्त्युच्या चक्रामधुनी विमुक्त होती‚ धनंजय २

मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम् ।
सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ ३

महाब्रह्म ही माझी योनी‚ गर्भ ठेवितो मी तीत
आणि भारता‚ जन्मा येई त्यातुन हे सारे जगत ३

सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः ।
तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ ४

कौंतेया‚ साऱ्या योनींतुन जन्माला येती जीव
महाब्रह्म योनींची योनी आणि मजकडे पितृत्व ४

सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः ।
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥ ५

प्रकृतीतल्या सत्व-रजो-तम या त्रिगुणांच्या संगाने
देहामधल्या जीवांवरती‚ पार्था‚ पडती नियंत्रणे ५

तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम् ।
सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ ॥ ६

निर्मल अन् निर्दोष सत्व देई प्रकाश त्या जीवाना
सौख्यबंधने‚ ज्ञानबंधने पडती रे, निष्पापमना ६

रजो रागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् ।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम् ॥ ७

प्रीतीमधुनी रजोगुणाची उत्पत्ति असे‚ धनंजया‚
आकांक्षा अन् आसक्तीने बांधि जिवा तो‚ कौंतेया ७

तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् ।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ ८

अज्ञानातुन तम जन्मे जो पाडि जिवाला मोहात
तसेच आळस‚ निद्रा‚ आणिक प्रमाद यांच्या बंधात ८

सत्त्वं सुखे सञ्जयति रजः कर्मणि भारत ।
ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सञ्जयत्युत ॥ ९

सत्व सुखाने‚ रज कर्माने‚ तसेच तम अज्ञानातुन
प्रमाद करण्या भाग पाडिती जीवाला‚ कुंतिनंदन ९

रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत ।
रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १०

तम नि रजाच्या पाडावाने सत्व कधी वरचढ होते‚
कधि तमसत्वावर रज आरूढ‚ रजसत्वावर तमहि तसे १०

सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्प्रकाश उपजायते ।
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥ ११

सर्व इंद्रियांमधि ज्ञानाचा प्रकाश निर्मल जधि येतो
जाण‚ सत्वगुण त्या समयाला मनात वृध्दिंगत होतो ११

लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा ।
रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥ १२

भरतश्रेष्ठा‚ रजोगुणप्रभावामधि लोभारंभ असे‚
कर्मकांड प्रिय बनुनी इच्छा अतृप्तीची वाढ वसे १२

अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च ।
तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥ १३

तसे तमाने‚ हे कुरूनंदन‚ आळस अंगी बाणवतो
निष्क्रियता‚ मूर्खता‚ मोह यांच्या आहारी नर जातो १३

यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् ।
तदोत्तमविदां लोकानमलान्प्रतिपद्यते ॥ १४

सात्विकता अंगिकारता मग जेव्हा होई देहान्त
मनुष्य जातो निर्मल ऐशा ज्ञानि मुनींच्या लोकात १४

रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते ।
तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥ १५

रजोगुणातिल मृत्यूनंतर कर्मलिप्तसा जन्म पुन:
तमातल्या मरणाने निश्र्चित पशुयोनीमधि ये जनना १५

कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् ।
रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥ १६

पुण्यकर्म फल सत्वामधले विशुध्द असते हे जाण
रजातले फल दु:खप्रद अन तमातले दे अज्ञान १६

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ १७

सत्वामधुनी ज्ञानोत्पत्ती येई‚ लोभ रजामधुनी
प्रमाद आणि मोह तमातुन‚ तसेच अज्ञानहि येई १७

ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १८

सात्विक पोचे उच्च स्तरावर‚ राजस खालोखाल वसे
घृणाकारि गुणवृत्ति तामसा अधोगतीची वाट असे १८

नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति ।
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥ १९

त्रिगुणांखेरिज करविता नसे दुजा कुणी हे कळे जया
त्या द्रष्टया सन्निधता माझी निश्चित लाभे‚ धनंजया १९

गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् ।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥ २०

त्रिगुणांच्या पलिकडे पाहि जो असा देहधारी भक्त
जरा‚ दु:ख अन् जननमरण या चक्रातुन होई मुक्त २०

अर्जुन उवाच ।
कैर्लिङ्गैस्त्रीन्गुणानेतानतीतो भवति प्रभो ।
किमाचारः कथं चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥ २१

अर्जुन म्हणाला‚
“देहधारि हा काय करोनी त्रिगुणाच्या जाई पार‚
कैसे लक्षण‚ कैसे वर्तन‚ त्याचे कथि मज‚ मुरलिधर” २१

श्रीभगवानुवाच ।
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव ।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति ॥ २२

श्री भगवान म्हणाले‚
ज्या मनुजाला प्राप्त असे फळ सत्व‚ रज‚ नि तम त्रिगुणांचे
ना अव्हेरी‚ ना त्यांस्तव झुरी‚ हे वैशिष्टय असे त्याचे २२

उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते ।
गुणा वर्तन्त इत्येवं योऽवतिष्ठति नेङ्गते ॥ २३

उदासीन त्रिगुणांप्रत राही‚ होई न विचलित त्यांपायी
स्वीकारूनि अस्तित्व तयांचे अलिप्त त्यांपासुन राही २३

समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः ।
तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥ २४

सुख-दु:ख तसे प्रिय-अप्रिय वा स्तुति-निंदा‚ माती-सोने
समान मानी ही सारी अन् स्वस्थ राही तो धैर्याने २४

मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः ।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ २५

तसेच मान‚ अपमान आणखी शत्रु‚ मित्र या दोन्हीत
भेद न मानी कर्मयोगी जो त्याला म्हणति गुणातीत २५

मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते ।
स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते ॥ २६

एकनिष्ठ राहुनि माझ्याशी करि मम सेवा भक्तीने
अशा गुणातीतास लाभते ब्रह्मपदी स्थायिक होणे २६

ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ २७

अमर्त्य‚ अव्यय ब्रह्माचे, भारता‚ अखेरीचे सदन
शाश्वत धर्माचे‚ सुखपरमावधिचे‚ मी आश्रयस्थान” २७

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय पूर्ण झाला

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..