नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय अठरावा – मोक्षसंन्यासयोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः ॥

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय


अर्जुन उवाच ।
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १

अर्जुन म्हणाला,
पूर्ण कर्मसन्यास आणखी फलत्यागामधला
दोन्हिमधला फरक सांग तू, केशिनिषूदन, मला १

श्रीभगवानुवाच ।
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ २

श्री भगवान म्हणाले,
ज्ञानी म्हणती पूर्ण कर्म सोडणे असे ‘संन्यास’
फलेच्छेविना कर्मे करणे – ‘त्याग ‘ संज्ञा त्यास २

त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ ३

दोषास्पद कर्मे टाळावी म्हणती काही ज्ञानी
यज्ञ, दान, तप कधीही न टाळावे म्हणती कोणी ३

निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥ ४

त्यागामधले तत्व काय ते कथितो मी तुजला
तीन प्रकारे त्याग वर्णिला जातो, नरशार्दुला ४

यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥ ५

यज्ञ, दान, तप त्यागु नये कधि हे निश्चित जाण
या कर्मांच्या आचरणाने पावन होती सुज्ञ ५

एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥ ६

तरिहि फलाची धरू नये कधि या कर्मांतुन आशा
ठाम असे हे मत माझे, ना ठेवावी अभिलाषा ६

नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ ७

या नियमित कर्मांपासुन कधि घेउ नये संन्यास
मोहापायी घेतल्यास त्या जन गणतिल ‘तामस’ ७

दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥ ८

नको कष्ट देहास म्हणुनि वा भीतिपोटि संन्यास
घेतिल या कर्मांचा तर तो त्याग विफल ‘राजस’ ८

कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन ।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९

अभिलाषांना त्यागुन केली नियमित कर्मे, पार्थ
तर त्या त्यागाला ‘सात्विक’ हे अभिधान ठरे सार्थ ९

न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १०

अकुशल कर्मे नावडती, अन् कुशल तितुकि आवडती
असे न मानी त्यागि पुरूष नि:शंकित ठेवुनि मती १०

न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥ ११

देहधारिना अशक्य त्यजणे कर्मे पूर्णपणे
फलाभिलाषा त्यजती त्यांसच कर्मयोगी म्हणणे ११

अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् ।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ॥ १२

इष्ट, अनिष्ट नि मिश्र अशी कर्माचि फळे तीन
मरणानंतर भोगत असती रे सामान्य जन
खरेखुरे त्यागी ज्यांनी ना धरिला अभिलाष
कर्मफलांच्या सुखदुखांचा त्यांसि न हो स्पर्श १२

पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥ १३

पाच कारणे कर्मसिध्दिची वेदान्ती वर्णन
महाबाहु, घे समजुन जी मी पुढे करिन कथन १३

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥ १४

जागा, कर्ता, साधन, तैसे विविध यत्न, दैव
ही असती ती पाच कारणे, घे ध्यानी, पांडव १४

शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः ।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥ १५

कायावाचामने करी कर्मे जी मनुष्यप्राणी,
योग्य असो वा अयोग्य, होती याच कारणांनी १

तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ॥ १६

तरिही ज्याला वाटे की तो स्वत:च कर्ता असे
मूढमती निर्विवाद तो, जो यथार्थ जाणत नसे १६

यस्य नाहङ्कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वाऽपि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥ १७

निरहंकारी अलिप्तबुध्दी असा पुरूष जगती
मारिल सर्वां तरि ठरेल ना मारेकरि संप्रती १७

ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसङ्ग्रहः ॥ १८

कर्माला प्रवृत्त करति रे ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता
अन् कर्माचे घटक साधने, कर्म, आणि कर्ता १८

ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः ।
प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥ १९

त्रिगुणांच्या अनुषंगे कर्ता, कर्म, ज्ञान यांचे
तीन भेद असती कथितो तुज श्रवण करायाते १९

सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते ।
अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥ २०

(ज्ञान)
विभक्त ऐशा जीवांमाजी भाव असे एक
ज्ञान जे असे सांगे त्याला समजावे ‘सात्विक’ २०

पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् ।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् ॥ २१

ज्यायोगाने सर्वांभूती भिन्न भाव दिसती
त्या ज्ञानाला ‘राजस’ ऐशा नावे संबोधती २१

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम् ।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ॥ २२

एका कर्मी आसक्ती, सर्वस्व मानुनी त्यासी,
ज्या योगे ठेवी मानव ते अल्पज्ञान ‘तामसी’ २२

नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम् ।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ २३

(कर्म)
नियत कर्म आसक्ती आणि प्रीतिद्वेषविरहित
फलेच्छेविना केले तर ते ‘सात्विक’ ऐसे ख्यात २३

यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः ।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ॥ २४

फलाभिलाषा धरून आणिक महत्प्रयासें केले
अहंकारपूर्वक, त्या कर्मा ‘राजसात’ गणलेले २४

अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् ।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ २५

मोहापोटी हिंसापूर्वक अन् ना जाणुनि कुवत
केलेले जे कर्म पार्थ, ते ‘तामस’ म्हणुनी ज्ञात २५

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥ २६

(कर्ता)
अनासक्त, निरहंकारी, उत्साही, संतुष्ट
कार्य सिध्द हो वा न हो, न होई कधिही रुष्ट
आणि जो निर्विकार राहुनि कर्मे नियत करी
त्याला ‘सात्विक’ कर्ता ऐसी मिळे उपाधी खरी २६

रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः ।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥ २७

प्रीति-हर्ष वा शोकलिप्त कर्ता जो हिंसाचारी,
कर्मफलेच्छू, अपवित्र, तया ‘राजस’ म्हणती सारी २७

अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः ।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥ २८

चंचलबुध्दी‚ अज्ञ‚ हट्टि‚ ठक‚ चेंगट अन् आळशी
अशा दुर्मुखी कर्त्याला जन मानतात ‘तामसी’ २८

बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु ।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥ २९

बुध्दी अन् धैर्यामध्येही त्रिगुणानुसार फरक
पूर्णपणे पण वेगवेगळे वर्णन करतो ऐक २९

प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये ।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३०

उचित आणखी अनुचितात वा भय अन धैर्यामधी
बंध मुक्तितिल भेद दाविते ती ‘सात्विक’ बुध्दी ३०

यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च ।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ ३१

धर्म आणखी अधर्म किंवा अकार्य अन कार्य
यथार्थतेने जी न जाणते ती ‘राजस’ पार्थ ३१

अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता ।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२

अधर्मास जी धर्मच मानी अज्ञानापोटी
सर्व अर्थ उलटाच लावते ती ‘तामस’ वृत्ती ३२

धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः ।
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३

अढळपणाने करवि प्राण-मन-इंद्रिय आचार
त्या धैर्या ओळखले जाते ‘सात्विक’, धनुर्धर ३३

यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन ।
प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४

जे धडाडिने धर्म, अर्थ अन् कामहि अनुसरते
फल आकांक्षा धरी प्रसंगी धैर्य ‘राजस’ ते ३४

यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च ।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५

ज्या दुर्मतिने खेद, शोक, भय, स्वप्न, गर्व होय
त्या धैर्याला म्हटले जाते ‘तामस’, धनंजय ३५


सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ ३६

हे भरतर्षभ‚ सौख्याचेही तीन प्रकार ऐक
अभ्यासाने रमे जीव अन समाप्त हो दु:ख ३६

यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् ।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ ३७


असे सौख्य प्रारंभि विषासम, अमृतमय अंती
आत्मज्ञानातुन उपजे त्या ‘सात्विक’ सुख म्हणती ३७

विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् ।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥ ३८

विषयांच्या भोगातुन भासे अमृतमय आधी
अंती विषमय होइ त्या सुखा ‘राजस’ हि उपाधी ३८

यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥ ३९

जे आरंभी आणि अंतिही मोहप्रद असते
निद्रा आळस कर्तव्यच्युती यातुन उद्भवते
(कनिष्ठतम या स्तरावरी होते याची गणती)
अशा सुखाला कुंतिनंदना‚ ‘तामस’सुख म्हणती ३९

न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः ।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४०

पृथ्वी‚ नभ‚ सुरलोकामध्ये त्रिगुणातुन मुक्त
असे काहिही नसते पार्था, हे शाश्वत सत्य ४०

ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप ।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥ ४१

द्विज‚ क्षत्रिय अन् वैश्य शूद्र या सर्वांची कर्मे
वेगवेगळी ठरली त्यांच्या स्वभावगुणधर्मे ४१

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥ ४२

शम‚ दम‚ तप‚ शुचिता‚ शांती‚ नम्रता नि आस्तिकता
ही कर्मे योजिली ब्राह्मणांसाठी स्वभावत: ४२

शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् ।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥ ४३

शौर्य‚ तेज‚ धाडस‚ जागृति अन् पद रोवुनि लढणे‚
दानशूरता‚ नेतृत्व अशी क्षत्रियाचि लक्षणे ४३

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥ ४४

कृषि‚ गोरक्षण‚ व्यापार असे वैश्याचे कार्य
सेवा द्विज-क्षत्रिय-वैश्याची शूद्रा कर्तव्य ४४

स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥ ४५

आपआपल्या कर्तव्यातुन मनुज सिध्दि पावे
कसा काय ते वर्णन करतो पार्था‚ ऐकावे ४५

यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥ ४६

ज्याच्यायोगे हे जग सारे जन्मुनि विस्तारते
त्याला पुजिले, स्वकर्म करूनी, तर सिध्दी लाभते ४६

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ४७

नियत कर्म आपुले करावे जरी दोषपूर्ण
परक्याचे ना करण्या जावे, येइ जरी पूर्ण
स्वभावत: ज्याची त्याची जी कर्मे योजियली
तीच करावी, कधीच ना ती पापकारि ठरली ४७

सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ ४८

कौंतेया‚ स्वाभाविक कर्मे सदोष तरि ना टाळ
दोषयुक्त कर्मे असती जणु धूम्राच्छादित जाळ ४८

असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः ।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥ ४९

आत्मसंयमी निरिच्छ मनुजाला होते प्राप्ती
संन्यासातुन परमोच्च अशी कर्मबंधमुक्ती ४९

सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे ।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥ ५०

कौंतेया‚ कैसा मिळवी नर परम ब्रम्ह स्थान
ऐक सांगतो संक्षेपाने दिव्य असे ज्ञान ५०

बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१

शुध्दबुध्दिने युक्त आणखी ठाम निग्रहाचा‚
प्रेम-द्वेषवाणी त्यजुनी करि त्याग वासनांचा‚ ५१

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२

मिताहारि, राही एकांतीं विरक्ति बाणवुन‚
कायावाचामने निश्चये राहि ध्यानमग्न‚ ५२

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५३

अहंकार‚ बल‚ गर्व‚ क्रोध अन् कामवासनांना
दूर सारूनी सदैव ठेवी शांत आपुल्या मना‚
असाच मानव‚ हे कौंतेया‚ हो मिळण्या पात्र
परम ब्रह्म स्थानाचा अनुभव आणिक अधिकार ५३

ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति ।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥ ५४

अधिकारि असा प्रसन्नमन अन् निरिच्छ‚ निर्मोही
सर्वां लेखी समान आणिक मम समीप येई ५४

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ ५५

भक्तीने जाणी मजला मी कोण आणखी कसा
अन् त्यानंतर सामावी मम ह्रदयी पुरूष असा ५५

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः ।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥ ५६

सदैव राही रत कर्मामधि मम आश्रय घेउन
अशा नरा मम कृपेतुनी हो प्राप्त परम स्थान ५६

चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः ।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ ५७

मनापासुनी मज अर्पण कर तुझे नित्य कृत्य
योगबुध्दिने माझ्या ठायी लीन ठेवि चित्त ५७

मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।
अथ चेत्त्वमहङ्कारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि ॥ ५८

माझ्या ठायी चित्त ठेवता मिळेल माझी कृपा
आणि आपदांतुनी साऱ्या तू तरशिल परंतपा‚
अहंकार धरूनी माझ्या वचना जर दुर्लक्षील
तर पार्था‚ हे ठाम समज‚ तू नाश पावशील ५८

यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९

‘न लढिन’ ऐसा अहंकार तू ठेवित असशील
व्यर्थ तरी तो, प्रकृती तुला लढण्या लावील ५९

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत् ॥ ६०

मोहापोटी स्वाभाविक जे टाळू बघशी कार्य
अनिच्छ जरी तू, स्वभावत: तुज करणे अनिवार्य ६०

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१

भूतांच्या अंतरात ईश्वर निवासास असतो
अन् मायेने यंत्राजैसे तयां चाळवित बसतो ६१

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।
तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ ६२

म्हणुन भारता‚ जा सर्वस्वी ईश्वरास शरण
कृपेने तयाच्या मिळेल तुज परम शांतिस्थान ६२

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ ६३

तुला असे हे सांगितले मी गुह्यातिल गुह्य
विचार याचा करूनी करि तव इच्छित कर्तव्य ६३

सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः ।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥ ६४

जिवलग म्हणुनि पुन्हा सांगतो गुपितातिल गुपित
धनंजया‚ ते ऐक त्यामध्ये तुझेच, रे, हीत ६४

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५

माझे चिंतन‚ माझी भक्ती‚ मजला वंदन करी
मी ईश्वर‚ तू प्रियतम‚ होशिल विलीन मम अंतरीं ६५

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ ६६

धर्मांचे अवडंबर सोडुनि मलाच ये शरण
भिऊ नको, मी नि:संशय तुज पापमुक्त करिन ६६

इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन ।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६७

जो न तपस्वी‚ भक्ति ना करी‚ उदासीन ऐकण्या‚
निंदी मजला‚ अशा कुणा हे जाउ नको सांगण्या ६७

य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८

जो गुपीत हे केवळ माझ्या भक्तांना सांगतो
परमभक्त होउन माझा तो मज येउन मिळतो ६८

न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९

असा भक्त प्रियकर दुसरा ना मानवात मिळणे
म्हणुनी शक्य न दुजा कुणि त्याच्याहुनि प्रिय असणे ६९


अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ ७०

पार्था‚ अपुल्यामधल्या संवादाचे अध्ययन
करेल त्याने जणु यज्ञाने केले मम पूजन ७०

श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः ।
सोऽपि मुक्तः शुभाँल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥ ७१

छिद्रान्वेशीपणा न करता श्रध्देने श्रवण
करेल तो पापमुक्त होइल कौंतेया‚ जाण
पापांमधुनी मनुष्य ऐसा मुक्ती मिळवेल
पुण्यात्म्यांच्या शुभलोकामधि जाउनि पोचेल ७१

कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा ।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥ ७२

एकअग्र चित्ताने‚ पार्था‚ ऐकलेस का सारे?
अज्ञानात्मक मोह तुझा मग लयास गेला ना रे? ७२

अर्जुन उवाच ।
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ ७३

अर्जुन म्हणाला‚
अच्युता‚ तुझ्या प्रसादामुळे मोह नष्ट झाला
भ्रम जाउनि मी तयार तव आदेश पालनाला ७३

सञ्जय उवाच ।
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः ।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ ७४

संजय म्हणाला‚
वासुदेव अन् पार्थामधले समग्र संभाषण
अद्भुत अन् रोमांचक ऐसे‚ मी केले श्रवण ७४

व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् ।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ॥ ७५

व्यासकृपेने मला मिळाले ऐकाया गुपित
योगेश्वर श्रीकृष्ण, अर्जुना, असताना सांगत ७५

राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् ।
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ ७६

पुन:पुन्हा आठवुनी मज तो कृष्णार्जुन संवाद
जो अद्भुत अन् पुण्यकारि, मज होत असे मोद ७६

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः ।
विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ॥ ७७

तसेच ते अति अद्भुत दर्शन हरिचे आठवुनी
विस्मय वाटुनि मोद होतसे मजसी फिरफिरूनी ७७

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ ७८

हे राजा‚ त्यामुळेच माझा ग्रह ऐसा बनला
जिथे कृष्ण तेथेच धनुर्धर‚ तिथेच जयमाला ७८

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः ॥

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय पूर्ण झाला.


श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले हे ज्ञान सध्याच्या काळातील मराठीभाषिकांनाही कळावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण करून, माझ्या हातून हे लिहवून घेणाऱ्या परमेश्वराकडे, हे कार्य पूर्ण झाल्यानंतर, मी नतमस्तक होऊन मागतो आहे ते

‘पसायदान’

समंत दीप्तिमंत हो, कोणी कुठे न अडखळो
उजळून टाक विश्व तू, अंधार येथुनी पळो

सरली युगे युगांवरी, उद्धारिल्यास तू धरा
आम्ही सुपुत्र म्हणवितो, अन जाळतो वसुंधरा
करतो आहोत काय जे, वैफल्य त्यातले कळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो

हरएक प्रेषितामुळे धर्मांध जाहलो आम्ही
ते धर्मकांड का हवे? मनुष्यधर्म का कमी ?
‘सारी तुझीच लेकरे’ हेच सत्य आकळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो

आता नको नवा कुणी, आचार्य, रबी वा मुनी
धाडू नकोस पुत्र तू, अथवा नको नवा नबी
अवतार तू स्वत:च घे, त्याचे सुचिन्ह आढळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो

— मुकुंद कर्णिक

||श्रीकृष्णाला अर्पण||

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..