नवीन लेखन...

आमच्या गावान

वयाच्या आठव्या वर्षापर्यंत माझे बालपण आमच्या गावातच गेले. त्यावेळेस चार आणे आणि आठ आण्यासह जस्ताचे दहा आणि वीस पैसे पण चालायचे. गावात असलेल्या दुकानात तेव्हा चार आण्यात काचेच्या बरणीत ठेवलेली गोळ्या बिस्कीट मिळायची. लाल भडक रंगाच्या आणि दंडगोल आकाराच्या पानपट्टीच्या गोळ्या, संत्र्याच्या फोडी सारख्या पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या लिंबूच्या गोळ्या आणि नाण्यासारख्या गोल पण पांढऱ्या शुभ्र अशा पेपरमिंटच्या गोळ्या, यापैकी तेव्हा चार आण्यात कोणत्याही पाच गोळ्या मिळायच्या. पाच पैशाला एक गोळी. एक रुपयात चार प्रकारच्या आणि चार रंगांच्या वीस गोळ्या यायच्या. आता परदेशातून येताना शेकडो अमेरिकन डॉलर्स देऊन आणलेली क्वालिटी स्ट्रीट, लिंडोर, मिल्का, हॅझेलनट, स्विस काय नी बेल्जीयम ब्रँडेड चॉकलेट आणि कुकीज आणली तरी त्यांना बालपणी खाल्लेल्या गोळ्या बिस्किटांची सर येत नाही.

गावातल्या दुकानातून तेव्हा एक रुपयाची मिरची कोथिंबीर, दोन रुपयांचे टोमॅटो किंवा बटाटे आणायला घरातुन कोणी ना कोणी पाठवायचे. खरं म्हणजे कोणी दुकानात काही आणायला पाठवेल याची वाटच बघत असायचो. पाच नाहीतर दहा रुपयाची नोट असली तर मी गोळ्या खाऊ का विचारून घ्यायचो आणि जर एक किंवा दोन रुपयाचे कॉईन दिले तर अजून चार आणे नाहीतर आठ आणे मागून घायचे.

घरातून धूम ठोकल्यावर दुकानात पोचायला एक मिनिट सुद्धा लागायचं नाही. काचेच्या बरण्यांत भरून ठेवलेल्या रंगी बेरंगी गोळ्या दुकानात सगळ्यात जास्त आकर्षक दिसायच्या.काचेच्या बरणीत एकावर एक रचून ठेवलेली लंबगोल आकाराची क्रीम बिस्कीट ज्याच्यावर मध्यभागी एक होल आणि त्यावर लाल भडक रंगाचा जॅमचा ठिपका आणि जॅम ला चिकटलेली साखर असायची ते आठ आण्यात एकच यायचे. काजूच्या आकाराची लहान लहान बिस्किटे आणि वेगवेगळ्या रंगाचे क्रीम लावलेली लहान लहान बिस्किटे ती सुद्धा चाराण्यात पाच पाच यायची.

एक रुपयात चार पाच हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, कडीपत्ता आणि कोथिंबीर एवढं सगळं पेपराच्या तुकड्यात गुंडाळून दिले की हाताच्या मुठीत मावत नसायचे. दोन रुपयात सहा सात टोमॅटो आणि बटाटे यायचे, प्लास्टिकच्या कॅरी बॅग चा तेव्हा शोध लागला नव्हता त्यामुळे हाफ पॅन्टच्या दोन्ही खिशात वस्तू कोंबायच्या नाहीतर अंगातला शर्ट किंवा बनियन हाताने झोळीसारखा धरून त्यात घालून न्यायचे.

गोळ्या ठेवायला खिशात जागा नसली किंवा हात रिकामे नसले की सगळ्याच्या सगळ्या गोळ्या एकदम तोंडात टाकल्या जायच्या. कुरकुरे, लेज, चिप्स किंवा मॅगी यांचा सुद्धा त्यावेळेस शोध लागला नव्हता. किंडर जॉय मध्ये जशी आता लहान लहान खेळणी येतात तशी त्यावेळेस चार आण्यात नाहीतर आठ आण्यात भिंगरी, टिक टीका, शिटी अशी खेळणी यायची. पिवळ्या धम्मक रंगाच्या तेलात तळलेल्या नळया ज्या सुद्धा तेव्हा चार आण्यात पाच यायच्या त्या घेऊन पाचही बोटात घालून खाताना मज्जा यायची. चार आण्यातच बर्फाचे पेप्सीकोला यायचे. आठ आण्यात मँगो फ्लेवर किंवा दुधाचे पेप्सीकोळा यायचे.

दुपार झाली की गावात गोळा सरबत वाला भय्या त्याची हातगाडी घेऊन यायचा. आठ आण्यात बर्फाचा गोळा आणि एक रुपयात सरबत. त्याच्याकडे असलेल्या काचेच्या बाटल्या काला खट्टा, ऑरेंज, लेमन, मँगो अशा रंगीत फ्लेवर्स नी सजलेल्या असायच्या. गोळेवाला त्याच्या लाकडी रंध्यावर बर्फ घासून किसताना खाली पडलेला बर्फ आमी पोरं गोळा करून गुपचूप एकमेकांच्या शर्टात टाकायचो. गोळे वाल्याचे लक्ष नसले की बाटली उचलून एका हातातल्या गोळ्यावर दुसऱ्या हाताने काला खट्टा रंग हलवून हलवून घायचो. गोळ्यावर टाकायच्या फ्लेवर असलेल्या बाटलीला एक लहान नोझल असलेले लाकडी बूच असायचे. गोळ्यावर फ्लेवर टाकताना हुच हुच असा आवाज यायचा आणि बाटलीतल्या काळ्या नाहीतर ऑरेंज रंगात पांढरा शुभ्र बर्फाचा गोळा रंगून जायचा. मग त्याच्यावर स्प्रिंकलर मधून काळे मीठ मारले जायचे. गोळा खाल्ल्यावर ओठ, जीभ आणि तोंड रंगून जायचे. कपड्यावर गोळ्याचे डाग पडायचे पण त्याची कोणालाच फिकर नसायची. चिखलात पडलेली दहा रुपयाची नोट उचलण्यासाठी शाळेचा स्वच्छ युनिफॉर्म चिखलात माखवणारा पोरगा आणि सर्फ एक्सेल हैं न असं कौतुकाने सांगणारी आई त्यावेळी जन्मली नव्हती. आमच्या वेळेस पण दाग अच्छेच होते. कपडे चिखलात किंवा धुळीने खराब व्हायचे तर दूरच पण खेळताना मस्ती किंवा मारामारी करताना फाटले तरी कोणी काही बोलायचं नाही. धावताना,पळताना पडल्यावर खरचटल्यावर रक्त आल्यावर तिथलीच धूळ त्यावर अँटीसेप्टिक म्हणून लावली जायची. लागलय, खरचटलं म्हणून घरातले कोणी कळवळायचे नाही की चार समजुतीच्या गोष्टी सांगायचे नाही. उलट ओरडा बसू नये म्हणून काही झालेच नाही दुखत नाही असा आमच्याकडूनच खतरो के खिलाडी असल्यासारखा आणि साळसूदपणाचा आव आणला जायचा.

दुपारी सगळी लहान पोरं सावली बघून एकतर गोट्या खेळायची नाहीतर सोड्याच्या बाटल्यांची बुचं घेऊन लादीच्या तुकड्यानी चंपूक खेळायची. एका गोल राउंड मध्ये जेवढे खेळणारे असतील त्यांच्याकडून बुचं घेऊन ती राउंड मध्ये फेकायची, राउंड बाहेर एकपण बूच पडलं की दुसऱ्याचा नंबर. ज्याची सगळी बूचं राऊंड मध्ये पडली तर त्यापैकी एक बूच इतर सगळे दाखवणार मग आखलेल्या रेषेच्या बाहेरून लादीच्या तुकड्याने नेमके तेच बूच नेम धरून इतर बुचालेना न लागता राउंड बाहेर उडवले की सगळी बुचं मारणाऱ्या खेळाडूला.

गावातल्या चावडीवर संध्याकाळी तरुण एका बाजूला बसायचे तर वरिष्ठ मंडळी एका बाजूला. खेळणाऱ्या लहान पोरांवर आणि रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांवर त्यांचे डोळे सी सी टी व्ही सारखे अबोल पण नजर ठेवून असायचे. व्हाट्सअप आणि फेसबुकच काय पण मोबाईलचाच शोध लागला नसल्याने एकमेकांशी गप्पा गोष्टी, हास्य विनोद आणि सुख दुःख रोजच्या रोजच शेअर करायचे.

चावडीवर शहाबादी लादी लावलेली आयताकृती पन्नास बाय शंभर फुटाची जागा होती त्यावर एक टप्पा आउट अंडरआर्म क्रिकेट खेळल जायचं. चावडीच्या बाजूने गावातले सांडपाण्याचे गटार वाहत असायचे. त्या गटारात बॉल गेला की तो बाहेर काढून, जोरात जमिनीवर आदळला जायचा आणि आपटल्यामुळे त्याच्यावरचे पाणी उडून तो स्वच्छ झालाय असं समजून पुन्हा खेळाला सुरुवात व्हायची.

संध्याकाळ झाल्यावर अंधार पडताना शेतावरून गुरं ढोरं यायला सुरवात व्हयची. भाजीपाल्याचा मळा करणारे शेतकरी त्यांच्या शेतातल्या मेथी, कोथिंबीर यांच्या जुड्यांनी बांधलेले बोचके आणि वांग्यांनी रचलेल्या टोपल्या बैल गाडीत आणायचे. शेतावरून आणलेला भाजीपाला पहाटे पहाटे कल्याणला घाऊक मार्केट मध्ये नेण्यासाठी घरासमोर नेऊन रचायचे. गावातल्या मेथी आणि कोथिंबीरच्या उग्र सुवासाने चावडीचा परिसर दरवळून जायचा. दिवस संपूर्ण मावळला की घरोघरी सुगंधित अगरबत्त्या लावून देवाला दिवाबत्ती केली जायची. इन्व्हर्टरचा शोध लागला नसल्याने दिवस मावळल्यावर लाईट गेली की मेणबत्त्या शोधायला लागायच्या, एकतर त्या आयत्या वेळेवर मिळतं नसतं किंवा संपलेल्या असायच्या मग सगळी चिल्लर गँग दुकानावर मेणबत्त्या आणायला. एक रुपया दिला की बारा आण्याच्या मेणबत्त्या घ्यायच्या आणि चार आण्याच्या पाच गोळ्या तोंडात घालून अंधारात घराकडे निघायचे.

लाईट गेल्यावर सगळ्यांच्याच घरात आणि घराबाहेर काळोख असायचा मग सगळी मंडळी घराच्या ओटीवर हवा खायला आणि मोठी पुरुष मंडळी आणि पोरं चावडीवर येऊन गोळा व्हायची. लाईट आली रे आली की सगळी लहान पोरं जोरात ओरडायची, शिट्या मारायची. कधी कधी शिट्या मारून आणि ओरडून झाल्या झाल्या लगेचच लाईट पुन्हा जायची. मग सगळे जण सुस्कारे सोडत आणि लाईट वाल्याना शिव्या घालत निमूटपणे बसायचे.
आता गांव नाही राहिलं आणि गावपण सुद्धा नाही राहिलं. गावातच काय घराघरातच राजकारण झालंय. लोकं शिकली, सुधारली पण आपुलकी विसरली.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 162 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..