नवीन लेखन...

पुनर्भेट

ही गोष्ट आहे चार जिवलग मित्रांची. जे एकाच शाळेत जुन्या एसएससी पर्यंत शिकले. त्या शहरात श्रीमंतांचं आलिशान असं एकच हाॅटेल होतं, ते कॅम्पमध्ये. त्याची चर्चा त्यांच्याही कानावर आलेली होती की, तेथील चहा देखील त्यावेळी दहा रुपयाला मिळत असे, जेव्हा अमृततुल्यचा चहा पंचवीस पैशाला होता.

एसएससीची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की, आपण त्या हाॅटेलमध्ये जाऊन एकदा चहा घ्यायचाच. त्यासाठी चौघांनी चाळीस रुपये जमवले.

रविवारचा दिवस होता, साडेदहाच्या सुमारास आपापल्या सायकलीवरुन चौघेही त्या हाॅटेलवर पोहोचले. तेथील सिक्युरीटीवाल्याने त्यांना फाटकाशी अडवले. तेव्हा चौघांनी आम्हाला चहा घ्यायचा आहे, असे सांगितले. तेवढ्यात एका सुटातील तरुणाने त्यांना आत बोलावले. हे चौघेही गार्डन रेस्टाॅरंटमध्ये बसल्यावर त्या तरुणाने जवळ येऊन चौकशी केली. तेव्हा प्रत्येकाने आपलं नाव सांगितले व चहाची आॅर्डर दिली.

एका वेटरने चहाचा ट्रे आणला व त्यांच्या पुढ्यात ठेवला. दिनेश, संतोष, मंदार व प्रसन्न यांनी चहा घेता घेता गप्पा मारण्यास सुरुवात केली. चौघांनी एकमताने असं ठरवले की, पन्नास वर्षांनंतर आपण याच हाॅटेलमध्ये याच तारखेला एकत्र यायचं. त्यादिवशी जो सर्वात उशीरा येईल, त्याने हाॅटेलचं झालेलं बिल भरायचे! तेवढ्यात तो सुटातील तरुण बिल घेऊन आला, त्याच्याकडे पैसे देताना दिनेशने चौघांनी, ठरलेली गोष्ट त्याला सांगितली. त्यालाही त्या चौघांचे कौतुक वाटले. त्याने स्वतःची ओळख त्यांना करुन दिली, ‘ मी कुमार गौडा. मी याच महिन्यात इथे नोकरीला लागलो आहे, पन्नास वर्षांनंतर कदाचित मी इथेच असेन तर, आपण नक्कीच भेटू.’

चौघेही पुढचं शिक्षण घेण्यासाठी पांगले. दिनेशच्या वडिलांची बदली झाल्याने तो शहर सोडून गेला. संतोष पुढच्या शिक्षणासाठी काकांकडे गेला. मंदार व प्रसन्न यांनी शहरातीलच वेगवेगळ्या काॅलेजमध्ये प्रवेश घेतला.
‌‌
दिवस, महिने, वर्षं निघून गेली. त्या शहरात पन्नास वर्षांत आमूलाग्र बदल झाला. शहराची लोकसंख्या वाढली. रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रोमुळे शहराचा चेहरामोहराच बदलून गेला. ते कॅम्प भागातील हाॅटेल काळानुरूप, नूतनीकरणाने भव्य झालेलं होतं. त्यासारखीच इतरही अनेक फाईव्हस्टार हाॅटेलं शहरात असली तरी सर्वांत जुनं, अत्याधुनिक सोयी असलेलं ते हाॅटेल शहराची ‘शान’ होतं.‌ आता त्या हाॅटेलचा मॅनेजर होता, कुमार गौडा.

पन्नास वर्षांनंतरच्या ठरलेल्या तारखेला दुपारी एक आलीशान कार हाॅटेलच्या दाराशी उभी राहिली. दिनेश कारमधून उतरला व काठी टेकत पोर्चमध्ये जाऊ लागला. तेव्हा एक टक्कल असलेल्या सुटमधील लठ्ठ आॅफिसरने दिनेशला पाहून शेकहॅण्डसाठी हात पुढे केला.. दिनेशने निरखून पहात विचारले, ‘कुमार गौडा?’ कुमारने हसून दाद दिली व दिनेशला घट्ट मिठी मारली.. कुमारने सांगितले की, प्रसन्न सरांनी तुमच्यासाठी टेबल एक महिन्यापूर्वीच बुक करुन ठेवलंय.

दिनेश मनोमन खुश झाला होता की, तो चौघात पहिला आल्याने, आज होणारं बिल त्याला भरावं लागणार नव्हतं. तासाभराने संतोष आला. संतोष शहरातला मोठा बिल्डर झाला होता. वयोमानानुसार तो आता बुजुर्ग ज्येष्ठ नागरिक दिसत होता. आता दोघेही गप्पा मारत, त्या दोघांची वाट पाहू लागले. अर्ध्याच तासात मंदार आला. त्यांच्याशी बोलताना दोघांना समजले की, मंदार उद्योगपती झालाय. तिघेही शाळेतील आठवणींना उजाळा देत होते. तिघांची नजर सारखी दरवाजाकडे जात होती, की प्रसन्न कधी येतोय?

तेवढ्यात कुमार आला व त्याने आॅर्डर घेऊन सांगितले की, प्रसन्न सरांकडून निरोप आला आहे.. तुम्ही सुरुवात करा.. मी येतोय.. तिघेही पन्नास वर्षांनंतर एकमेकांना भेटून खुशीत आले होते. चेष्टा मस्करी, गप्पात तास होऊन गेला. स्नॅक्स खाऊन झाले होते. दिनेशला आठ वाजेपर्यंत निघायचे होते. त्यामुळे त्याने जेवणाची आॅर्डर दिली. कुमार पुन्हा पुन्हा त्यांना भेटून काय हवं नको ते पहात होता. जेवण झाले. तिघांच्याही आवडीचा मेनू प्रसन्नाने कुमारला सांगून ठेवला होता. दिशेने कुमारला बिल मागितले, तर कुमारने बिल पेंड झाल्याचे सांगितले. प्रसन्नने आॅनलाईन बिल पेड केले होते..

तिघेही निघायच्या तयारीत असताना आठ वाजता, आलिशान कारमधून एक व्यक्ती उतरली व या तिघांकडे आली.. तिघेही त्या व्यक्तीकडे पहातच राहिले.. तरुण वयातील प्रसन्न त्यांच्यापुढे उभा होता. तो तरुण बोलू लागला, ‘मी प्रसन्नचा, तुमच्या मित्राचा मुलगा. बाबांनी मला आजच्या तुमच्या भेटीबद्दल सांगितलेलं होतं.. ते या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते.. गेल्याच महिन्यात ते दुर्धर आजाराने गेले. मला त्यांनी सांगून ठेवलं होतं की, तू उशीराने त्यांना भेटायला जा. लवकर गेलास तर मी या जगात नाही म्हणून, ते दुःखी होतील. मला त्यांनी हे देखील सांगून ठेवलं होतं की, माझ्या वतीने तू त्यांना मिठी मार.’ असं म्हणून प्रसन्नच्या मुलाने दोन्ही हात पसरले.. ह्या तिघांनीही त्याला मिठीत घेतले व आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्या प्रसन्नच्या मुलांचे दोन्ही खांदे अश्रूंनी ओले झाले होते..

कुमार गौडा, त्या जिवलग मित्रांची गळाभेट पाहून, स्वतःच्या डोळ्यातील अश्रू रुमालाने टिपत होता…

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

१२-८-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 187 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..