नवीन लेखन...

मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते छोटा गंधर्व

‘माझ्या आवाजाला शोभेल असं स्वत:चं गाणं मी बनवलंय. मी रंगभूमीवर कुणाचीही नक्कल करीत नाही. आय काण्ट इमिटेट एनी बडी बट आय फॉलो बालगंधर्व. त्यांचा जन्म १० मार्च १९१८ रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला.माझं गाणं माझ्या चिंतनातून आलं आहे. असा हा आध्यात्मिक प्रवृत्तीचा, कवी मनाचा, प्रसिद्धीपासून दूर असलेला आणि साधी राहणी असलेला अत्यंत मोठा कलाकार म्हणजे मा.छोटा गंधर्व! मा.छोटा गंधर्व यांचे खरे नाव सौदागर नागनाथ गोरे. बालगंधर्व यांच्यानंतर पुण्यस्मरण करावे असे रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.छोटा गंधर्व. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. मा.छोटा गंधर्व यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते. बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिध्द असलेल्या बालमोहन संगीत मंडळीचे मालक मा.दामूअण्णा जोशी हे गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली आणि त्यांच्या आईवडिलांची समजूत घालून त्यांनी लहान मा.छोटा गंधर्वना, तसेच त्यांचा धाकटा भाऊ पीतांबर ह्याला आपल्या कंपनीत आणले. ‘बालमोहन संगीत मंडळी’ने रंगभूमीवर आणलेल्या प्राणप्रतिष्ठा ह्या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका मिळाली आणि तीही नायिकेची. पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात हा प्रयोग झाला. सौदागरांच्या सुरेल आवाजाने आणि गाण्याच्या आकर्षक मांडणीने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘बालमोहन’च्या अन्य काही नाटकांत कामे केल्यानंतर, ह्या संस्थेने सादर केलेल्या संशयकल्लोळ ह्या नाटकातल्या नायिकेची-रेवतीची त्यांनी केलेली भूमिका अतिशय गाजली. त्यांनी गायिलेल्या अनेक पदांना प्रेक्षकांकडून ‘वन्स मोअर’ मिळत. संगीतकलेत सौदागरांची अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून दामूअण्णांनी मा.छोटा गंधर्वना उत्तमोत्तम गायकांची तालीम मिळेल, अशी व्यवस्था केली. वसंतराव गोइत्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे येथील गायनशिक्षक पाध्येबुवा ह्यांनी त्यांना आरंभी गाणे शिकवले. सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम मिळाली. कृष्णराव गोरे, कृष्णराव शेंडे, मा. दीनानाथ ह्यांचाही काही सहवास आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. मात्र १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. हे लाहोरकडचे उत्कृष्ट गवई तेव्हा मुंबईत राहत होते. पुढे १९४४-४५ साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखाँ यांच्याकडे गाणे शिकले. अनेकांच्या गायकीचे अनुभव व संस्कार लाभल्यामुळे जेथे जे चांगले गवसेल, ते घेऊन आपल्या स्वतःच्या गायकीचे सुंदर रसायन त्यांना घडविता आले. नाटकाच्या व्यवसायाला १९३२-३३ च्या सुमारास वाईट दिवस आले होते आणि ‘बालमोहन संगीत मंडळी’लाही ह्या परिस्थितीची झळ लागू लागली होती. तथापि आचार्य अत्र्यांसारखा प्रभावी नाटककार ह्या संस्थेच्या मागे उभा राहिल्यामुळे ही संस्था त्या आपत्तीतून बचावली. अत्र्यांचे पहिले नाटक साष्टांग नमस्कार ‘बालमोहन’ने १९३३ साली रंगभूमीवर आणले. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ह्या नाटकात सौदागरांनी नायिकेची-त्रिपुरीची- भूमिका केली. त्यानंतरच्या घराबाहेर ह्या अत्रेकृत नाटकातील पन्दाभाच्या भूमिकेपासून त्यांनी स्त्रीभूमिका करणे सोडून देऊन नायकाच्या भूमिका करावयास आरंभ केला. साष्टांग नमस्कार आणि घराबाहेर नंतर भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, उद्याचा संसार, वंदे मातरम्, मी उभा आहे अशी नाटके ‘बालमोहन’ने रंगभूमीवर आणली. ह्यात संस्थेला आर्थिक लाभाबरोबरच जी कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळाली, ती मिळविण्यात सौदागरांचा वाटा मोठा होता. तथापि मी उभा आहे या नाटकानंतर अत्रे अन्य क्षेत्रांत मग्न झाल्यामुळे ‘बालमोहन’चा एक मोठा आधार तुटला आणि संस्था चालवणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले. त्यामुळे ‘बालमोहन’मधल्या काही प्रमुख नटांनी १९४३ मध्ये ‘कला-विकास’ ही नवी संस्था काढली. त्यांच्यांत सौदागरही होते. ह्या संस्थेतर्फे नाटककार नागेश जोशी ह्यांची फुलपाखरे, मैलाचा दगड, देवमाणूस, विजय ही नाटके सादर केली जाऊ लागली. त्यांतील मुख्य भूमिकांची आणि संगीताची बाजूही त्यांनी सांभाळली. ह्या संस्थेच्या नाटकांची पदेही देवमाणूस पासून सौदागर स्वतः लिहू लागले. ह्या नाटकातील ‘चांद माझा हा हसरा’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले. ‘कला-विकास’ ही कालांतराने बंद पडल्यानंतर ‘भारत नाट्यकला’ ह्या संस्थेच्या सौभद्र (कृष्ण), विद्याहरण (कच), मानापमान (धैर्यधर) ह्या नाटकांतून त्यांनी नायकाच्या भूमिका केल्या. त्यांची कृष्णाची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. १९५१ नंतर ते ठेकेदारांनी करविलेल्या नाट्यप्रयोगांतून ‘नाइट’वर कामे करू लागले. नाइट म्हणजे नटाला दर प्रयोगाला दिले जाणारे मानधन. त्या काळात छोटा गंधर्व संगीत नाटकाकरिता सर्वांत जास्त म्हणजे रु. १०००/- नाइट घेत असत. सौभद्र, विद्याहरण, मानापमान, मृच्छकटिक आणि संशयकल्लोळ ह्या नाटकांतूनच त्यांनी पंचविसांहून अधिक वर्षे प्रमुख भूमिका केल्या. सुरेल मुलायम आवाज, स्वच्छ दाणेदार ताना, सुंदर आणि स्पष्ट हरकती, मुरक्या, मिंड, सुरांचा प्रभावी लगाव, कमावलेला दमसास, मंद्रात खर्जापर्यंत जाणे ही त्यांच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. त्यांच्या असामान्य गानकौशल्यामुळे ‘स्वरराज छोटा गंधर्व’ हे मानाभिधान त्यांना लाभले. मा.अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला ‘छोटा गंधर्व’ हा किताब बहाल केला. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. विद्याधर गोखले ह्यांच्या सुवर्णतुला ह्या नाटकात त्यांनी काम केले होते आणि त्यातील पदांना संगीतही दिले होते. नाट्यसंगीतासाठी शास्त्रीय संगीताची बैठक आवश्यक असून संगीतातील सर्व प्रकारचे सौंदर्य नेमकेपणाने टिपता आले पाहिजे; नाटकातील पदाचा आरंभ आणि त्याची अखेर आकर्षक असली पाहिजे; नाट्यसंगीतासाठी क्लिष्ट रागांची योजना करू नये; प्रेक्षकांच्या अंतःकरणापर्यंत सहजपणे भिडतील अशा संगीतरचना कराव्या, अशी त्यांची मते होती. त्यांच्याबरोबर संशयकल्लोळमध्ये रेवतीची भूमिका करणाऱ्या मा.इंदू मुळपुळे ह्यांच्याशी त्यांनी १९३७ साली विवाह केला. आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणार्या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. मुंबईत १९८० साली झालेल्या साठाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.

छोटा गंधर्व यांचे ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मा.छोटा गंधर्व यांची काही गाणी
अति कोपयुक्त होय परि
आनंदें नटती
कोण तुजसम सांग
गणराजाला करू मुजरा
गोविंद गोविंद
चांद माझा हा हासरा
छळि जीवा दैवगती अती
जगाचे बंध कोणाला
जलधर संगे नभ
तू माझी माउली
दिलरुबा मधुर हा दिलाचा
दे हाता या शरणागता
नच सुंदरि करूं कोपा

https://www.youtube.com/shared?ci=fukcp9oRPyE

https://www.youtube.com/shared?ci=DWuG-HiEEqI

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..