नवीन लेखन...

नक्षलवादी आयपीएलची मस्ती उतरवतील का?





दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक श्री प्रकाश पोहरे यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध `प्रहार’ या स्तंभात १८ एप्रिल २०१० रोजी लिहिलेला हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी खास प्रकाशित करत आहोत.


मी याच स्तंभात 28 मार्चला लिहिलेल्या ‘कोण म्हणतो भारत गरीब आहे?’ या प्रहारला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद हेच दर्शवितो, की आयपीएलच्या माध्यमातून या देशात सुरू असलेला काळ्या पैशाचा तमाशा लोकांना चीड आणत आहे. एकीकडे दहा-वीस हजाराच्या कर्जापायी शेतकरी आत्महत्या करीत आहेत, पन्नास-शंभर रूपयांसाठी दिवसभर काबाडकष्ट करणारे मजूर याच देशात जगण्यासाठी मरण उपसत आहेत, या देशातील सत्तर टक्के लोकांच दैनिक उत्पन्न एका बिसलरीच्या बाटलीच्या किमतीएवढेही नाही असे सरकारचाच अहवाल सांगत आहे आणि दुसरीकडे निव्वळ पैशाचा माज, मस्तीचे प्रदर्शन आयपीएलच्या माध्यमातून होत आहे. हा प्रचंड विरोधाभास कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणाराच आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसेबद्दल चर्चा करताना, शेवटी सगळ्यांचे आर्थिक विषमताच नक्षलवादाला जन्म देत आहे, यावर एकमत होते आणि याच विषमतेचा असा बाजार मांडला जात असताना सरकारसह कोणताच राजकीय पक्ष आपले तोंड उघडायला तयार नाही.

नक्षलवाद्यांचेही चुकतच आहे. त्यांनी मुळावरच घाव घालायला हवा. कशाला त्या बिचार्‍या पोलिसांना मारता? त्यांचा काय दोष? ते हुकूमाचे ताबेदार आहेत, पोटाचे गुलाम आहेत. त्यांना हुकूम देणार्‍यांचा गळा धरायला हवा. शेवटी नक्षल्यांच्या गोळ्यांना बळी पडणारे पोलिस आहेत तरी कोण? ज्या गरीबांसाठी, आदिवासींसाठी नक्षल्यांचे आंदोलन सुरू आहे, त्या गरीब, आदिवासी कुटुंबातील तरूणच शेती परवडत नाही, मजूरीत पोट भरत नाही, उच्च शिक्षण घेण्याची आर्थिक ताकद नाही म्हणून पोलिसात भरती झालेले असतात. त्यांना कशाला मारायचे?

शेवटी जलियानवाला बागेत गोळीबार करणारे पोलिस भारतीयच होते, मात्र त्यांना गोळीबाराचा ऑर्डर देणारा जनरल डायर

हा इंग्रज होता आणि म्हणूनच 1940 मध्ये त्याचा सहकारी आणि जलियानवाला बाग गोळीबार कांडाचा प्रमुख सुत्रधार मायकल ओडवायर याला शहीद उधमसिंग यांनी टिपले होते आणि तेही इंग्लंडमध्ये जाऊन! मारायचेच असेल तर आर्थिक विषमतेला जन्म देणार्‍या, पैशाचा बाजार मांडून गरीबांची आणि गरीबीची थट्टा करणार्‍या या भांडवलदार वर्गाला मारा, त्यांना पोसणार्‍या, त्यांच्या पैशाने उपकृत झालेल्या हरामखोर राजकारण्यांना, प्रशासकीय अधिकार्‍यांना मारा, मूळावर घाव घाला. या आयपीएलमध्ये पैशाचा किती घाणेरडा खेळ चालला आहे, हे नुकत्याच समोर आलेल्या थरूर-मोदी वादातून स्पष्ट होते. या वादाने क्रिकेटमधील हिडीसपणाच समोर येत

आहे.

एखादा खेळ हा खेळ असतो तोपर्यंतच त्यात खिलाडूपणा शिल्लक असतो आणि त्यापासून निखळ आनंद मिळतो. या खेळाचा धंदा झाला की सगळेच संपले. तिथून पुढे सुरू होते ती त्या खेळाची आणि खेळापासून मिळणार्‍या आनंदाची धंदेवाईक होलपट. भारतात आयपीएल नावाच्या भुताने या खेळाला पछाडले आणि एक खेळ म्हणून क्रिकेटमध्ये जो काही आनंदाचा भाग होता तो पार लयाला गेला. भारतीय लोकांच्या क्रिकेटवरील आंधळ्या प्रेमापलीकडे असलेल्या प्रेमाचा बाजार काही खास धंदेवाईक मंडळींनी मांडला. त्यासाठी या खेळाची चौकट त्यांनी मोडली. हा खेळ आता दोन देशांदरम्यान खेळला जात नाही. काही कंपन्या, उद्योजक, चित्रपट सितारे विविध देशांच्या खेळाडूंना विकत घेऊन आपला संघ तयार करतात आणि त्यांच्यात झुंजी लावल्या जातात. कुठेही राष्ट्रभावना नाही, देशासाठी खेळण्याचा, जिंकून देशाची मान उंचावण्याचा प्रश्नच नाही. आपल्या मालकासाठी खेळायचे, त्यातून त्याच्या कंपनीची जाहिरात करायची, त्याचा धंदा वाढवायचा आणि त्यासाठी भरमसाठ मोबदला घ्यायचा, असा सगळाधंदेवाईक मामला आहे. धंदा म्हटले, की मग त्यात फारसा विधिनिषेध बाळगण्याचे कारण उरत नाही. आयपीएलमध्ये सध्या हेच सुरू आहे. या क्षेत्रातील उलाढाल अतिशय प्रचंड आहे. आयपीएलची ही सर्कस इतकी प्रचंड यशस्वी होईल, याची कल्पना सुरूवातीला अनेकांना आली नाही; परंतु आता आपण या धंद्यात गुंतवणूक न करून मोठी चूक केल्याचे अनेकांना वाटत आहे आणि या अनेकांमध्ये केंद्र सरकारमधील मंत्र्यांचाही समावेश आहे. अशा इच्छुकांना या लुटमारीत सामावून घेण्यासाठी पुढील वर्षीपासून या स्पर्धेत दोन नव्या संघांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या एका खास व्यक्तीसाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या व्यक्तीला कोच्चीचा संघ विकत घ्यायचा

ोता. त्याची कुणकुण लागताच परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शशी थरूर यांनी पडद्यामागून हालचाली करीत रांदेवू स्पोर्टस् त्या कंपनीच्या माध्यमातून मोठी बोली लावून कोच्चीची मालकी आपल्या ताब्यात घेतली. हे त्या व्यक्तीसाठी ‘फिल्डिंग’ लावणार्‍यांसाठी अनपेक्षित होते. रांदेवूने कोच्चीची मालकी सोडावी यासाठी या कंपनीवर दबाव आणण्यात आला. कंपनीला 5 कोटी डॉलर्सची म्हणजेच 200 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आल्याचाही आरोप होत आहे. केवळ संघावरील मालकी हक्क सोडण्यासाठी

200 कोटी रूपये दिल्या जाऊ शकत असतील, तर या धंद्यातून किती मिळकत होत असेल, याची कल्पना करता येऊ शकते. रांदेवूने तो प्रस्ताव फेटाळला. कुठलेही कष्ट न करता, कुठलीही गुंतवणूक न करता, जोखिम न घेता घरबसल्या 200 कोटी रुपये मिळत असताना, रांदेवूने हा प्रस्ताव फेटाळला ,याचा अर्थ या गुंतवणुकीतून यापेक्षा कितीतरी अधिक पट फायदा कंपनील अपेक्षित आहे आणि तो मिळण्याची खात्री आहे. इतर कोणत्याही उद्योगधंद्यात इतकी खात्री नसते. रांदेवूने केलेला वांधा दूर करण्यासाठी मग इतर मार्गांनी प्रयत्न सुरू झाले, अगदी या नाट्यात ‘डी’ कंपनीचेही नाव आले. रांदेवूच्या पाठीशी शशी थरूर यांनी आपली ताकद उभी केल्याचे स्पष्ट

होताच, त्यांनाच दणका देण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावण्यात आली. ललित मोदींनी त्यात मध्यवर्ती भूमिका वठविली. यात ललित मोदींपेक्षा ते ज्यांच्यासाठी काम करीत आहेत

ती व्यक्ती अधिक महत्त्वाची आहे; परंतु ते नाव समोर आलेले नाही, कदाचित येणारही नाही. आयपीएलच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उधळपट्टीवर एकही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही, हे खूपच आश्चर्यजनक आहे. कदाचित हे राजकीय पक्ष आयपीएल संयोजकांच्या उपकाराखाली दबले गेले असावेत. तोंड बंद ठेवण्यासाठी या प्रत्येक राजकीय

पक्षाकडे 200 ते 300 कोटींची बिदागी गेल्याचे सांगण्यात येत आहे, त्यात तथ्य असलेच पाहिजे. या आयपीएलचा एकूण पसारा पाहता हा खर्च अगदीच मामूली म्हणायला हवा. दोन वर्षांपूर्वी आयपीएलचा सगळ्यात महागडा संघ साधारण साडेपाचशे कोटींमध्ये खरेदी करण्यात आला होता, दोनच वर्षांनंतर कोच्चीच्या संघासाठी रांदेवूने तब्बल पंधराशे कोटी मोजले आहेत आणि पुण्याचा संघ 1700 कोटी ला विकला गेला. यावरून यात होणार्‍या उलाढालीची आणि त्याच्या चढत्या क्रमाची कल्पना यावी. नक्षलवाद्यांचा लढा ज्या भांडवलशाही व्यवस्थेविरूद्ध सुरू आहे, त्याच व्यवस्थेचे रखवालदार, म्हणजेच राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, प्रचंड काळा पैसा जवळ बाळगणारे धनाढ्य उद्योगपती या आयपीएल सर्कसीत रिंगमास्टरची भूमिका बजावत आहेत. यातील खर्चाचे आकडे पाहून डोळे दिपून जातात. या सामन्यांची तिकीटे पाच हजारापासून एक लाखापर्यंत आहेत. तिकीट जितके महाग तितक्या सुविधा अधिक, अगदी वातानुकूलीत जागा, मद्यपानाची सोय आणि इतरही अनेक सुविधा पुरविल्या जातात. या सामन्यादरम्यान दाखविल्या जाणार्‍या जाहिरातींचे दरदेखील डोळे फाडायला लावणारे आहेत. मागे आबांनी तरूणांना बिघडवतात म्हणून बारबालांच्या नाचण्यावर टाच आणली होती. त्या बारबाला किमान

आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या हाता-तोंडाचे गणित जमविण्यासाठी मजबूरीने नाचत होत्या. क्रिकेटच्या मैदानावर हजारो प्रेक्षकांसमोर तोकड्या कपड्यात नाचणार्‍या ‘चिअर्स गर्ल्स’ ला त्यांच्या पोटापेक्षा लोकांच्या डोळ्यांची गरज अधिक महत्त्वाची वाटते आणि आबा काहीही करू शकत नाहीत. जर बारबाला तरूणांना बिघडवत होत्या ,तर या ‘चिअर्स गर्ल्स’ कोणते आध्यात्मिक ज्ञान वाटत आहेत? आयपीएलची ही मस्ती क्रिकेटसाठी पागल होणार्‍या लोकांच्या जीवावर सुरू आहे आणि हे पागल लोक सुद्धा त्याकरीता कारणीभूत आहेत. उद्या स्टेडियमवर कुत्रे फिरकू देऊ नका, टींव्हीवरही बहिष्कार टाका, या आयपीएलचा खेळ करणारे व हजारों कोटी रुपये गुंतवणारे किमान एक-दोन हजार हरामखोर लोक हॉर्टअटॅकने तरी मरतील किंवा स्वत:च्या मस्तकात गोळी तरी झाडतील, हे नक्की.

या देशातील 120 कोटींपैकी किमान 60 कोटी लोक दररोज किमान दहा तास वेळ या सामन्यांसाठी वाया घालवित असतात. याचा अर्थ दररोज 600 कोटी तासांचे मनुष्यबळ अक्षरश: वाया जाते आणि आयपीएलचा हा तमाशा 45 दिवस चालणार आहे. हा एकूण हिशेब गृहीत धरला तर 2700000000000 ( सत्तावीस हजार कोटी तास) वाया जात आहेत, गेले आहेत. ज्या देशाच्या 70 टक्के लोकांचे दैनिक उत्पन्न धड 20 रूपयेदेखील नाही, त्या देशात 27 हजार कोटी मनुष्यबळ तास केवळ क्रिकेटपायी वाया जात असतील, तर तो देशद्रोहच ठरतो. हे सगळे मनुष्यतास कामाला लावले तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून पार पूर्वेला नागालँडपर्यंत केवळ एका आठवड्यात पाण्याचे कालवे खोदले जाऊ शकतात आणि देश सुजलाम् सुफलाम् होऊ शकतो. शिवाय या सामन्यांसाठी होणारी विजेची उधळपट्टी हा वेगळाच विषय आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात ग्रामीण भागात बारा बारा तास भारनियमन होत असताना, आयपीएलचे सगळेच सामने विद्युत प्रकाशझोतात कसे खेळविले जात आहेत, त्यांना वीज पुरवठा का केला जातो हे कळायला मार्ग नाही. या सामन्यांवर सट्टेबाजी चालते तीही हजारो कोटींची! हाही स्वतंत्र लेखाचा विषय आहे. आमच्या सरकारला मटक्याची, वरलीची ऍलर्जी आहे; परंतु हा अत्याधुनिक सट्टा मात्र इंटरनेट व मोबाईलद्वारे बिनबोभाट चालतो, ना पोलिसांची, ना सरकारची माय व्याली हे बंद करण्याची! एकूण काय, तर आयपीएल ही सरकार, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी या सगळ्या भांडवलशाही व्यवस्थेच्या पुजार्‍यांनी बटिक बनविलेल्या भारतमातेची, लोकशाहीत ‘इंडियन्स’नी मांडलेली पैशाची पुजा आहे आणि त्या पूजेच्या दानपेटीत गरीब, अडाणी क्रिकेटवेडे लोक आपले दान टाकून या पुजार्‍यांचे चांगभले करीत आहेत. नक्षल्यांनी या पुजार्‍यांना जाब विचारायला हवा, त्यांच्या नरड्यावर बंदूक रोखायला हवी. बिचार्‍या पोलिसांना मारून काय
पयोग ?

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..