चवीची अनुभूती

The Taste

बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . . बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.

कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम? बाजारातून आणलेल्या जिन्नसांचं सोडा, पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवीत बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं?

उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागतात? कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ? नाही ना? कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते.

एरवी बघताक्षणीच फस्त होणारे पिठलं भात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगानंतर खाताना कुठे चवदार लागतय सांगा बरं ! एखाद्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत ‘अन्न गोड लागत नाही’ असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तुम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.

कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते. किती धांदल असते तिची ! काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही. इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते.

कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत ‘घोटभर’ प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणिक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते; टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.

भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते, चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते.

चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी त्या चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते… !!!महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…

About Guest Author 502 लेख
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*