नवीन लेखन...

नोव्हेंबर २२ : मर्वन अटापट्टू आणि गिली-लँगरचा अफलातून विजय



२२ नोव्हेंबर १९७० रोजी मर्वन सॅम्सन अटापट्टूचा जन्म झाला. श्रीलंकेकडून आजवर खेळलेल्या सर्वाधिक तंत्रशुद्ध फलंदाजांमध्ये अटापट्टूचा समावेश होतो.

अटापट्टूच्या कसोटी कारकिर्दीचा प्रारंभ मात्र त्याच्या नंतरच्या कामगिरीकडे पाहता विस्मयजनक होता. त्याच्या पहिल्या सहा डावांमधून त्याला अवघी एकच धाव काढता आली ! ही त्याच्या नावावर नोंदली गेलेली एकमेव धावही लेग-बाय असल्याचे पुनर्दृष्यातून स्पष्ट होते !! अटापट्टूच्या समर्थकांचे एक निरीक्षणही लक्षणीय आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मायकेल आथर्टन, ग्रॅहम गूच, लेन हटन, सईद अन्वर, वसिम अक्रम ह्या सर्व खेळाडूंनाही कसोटी पदार्पणात भोपळा फोडता आलेला नव्हता आणि निवृत्तीकाली त्यांच्याकडे प्रत्येकी अडीच हजारांहून अधिक धावा होत्या.

पहिल्या तीन कसोट्यांमधील ०, ०, (भारताविरुद्ध) ०, १, (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) ०, ० (भारताविरुद्ध) अशा सुरुवातीनंतर पुढील ११ डावांमधील मर्वनची कामगिरी २५, २२, ०, २५, १४, ४, ७, १०, २६, १९, २९ अशी राहिली. भोपळ्याच्या भयावह मालिकेतून तो बाहेर पडलाच पण दहाव्या कसोटीत भारताविरुद्ध १०८ धावा काढून त्याने आपले पहिले शतक पूर्ण केले.

एकाच कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या खेळाडूची कामगिरी ०० अशी चष्म्यासारखी दिसते. म्हणूनच की काय तिला इंग्रजीत ‘पेअर’ म्हटले जाते ! अटापट्टूच्या नावावर अशा ४ पेअर्ससहित २२ कसोटी भोपळे आहेत. आघाडीच्या फळीतील फलंदाजासाठी हा विक्रम ‘असावा’. (संगणक आणि सॉफ्टवेअर्स खूप प्रगत झालेले असले तरी त्यांच्या वाढीला अजून खूप वाव आहे !)

एप्रिल २००३ मध्ये पाचूच्या बेटांच्या एदि (एकदिवसीय) संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती झाली. एदिसांमधील चपळ क्षेत्ररक्षणासाठी तो विख्यात आहे. २००७ च्या विश्वचषकासाठीच्या संघातून त्याला वादग्रस्तपणे वगळण्यात आले. २००७-०८ च्या हंगामातील ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार्‍या संघातही त्याला स्थान मिळाले नव्हते पण श्रीलंकी क्रीडामंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यावर त्याचा संघात समावेश करण्यात आला. पहिल्याच

कसोटीत तो

‘मज्बूत’ खेळला आणि “निवडसमिती ही एका जोकरच्या नेतृत्वाखालील बोलक्या बाहुल्यांची समिती आहे” असा जोरकस फटका त्याने मारला. सोळा शतके आणि सहा द्विशतकांसह ५,५०२ कसोटी धावा जमवून तो या मालिकेनंतर निवृत्त झाला.

महान ऑस्ट्रेलियाई क्रिकेट साम्राज्याला आता जरी उतरती कळा लागली असली तरी दोन वेळा, सलग १६ कसोट्या जिंकण्याचा विक्रम कांगारूंच्या संघाने केलेला आहे. आजच्या तारखेला घडलेली एक कांगारूंची विजयकथा…

इसवी सन १९९९. होबार्ट नावाचे नगर होते. तिथे पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना १८ नोव्हेम्बरपासून सुरू होता. पाकिस्तानच्या २२२ धावांना ओलांडून २४ धावांची शेंडी कांगारूंनी लावली. दुसर्यात डावात मात्र पाहुण्या पाकिस्तानने ३९२ धावा केल्या आणि कांगारूंपुढे विजयासाठी ३६९ धावांचे लक्ष्य ठेवले.

रिकी पॉन्टिंग शून्यावर बाद झाला तेव्हा कांगारूंची अवस्था ५ बाद १२६ अशी झाली. जस्टिन लँगरच्या साथीला आता अडम गिल्क्रिस्ट आला. गिल्क्रिस्टचा हा दुसराच कसोटी सामना होता. लँगर-गिलीने मग पाकला आणखी यश मिळू दिले नाही आणि चौथा दिवशी यष्ट्या उखडण्यात आल्या तेव्हा ऑस्ट्रेलियाने १८८ धावा केलेल्या होत्या. विजयासाठी अजून १८१ धावा कांगारूंना हव्या होत्या.

पाकिस्तानचा विजय ही औपचारिकता मानली जात होती आणि अनिर्णित राखणे हे कांगारूंसाठी आव्हान होते. कांगारूंचा विजय कुणाच्या खिजगणतीतही नव्हता कारण गिली‘डंडा’ अजून फिरलेलाच नव्हता !

चतुर्थ संध्येच्या ४५ नंतर पुढे खेळताना गिलीने पाचव्या दिवशी १०४ धावा चोपल्या. एकूण १६३ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि एका षटकारासह १४९ धावा काढून गिल्क्रिस्ट नाबाद राहिला. संघाच्या ३६४ धावांवर दुसरा शतकवीर जस्टिन लँगर बाद झाला होता आणि शेन वॉर्न मैदानात उतरला होता पण एकाही चेंडूचा सामना करण्याची तसदी गिलीने वॉर्नीला दिली नाही !

एक अशक्यप्राय विजय कांगारूंनी मिळविला. हा त्यांचा सलग तिसरा कसोटी विजय होता आणि पुढच्या तेरा कसोट्यांमध्ये विजयाची ही मालिका कायम राहिली.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..