नवीन लेखन...

योग: कर्मसु कौशलम्

कर्माच्या दोरीवरून चालताना दुसर्या बाजूचा तोलही सांभाळावा लागतो. ही दुसरी बाजू अपेक्षांची! मी एवढं केलं सगळ्यांसाठी पण कुणाला काही नाही त्याचं. साधं थँक्यू म्हटलं नाही. ..वाईट वाटतं. अगदी खरं आहे. पण हळूहळू ते वाईट वाटणं ही कमी व्हायला हवं. कारण ते वाईट फक्त आपल्याला वाटत असतं. ज्याला ते कळायला हवं त्याच्या ते गावीही नसतं.


‘योग: कर्मसु कौशलम्’ गीतेमधलं हे सुपरिचित असं वचन. खरंतर हे सर्वांनीच अमलात आणावं असं वचन पण ज्येष्ठांनी नक्कीच आचारात ठेवावं असं वचन. या वचनाचा नेमका अर्थ काय? कर्मातलं कौशल्य म्हणजे योग. आता कुणी असं म्हणेल की,  ‘आम्ही आता निवृत्त झालो आहोत, आता आम्हाला हे कशासाठी?’

कर्मातलं कौशल्य म्हणजे नेमकं काय? कुठलंही काम करताना ते अगदी व्यवस्थित, परिपूर्ण करावं, कुशलतेने करावं हे कौशल्य आहेच पण भगवंत यापलीकडे आपल्याला घेऊन जात आहेत असं वाटतं. कर्मातलं कौशल्य म्हणताना मला समोर दिसतो तो डोंबारी. सावकाश, शांतपणे दोरीवरून तोल सांभाळत चालणारा. ‘कर्मसु कौशलम्’ म्हणजे तोल सांभाळणे. कर्म करत असताना दोन्ही बाजूला आपला तोल ढळू शकतो. एक बाजू आहे ‘मी’ केलं आणि दुसरी बाजू आहे ‘मी एवढं केलं पण तेवढं मला मिळालं नाही’. या दोन्ही बाजूंना न पडता कर्माच्या दोरीवरून चालावं लागतं.

‘मी केलं’. सामान्यपणे आपला हा स्वभाव असतो की छोटसं काही केलं तरी ते आपण केलंय हे अधोरेखित करणं. बर्याचदा तर काही मंडळी ‘मला नावबिव काही नकोच आहे’ असा मुखवटा धारण करतात. पण ‘मी केलं’ हे सांगायची एकही संधी दवडत नाहीत. निवृत्त मंडळींच्या बोलण्यात हा ‘मी’ बरेचदा डोकावताना दिसतो. ऑफिसमध्ये आपण केलेलं काम, घरासाठी, नातेवाईकांसाठी आपण घेतलेले कष्ट… यात हा ‘मी’ बरेचदा येतो. ते काम केलेलं असतं. ते खोटं नसतं. पण पुढच्या पिढीला हे सतत ऐकवत राहिलं तर त्यांना ते रुचत नाही. जमाना बदललेला असतो. त्यांना त्यांचे प्रश्न असतात. ज्येष्ठांच्या तोंडून वारंवार येणारा ‘मी’ त्यांना खटकतो. आणि मग संवाद कमी व्हायला लागतो.

मी शाळेत नोकरी करत होते तेव्हा अधून मधून माझे बाबा माझ्याकडे राहायला येत. मुलगी लहान, यजमान बाहेरगावी, नोकरी, तिथली कामं, घरातली कामं… दिवस अपुरा पडायचा. पण बाबा आले की कधी पुस्तकांची कपाटं आवरत, कधी स्वयंपाकघरातले खण लावून ठेवत, कधी चक्क दाणे भाजून कूट करून ठेवत… एक ना दोन. पण कधीही स्वतःहून सांगत नसत. कधी कधी तर बाबा त्यांच्या घरी गेल्यावर मला कळायचं की त्यांनी माझी किती कामं हलकी करून ठेवली आहेत. पण स्वतः एक अक्षर त्या विषयी बोलायचे नाहीत. आणि कधी मी म्हटलं त्याविषयी की म्हणायचे ‘अगं होता मला वेळ. तू एकटी काय काय करशील?’ न बोलता त्यांनी किती शिकवलं! ‘फार पसारा होता बाई, आम्हाला नाही असलं आवडत. म्हणून आज दुपारभर बसून सगळं आवरून घेतलं.’ असेही उद्गार काही जणांकडून ऐकलेत. किंवा न बोलताच, पण मुद्दाम आपल्याला दिसेल अशी मदत करणारी मंडळीही पाहिली आहेत. या सगळ्यात प्रभाव पडला तो बाबांचाच! टापटिपीची सवय लागली. ‘मी केलं’ असं न उच्चारताही, आपलं कामच आपला शिक्का त्यावर उमटवत असतं आणि तो शिक्का नाही उमटला तरी हरकत नाही. काम छान आणि प्रेमाने करावं हे महत्वाचं याची जाणीव करून दिली त्यांनी. हा असा ‘मी’ टाळणं, गाळणं, गिळणं आणि नंतर आपसूक गळणं हे कर्मातलं एक कौशल्यच!  मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो.. हे बोरकर म्हणतात ते खरं कौशल्य!

त्या कर्माच्या दोरीवरून चालताना दुसर्या बाजूचा तोलही सांभाळावा लागतो. ही दुसरी बाजू अपेक्षांची! मी एवढं केलं सगळ्यांसाठी पण कुणाला काही नाही त्याचं. साधं थँक्यू म्हटलं नाही. …वाईट वाटतं. अगदी खरं आहे. पण हळूहळू ते वाईट वाटणं ही कमी व्हायला हवं. कारण ते वाईट फक्त आपल्याला वाटत असतं. ज्याला ते कळायला हवं त्याच्या ते गावीही नसतं. म्हणजे अस्वस्थ होतो …फक्त आपण, अतिरिक्त विचार करत बसतो…फक्त आपण. त्यापेक्षा ‘ठीक आहे, मला तेव्हा ते त्यांच्यासाठी करावं वाटलं, केलं.’ ते मनातूनही काढून टाकून मन मोकळं करून टाकणं हे मानसिक स्वास्थ्यासाठी सगळ्यात महत्वाचं. फार जुन्या हिशोबांच्या वह्या बाळगूच नयेत.

थोडक्यात नदीसारखं व्हावं आणि वाहावं. ‘मी वाहतेय’ असंही ती म्हणत नाही. ‘मी लोकांसाठी वाहते’ असंही ती म्हणत नाही, ‘मी व्हायल्यामुळे माझी कीर्ती वाढणार आहे’ असंही ती म्हणत नाही. तिला फक्त न थांबता वाहणं माहीत असतं.

पूर्वीच्या काळी असणारा वानप्रस्थ आता अवतीभवती वनं नसल्याने शक्य नाही. वनात जाताना काय करायचे लोक? काही नाही. सगळ्या गुंत्यातला पाय मोकळा करून घ्यायचे. ‘मी’ आणि ‘माझं’ यांच्या गाठीच जास्त बसतात आणि गुंता होतो. या गाठी सोडवल्या की मन दुरुस्त, तन दुरुस्त… आपल्याकडे प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन मार्ग सांगितलेत. आपल्या रोजच्या आयुष्यात प्रवृत्ती ही तारुण्यात तर निवृत्ती ही ज्येष्ठ कक्षेत गेल्यावर उपयुक्त ठरते. लहानपणी मुठी वळलेल्या असतात, हळूहळू त्या उघडू लागतात. निवृत्तीच्या वयात त्या पूर्ण उघडाव्यात आणि समर्थ म्हणतात तसं दोन्ही हातांनी ‘आनंदाची लुटी करावी’  ! हे कर्मातलं कौशल्य साधता आलं म्हणजे योग साधला. जीवन त्यांना कळले हो…

– धनश्री लेले

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..