‘येणें वरें ‘नितीनो’ । सुखिया झाला ।।’

आपण बऱ्याचदा ठरवतो एक आणि होतं वेगळंच. आता बघा ना, अगदी काल-परवाच, म्हणजे ३१ डिसेंबरला मी ‘जरा विसावतो या वळणावर’ हा लेख लिहून नविन वर्षात मी फार लेखन करणार नाही असं मनोगत व्यक्त केलं होतं. माझ्या लिखाणात आणखी सकसता, सजगता आणि चौफेर दृष्टी येण्यासाठी, मला आणखी भरपूर वाचन करण्याची आवश्यकता असल्याचं मला गेले काही महिने जाणवतंय आणि तसं चौफेर वाचन करण्यासाठीच लेखनातून काही काळ विश्रांती घेण्याचा मी निश्चय केला होता. या वर्षात मला आणखीही काही कामं पूर्णत्वास नेण्याची असल्याने आणि त्याचाही परिणाम माझी लेखन कामाठी मंदावण्यावर होणार असल्याचं सुतोवाच मी माझ्या ह्या लेखात केलं होतं. पण मी हा लेख लिहून अवघे काही तास उलटायत न उलटायत, तोवर मला माझा संकल्प बाजूला ठेवावा लागेल आणि किबोर्डवर बोटं चालवावी लागतील याची मला तो लेख लिहिताना काहीच कल्पना नव्हती..! ‘मॅन प्रपोजेस अॅंड देव डिस्पोजेस’ ह्या मराठी टच दिलेल्या इंग्रजी म्हणी प्रमाणेच झालंय. अगदी शब्दश:‘देवा’ने माझा संकल्प बाजुला ठेवायला मला भाग पाडलंय, ते ही साक्षात दर्शन देऊन.

प्रसंगच तसा घडला.. काल १ जानेवारी. नविन वर्षाचा पहिलाच दिवस. नेहेमीप्रमाणे, पण एकोणीसाच्या पूर्वी वीस असा उलटं पाढा येण्याच्या वर्षातला पहिलाच दिवस असल्साने जरा जास्त उत्साहाने घराबाहेर पडलो. उलटं काही दिसलं की मला उत्साह येतो, हा माझा स्वभाव दोष (म्हणून तर ‘…. का उलटा चष्मा’ मला आवडतो)..! बोरीवलीला ट्रेन पकडण्यासाठी जात असतानाच फोन वाजला. फोनवर आजगांवकर होते.

आजगांवकर कोण, याची पहिली ओळख करुन देतो. बाळकृष्ण लक्ष्मण उपाख्य बा.ल. आजगांवकर आमच्या कोकणातले. वेंगुर्ल्यानजिकच्या आजगांवचे. केंद्र सरकारातून निवृत्त झालेले, कविता करणारे, पण वाचन दांडगं असल्यानं आजच्या काळावर आणि सामाजिक परिस्थितीवर साकल्याने विचार करणारे एक आपल्यासारखेच सामान्य नागरिक. वय वर्ष ८३. माझ्या वडिलांएवढेच.

आता आजगांकर माझ्या संपर्कात कसे आले, त्याची लहानशी कथा..!

मी गेली दोन वर्ष ‘साप्ताहिक किरात’ मधे अधुन मधून लिहितो. हे साप्ताहिक वेंगुर्ल्याहून प्रसिद्ध होतं. थोडी थोडकी नव्हे, तर गेली ९६ वर्ष सातत्याने. (कै.) अ. वा. मराठेंनी सुरु केलेलं प्रखर सामाजिक भान असलेलं हे साप्ताहिक, आज पुढच्या पिढीच्या सो. सीमा शशांक मराठे नेटानं आणि त्याहीपेक्षा निष्ठेने पुढे चालवतायत. अशा व्रती नियतकालिकांना सक्रीय सहकार्य करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि म्हणून यात जमेल तसं लिहितो. या ‘साप्ताहिक किरात’चे आजगांवकर जुने वर्गणीदार व वाचक.

दोन वर्षांपूर्वी मी ‘किरात’साठी प्रथमच लिहिलेला एक लेख आजगांवकरांच्या वाचनात आला आणि मला त्यांनी, त्यांना लेख खुप आवडल्याचा आवर्जून फोन केला. कुणाही लिहिणाराला त्याचं लिहिलेलं आवडल्याचा एखाद्या वाचकाचा फोन येणं, यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट त्याच्यासाठी असूच शकत नाही. मी ही याला अपवाद नाही. असाच मलाही फोन आला, त्या लेखाच्या विषयावर आमच्यात जुजबी चर्चा झाली आणि फोन संपला. पुढे जेंव्हा जेव्हा मी लिहिलेलं काही किरातमधे प्रसिद्ध व्हायचं, तेंव्हा तेंव्हा मला आजगांवकरांचा न चुकता फोन यायचा. भरपूर कौतुक करणारा आणि म्हणून मलाही आणखी विचार करायला लावणार, माझ्या लेखनात सुधारणा करण्यास भाग पाडणारा. असे मला अनेक फोन येतात, पण आजगांवकरांची गोष्टच वेगळी. तो नुसता कोतुक करणारा फोन नसायचा, तर आमची त्या लेखावर थोडीशी चर्चाही व्हायची. पण हा सिलसिला फोनपुरताच मर्यादीत असायचा आणि आपण भेटू कधीतरी म्हणून थांबायचा. फोन मी सेव्ह करुन ठेवला होता.

काल सकाळी त्यांचा फोन आला. भरभरुन बोलले. नेहेमी प्रमाणेच एकदा मला भेटायची इच्छा प्रदर्शित केली. माझ्याकडे वेळ होता. आजगांवकरांचा मुक्काम बोरीवलीतच. मी म्हणालो आताच येतो. नववर्षाची सुरुवात माझ्या लेखनावर प्रेम करणाऱ्या वाचकाच्या भेटीने होणं यासारखा शुभशकून नाही. मी गेलो.

माझ्या लेखनावर प्रेम करणारांना भेटण्याची ही काही माझी पहिलीच वेळ नाही. पण आजगांवकरांची भेट काही वेगळीच होती. त्या सर्वच साहित्यप्रेमी कुटुंबाने माझं ज्या अगत्यानं आणि जिव्हाळ्यानं स्वागत केलं, ते मी पुढील आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. चार शब्द लिहिता येणाऱ्यावर माणसं इतकं प्रेम करू शकतात, याची मी कल्पनाही केली नव्हती. मी त्यांना प्रत्यक्षात पूर्वी कधीही भेटलो नसताना आजगांवकर, निवृत्त शिक्षिका असलेल्या सौ. आजगांवकर, मराठीत एम.ए. केलेल्या त्यांच्या स्नुषा सौ. स्वाती आणि आजगांवकरांची सोहम आणि सानिका ही दोन मोहक नातवंड यांनी माझी त्यांच्याशी जन्मोजन्मीची ओळख असावी तस स्वागत केलं. पण मला वाटतं, ही ओळख जन्मोजन्माचीच असावी. कारण आमचा परिचय झालाच तो मुळी शब्दांमुळे आणि शब्द हे पिढ्यांपिढ्यांची संस्कृती वाहत असतात. माझे शब्द त्यांना भिडले याचा अर्थ मागच्या पिढ्यांत कुठेतरी आम्ही भेटलो होतो, बोललॊ होतो हा असावा, असं मी समजतो. शब्दांमुळे माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व भेटलेल्या – न भेटलेल्याप्रती माझी हीच भावना आहे.

तासाभराच्या आमच्या भेटीत मला आजगावकर कुटुंबाकडून माझ्या पुढल्या लिहित्या आयुष्याला पुरून उरेल एवढं प्रेम मिळालं जे मला सतत कार्यरत ठेवणार आहे. लोक पूजतात त्या कधीही न पाहिलेल्या देवावर माझा विश्वास नाही, माझ्यासारख्या लिहिणाऱ्यांसाठी वाचक हा साक्षात देव. हा देव प्रसन्न झाला तर न मागता भरभरून देतो, याची प्रचिती मी कालंच, वर्षाच्या पहिल्याच दिवशी घेतली. आजगावकरांनी मला जे काय ‘पसायदान’ दिलं, हे सांगण्याच्या पलीकडचं आहे,

ज्ञानेश्वर माउली त्याच विश्वात्मक देवाला त्यांनी केलेल्या ज्ञानेश्वरीरूपी वाग् यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात. ज्ञानेश्वरांची थोरवी वेगळीच. त्यांची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही. माऊलींची ती ‘ज्ञानेश्वरी, माझी ‘अज्ञानेश्वरी’..! असं असलं तरी दोघांचाही संबंध ‘वाग् यज्ञा’शी, शब्दांशीच..!!

‘जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें || असं ‘ज्ञानि’माऊली जे म्हणतात, तेच माझ्या अल्प ज्ञानाने म्हणायचं माझा सततचा प्रयत्न असतो. तो माझ्या देवांपर्यंत पोचतोय, माझा देव प्रसन्न होतोय आणि न मागता ‘पसायदान’ही माझ्या पदरात टाकतोय, याचा मला खूप आनंद आहे. ‘येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला’ ह्या माउलींच्या शब्दांत थोडा बदल करून ‘येणें वरें नितीनो । सुखिया झाला’ असं मी म्हटलं तर चुकू नये..

आजगावकर ह्या माझ्या देवाचंच एक स्वरूप. ह्याच आनंदाने मला या वर्षात कमीत कमी लिहिण्याचा आणि जास्तीत जास्त वाचण्याचा संकल्प आजच्या दिवसापुरता बाजूला ठेवावा लागतोय..! मॅन प्रपोजेस अॅंड देव डिस्पोजेस’ हे ह्या लेखाच्या सुरुवातील मी का म्हणालो, ते आता तुम्ही समजू शकता..!!

– @नितीन साळुंखे
9321811091
02.01.2019

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 368 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…