नवीन लेखन...

विलेक्शनचा फार्स

नाटकाचे अनेक प्रकार असतात. त्यातल्या ‘फार्स’ ह्या नाट्य प्रकारात, सध्याचं मुख्यतः द्विपात्री आणि द्विसंवादी निवडणुक नाट्य फिट्ट बसतं. या नाटकात मुख्य संवाद असे दोनच, ‘मै भी चौकीदार’ आणि ‘चौकीदार चोर है’ किंवा ‘चौकीदार चोर है’ आणि ‘मै भी चौकीदार’ हे, पण वेगवेगळ्या स्वरात आणि कधीकधी तारस्वरात म्हटलेले. आणखीही काही पात्र यात गरजेनुसार किरकोळ कधी सल्लागारांचे, तर कधी वंचितांचे संवाद म्हणत एन्ट्री घेऊन वावरत असतात आणि एक्झीट घेत असतात. ही पात्र नेमकी कुणाच्या बाजूने संवाद म्हणत असतात हे शेवटपर्यंत काही काळात नसत. पण ती पात्र काही तेवढी महत्वाची नसतात. मुख्य पात्र दोनच. संवादही दोनच..!

यातलं एक पात्र म्हणणार ‘चौकीदार चोर आहे’, तर लगेच दुसरं पात्र म्हणणार ‘मी पण चौकीदार’. कधीतरी दुसरं पात्र म्हणणार ‘मी पण चौकीदार’. लगेच पहिलं पात्र म्हणणार, ‘चौकीदार चोर आहे’. म्हणजे दुसरं पात्र, ‘मी चोर आहे’ अशी कबूली देतंय, की ‘चौकीदार चोरी कसा करेल’ असा प्रश्न विचारून नाकबूल करतंय, हेच प्रेक्षकाना समजेनासं होतं. आहे काही लाॅजीक? नाही ना? फार्स या प्रकाराचा लाॅजीकशी तसाही काही संबंध नसतो. असतो तो निव्वळ बुद्धीशी काहीच संबंध नसलेला विनोद. हेच सध्या चालेलं आहे, असं मला वाटतं. हा फार्स पाहाताना काहींना मात्र ‘तळं राखेल, (हा शब्द ‘राखेल’ असाच आहे, ‘राफेल’ असा नाही. काही नतद्रष्टांना तो ‘राफेल’ असा वाटू शकतो. पण तो ‘राखेल’ असाच आहे याची नोंद घेणे) तो पाणी चाखेल’ आणि ‘जो बोट रोखतो, त्याची चार बोटं स्वतःकडे असतात’ ह्या म्हणी शिंच्या उगाचंच आठवत राहतात.

फार्समधे रंगमंचावरच्या घटना अत्यंत वेगाने घडत असतात. प्रेक्षकांना विचार करायला वावच ठेवलेला नसतो. किंबहूना त्यांनी विचार करुच नये, अशीच अपेक्षा असते. कोण कोणाचा कोण, तो कोण कोणाशी का आणि काय बोलतोय, ह्याचा शेवटपर्यंत पत्ता लागत नसतो. अतिशयोक्ती, असंभवनीय घटना, विदुषकी चाळे, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक करणं, हा या फार्सचा उद्देश. यांत पात्रांचा गोंधळ आणि धिंगाणा नाटकसंपेपर्यन्त चालू असतो.

नाटकाच्या रंगमंचावर अनेक विंगां असतात. काही ‘राईट’ला असतात, काही ‘लेफ्ट’ला असतात. काही अती डावीकडे, तर काही अती उजवीकडे. नाटकात नाट्य भरावं म्हणून किंवा प्रेक्षकांवर धक्का तंत्राचा परिणाम व्हावा म्हणून काही प्रवेश थेट समाजातून (पक्षी:प्रेक्षकातून) योजले जातात.काही विंगा अगदी नेमस्त असल्यासारख्या समोरही असतात. पण समोरच्या विंगेतून फारशी ये-जा होत नाही, कारण मग त्यात नाट्य उतरत नाही. सरळपणात कसलं नाट्य? नाट्य निर्माण होतं ते, जे शक्य नाही तिथून एक्झिट घेतलेल्या पात्राने, अशक्य कोटीतील वाटणाऱ्या विंगेत घेतलेल्या एन्ट्री मुळे. रंगमंचावरची पात्र स्टेजवरच्या या अनेक विंगांतून प्रवेश करत असतात आणि कथेच्या मागणी प्रमाणे अनेक विंगांतून एक्झीट घेत असतात. जसजसा नाटकाचा क्लायमॅक्स जवळ येतो, तसतश्या पात्रांच्या हालचाली वेगवान आणि अतर्क्य होत जातात आणि संवाद विचित्र होत जातात. प्रेक्षकांची मती गुंगवून टाकणे हाच उद्देश असल्याने, असं करणं आवश्यक असतं. त्याशिवाय प्रेक्षक दिक्-मूढ कसा होईल?

निवडणुक नाट्याच्या पार्श्वभुमीवर अशीच काही पात्र आता विविध वेश पालटून किंवा रुप बदलून विविध विंगांतून ये जा करु लागली आहेत. काही लेफ्टच्या विंगांतून बाहेर पडतायत, काही तरी अगम्य तत्वाची बडबड करत राईटच्या विंगेत शिरतायत, तर काही नेमकं उलट करतायत. गंम्

मत म्हणजे सर्व विंगा मागच्या रंगपटात उघडतात आणि तिथे मात्र राईट, लेफ्ट, समोररचे, मागचे (पिछडलेले) असे सर्वच एकत्र येऊन चा-बिस्कीटावर ताव मारत, सिग्रेटी फुंकत ‘काय यार साॅलिड रोल केला, अगदी खरं वाटावं असा’ असं एकमेकांना म्हणत एकमेकांची पाठ थोपटत बसलेले असतात. प्रेक्षक मात्र, फार्सातल्या ज्या ज्या पात्राच्या बाजूने उभे राहीलेले असतात, ते आपापसात फुकाचा वितंडवाद घालत बसलेले असतात..

असंच काहीसं सध्या विलेक्शनच्या फार्स-कम-नाट्यात चाललेलं आहे. आपण विचार करु नये, फक्त टाळ्या पिटाव्यात, जमल्यास मध्यमवर्गीय अवघडलेपण बाजूला ठेवून शिट्या माराव्यात किंवा पिवळे, भगवे, हिरवे इत्यादी विविध रंगांचे रुमाल (मनातल्या मनात)उडवावेत एवढाच प्रेक्षकांचा (पक्षी: मतदारांचा) रोल.

लोकशाही नाट्य चिरायू होवो.

झमुरे, बजाओ ताली..!

— नितीन साळुंखे
‪9321811091
२०. ०३. २०१९
फोटो सौजन्य- इंटरनेट‬

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..