नवीन लेखन...

सतर्क ग्राहक

मी मुंबईत वांद्रे येथे एक सरकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होतो तेव्हाची गोष्ट आहे. या शाखेचे बहुतांश ग्राहक अनिवासी भारतीय असल्याने ते लाखात कमी आणि कोटींमध्ये जास्त व्यवहार करायचे. त्यामुळे या शाखेत फसवणुकीचे (फ्रॉड) प्रकार नेहमी होत असत.  कधी दिल्ली पोलिस माझ्या केबिनमध्ये तर कधी बंगलोर पोलिस. माझा बराच वेळ ह्या केसेसचा तपास हाताळण्यातच गेला.

एके दिवशी सकाळी एक व्यक्ती माझ्या केबिनमध्ये येऊन म्हणाली, माझे नाव विरेन शहा. मी तुमचा खूप जुना ग्राहक आहे. माझे अल्को मार्केटमध्ये कपड्यांचे मोठे दुकान आहे. परवा संध्याकाळी पोस्टमन चेकबुक घेऊन माझ्या दुकानात आला. दुकानाचा पत्ता बरोबर होता पण दुकानाचे नाव वेगळे होते. त्यामुळे माझ्या कर्मचाऱ्याने ते न स्वीकारता परत केले. काल संध्याकाळी पोस्टमन पुन्हा एटीएम कार्ड असलेले पाकीट घेऊन आला. पत्ता माझ्याच दुकानाचा होता पण परत नाव तेच होते जे काल परत केलेल्या पाकीटावर होते.  तेंव्हा मला जरा संशय आला. मी पोस्टमनला भेटलो. पोस्टमनने मला जे काही सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. लगेचच तुम्हाला भेटायला आलो.  त्या पोस्टमनने सांगितले की काल संध्याकाळी दोन मुले त्याच्याकडे आली होती. त्यांनी ते चेकबुक आणि एटीएम कार्ड असलेली पाकिटे मागितली. त्या बदल्यात ते प्रति पॅकेट 500 रुपये देण्यास तयार होते. पण आमचा पोस्टमन खूप प्रामाणिक आहे. त्याने स्पष्ट नकार दिला आणि ती दोन्ही पाकिटे बँकेत परत गेली आहेत, असे सांगून त्या मुलांना टाळले.

विरेन शहाचे म्हणणे पूर्ण झाल्यावर मी नवीन खाती उघडण्याचे काम पाहणाऱ्या अमृताला त्या खात्याचा फॉर्म घेऊन यायला सांगितले. त्या फॉर्मसोबत जोडलेली कागदपत्रे मी पाहू लागलो. विरेन शहांचे लक्ष  दुकानाच्या परवान्यावर (लायसेंस) गेले. त्यांनी ती  फोटोकॉपी बनावट असल्याचे सांगितले. त्यांनी दुकानातून परवान्याची मूळ प्रत मागवली. दोन्ही परवान्यांची तुलना केली असता नाव वगळता उर्वरित सर्व मजकूर अगदी समान होता. दुकानाचे लाईसेन्स बनावट लावल्याचे आढळून आले. पत्त्याबद्दलही तेच. त्यासोबत जे वीज बिल जोडण्यात आले तेही बनावट होते. मी, विरेन शहा आणि अमृता यावर चर्चा करत असताना अमृताने सीसीटीव्हीवर त्या दोन मुलांना शाखेत येताना पाहिले. मी ताबडतोब अमृताला तिच्या जागेवर परत जाण्यास सांगितले आणि दोन्ही मुलांना काहीतरी सबब सांगून काही काळ गुंतवून  ठेवण्यास सांगितले. मी तात्काळ पोलिस स्टेशनला फोन करून पोलिसांना माहिती दिली. वॉचमनलाही त्या दोन मुलांवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले. मी स्वतः बँकिंग हॉलमध्ये उभा होतो. हे सर्व इतके शांततेत घडले की ग्राहकांनी खचाखच भरलेल्या शाखेतील कोणालाही याची जाणीवही झाली नाही. काही क्षणातच पोलिस व्हॅन शाखेसमोर आली. त्यातून 4 हवालदार आणि 2 पोलिस निरीक्षक उतरले. पोलिसांना येताना बघून त्या मुलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण हवालदारांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडले आणि  माझ्या केबिनमध्ये घेऊन आले. पोलिसांनी त्या दोघांना यथेच्छ बदडायला सुरुवात केली पण दोघेही इतके निगरगट्ट  होते की तोंड उघडण्याचे नाव घेत नव्हते. शेवटी दोघांनाही व्हॅनमध्ये घालून घेऊन गेले आणि आम्हाला पोलिस स्टेशनला यायला सांगितले. आम्ही म्हणजे मी, अमृता आणि विरेन शहा तिघे पोलिस स्टेशनला पोहोचलो. हा सगळा प्रकार पाहून शाखेत उपस्थित असलेले इतर कर्मचारी व ग्राहक हादरून गेले. काय होतंय ते त्यांना कळतही नव्हतं.

आम्ही पोलीस ठाण्यात पोहोचलो. त्या दोघांना गुन्हे अन्वेषण कक्षात नेण्यात आले होते आणि अगदी पोलिसी खाक्याने त्यांची चौकशी सुरू असल्याचे दिसले. त्या मुलांच्या झिंज्या धरून त्यांचे डोके भिंतीवर आपटले जात होते. त्यांचे कपडे काढून त्यांना कमरेच्या पट्ट्याने असे मारले जात होते की आम्हाला ते बघवत नव्हते.  त्यांच्या खिशात क्रेडिट कार्ड आणि 4-5 बँकांचे धनादेश सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून जप्त केलेल्या 2-4 पॅनकार्डवरील फोटो त्यांचे होते पण नाव प्रत्येक कार्डवर वेगळे हे पाहून मला आश्चर्य वाटले. मुख्य पोलीस अधिकारी अहमद खान यांच्या केबिनमध्ये आम्ही गेलो. तिथे आमचीही जवळपास 3-4 तास चौकशी झाली, जबानी घेण्यात आली. रात्री उशिरा आमची पोलिस स्टेशनमधून सुटका झाली.

दोन-तीन दिवसांनी मला अहमद खान यांचा फोन आला. मी तिथे पोहोचताच त्यांनी माझे अभिनंदन केले आणि म्हणाले, तुमच्या सतर्कतेमुळे आम्ही एक मोठे रॅकेट पकडू शकलो. आतापर्यंत या टोळीने 4-5 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्या दोन मुलांनी जो कबुली जवाब दिला तो असा होता.  आम्हाला वांद्रे पूर्व येथील अंबर हॉटेलमध्ये नोकरी देण्याच्या निमित्ताने बोलावण्यात आले. बँकेत खाते उघडण्यासाठी लागणारी सर्व बनावट पॅनकार्ड, वीजबिल आदी आमच्या हाती दिले. आम्हाला अकरा हजार रुपये देण्यात आले. एक हजार रुपये कोणत्याही बँकेत खाते उघडण्यासाठी भरावयाची रक्कम आणि दहा हजार रुपये आमचे बक्षीस. बँकेत खाते उघडणे आणि त्या खात्याचे चेकबुक आणि एटीएम कार्ड त्यांच्यापर्यंत पोहोचवणे एवढेच आमचे काम होते. आम्ही त्यांना ओळखत नाही.

हा प्रकार कळताच पोलिसांनी त्या मुलांमार्फत चेकबुक देण्याच्या बहाण्याने त्यांना बोलावून घेत हॉटेलभोवती सापळा रचला. काही पोलीस ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये वेगवेगळ्या टेबलवर बसले. ते येताच पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. अधिक तपासात आठ बँका या टोळीचे बळी ठरल्याचे समोर आले.

या घटनेची माहिती मी तात्काळ हेड ऑफिसला दिली. माझा सत्कार झाला. पण प्रत्यक्षात तो सन्मान त्या सतर्क ग्राहकाचा म्हणजे विरेन शहा आणि प्रामाणिक पोस्टमनचा होता.

-रामदास कामत

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..