नवीन लेखन...

विधायकतेच्या वाटेवर

जनशक्तीवाचक चळवळ, औरंगाबाद

एकुणच भारतात मुद्रणाची कला सार्वजनिक होत गेली आणि त्या सोबत प्रसार माध्यमांचा ‘प्रसार’ होण्यास सुरवात झाली. पहिली १५० वर्षे प्रसार माध्यमे म्हणजे वर्तमानपत्रे, नियतकालिके असंच स्वरूप होतं. १९८० नंतर आपल्याकडे दूरदर्शनचे जाळे पसरू लागले. २० व्या शतकाच्या अगदी शेवटी शेवटी खासगी दूरदर्शन वाहिन्यांची सुरुवात झाली. २१ व्या शतकात पहिल्या दशकानंतर सामाजिक माध्यमं (सोशल मिडीया) सुरू झाली. म्हणजे १८३० पासून बघितले तर २०० वर्षांत कागदावरची मुद्रित माध्यमं ते प्रचंड भांडवली गुंतवणुकीची इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं ते कुणालाही हाताळता येतील अशी स्वस्तामधील म्हणजे जवळपास फुकटच अशी अनिर्बंध सामाजिक माध्यमं ( फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर इ.) असा प्रसार माध्यमांचा प्रसार झाला. या काळात समाज कसा कसा बदलत गेला? कागदी माध्यमं होती तेंव्हा समाज हा अगदी माहितीच्या पातळीवर बाळबोध होता.

देशावर आधी इस्ट इंडिया कंपनीची आणि नंतर इंग्रजांची सत्ता होती. साक्षरांची संख्या अगदीच किरकोळ म्हणावी अशी होती. या काळात कागदांवरील अक्षरांचे विलक्षण असे महत्त्व होते. टिळकांचा एक एक अग्रलेख, एक एक शब्द आंदोलनाचे स्वरूप धारण करू शकायचा. लोकमानसावर त्याचा प्रचंड प्रभाव होता.

नेमके हेच हेरून टिळकांनी आपल्या राजकीय लढ्यासोबतच सामाजिक प्रबोधनासाठी या माध्यमांचा वापर करायला सुरवात केली. टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्याचा प्रचार आणि प्रसार हा या प्रसार माध्यमांमधूनच झाला. त्यापूर्वी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सवांची परंपरा नव्हती. या उत्सवाचा उपयोग सांस्कृतिक चळवळीसाठी करून घेण्यात आला. गणपतींच्या मेळ्यांमधून संगीताच्या नाटकाच्या माध्यमातून प्रस्थापित राजकीय सामाजिक चळवळ बळकट होत गेली. याला तेव्हाच्या प्रसार माध्यमांनी फार मोठ्या प्रमाणावर बळ मिळवून दिले.

दुसरा टप्पा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मानावा लागेल. पारतंत्र्यात प्रसार माध्यमांचे ध्येय वेगळे होते. पण स्वातंत्र्यानंतर ते काहीसे बदलले. गावोगावच्या जत्रा, उरूस, सण, समारंभ, नवरात्र महोत्सव आदींना या माध्यमांतून प्रसिद्धी मिळायला लागली. ‘पंढरीची वारी’ समजून घेवून त्यावर वेगळे ‘फिचर्स’ लिहिले जायला लागले. गावोगावच्या छोट्या मोठ्या उत्सवांना प्रसार माध्यमांत स्थान मिळायला लागले. जत्रा/ उत्सव/ उरूस यांच्या निमित्ताने त्या परिसरात ज्या सांस्कृतिक घडामोडी होतात यांच्यावर ही माध्यमं लक्ष ठेवायला लागली. या शिवाय साहित्य संमेलन, सवाई गंधर्व संगीत महोत्सव अशा नवीन साहित्य संगीत परंपरा सुरू झाल्या. त्यांचीही दखल प्रसार माध्यमांतून घेतली जायला लागली.

दूरदर्शनचा प्रसार झाल्यावर या सामाजिक प्रबोधनांत एक गुणात्मक फरक पडत गेला. दृश्य स्वरूपात काहीही दिलं तरी लोक पाहतात कारण त्यांना त्याचे सुरवातीला अप्रुप होते. शिवाय या माध्यमाचे वैशिष्ट्य म्हणजे याला साक्षर असण्याची गरज नव्हती. बिनडोक करमणूक असे स्वरूप या प्रसार माध्यमांना येत गेले. याचा परिणाम असा झाला की वर्तमानपत्रांनी जी काही मर्यादा होती ती ओलांडून अगदी तळागाळापर्यंत हे माध्यम पोचले. हे माध्यम तंत्रज्ञानावर अवलंबून होते. शिवाय दृश्याच ताकद मोठी असते त्यामुळे आत्तापर्यंत न आलेले विषय दृष्टीकोन विविध सामाजिक घटक यात यायला लागले.

रूढी, परंपरा ज्या काही आपल्या समाजात हजारो वर्षे चालत आलेल्या आहेत त्या शब्दांतून मांडणे याला एक मर्यादा होती. आता दूरदर्शन मुळे दृश्य स्वरूपात या सगळ्या बाबी समाजासमोर मांडणे सहज सोपे झाले. त्याचा परिणामही जास्त होवू लागला. दूरदर्शनवर रामायण लागायचे तेंव्हा लोक दूरदर्शन संचाची पूजा करायचे, हार घालायचे, उदबत्ती लावायचे. रस्ते सूनसान व्हायचे. ही या माध्यमाची ताकद होती. पुढे याच ताकदीचा अतिरेकी वापर करत या माध्यमांनी धुमाकूळ घालायला सुरवात केली.

१९९५ नंतर खासगी वाहिन्या सुरू झाल्या. यांच्यावर बंधनं तशी फारशी नव्हती. अगदीच अश्लील आणि बिभत्स असं काही सोडलं तर ते बरंच काही दाखवून शकत होते. याचा त्यांनी फायदा उचलला. इथूनच काही प्रमाणात सामाजिक मुल्यांच्या घसरणीला सुरवात झाली. समाजात निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते, प्रतिभावंत, कलाकार यांच्या पेक्षा सुमार लोकांना महत्त्व यायला सुरवात झाली. कारण ते फारश्या अटींशिवाय कार्यक्रमांसाठी तयार असायचे.

रूढी, परंपरा, उत्सव, जत्रा यांच्यातून नेमकं काय दाखवावे आणि काय दाखवू नये याचे एक तारतम्य आवश्यक होते. मुद्रित स्वरूपात जेव्हा माध्यमं होती तेव्हा त्यांचा आवाका तसा मर्यादित होता. परिणामी त्यांच्यावर नियंत्रण शक्य होते. पण खासगी दूरदर्शन वाहिन्यांवर बंधनं घालणं शक्य राहिलं नाही. परिणामी चांगल्या सोबतच वाईटाचाही प्रचार प्रसार सुरू झाला. अनिष्ट गोष्टींना महत्त्व यायला लागलं. रिआलिटी शो मधून तीन मिनिटांचे गाणं म्हणणारा रात्रीतून स्टार व्हायला लागला पण त्यासाठी लागणारी मेहनत रियाज कला आत्मसात करण्यासाठी लागणारे अफाट कष्ट दुर्लक्षित झाले. यातून सामाजिक मूल्यांच्या हासाला सुरवात झाली.

 

२१ व्या शतकाच्या सुरवातील या सोबत सामाजिक माध्यमं (सोशल मिडीया) वाढायला सुरूवात झाली. दहा पंधरा वर्षात त्याचा अतिरेक झालेला पहायला मिळतो आहे. मुद्रित माध्यमं, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं यांच्यावर काहीतरी बंधनं शक्य होती. पण सोशल मिडिया म्हणजे मोकाट सुटलेले जनावर झाले आहे. त्यावर लगाम कसा घालायचा?

गेल्या दोनशे वर्षांत समाज खूपच बदलला आहे. याची योग्य ती दखल माध्यमांनी घेतलेली दिसते. पण या समाजाला विवेकाच्या पातळीवर आणण्याची भूमिका मात्र ती घेताना दिसत नाही. मिशन टू प्रोफेशन असा जर माध्यमांचा प्रवास असेल तर आपणही त्याकडून तशी अपेक्षा ठेवू शकत नाही.

पण दुसरा एक मोठा आशेचा किरण सोशल मीडियांतून दिसतो आहे. अगदी कमी प्रमाणात का असेना काही मंडळी संस्था यांचा चांगला वापर करून घेताना दिसत आहेत. ज्या गोष्टी प्रस्थापित माध्यमं दाखवत नव्हती, समोर येवू देत नव्हती अशा कितीतरी बाबी सोशल मीडिया थेटपणे समोर आणतो आहे. फोटो, व्हिडीयो यांचा वापर करून सत्य समोर मांडण्याची धडपड कौतुक करावी अशीच आहे. या माध्यमाच्या वापरासाठी फारसे पैसे लागत नाहीत. परिणामी या माध्यमांचा वापर प्रचंड वाढत चालला आहे.

आता उलट प्रस्थापित माध्यमांनी या सोशल मीडियाचा धसका घेतलेला दिसतो आहे. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचे ज्या तरूण मुलीसोबत प्रेम संबंध होते त्यांची छायाचित्रे या सोशल मिडीयावर गाजली. त्यानंतर अपरिहार्यपणे दिग्विजय सिंह यांना या आपल्या संबंधांची कबुली द्यावी लागली. या तरूण मुलीसोबत त्यांना विवाह करावा लागला. हे कुणाही प्रस्थापित माध्यमांनी केले नाही. कारण जर तसं काही घडलं असतं तर ही माध्यमं या छायाचित्राचा उपयोग करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करून चूप बसण्याचीच शक्यता जास्त होती. पण त्यांनी सत्य कधी समोर आणले नसतं.

सोशल मीडियाच्या दबावाने सत्य समोर येण्याचे प्रमाण वाढले आहे हे मान्यच करावे लागेल. सगळा समाज कधीच एकसाथ बिघडलेला नसतो. एक विचारी वर्ग समाजात कायमच कार्यरत असतो. त्याचा आवाज दाबला गेला तर अनाचार वाढतात. तेव्हा सोशल मीडिया जर समाजातील विचारी वर्गाचा अवाज बनून पुढे येत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे.

एक अतिशय साधं उदाहरण ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याबाबत आहे. त्यांनी ब्लॉग लिहायला सुरवात केली. आणि या ब्लॉगला वाचणाऱ्यांची भेट देणाऱ्यांची संख्या एक कोटीचा टप्पा पार करून गेली. या ब्लॉगसाठी त्यांना कुठलाही फार मोठा भांडवली खर्च करावा लागला नाही. आता एक युट्यूब चॅनल ते सुरू करत आहेत.

एकूणच माध्यमांचा विचार केला तर ते एक दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर आपण कसा करून घेतो यावरच समाजाची साधक बाधक घडण बनत जाईल. बहुतांश विचारी लोकांनी या माध्यमांचा तारतम्याने वापर करायचे ठरवले तर खूप काही चांगले घडू शकते. मराठवाडा भागात शास्त्रीय संगीताची चळवळ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मदतीची चळवळ, कचरा वेचक महिलांची चळवळ असे काही उपक्रम सदर लेखकाने स्वतः सोशल मीडियाचा वापर करत यशस्वी करून दाखवले आहेत. गावोगावच्या छोट्या पत्रकारांना इतर प्रस्थापित माध्यमं संधी देत नाहीत. त्यांच्यासाठी सोशल मीडिया हे एक वरदान ठरू शकते.

आधुनिक काळातही महानगरांमध्ये मंदिरे, उपासना स्थळे येथे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम मोठ्या प्रमाणात चालविले जातात, मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा होतात, समाजाचे एकत्रिकरण घडून येते त्या प्रमाणेच नवीन माध्यमांचा वापर करून चांगल्या गोष्टी होवू शकतात. गरज आहे ती यासाठी पुढे येणाऱ्या तरूण वर्गाच्या पाठीशी मदतीचा भक्कम हात आणि शुभेच्छांची थाप देण्याची.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात डॉ. श्रीकांत उमरीकर  यांनी  लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..