नवीन लेखन...

वायस पुराण

वायस पुराण (सम सोल्स सफर सायलेंटली!)


– समोरचं दृश्य अभूतपूर्व होतं. अविश्वसनीय होतं. आश्चर्यकारक होतं. अकल्पित तर होतंच पण अवर्णनीय सुद्धा होतं.

एका लयीत, दुडक्या चालीने असंख्य कावळे रस्त्यावरून चालत होते.
काळा रंग सरपटत जातोय असंच वाटत होतं.
एकटक बघत राहिलं तर अंगावर शहारे यावेत तसं जाणवत होतं.
एरव्ही सुसाट जाणारी वाहनं आज थांबून राहिली होती.
रस्त्यावर मैलोगणती रांगा लागल्या होत्या.
रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची गर्दीच गर्दी झाली होती. आणि सर्वांच्या मोबाईलवर नेहमीप्रमाणे व्हिडीओ शुटींग चालू होते.
एव्हाना ही बातमी सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे न्यूज चॅनल्सच्या ओबी व्हॅन्स आणि वार्ताहरांची प्रचंड धावपळ सुरू झाली होती.
प्रादेशिक आणि राष्ट्रीय चॅनल्सवाल्यांनी प्राईम टाइम चा विचार न करता टीआरपी देणारी ही न्यूज फ्लॅश करायला सुरुवात केली होती.

असंख्य कावळे. नजर जाईल तिकडे कावळे. एरव्हीची कावकाव ऐकू येत नव्हती. काकस्पर्श कुठेही होत नव्हता. संमोहित झाल्यासारखे सगळे चालत होते.
आजूबाजूच्या गर्दीची, वाहनांची, चकाकणाऱ्या मोबाईलच्या फ्लॅशची, कसलीच जाणीव त्यांना नव्हती.
त्या सगळ्यांना, सर्वात पुढे चालणारे शंभुराव दिसत होते. ऐंशी वय असूनही, शरीर साथ देत नसूनसुद्धा काठीच्या आधाराने ते चालत होते. चाल मंदावली असली तरी जोश तरुणाईला लाजवेल असाच होता. चेहऱ्यावर हास्य होते. आत्मविश्वास होता. पाठी न पहातासुद्धा त्यांना कळत होते की असंख्य कावळे त्यांच्या मागून चालत येत आहेत. शंभुरावांजवळचा मनाचा निग्रह त्या कावळ्यांमध्ये होता हे त्यांना न सांगता कळत होते. आपल्याला कोठे जायचे आहे, काय करायचे आहे, कशासाठी करायचे आहे, याची पूर्ण कल्पना त्यांनी चार दिवसांपूर्वी एकाक्षला दिली होती.
एकाक्ष त्यांचा आवडता कावळा होता.
आणि सगळ्या वायस विश्वावर त्याची अनभिषिक्त हुकूमत होती.
सगळं वायस विश्व एकाक्ष मुळं परिचित झालं होतं.
त्यामुळं त्यांच्या एका शब्दावर सगळे वायस रस्त्यावर उतरले होते.

हे त्यांचं नातं, पोलीस यंत्रणेला ठाऊक नव्हतं.

कावळे शंभुरावांच्या पाठी लागले आहेत, ते त्यांना त्रास देतील या भीतीने आणि माणुसकीच्या नात्याने, एका वर्दीने शंभुरावांना रस्त्याच्या एका बाजूला नेले. संरक्षण देण्यासाठी.

पण हे कावळ्यांना समजत नव्हतं.
शंभुरावांना कुणीतरी त्रास देतंय, इतकंच त्यांच्या लक्षात आलं.
आणि पुढच्याच क्षणी अतर्क्य घडलं. ..

सगळे कावळे, कावकाव न करता शंभुरावांभोवती गोलाकार जमू लागले आणि शंभुरावांना संरक्षण देत पुन्हा दुडक्या चालीनं चालू लागले.
त्यांची संख्याच इतकी होती की वर्दी, गर्दी आणि न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर, भीतीनं खूप दूर झाले.
दृश्य मजेदार होतं आणि तितकंच कारुण्यमय होतं.
हजारो कावळ्यांच्या संरक्षणात वयोवृद्ध शंभुराव चालत होते.
आणि या सगळ्यांचं काय करावं हे न उमगलेली व्यवस्था, भोवतालची गर्दी आणि रिपोर्टर्स चालत होते.

व्यवस्था, अगतिक होऊन !
गर्दी, उत्सुकतेनं !
रिपोर्टर्स, कर्तव्य म्हणून !

चालत होते.
चालत होते. ..

* * * * * *

बातमी एव्हाना विधिमंडळात पोहोचली होती.
अधिवेशन चालू होते.
उच्चारवाने, आक्रस्ताळेपणाने, प्रसिद्धीलोलुपतेने एकमेकांवर तुटून पडणारे सगळे लोकप्रतिनिधी, कावळ्यांची बातमी समजल्यावर पाचदहा मिनिटे हबकून गेले.
आणि नंतर वस्तुस्थिती समजून न घेता नेहमीप्रमाणे हलकल्लोळ सुरू केला.
सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांना कावळ्यांच्या नावाने टोमणे, चिमटे, शालजोडी यातून ओरबडायला सुरुवात केली.
मात्र मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, सभापतींची परवानगी घेऊन सभागृहाबाहेर आले.

* * * * * *

न्यूज चॅनल्सनी सगळ्या गोष्टींचा इव्हेंट सुरू केला.
बाईट्सवर बाईट्स चा रतीब सुरू केला.
लहान मुले, तरुणाई, मध्यम वयाचे नागरिक, वृद्ध स्त्रीपुरुष, व्यावसायिक, नोकरदार, प्रवासी, वाहनचालक, सर्व धर्मांचे लोक. नेते मंडळी, साहित्यिक, समाजसेवक. ..
कुणाकुणाला सोडलं नाही.

तुम्हाला काय वाटतं ?
याप्रसंगी तुमची मनःस्थिती कशी आहे ?
काय सांगाल याबद्दल ?
बस ! हे आणि असेच प्रश्न विचारून ते रिपोर्टर्स पकवू लागले होते.
आमच्या चॅनल्सच्या स्क्रीनवर, सर्वात प्रथम असं घोषित करून, कधी तारसप्तकात तर कधी हळुवारपणे, भाषेचा, व्याकरणाचा खून पाडत रिपोर्टिंग सुरू होतं.

* * * * * *

– कावळे चालत होते.
त्यांना उन्हातान्हाची पर्वा नव्हती.
खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती.
त्यांना फक्त शंभुराव दिसत होते.
ऐंशी वर्षांचे शंभुराव.
सगळ्या कावळ्यांना समजून घेणारे शंभुराव.
वृद्धाश्रमात मिळालेल्या अन्नापैकी केवळ एकच पोळी स्वतःला ठेवून बाकीचं अन्न कावळ्यांसाठी राखून ठेवणारे.
वृध्दाश्रमातील सर्वांना नम्रतापूर्वक अन्नदानाचा आग्रह करणारे.
कावळ्यांचा उपहास, टिंगल करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर देऊन गप्प करणारे.
जखमी कावळ्यांना औषधोपचार करणारे.
त्यांना प्यायला चांगलं पाणी मिळावं, म्हणून खास सोय करा असं सांगणारे आणि व्यवस्थापन मानत नाही म्हटल्यावर उपोषणाला बसणारे.
पिंडावरच्या कावळ्यांचा समर्थक अशी हेटाळणी झाली तरी हसतमुखाने त्याकडे पाहणारे शंभुराव.
सगळ्या कावळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी खूप आदरभाव होता.
जगातल्या सगळ्या कावळ्यांचा एकमेव समर्थक अशी कुचेष्टा त्यांच्या वाट्याला यायची.
ती ऐकून सगळ्या कावळ्यांना वाईटही वाटायचे आणि अभिमानसुद्धा वाटायचा.
काकस्पर्श वाईट, अपशकुनी असं म्हणणाऱ्यांना थोबडवणारे शंभुराव कावळ्यांना अगदी जवळचे वाटायचे.
त्यामुळे एकाक्षने आजच्या एकत्रिकरणाचे सांगितल्यावर, काम काय हे न विचारता हजारो कावळे एकत्र आले.
आणि उद्देश समजल्यावर उत्साहाने चालू लागले, शंभुरावांच्या बरोबरीने. त्यांना संरक्षण देत.

एकाक्ष हा शंभुरावांचा लाडका होता.
ते त्याच्याशी खूप बोलायचे.
खूप काही सांगायचे.
“. .. तुला सांगतो एकाक्ष, तुम्ही सगळे कावळे आणि आमच्या मानव जातीतील वृद्ध एकाच प्रकारचं जीवन जगतो. तुमच्या वाट्याला हेटाळणी येते, तशी हेटाळणी आमच्याही वाट्याला येते. तुमच्या रंगरूपावरून, दिसण्यावरून तुम्हाला कुणीही जवळ करीत नाही. आणि आम्ही म्हातारे झालो की तीच अवस्था आमच्याही वाट्याला येते. तुमच्यामध्ये नातीगोती आहेत की नाही हे माहीत नाही, पण आमच्यात नातं सांगण्याची लाज वाटणारे अनेक आहेत. पेन्शन मिळणारे थोडे सुखी आहेत पण बाकीचे तुमच्याप्रमाणे देवावर हवाला ठेवून जगणारे अनेकजण आहेत. पालकांना वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात टाकण्याची, आमच्यापैकी अनेकांच्या मुलांची घाई चाललेली असते. त्याअगोदर संपत्ती नावावर करून घेण्याचा धूर्तपणा दाखवलेला असतोच, तोपर्यंत गोड बोलून गाजर दाखवलेलं असतं. तुम्ही जसे कुणीतरी टाकलेल्या अन्नावर जगता तसे आम्हीसुद्धा वृद्धाश्रम नावाच्या तुरुंगात उपकार केल्यागत टाकलेल्या वा दिलेल्या अन्नावर जगतो. तुम्ही आमच्यापेक्षा सुखी आहात. कारण तुम्हाला कुठेही हिंडण्याचं स्वातंत्र्य आहे. उडण्याचं स्वातंत्र्य आहे. बोलण्याचं, खाण्याचं, सुखेनैव फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला देवपुत्र म्हटलं जातं ते खरं आहे. आणि आम्ही काहीतरी बोलू, कसे तरी राहू, जगू, म्हणून आम्हाला इथे या वृद्धाश्रमात आणून डांबून ठेवलं जातं. घरात अडगळ होते आमची. डस्टबिन म्हणून संभावना होते. तुम्ही सगळे हुशार आणि कुटुंबासाठी धडपडणारे आहात. दिवसभर कुठेही हिंडलात तरी रात्री पिल्लांसाठी घरट्यात येता. आणि आम्ही आमच्या पिल्लांनाच दुरावतो. आमच्यातल्या काहींना घरात ठेवलं तर कुलूपबंद करून ठेवतात. ओळख सांगायची वेळ आली तर परक्यागत ओळख सांगितली जाते.
एकाक्ष, अरे वृद्धाश्रम म्हणजे तरी काय ? पैसे भरून दिलेला सक्तीचा तुरुंगवासच तो. जबरदस्तीच्या पोटी प्रेम नसते. नोकरी म्हणून कर्तव्य करणाऱ्यांना मायेचा ओलावा ओढून ताणून आणता येत नाही. इथे अन्न देतात, औषधे देतात, सेवा देतात पण त्याला घरच्या अन्नाची, प्रेमाची, मायेच्या ओलाव्याची, नातवंडांच्या सुखद स्पर्शाची सर नसते. घरच्या भिंतींना आठवणींचे लिंपण असते. ते या वृद्धाश्रमात नसते रे. खरं सांगायचं तर कोरड्या असतात या वृद्धाश्रमातील भिंती. आम्हा वृद्धांना, वृद्धाश्रम हा शाप आहे, आमच्यासाठी नरक आहे. आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, संवेदनशीलतेचा ओलावा संपलेला हा नरक आहे. तुटलेली नाती आणि सुटलेल्या गाठी जुळवत बसताना जीवाची कुतरओढ जिथे होते, तो हा नरक. ज्यांना वृद्धाश्रम चांगला वाटतो, ते खोटं बोलतात किंवा त्यांना तसं बोलण्यासाठी विशेष काहीतरी मिळत असावं. वृद्धाश्रम हा दुरावा आहे, न सांधली जाणारी दरी आहे. इथे आल्यावर आत्मविश्वास संपतो. वृत्तीतील विधायक दृष्टी संपते. कारण मनात फक्त एकच येत राहतं, आपण सगळ्यांना नकोसे झालो आहोत, आपण टाकाऊ, बिनउपयोगाचे झाले आहोत, मेलेल्या मनाचे झालो आहोत. मला वाटतं एकाक्ष, आपण एक चळवळ उभारायला हवी. समाजातले सगळे वृद्धाश्रम कायद्याने बंद करायला हवेत. वृद्धांची जबाबदारी घरच्यांनी आनंदानं घ्यायला हवी. तसा कायदा करायला हवा. आणि जे कुटुंबीय वृद्धांना सांभाळणार नाहीत त्यांना कडक शासन व्हायला हवं. बस ! ठरलं !! ”

शंभुराव उठले.
टेबलावरचा कागद हाती घेतला आणि वृद्धाश्रम कायद्यानं बंद झालाच पाहिजे, या चळवळीचा मसुदा ते तयार करू लागले.

त्यांना माहिती होतं, अनेक वृद्धांचाच याला विरोध होईल, कारण त्यांना सवयीचं गुलाम होऊन राहण्यात हीत वाटेल. किंवा पुन्हा घरी जाण्यात अपमान वाटेल.
त्यांनी तो विचार सोडून दिला.
प्रसिद्धी माध्यमे, सोशल मीडिया दूर ठेवला कारण त्यातून काहीच साध्य झालं नसतं, यावर त्यांचा विश्वास होता.
शासनाचं, व्यवस्थेचं, समाजाचं लक्ष वेधून घ्यायचं तर वेगळ्या पद्धतीनं चळवळ उभी करायला हवी या निर्णयापर्यंत ते आले.
समोर एकाक्ष बसला होता.
त्यांना वाटलं कावळ्यांना मदतीची साद घातली तर. ..
त्यांनी त्याला विचारलं. काय काय करायचं ते सांगितलं.
आणि त्यातून साकारला आजचा दिवस.
प्रचंड मोठ्ठं अभिनव आंदोलन.

* * * * * *

शंभुरावांनी आपलं निवेदन शासनाच्या प्रतिनिधींना दिलं आणि ते पाठी वळले.
सगळा मीडिया त्यांची वाट पाहत होता.
त्यांनी आपल्या मनातील भावनांना पुरेशी वाट करून दिली आणि ते निघाले.
पण मीडिया त्यांची पाठ सोडायला तयार नव्हता.
– प्रश्नांची सरबत्ती करायला चॅनल्सवाले पुढं घुसू लागले आणि इतका वेळ शांत असलेले कावळे बिथरले.
प्रचंड कलकलाट सुरू झाला.
चोचीने ते सगळ्यांना जखमी करू लागले.
वर्दी, गर्दी पुढं होऊन त्या कावळ्यांना हाकलू लागली. गदारोळ सुरू झाला. वर्दीनं लाठीमार सुरू केला.
कावळे आणि गर्दी पिसाळली.
त्यातच चेंगराचेंगरी होऊ लागली.
या दरम्यान शंभुराव केव्हा खाली पडले आणि तुडवले गेले हे कुणाच्याच लक्षात आलं नाही.
– बऱ्याच काळानंतर सगळं शांत झालं.

आता तेथे शेकडोंच्या संख्येनं मेलेले कावळे, असंख्य पिसे पडलेली होती.
चेंगराचेंगरीत तुडवले गेलेल्या शंभुरावांचा मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे गेला होता.
एकाक्ष डोळ्यातून वाहणारं पाणी सावरत त्यांच्या देहापाशी थांबला होता.

– टीव्हीवर न्यूज फ्लॅश होत होती.
‘ शंभुरावांच्या निवेदनावर सरकार सहानुभूतीने विचार करण्यासाठी एक त्रिसदस्यीय कमिटी नेमणार आहे. ‘

काहीशा अनिच्छेने एकाक्ष तिथून निघाला आणि शंभुरावांच्या घराच्या दिशेनं उडाला.

* * * * * *

– दरवाजा उघडा होता.
टीव्हीवर बातम्या चालू होत्या.
पण कुणाचंही लक्ष नव्हतं.
तो हॉलमधल्या फॅनवर बसला. त्याचं लक्ष खाली गेलं.
हॉलमध्ये पितृपक्षातला, पितरांचं स्मरण करण्याचा इव्हेंट सुरू होता.
केळीच्या हिरव्यागार पानावर विविध प्रकारच्या सहासात चटण्या, वेगवेगळ्या कोशिंबिरी, वेगवेगळ्या चवींच्या चार पाच भाज्या, वडे, घारगे, लाडू, दोनतीन प्रकारच्या स्वादिष्ट खिरींच्या चांदीच्या वाट्या, पांढराशुभ्र भात, त्यावर पिवळं धम्मक वरण, साजूक तूप आणि अन्य काही पदार्थ वाढलेले होते.

त्या सजलेल्या हिरव्यागार पानाचा मोबाईलवर फोटो घेण्यासाठी आणि स्टेटसला ठेवण्यासाठी, सगळ्या नातेवाईकांची घाईगडबड सुरू होती.

– आणि फॅनवर बसलेला एकाक्ष सुन्न होऊन, जाणिवांच्या चक्रव्यूहात अडकत चालला होता. ..

( काल्पनिक )

– डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
९४२३८७५८०६

वायस पुराण ही एक फॅन्टसी आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि वृद्धाश्रमात खितपत पडलेल्या सर्वांना ही फॅन्टसी समर्पित करीत आहे.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..