नवीन लेखन...

वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना

`वलयांकितांच्या सहवासात’ या लेखमालिकेतील हा लेख, `मराठीसृष्टी डॉट कॉम` (www.marathisrushti.com) या वेबपोर्टलवर दिनांक २५ मे २०२० रोजी प्रथम प्रकाशित झाला. लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणतीही काटछाट न करता, लेखकाच्या नावासहित शेवटपर्यंत शेअर करावा… 


मराठी लग्नाच्या जेवणाचा मनमुराद आनंद घेताना परवीनजी आणि खॉंसाहेब…

५ जुलै १९८१. नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. दादरचा राम मारुती रोडवरचा सी.के.पी. समाज हॉल. माझ्या धाकट्या काकाचं, रविकाकाचं लग्न होतं. रजिस्टर्ड लग्न झालं व स्वागत समारंभ सुरू झाला. साडे अकरा-बाराच्या सुमारास हॉलच्या दरवाजापाशी एकदम धांदल उडाली. अरुणकाका मुळे एका अत्यंत देखण्या, जुन्या काळातली राणी असावी अशा रुबाबदार महिलेसमवेत हॉलमध्ये शिरला. तिच्याबरोबर तिच्यापेक्षा साधारण फूटभर उंच असलेला, तितकाच देखणा पुरुषही होता. तिनं उंची साडी परिधान केली होती, तिच्या अंगावरून प्रकाश परिवर्तित होत होता, मोठे मोठे पारदर्शी डोळे, त्यात भरलेलं काजळ, लांब केसांची घट्ट वेणी बांधलेली, मोजके पण ऐश्वर्यसमृद्ध दागिने तिनं घातलेले; तर त्या पुरुषानं पांढरा शुभ्र झब्बा आणि पायजमा घातलेला, लांब कुरळे भरगच्च केस, स्वप्नील पण दुसऱ्याच्या हृदयाचा ठाव घेणारे डोळे. सारे नवदांपत्याकडे गेले. आम्ही पोरं भांबावलो होतो. आई कानात म्हणाली, “या बेगम परवीन सुलताना आहेत, आणि ते उस्ताद दिलशाद खां, त्यांचे पती.” मी लांबून त्या दोघांकडे पाहात बसलो, आणि पाहातच बसलो. अचानक आठवलं, उस्तादजींना मी ‘मिली’ सिनेमात पाहिलं होतं. त्यात ते डॉक्टरची भूमिका करत होते. आणि परवीनजी तर त्यांच्या आवाजामुळे आमच्या घराचा एक अविभाज्य हिस्सा झालेल्या होत्या. रविकाकाच्या खजिन्यात त्यांच्या बऱ्याच रेकॉर्ड्स होत्या. त्याच्या बोलण्यात ‘परवीनजी’ असा उल्लेख कायम असायचा. पण रविकाकाचं लग्न, हा मी त्यांना पाहण्याचा पहिला प्रसंग!

सौ वासंती व रवीकाका आरेकर, उस्ताद दिलशाद खॉं, परवीनजी आणि अरुण मुळे..

त्या लग्नातला या सर्वांचा फोटो आहे. खांसाहेब मध्यभागी उभे आहेत, त्यांनी दोन्ही खांदे फैलावून रविकाका आणि अरुणकाकाला कवेत घेतला होता. आजही तो क्षण मनात कायमस्वरूपी बसला आहे. एवढी मोठी गायिका पण लग्नाच्या पंगतीमध्ये सर्वांसोबत जेवायला बसली. ब्राह्मणी पद्धतीचं जेवण आवडीनं जेवली. प्रत्येक पदार्थाची त्यांनी ओळख करून घेतली व त्या मनसोक्त जेवल्या. जाताना माझ्या एक्याऐंशी वर्षांच्या आजीला व्यक्तिश: भेटून, तिला खाली वाकून नमस्कार करून गेल्या. खांसाहेबांनीही तिला वाकून नमस्कार केला. आई म्हणाली, “हे संस्कार असतात.”

त्यांच्या या पहिल्या दर्शनानंतर त्यांचं गाणं अधिक जवळचं झालं. शास्त्रीय संगीत हे जाणकारांनाच कळतं. मला ते आजतागायत कळलेलं नाही. तुम्हाला जेव्हा खूप कळायला लागतं, तेव्हा असमाधानाच्या पाकोळ्या भिरभिरायला लागतात. एखादी गोष्ट न कळताही अज्ञानाचा आनंदही भोगता यायला हवा. मला तो भोगता येतो.

१९८३ चा सुमार असावा. (सालाची खात्री नाही) त्या काळात दूरदर्शन हा एकमेव चॅनेल होता. पुढच्या आठवड्यात कोणते कार्यक्रम आहेत, ते दर रविवारी सकाळी दाखवलं जायचं. तो त्या काळातला लोकप्रिय कार्यक्रम होता. आम्ही वह्या घेऊन बसायचो, कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम बघायचा, हे नक्की करून ठेवायचं. तर जानेवारी महिन्यातल्या एका रविवारी सकाळी ‘साप्ताहिकी’ सुरू होती आणि येत्या शनिवारी रात्री नॅशनल नेटवर्कवर साडे नऊ वाजता परवीनजी व खांसाहेब अशी जुगलबंदी आहे, असं निवेदिकेनं सांगितलं. लगेच कार्यक्रमाची क्षणचित्रे दाखवली गेली. खांसाहेब व परवीनजी, असे दोघे काश्मीरमधल्या एका हाऊसबोटीवर बसून गायन करताना दिसले. मी शनिवारची वाट बघू लागलो. साडे आठ वाजता लाईट गेले. लगेच आमची फोना फोनी सुरू झाली. एम्.एस्.ई.बी. वाल्या मंडळींकडे धावपळ केली आणि कसेबसे नऊ पंचवीस वाजता लाईट आले. बरोबर साडे नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला. ते दोघं त्या दिवशी जे काही गायले ते अद्भूत होतं. ते कोणता राग गायले, त्याचे आरोह-अवरोह कसे होते, हे कळण्याची माझी क्षमता नव्हती. पण, माझ्यासारख्या औरंगजेबाला जागेवर बांधून ठेवण्याचं अफालतून गारुड त्यांच्या गायनात होतं. परवीनजींचा कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसलेला, तिन्ही सप्तकांत वीजेसारखा लीलया फिरणारा नितळ, निकोप, धारदार आणि तरीही कानाला मृदू असणारा आवाज व खांसाहेबांचा घनगंभीर, प्रशांत महासागराच्या खोलीतून येणारा, सारी खळबळ, सारी उर्जा खंबीरपणे धरून असलेला, वीजेला पोटात सामावून घेणारा आणि तिला कोंदण प्राप्त करून देणारा स्वर ….. अफाट जुगलबंदी होती ती. या क्षणीही कर्णसंपुटाला त्यांच्या अस्तित्त्वाचं सार्थकत्त्व बहाल करणारी ती जुगलबंदी आठवते!


`वलयांकितांच्या सहवासात’ या लेखमालिकेतील हा लेख, `मराठीसृष्टी डॉट कॉम` (www.marathisrushti.com) या वेबपोर्टलवर दिनांक २५ मे २०२० रोजी प्रथम प्रकाशित झाला.


मला राजेश खन्ना आणि किशोरकुमार हे काँबिनेशन फार आवडतं. किशोरकुमार गेल्यावर तर मी काही दिवस सूतक पाळलं होतं. राजेश खन्नाचा बेकार चित्रपटही मी आवर्जून पाहायचो. तसा मी ‘कुदरत’ नावाचा चित्रपट पाहिला आणि त्यातलं ‘हमें तुमसे प्यार कितना’ हे गाणं ऐकलं. ते दोघांनी किशोरकुमार आणि परवीनजींनी गायलं होतं. फॉर अ चेंज, मला पहिल्यांदा किशोरकुमारइतकंच परवीनजींनी गायलेलं गाणं आवडलं. (‘शर्मिली’त किशोरकुमार आणि लता मंगेशकर दोघेही ‘खिलते है गुल यहाँ’, हे गाणं गातात. मला किशोरचंच आवडतं. का? या प्रश्नाला उत्तर नाही) मी रविकाकाच्या मागे लागायचो, मला परवीनजींना भेटायचंय. पण ते जमतच नव्हतं.

दरम्यान शिक्षण, प्राध्यापकी, स्वत:ला स्थिरता प्राप्त करून देणं अशा प्रकारे मी जगण्याच्या मागे लागलो.

प्राचार्य दिनेश पंजवानी नावाच्या एका मोठ्या झपाट्याच्या प्राचार्यानं आम्हां शिक्षकांना मोठी स्वप्नं पाहायला शिकवलं. त्या स्वप्नांचा एक भाग म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महान व्यक्तीना, त्यातही कलावंतांना विद्यार्थ्यांच्या भेटीला आणणं. पहिले रवींद्र जैन, मग उस्ताद झाकीर हुसेन. तिसऱ्या वर्षी कोणाला बोलवायचं याचा विचार सुरू झाला. मी सुचवलं, “आपण परवीन सुलतानांना तिसरा गौरव पुरस्कार देऊ या का?” सर म्हणाले, “तू त्यांनाही ओळखतोस?” मी – “हो, मी ओळखतो. त्या मला ओळखत नाहीत. पण रविकाकाचा व त्यांचा दोघांचा स्नेहबंध घट्ट आहे.” सरांनी सुचवलं, “ठीक आहे. असं कर, खांसाहेबांनाही ते येऊ शकतील का? असं विचार.” मी एकदम हवेत गेलो.

परवीनजी आणि नीतिन आरेकर…

रविकाकानं परवीनजींना फोन केला. त्यांनी क्षणात येण्याचं मान्य केलं. मी व रविकाका त्यांच्या खारच्या घरी त्यांना निमंत्रण करायला गेलो. चर्चबेल वाजते तशी त्यांच्या दारावरची बेल होती. राहीनं दरवाजा उघडला. आम्ही आत गेलो. साधारण अठरा बाय पंधराचा तो हॉल होता. छान सजवला होता. धूप दरवळत होता. साधेसे सोफे होते, खाली पसरलेली एक गादी, लोड, तक्क्ये होते. भिंतीवर मक्केचं चित्र होतं. दुसऱ्या बाजूला सत्यसाईबाबांची तसबीर होती. मी अवघडून बसलो होतो, तर रविकाका आरामात बसला होता. काही क्षणांनंतर मधल्या दारावरचा पडदा बाजूला सारून परवीनजी आल्या. साधासा पंजाबी ड्रेस, हातात सोन्याचे नक्षीदार तोडे, कपाळावर मोठं कुंकू आणि मुद्रवर प्रसन्न हास्य! रविकाका सहजपणे आणि मी धपडपत उठलो. “अरे रविभाई कैसे हो? आजकल तो आप आतेही नहीं हो?” रविकाकाने माझी ओळख करून दिली. मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. “जिते रहो बेटा, जिते रहो. भगवान को नमश्कार करना चाहिये, इन्सान को नहीं।” मी पटकन म्हणालो, “जी, आप जैसे कलाकारों में भगवान दिखते है।” त्यांनी मिश्कील नजरेनं माझ्याकडे पाहिलं, मजेत हसल्या. बावीस वर्षांपूर्वी त्यांना जसं बघितलं तशाच त्या दिसत होत्या. मी त्यांना आमच्या गौरव दिवसाची कल्पना समजावून द्यायला सुरुवात केली. तर त्यांनी मला थोपवलं व अस्खलित मराठीत म्हणाल्या, “बेटा, आरामात बस. रविभाईने सांगितलं म्हणजे मी येणार. नाही, आम्ही येणार! तुम्ही आता काय घेणार ते सांगा. चहा, कॉफी की शरबत?” आणि मग त्या स्वत: स्वयंपाकघरात गेल्या. स्वत: चहा केला, काही कुकीज आणि मिठाई एका ट्रेमध्ये घेऊन आल्या. त्या नुकत्याच उत्तर भारतात मैफिलीसाठी जाऊन आल्या होत्या. तिथून आणलेली मिठाई होती. त्या मिठाईबद्दल त्या माहिती देऊ लागल्या. ती कशापासून बनवतात, कशी बनवतात, कोणत्या उत्सवात तिचं महत्त्व असतं, हे सारं त्या वर्णन करून सांगत होत्या. भारतातील सर्वश्रेष्ठ शास्त्रोक्त संगीत गायिकांमधील ही एक गायिका, जिनं माझं आवडतं गाणं गायलंय ती गायिका, संगीताविषयी न बोलता मिठाईबद्दल बोलत होती. चहा वगैरे झाल्यावर मग त्यांनी विचारलं, “अब बताओ बेटा, प्रोग्राम कैसे होगा?” मी त्यांना कार्यक्रमाची रूपरेषा आणि त्यामागील कल्पना सांगितली. त्यांच्याकडे तारीख मागितली. त्या म्हणाल्या, “तुला कोणती हवी ते सांग.” मी ३० जानेवारी २००३ म्हणालो. त्यांनी होकार दिला. आम्ही त्या उभयतांना आमचा ‘गौरव पुरस्कार’ देणार होतो. परवीनजी म्हणाल्या, “बेटा, एक बात का ख़याल रहे, पहले सम्मान खांसाब का होगा, बाद में मेरा होगा। वह मेरे पती है इसलिये नहीं। वह मेरे गुरु है। मैं उन्हीं के पास आज भी सिखती हूँ।” मी हैराणलो. “आज भी का मतलब क्या?”  मी विचारलं. “अरे भई, परवीन आज भी बड़े सुबह पाच बजें उठकर रियाज़ करती है,” असं म्हणत खांसाहेबांनी प्रवेश केला. साडे सहा फूट उंचीचे खांसाहेब हॉलमध्ये शिरताच तो हॉल भरून गेला. “बेटा ध्यान में रखना, रियाज़ करोगे तो राज करोगे” दीदी म्हणाल्या, “हां ह़म दोनों रोज़ बडे सुबह पाच बज़े उठकर रियाज़ करते हैं। रात को कितनी भी देरी होने दो, सुबह पाच बज़े रियाज़ शुरू।” “रविभाई कैसे हो?” आपल्या लांब केसांची झुल्फे दोन्ही हातांनी मागे सारत खांसाहेबांनी विचारणा केली. ते नमाज़ पढून आले होते. त्यांच्या गप्पा सुरू राहिल्या. ते तिघं स्नेही एकमेकांशी बोलत होते. मी बघत होतो.

ठरल्या दिवशी त्या दोघांना घेऊन रविकाका कॉलेजला आला. स्वागतासाठी प्राचार्य आणि अन्य उपप्राचार्य उभे होते. आमच्या उपप्राचार्या उमा विश्वकर्मा यांना बघून परवीनजी हर्षभरित झाल्या. त्यांनी भर्रकन पुढे होऊन त्यांना मिठी मारली. दोघींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते. आम्ही आश्चर्यचकित झालेलो. माझ्याकडे बघून परवीनजी म्हणाल्या, “बेटा, खांसाहेब व मी, शादाबच्या (त्यांची मुलगी) जन्मानंतर पहिल्यांदा परदेशात गेलो, तेव्हा खांसाहेबांची एक शिष्या अंबरनाथला राहायची. शादाबला आम्ही तिच्याजवळ सोडून गेलो होतो. उमा तिच्यासमोर राहायची. तिनंही शादाबची काळजी घेतली. हम दोनों सहेलीयां है.” उमा मॅडमना मी नंतर विचारलं, “तुम्ही आधी का बोलला नाहीत?” त्या म्हणाल्या, “बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटणार होतो, ती खूप मोठी गायिका झालीय. शी इज अ लीजंड नाऊ, काय माहीत ती ओळख देईल की नाही. बट नो, आय् वॉज राँग. शी डिड नॉट चेंज अट ऑल?” परवीनजींच्या व खांसाहेबांच्या सत्काराच्या वेळी समोर साडे तीन हजारांहून अधिक मुलं बसलेली होती. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम दोन अडीच तास रंगला. त्या कार्यक्रमात परवीनजींनी पद्म पुरस्कार देण्याच्या त्यावेळच्या प्रक्रियेवर सडकून टीका केली होती आणि नंतर तो कार्यक्रम ‘टॉक ऑफ द प्रेस’ बनला होता. परवीनजींनी मुलांसमोर आपल्या आयुष्यातील काही किस्से सांगितले आणि त्या गायल्या, “हमें तुमसे प्यार कितना…” हे गाताना त्यांनी सर्व मुलांसमोर आपले हात नेले, आणि ते हात हृदयाशी नेऊन त्यांनी सांगितलं, “तुम्ही उद्याची आशा आहात. म्हणून हे गाणं तुमच्यासाठी.” स्त्री-पुरुष प्रेमाच्या गीताला त्यांनी मातृप्रेमाची छटा दिली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमानंतर शेकडो मुला-मुलींनी त्या दोघांना गराडा घातला. त्यांनी सर्वांना खूश केलं, सह्या दिल्या, फोटो काढले. त्या महान गायिकेनं मुलांची मनं जिंकली.

बेगम परवीन सुलताना यांचा नेहमीच सन्मान होत असतो..

त्याच वर्षी मला ‘ऋतुरंग’च्या अरुण शेवतेंनी परवीनजींच्या मातृत्त्वाच्या अनुभवाचं शब्दांकन करण्यासाठी सांगितलं. मी परवीनजींना कल्पना सांगितली. एकच अपत्य व तेही कन्यारत्न असणाऱ्या पालकांवर त्या वर्षीचा ‘ऋतुरंग’चा दिवाळी अंक असणार होता. ही कल्पना सांगितल्यावर त्यांना अतिशय आनंद वाटला, कौतुक वाटलं. त्यांनी मला दिवस व वेळ सांगितली. मी अर्थातच रविकाकाच्या बरोबर त्यांच्याकडे गेलो. मला ‘परवीनजी’ किंवा ‘मॅडम’ म्हणणं थोडंसं ऑड वाटत होतं. मी त्यांना ‘दीदी’ म्हणून साद दिली, त्यांनी हसून प्रतिसाद दिला. म्हणाल्या, “अब ठीक लग रहा है।” आमची ती मुलाखत रंगली. आम्ही दोन अडीच तास तिथं होतो. आपल्या मुलीबद्दल बोलताना कोणतीही आई जशी एक्साईट झालेली असते, तशाच त्या एक्साईट झालेल्या होत्या. “शादाब हे लग्नानंतर अनेक वर्षांनी झालेलं अपत्य आहे. आम्ही तो निर्णय ठरवून घेतला होता,” दीदी मला म्हणालेल्या, “माझ्यावर जबाबदाऱ्या होत्या, खांसाहेबांवरही त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या होत्या. आम्ही दोघंही कलाकार. त्यामुळे एकूण आर्थिक स्थैर्य आल्याशिवाय मूल घेणं शक्य नव्हतं. आपण एक नवा जीव जगात आणतो आहोत, त्याला व्यवस्थित जगवता आलं पाहिजे. तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर मग आम्ही दोघांनी मूल घेण्याचा निर्णय घेतला. तुला सांगते, मी ते आई होणं आणि नंतरचं आईपण खूप एंजॉय केलं. खरं म्हणशील तर आम्ही दोघांनी आई-बाप होण्याची प्रक्रिया उपभोगली.” शादाब ही संगीताइतकंच त्यांच्या जीवनाचं केंद्रस्थान आहे. हा सारा अनुभव मी ‘ऋतुरंग’साठी लिहिला. एका संगीत सम्राज्ञीच्या मातृत्त्वाचा अनुभव तिनं मोकळेपणानं सांगितला होता. मी त्यांना तो लेख प्रसिद्धीला देण्यापूर्वी वाचून दाखवायला गेलो, त्यांनी बारकाईनं ऐकला व एकाही ओळीचा बदल न करता छापायला मान्यता दिली. तो लेख खूप गाजला. दीदींनी नंतर कधीही माझ्या लेखांची आधी तपासणी केली नाही.

त्यानंतर मी दीदींकडे जाऊ लागलो. कधी रविकाका असायचा कधी नसायचा. त्यांच्या घरात कधी परकेपणा वाटला नाही. घराची बेल वाजवली की घरभर मंजूळ नादावून ती बाहेर ऐकू यायची. दीदी कायम सांगत, “येण्यापूर्वी रिंग देत जा.” मी त्या भानगडीत कधी पडत नाही. आधी का कळवायचं? तर मी कर्जतहून त्यांच्याकडे आधी खारला आणि आता कांदिवलीला जाणार. त्या घरी नसल्या तर, माझी फेरी फुकट जायला नको, हा त्यांचा विचार असायचा. दोनदा त्यांनी मला सांगितलं, तिसऱ्या वेळी मीच त्यांना म्हणालो, “दीदी, देवाच्या देवळात जाण्यापूर्वी देवाला सांगायचं असतं का?” त्यानंतर मात्र त्यांनी आजपर्यंत मला कधीही सांगितलं नाही की फोन करून ये.

त्यांचं नवं घर कांदिवलीला आहे. मोठा फ्लॅट आहे. ते घर घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, “बेटा, मैं अब खार से और दूर, कांदिवली में रहने के लिये गयी हूँ।” पण जिथं मनात अंतर नसतं तिथं मैलांच्या अंतराला कुठे जागा असते? आम्हाला ते अंतर कधीच लांब वाटलेलं नाही. त्यांचं घर सोळाव्या मजल्यावर आहे. घराच्या दारावर दीदी, खांसाहेब आणि शादाब अशा तिघांच्या नावाची पितळी पाटी आहे. पहिल्यांदा त्यांच्या कांदिवलीच्या घरी गेलो, तर भला मोठा दरवाजा उघडून त्यांनी स्वागत केलं. मी पाटीकडे बघून छान आहे अशा अर्थानं मान डोलावली. तर दीदी म्हणाल्या “रविभाईने बना के दिया है।” त्यांच्या घराच्या आत पाऊल टाकलं की मोठा हॉल आहे. याला दिवाणखाना म्हणायला काही हरकत नाही. समोर तीन जण बसू शकतील असा सोफा आहे, त्याच्या दोन बाजूला एक एक कोच ठेवलेला आहे. मक्केचा मोठा फोटो आहे. एका बाजूच्या भिंतीवर सत्यसाईबाबांचा फोटो आहे. त्या फोटोच्या बाजूला त्या दोघांना मिळालेल्या काही महत्त्वाच्या स्मृतिचिह्नांची रचना आहे. जमिनीवर गालिचा आहे, त्यावर काही तक्क्ये पसरलेले असतात. दीदी एका सोफ्यावर बसल्या की मी त्यांच्या किंवा खांसाहेबांच्या पायाजवळ बसतो. ज्यानं त्यानं आपापली पायरी ओळखली पाहिजे.

परवीनजी आणि खॉंसाहेब…

तुम्ही त्यांच्या घरात पाऊल टाकलं व स्थिरस्थावर झालात की दीदी स्वत: उठून पाणी आणून देतात. त्यासोबत एखादा गोड पदार्थ असतोच. दीदी किंवा खांसाहेब सतत दौऱ्यावर असतात. कुठल्या तरी दौऱ्यावरून परतताना, त्यांनी त्या त्या भागातला प्रसिद्ध पदार्थ आणलेला असतो. तो त्या आवडीनं खिलवतात. परवीनजींना उत्तम खाण्याचा आणि खिलवण्याचा शौक आहे. त्यांच्या स्वराची माधुरी त्यांनी तयार केलेल्या पदार्थात असते. एकदा गप्पा मारताना त्यांनी एक किस्सा सांगितला – पूर्वी भारत सरकारच्या वतीनं जगभरात इंडिया फेस्टीव्हल केले जायचे. एकदा फ्रांसमध्ये कार्यक्रम होता. दीदी आणि खांसाहेबांच्या आधी काही दिवस, बिस्मिल्ला खांसाहेब पोहोचले होते. दीदींना पॅरिसच्या विमानतळावर उतरल्यावर भारतीय राजदूतांनी निरोप दिला की, “बिस्मिल्ला खांसाहेबांनी ताबडतोब बोलावलं आहे, ते वाट पाहात आहेत.” दीदी धास्तावल्या. ‘काय झालं असेल?’ अशी शंका मनात येऊन त्या घाई घाईनं खांसाहेब जिथं उतरले थेट तिथे गेल्या. बिस्मिल्ला खांसाहेब त्यांची वाट पाहात होते. दीदींना बघितल्यावर त्यांनी हुश्श केलं. दीदींनाही हायसं वाटलं- “मेरी सांस रुकी थी। लेकीन जब बिस्मिल्ला खांसाब को ठीक ठाक देखा तो, मेरी जान में जान आ गयी,” त्या म्हणाल्या. बिस्मिल्लाखांसाहेब त्यांना म्हणाले, “बेटा, यहां का डबल रोटी-बटर खाकर मैं परेशान हो गया हूँ और यहाँ का नॉनव्हेज खाने में डर लगता है। कुछ अच्छा खाने के लिये बनाओ।” ते बेचव जेवण जेवून बिस्मिल्ला खांसाहेब कावले होते. दीदी म्हणाल्या, “मेरी एक सहेली थी वहां। उसके साथ जा कर मैं बहोत सारा मटन लेकर आयी। उस फाइव्ह स्टार होटल के कीचन में गयी। वहां मैंने शेफ को रिक्वेस्ट किया। और अगले तीन घंटे के अंदर मैंने अपने जैसा खाना बनाया। पैंतीस लोगों ने वह खाना खाया था। मुझे गाना और खाना दोनो पसंत है।”

मा. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार स्विकारताना…

आणि हे खरं आहे. दीदी या बहुधा एकमेव गायिका असतील की ज्यांनी आवाजासाठी तेलकट, तुपकट खाणं, थंडगार सरबत सोडलं नसेल. प्रकाश माक्याचं तेलवाले धनंजय बेडेकर एकदा सांगत होते, कर्जतला त्यांच्याकडे परवीनजींचं शास्त्रोक्त गायन ठेवलं होतं. ओंकार गुलवडी आणि अप्पा जळगांवकर या साथीदारांसह धनंजय दीदींना घेऊन कर्जतला येत होता. १९८७ ची गोष्ट असेल. पळस्पा फाट्याजवळ तेव्हा नुकतंच पर्शिअन दरबार हॉटेल सुरू झालं होतं. त्यानं गाडी तिथं वळवली. दीदींच्या लक्षात आलं की गाडी पळस्प्याला आलीय. त्या म्हणाल्या, “इथं कुठं गाडी आणलीत. समोर घ्या. तिथं दत्त स्नॅक्स आहे. आपण तिथं कोथिंबीर वडी आणि बटाटेवडे खाऊ.” धनंजय गार पडला. रात्री गाण्याचा कार्यक्रम आहे आणि आत्ता ह्या बटाटेवडे खाणार? गुलवडी त्याला म्हणाले, “काळजी करू नकोस. त्यांना सवय आहे.” दीदींनी आवडीने कोथिंबीर वडी आणि बटाटेवडे खाल्ले. समोरच उसाचं गुऱ्हाळ होतं. हातानं फिरवायचा चरक होता. त्या म्हणाल्या, “आता रस पिऊ या.” धनंजयने रसवाल्याला बर्फ न घालता रस आणायला सांगितलं. ते दीदींनी ऐकलं. गुऱ्हाळवाल्या व्यक्तीला त्या म्हणाल्या, “भाईसाब इनका मत सुनिये। बरफ डाल दीजिये।” त्यांनी भरपूर बर्फ घातलेला रस प्यायला आणि रात्री त्या रसाची गोडी त्यांच्या गायनात पूर्ण उतरली.


`वलयांकितांच्या सहवासात’ या लेखमालिकेतील हा लेख, `मराठीसृष्टी डॉट कॉम` (www.marathisrushti.com) या वेबपोर्टलवर दिनांक २५ मे २०२० रोजी प्रथम प्रकाशित झाला.


दीदींना अप्रतिम सौंदर्यदृष्टी आहे. त्या रात्री त्या कार्यक्रमासाठी कर्जतला धनंजयच्या घरी पोहोचल्या. घरात शिरता शिरता बागेत पिवळ्या रंगाचं टपोरं गुलाबाचं फूल दिसलं. त्यांनी आत शिरल्या शिरल्या रेखा वहिनींना सांगितलं, “वो पिला गुलाब का फूल निकाल कर फ्रीज़ में रखवा दो। मैं मोतिया कलर की साडी पहननेवाली हूँ। उसके साथ ये फूल अच्छा दिखेगा।” मी ‘लोकसत्ते’साठी दीदींची भेट घेऊन शब्दांकन केलं होतं. त्यावेळी दीदी हसत हसत म्हणाल्या, “शुरुवाती दिनों में पहले मुझे देखने के लिये लोग आते थे और बाद में मेरे गाने में खो जाते थे।” मी आगाऊपणे त्यांच्या सौंदर्याबद्दल विचारलं, “तुम्ही इतक्या सुंदर दिसता. कोणती कोणती क्रीम लावता? कोणती काळजी घेता?” दीदी मोकळेपणाने हसल्या, म्हणाल्या, “बेटा, मी कोणतंही क्रीम लावत नाही की कसलीही काळजी घेत नाही. अल्लाह ने मला जशी घडवली तशीच मी राहते. गाण्याच्या आधी हलकासा मेक अप करते, बस! तशी माझी आई, मारूफा बेगम ही इराणी आहे, तिच्यातलं सौंदर्य मला वारसाहक्कानं मिळालं इतकंच.”

दीदींचे वडील जनाब इकरामुल माजिद हे शास्त्रीय संगीताचे जाणकार होते, ते स्वत: उत्तम गात असत. (रविकाकाची व इकरामुल साहेबांची आधी जान पहेचान झाली व मग दीदींबरोबर त्याचा स्नेह जडला.) गोहाती रेडिओवरचा पहिला शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम त्यांच्या गायनाचा होता. दीदींच्या जन्मापूर्वी त्यांनी पत्नीला उत्तमोत्तम शास्त्रीय संगीत, लोकसंगीत ऐकवलं होतं. अभिमन्यूप्रमाणे दीदींना गर्भातच संगीत मिळालं. पण त्या अभिमन्यूच्या थोडं पुढे गेल्या. त्याला चक्रव्यूह भेदता आला नाही, दीदींना मात्र संगीतातले नवनवे चक्रव्यूह शोधून भेदता आले, व त्यातून त्यांच्या संगीताचा विलोभनीय व्यूह तयार झाला. दीदींचं गाणं ऐकताना मला, एक सामान्य रसिक म्हणून कोडी पडत नाहीत. त्या गाताना रसिकाला सोबत घेऊन जातात, रसिकाला त्या गाणं ऐकायला शिकवतात आणि कोडीही सोडवून देतात. गाताना त्या स्वरांची अशी काही रचना करतात की जाणत्या ऐकणाऱ्याला वाटावं की आता या कोठे जाणार? कशा जाणार? आणि त्या सर्रकन समेवर येतात. गाताना त्या प्रत्येक वेळी, प्रत्येक रागाची नवनवी क्षितिजं शोधायला सुरुवात करतात, त्या स्वराकाशातलं एकेक नक्षत्र सहजपणे करतलावर घेतात आणि तितक्याच सहजतेनं रसिकांसमोर अलवार तरलतेनं पेश करतात. मी त्यांची ‘भवानी दयानी’ किती वेळा ऐकली असेल, याची गणना नाही. पण सीडीवर ती ऐकत असताना किंवा कित्येक मैफिलीचा समारोप ऐकताना तिचा प्रत्यय वेगळाच येतो. आपण देवीच्या त्या निराकार रूपाला साक्षात होताना बघत असतो, ‘भवानी दयानी’ ऐकताना दीदींच्या प्रत्येक आर्त स्वरागणिक रसिक स्वत:च्या आत आत जातो, स्वत:त दडलेल्या त्या आत्मरूपाचा साक्षात्कार त्याला घडतो आणि नकळतपणे त्याच्या डोळ्यांतून पाणी झरायला लागतं.

त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो. ईद, रमज़ानच्या निमित्ताने आमचा फोन जातो. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आई-बाबांना नमस्कार केल्यानंतर मी दीदींना फोन करून त्यांचे आशीर्वाद घेतो. त्यांनी फोन उचलला की पहिलं वाक्य “कैसे हो आप सब लोग?” असं असतं. त्या जसं मला फोन करतात, तसाच त्यांची काही कामे सांभाळणाऱ्या आमच्या प्रदीप गोगटेलाही त्यांचा स्वतंत्र फोन जातो. मध्यंतरी काही कामामुळे तो त्यांच्याकडे जाऊ शकला नाही, तर त्यांनी मलाच फोन करून प्रदीपची चौकशी केली. हे सौहार्द फार क्वचित अनुभवायला मिळतं. माझी आई अर्धांगवायूने आजारी पडल्यावर त्यांच्या फोनवरून होणाऱ्या चौकशीतलं पहिलं वाक्य बदललं, “माँ कैसी है? उनका ख़याल रखना.” आत्ता कोविड-१९ च्या महामारीत, त्यांचा पंधरा दिवसांतून चौकशी करणारा फोन हा येणारच. हा फक्त माझा अनुभव असेल असं नाही, त्यांच्या संपर्कात असणार्‍या प्रत्येक व्यक्तीविषयी, भारतातील आजच्या सर्वश्रेष्ठ अशा शास्त्रीय गायन करणाऱ्या गायिकेला काळजी असेल. आमचे शांताराम जाधव अनेक वर्ष दीदींना हार्मोनियमवर साथ करायचे, त्यांच्या कुटुंबियांची त्या रविकाका किंवा माझ्याजवळ चौकशी करायच्या. खांसाहेबांचे शिष्य जाईल काका व विद्याकाकू यांच्यावर त्यांचं विलक्षण प्रेम आहे. जाईलकाकांनी वांगणीला संगीत विद्यालय सुरू केलं, त्यावेळी त्या तशा आडगावात दीदी आणि खांसाहेब त्यांना शुभाशीर्वाद द्यायला आले होते. त्यांच्या घरी गुरुकुल पद्धतीनं काही विद्यार्थी मध्यंतरी राहात असत. त्यांना दीदी, शादाबप्रमाणेच वागवत असत. त्यांना कधीही आपण दुसऱ्याच्या घरी आहोत असं वाटलं नाही. एक संपूर्ण माणूस बघायचा असेल, तर मी नि:संदिग्धपणे दीदींचं नाव घेईन.

तुम्ही त्यांना भेटता तेव्हा तुमच्यावर असलेलं दडपण त्या सहजपणे हलकं करतात. माझा मावसभाऊ संतोष जोशी हा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करतो. त्याची पार्टनर प्रियांका साठे आणि ‘सूरश्री’चा अभिजित सावंत हे कल्पक कार्यक्रम करतात. ‘An Evening with an Artist’ हा एक कार्यक्रम ते करतात. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अर्ध्या भागात कलाकाराची मुलाखत असते आणि अर्ध्या भागात त्यांचं एकल सादरीकरण असतं. त्या कार्यक्रम मालिकेत त्यांना दीदींचा कार्यक्रम हवा होता. तिघांना घेऊन मी दीदींकडे गेलो. व्यवस्थित वेळ ठरवली होती. हे तिघेही शाकाहारी आहेत, याची माहिती दीदींनी माझ्याकडून घेऊन ठेवली होती. दीदींनी मस्तपैकी मटार टिक्की, व्हेज कबाब स्वत: केले होते आणि बंगाली मिठाई आणून ठेवली होती. आमची प्रियांका छान दिसते आणि तिनं दीदींना भेटायचं म्हणून खास वेशभूषा केली होती. तिचं भरपूर कौतुक करून इव्हेंट मॅनेजमेंट ती करते म्हणून तिला शाबासकी दिली. मग संतोष आणि अभिजितनं दीदींना विचारलं, “तुमची मुलाखत कोणी घेतली तर आवडेल तुम्हाला?” दीदी क्षणात म्हणाल्या, “बॉबी इंटरव्ह्यू लेगा। वो मुझे जानता है, लिखता भी है और प्रोफेसर है। घर का बच्चा है।” मी उडालो. लगेच म्हणालो, “ते शक्य नाही.” दीदी म्हणाल्या, “मैंने बोल दिया बस।” दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातल्या त्या मुलाखतीपूर्वी माझी हवा गुल होतीपण दीदींनी मला सांभाळून घेत छान मुलाखत दिली. कार्यक्रम तुफान रंगला.

त्या रात्री शास्त्रीय गायनानंतर ‘हमें तुमसे प्यार कितना’ त्या गायल्या. ते सुरू करण्यापूर्वी त्यांनी सर्व आयोजकांना विंगतून समोर प्रेक्षकांत येऊन बसायला सांगितलं. ते गाणं ‘मिश्र भैरवी’वर आधारित होतं. ते संपल्यावर प्रेक्षकांना वाटलं आता कार्यक्रम संपला. लोकांत चुळबूळ झाली, ते उठायला लागले. परवीन दीदींनी शुद्ध मराठी भाषेत उठलेल्या मंडळींना विचारलं, “एव्हढ्यात चाललात? ‘भवानी दयानी’ नाही ऐकायचं?” नंतर त्या मोजून साडे पाच मिनिटं गायल्या. पण, त्यावेळची ‘भवानी दयानी’ काही वेगळीच झाली. थिएटर हाऊस पॅक होतं. कार्यक्रम संपल्यावर पुढे पाच मिनिटं टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. आमच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर झरत होता आणि त्या प्रसन्नपणे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सभोवार विहरणाऱ्या स्वरलहरींना स्वत:त सामावून घेत होत्या आणि हळूवारपणे नतमस्तक होत होत्या.


`वलयांकितांच्या सहवासात’ या लेखमालिकेतील हा लेख, `मराठीसृष्टी डॉट कॉम` (www.marathisrushti.com) या वेबपोर्टलवर दिनांक २५ मे २०२० रोजी प्रथम प्रकाशित झाला. लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणतीही काटछाट न करता, लेखकाच्या नावासहित शेवटपर्यंत शेअर करावा… 


— डॉ. नीतिन दत्तात्रेय आरेकर
nitinarekar@gmail.com
880 555 0088
www.marathisrushti.com 

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 17 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..