नवीन लेखन...

वैभव संपन्न आपलं घर

नावडकर आर्ट्स म्हणजे नाटक व चित्रपटांच्या जाहिरातीच करणारी जोडगोळी, अशीच आमची ओळख झालेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे. एक कुरळ्या केसांना भांग पाडलेला तरुण, चेक्सचा हाफ शर्ट व डार्क कलरची पॅन्ट आणि पायात कोल्हापुरी चपला घालून ऑफिसमध्ये आला. त्याला एका नाटकाची जाहिरात करुन घ्यायची होती. आम्ही मागणीनुसार ती तयार केली व त्याच्या हातात दुसऱ्या दिवशी दिली. त्याने किती पैसे द्यायचे विचारल्यावर आम्ही एक रक्कम सांगितली. त्यावर तो म्हणाला, ‘सर, तुम्ही जाहिरातीचे पैसे फार कमी घेताय. एक तर मी तुमच्या कलेची किंमत करु शकत नाही, ती कितीही केली तरी कमीच होईल.’ असे म्हणत त्या तरुणाने मागितलेल्या रकमेत शंभर रुपयांची भर घालून ती हातात दिली. ती व्यक्ती म्हणजेच समाजसेवेचे व्रत घेतलेलं ‘आपलं घर’चं ‘आपलं माणूस’ आदरणीय विजयजी फळणीकर!
नागपूरहून एक माणूस पुण्यात येतो काय आणि काही वर्षांतच समाजसेवेचा एक ‘भव्य आदर्श’ उभा करतो काय, ही एक काल्पनिक कथा नसून कारूण्यमय संघर्षाची सत्यकथा आहे.
एखाद्या चित्रपटाचीच कथा वाटावी असंच विजयच्या जीवन प्रवासात घडत गेलं. पाच भावंडांमध्ये विजय दुसऱ्या नंबरचा. वडिलांचं दागिने घडविण्याचं दुकान. आजोबा, आत्या, आई आणि ही भावंडं. सगळं काही सुरळीत चालू असताना या कुटुंबाच्या सुखाला नियतीची नजर लागली आणि वडिलांच्या अचानक मृत्यूने परिस्थिती खालावली. देणेकऱ्यांनी दे माय धरणी ठाय करुन या कुटुंबाला मालकीच्या घरातून भाड्याने पत्र्याच्या घरात रहायला भाग पाडले. विपन्नावस्थेत अवघ्या सात वर्षांच्या विजयने आई बरोबर चार घरी जाऊन भांडी धुण्याच्या कामाला मदत केली. वडिलांच्या अचानक जाण्याचा धक्का बसून आजोबांची तर दृष्टीच गेली. आई व आत्याच्या तुटपुंज्या कमाईवर घर चालू राहिलं.
घरखर्चाला हातभार लावण्यासाठी विजय भजनी मंडळासाठी तबला, पेटी, टाळ यांचे अवजड पोते भजनाच्या ठिकाणी पोहोचविण्याचे जिकीरीचे काम करु लागला. भजन सुरु झाले की, हा बाजूला झोपी जायचा‌. त्यातील पेटी वाजविण्याची सुप्त इच्छा अनावर झाल्याने एका मित्राच्या घरी अडगळीत पडलेली पेटी त्याने मागून घेतली. तिची दुरुस्ती करण्यासाठी वणवण भटकला. दुरुस्ती करणाऱ्याने खूप मनस्ताप देऊन एकदाची पेटी दिली. घरी आणल्यावर घरातूनही विरोध झाला. रागाच्या भरात मोठ्या भावाने ती भिरकावून दिली. पुन्हा ती बिघडली. विजयने आपल्या कुवतीनुसार पुन्हा तिला पूर्वस्थितीत आणली व स्वरसाधना सुरु केली.
दरम्यान मामा विजयला शिक्षणासाठी त्याच्याबरोबर घेऊन गेला, मात्र तिथे मन न रमल्याने विजय घरी पळून आला. मुंबईला जाण्याची स्वप्नं रंगवू लागला. घर सोडताना बरोबर घेतलेली गजानन महाराजांची पितळी मूर्ती विकून वाटखर्चीसाठी पैसे उभे केले. रेल्वेच्या प्रवासात टीसीचे फटके खाऊन, नजर चुकवून मुंबईत दादरला उतरला.
चर्नी रोडच्या चौपाटीवर भेळपुरीच्या गाडीवरील प्लेट साफ करुन उपजीविका सुरू केली. त्या मालकानं सोबत घरी नेल्यावर त्याच्या अघोऱ्या बळजबरीचा आघात सहन न झाल्याने मध्यरात्रीच तो बाहेर पडला. मुंबापुरी देवीमंदिराच्या बाहेर मिळणाऱ्या अन्नदानावर दिवस काढले. डोक्यावर केस वाढलेले, कमरेला विटकी विजार अशा अवस्थेतील विजयला एका माणसाने माटुंगा पोलीस चौकीत नेले. कायदेशीर बाबी पूर्ण करुन डोंगरी तुरुंगातील बालसुधारगृहात ठेवले.
आयुष्याच्या वळणावर भेटलेल्या या बालसुधारगृहाच्या यशवंत काळेंनी विजयमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. त्याच्या सुप्त कलागुणांना वाव दिला. त्याच्यावर उत्तम संस्कार केले. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. काळे साहेबांनी नियमानुसार बालसुधारगृहातून विजयला पुन्हा नागपूरला नेऊन सोडले.
विजयची शाळा सुरू झाली. घरखर्चाचा वाटा उचलावा म्हणून तो राजगिऱ्याचे लाडू विकू लागला. आता तो पेटी वाजविण्यात पारंगत झाल्याने भजनी मंडळात जाऊन साथ करु लागला. त्याचे पैसेही मिळू लागले. दिवसा घड्याळाच्या दुकानात काम करुन रात्रीच्या शाळेत शिकू लागला. वृद्धत्वाने आजोबांची घटका भरली, त्यांनी विजयला गजानन महाराजांची पोथी ऐकवण्याची इच्छा दर्शवली. विजयने पोथी ऐकवली व आजोबांनी प्राण सोडला. घडाळ्याच्या दुकानदाराशी न पटल्याने ती नोकरी सोडून त्याने कपड्यांच्या दुकानात काम सुरू केले.
दहावीत असताना ‘महाविदर्भ’ दैनिकाचे काम केले. नागपूर दूरदर्शन सुरु झाल्यावर तिथे सांस्कृतिक कामासाठी प्रयत्न केला. तोच अनुभव पुढे बालचित्रवाणीसाठी उपयोगी ठरला. ‘महाविदर्भा’ची नोकरी असतानाच लग्नासाठी स्थळ पाहिले. ते नक्की केल्यानंतर काही दिवसांतच हातची नोकरी गेल्याने मुलीकडून नकार आला.
खटपट करुन विजयने स्वतःचे झेराॅक्सचे दुकान थाटले. दुकानाचा जम बसल्यावर त्या स्थळाने पुन्हा लग्नाचा आग्रह धरला. साध्या पद्धतीने लग्न पार पडलं. पत्नी साधनाने शिक्षण पूर्ण करण्यासाठी काॅलेजला जाणं सुरु केलं. काही महिन्यांतच विजयला बापाची भूमिका पार पाडण्याची चाहूल लागल्याने साधनाचं शिक्षण थांबलं. यथावकाश विजयला पुत्ररत्न झाल्याची बातमी समजली. काही दिवसांतच मुलाच्या पायगुणाने बालचित्रवाणीने विजयला मुलाखतीसाठी बोलावून घेतलं.
नोकरी मिळाल्यावर साधना व वैभवसह विजय पुण्यात आला. नोकरी आणि घर सांभाळून नवा संसार सुरू झाला. कामावर असताना एका सहकाऱ्याने आईवरुन शिवी दिल्याने विजयला राग आवरता आला नाही. झटापटीत त्या माणसाच्या डोळ्याला जखम झाली. डाॅक्टरी खर्च व भरपाईचा आर्थिक फटका बसला.
नाट्य निर्मितीच्या मोहापायी ‘आकांत’ नावाचे नाटक रंगभूमीवर आणले. अंदाजापेक्षा दुप्पट खर्च झाला. अपयशाने लाखांमध्ये कर्ज झाले. तीन जण वसूलीसाठी नोकरीच्या ठिकाणी येऊ लागले. अशावेळी कर्णाच्या औदार्याचे लाहोटीकाका मदतीला पाठीशी उभे राहिले. एकरकमी देणी फेडून विजयला चिंतामुक्त केले.
नोकरी चालू असतानाच विजयने समारंभासाठी सेट उभे करण्याचे काम सुरु केले. अनेक धनिकांची अशी मनपसंत कामे केल्याने लाहोटीकाकांचे पैसे अल्पावधीतच फेडले. आता सुख व संपन्नता आली. पैसा, संपत्ती, ऐश्र्वर्य हात जोडून उभं होतं.
एका ठिकाणी कामानिमित्ताने कारने जाताना विजयला कडाडून भूक लागली. संध्याकाळची वेळ होती. रस्त्याला चिटपाखरूही नव्हतं. खिशात पैसे होते, पण ते भूक थोडीच भागवणार होते? विजयला लांबवर दिव्याचा उजेड दिसला. जवळ गेल्यावर पाहिलं तर तो पोहे तयार करण्याचा कारखाना होता. विजय आत गेला व तिथल्या माणसाला विचारले, ‘काही खायला मिळेल का?’ त्याने विजयला खाण्यासाठी पोहे दिले. ते पोहे खाऊनच विजयला भूक भागवावी लागली. तिथे पैशाची मर्यादा विजयला जाणवली.
२००१ सालातील ऑक्टोबर महिना. दसरा सण साजरा झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून वैभव आजारी पडला. आधी साधारण वाटणाऱ्या आजाराने रौद्ररूप धारण केले. डाॅक्टरांनी आजाराची स्पष्ट कल्पना दिली आणि दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. सगळीकडे धावाधाव केली अखेर नियतीने डाव साधला. १८ नोव्हेंबरला वैभवने हे जग सोडले.
त्यानंतर गोंदियाला एका समारंभात गेल्यावर एका स्त्रीने विजयच्या पत्नीचा अपमान केला व म्हणाली, ‘निपुत्रिक रहाण्यापेक्षा एखाद्या मुलाला दत्तक घ्या.’ तोच विचार विजयने अंमलात आणायचं ठरवलं आणि आज अडतीस मुलं व सोळा आजी-आजोबांचा तो पिता झालाय.
यासाठी विजयला खूप दिव्यातून जावं लागलं. पहिल्यांदा वैभवच्या विम्याच्या आलेल्या रकमेतून अॅम्ब्युलन्स घ्यायचं ठरवलं. ती रक्कम कमी पडत होती म्हणून सुरेश वाडकरांनी ‘सूरमयी शाम’ हा कार्यक्रम केला. अॅम्ब्युलन्सला दिवसपाळीसाठी ड्रायव्हर मिळाला, पण रात्रीचं काय? प्रसंगी रात्री विजयने फोन घेऊन अॅम्ब्युलन्सची सेवा पुरवली. अशा प्रसंगी माणसांचे मुखवटे आणि त्यामागचे खरे चेहरे त्याने अनुभवले.
‘आपलं घर’ हा अनाथाश्रम सुरु करण्यासाठी विश्वस्तांचा विरोध सहन करावा लागला. पटेलांच्या मदतीने जागा मिळाली. भूमीपूजनाला सुरेश वाडकर आवर्जून आले. उदघाटनाला यशवंत काळे गुरूजी आले. चौदा मुलांच्या प्रवेशानंतर ‘आपलं घर’ सुरु झालं.
काही महिन्यांतच त्या घरातल्या मालकाने ‘घर खाली करा किंवा विकत घ्या’ असा इशारा दिला. पुन्हा धावपळ करुन विजयने दानशूरांकडून ती रक्कम उभी केली. घर मालकीचं झालं.
‘आपलं घर’ ला मदत करणारे देणगीदार कधी चेकने तर कधी धान्य स्वरुपात सहाय्य करीत. सकाळी बाहेर पडताना बरोबर घेतलेल्या मोठ्या रिकाम्या पिशव्या घरी परतताना किराणा सामानाने भरलेल्या असत. त्यातही विजयला धडा शिकविणारे अनुभव आले. एका गृहस्थाने दुपारी १२ वाजता या, धान्य देतो असे बजावले. तिथे पोहोचायला उशीर झाल्याने त्या गृहस्थाने धान्य देण्यास स्पष्ट नकार दिला. एका देणगीदाराने ‘मला दहा रुपये देणगी द्यायची आहे, ती घेण्यासाठी तुम्ही घरी या’ असा फोन केला. विजय तिथे गेला. पाकीट घेऊन उघडू लागला तेव्हा त्या गृहस्थाने ‘तुम्ही घरी गेल्यावर पाकीट उघडा’ असे बजावले. घरी आल्यावर पाकीट उघडलं तर आतमध्ये दहा हजारांचा चेक होता! पै नावाच्या त्या देणगीदाराने विजयची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत विजय पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. आता दरवर्षी पै काकांचा दहा हजारांचा चेक ‘आपलं घर’ ला नियमित मिळतो आहे.
‘आपलं घर’ मधील मुलांना विजयने विमान प्रवासाची देखील सफर घडवली आहे. ‘लिटील चॅम्प्स’ कार्यक्रमात सहभागी करुन चंदेरी दुनियेची झलक दाखवली आहे. या मुलांच्या समाधानातच त्या दोघांनी आपले सुख अनुभवले आहे.
डोणजे येथील जागा घेताना राऊत यांच्याशी संपर्क आला. आधी नकार देणारे राऊत नंतर तयार झाले. त्यांनी मागितलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम देऊन व्यवहार पूर्ण केला. जागेचा उद्देश लक्षात घेऊन राऊतांनीही स्वतःहून अधिक जागा विनामूल्य दिली.
डोणजेला जाताना वाटेत भेटणाऱ्या रखवालदार आजी विजयला न चुकता वानवळा देत असत. तसेच आपल्या कुटुंबासह आलेले एक गृहस्थ, गेलेल्या पत्नीच्या इच्छेनुसार तिच्या पाटल्या मोडून आलेले पैसे थरथरत्या हाताने देताना विजयला भावुक करुन गेले.
विजयच्या या सामाजिक सेवेची अनेक संस्थांनी दखल घेतली आहे. या अलौकिक कार्याबद्दल अनेक मान्यवर संस्थांनी राजकीय, सिने व क्रिडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या हस्ते सत्कार, पुरस्कार, सन्मान दिले.
आज दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी व वैशाली सामंत या ‘आपलं घर’ च्या मानद सभासद आहेत. त्यांच्या सांगण्यावरून अनेक देणगीदारांनी या कार्यास हातभार लावलेला आहे.
मला आनंद याचा वाटतो की, या जगावेगळ्या माणसाचा काही वर्षे का होईना सहवास आम्हाला लाभला. नाटकाच्या निमित्तानं भेटलो. एका लोकनाट्याचे फोटो काढून डिझाईन्स केली. वाळवेकर लाॅन्सवर भव्य सेट उभा केला होता तेव्हा मी फोटो काढायला होतो. महागॅसच्या जाहिरातीचे प्रशांत दामले समवेत चित्रीकरण करताना मी स्टील्स काढले होते. बालचित्रवाणीला भेट दिली होती. अनेक छोटी मोठी कामं केली होती. दादा कोंडकेंच्या ‘वाजवू का’ चित्रपटाच्या शुटींगला विजयजी संपर्कात होते. मध्यंतरी बरीच वर्षं निघून गेली. क्वचितच भेट होऊ लागली. एकोणीस वर्षांनंतर ‘पराजय नव्हे विजय’ वाचनात आलं आणि विजयजींची एका वेगळ्या दृष्टिकोनातून ओळख घडली. मी स्वतःला धन्य समजतो की, विजयजींच्या रुपाने मला अजून एक बंधू लाभला!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१६-११-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..