नवीन लेखन...

वडापाव

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महात्मा गांधींनी म्हटलं होतं, ‘परमेश्वराला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यायचा असेल, तर तो भाकरीच्याच रुपाने घ्यावा लागेल!’ आता ऐंशी वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे, आता भाकरी ही भुकेल्याला जीवनावश्यक असली तरी तिची जागा आता ‘वडापाव’ने बळकावली आहे. कारण भुकेल्याला तात्पुरती भूक भागविण्यासाठी वडापाव सर्वत्र उपलब्ध आहे…

‘वडापाव’चा जन्म १९६६ साली झाला असं मानलं जातं. तेव्हा उकडलेल्या बटाट्याच्या भाजीचा गोळा, बेसनाच्या पीठात घोळवून तळलेला वडा एवढीच कृती होती. मुंबईतील मामा काणेंसारख्या मराठी उपहारगृहांतून हा बटाटेवडा मिळत असे. दाक्षिणात्य इडली, डोशाला टक्कर देणारा हा ‘एकमेव मराठी पदार्थ’ लवकरच लोकप्रिय झाला. त्याला नक्की पाव कधी येऊन चिकटला त्याची नोंद उपलब्ध नाहीये.

१९७० नंतर मुंबईतील गिरण्यांच्या संप झाल्यानंतर अनेक गिरणी कामगार बेरोजगार झाले. पोटापाण्यासाठी त्यांनी वडापावच्या गाड्या लावायला सुरुवात केली. मुंबईतील सर्वसामान्य माणसाला परवडणारा हा ‘वडापाव’ वेळीअवेळी त्याची एकवेळची भूक भागवू लागला.

१९७६ साली मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो, तेव्हा रेल्वे स्टेशनवर, रस्त्याच्या काॅर्नरवर, चौपाटीवर असंख्य वडापाववाले दिसले. मुंबईला जाताना कर्जतचा वडापाव खाल्ल्याशिवाय प्रवासाला मजा येत नाही. त्यांची चव वेगळीच आहे. मुंबईच्या वडापाव मधील वडा हा गोलाकार लाडू सारखा असतो. सोबत लाल तिखट दिले जाते.

मुंबईबरोबरच वडापाव पुण्यातही येऊन धडकला. पुणेकर फारच चोखंदळ. त्यांनी आधी तो पाहिला, खाऊन त्याची चव अनुभवली व नंतर अक्षरशः त्याला ‘डोक्यावर’ घेतले. आज पन्नास वर्षांनंतर पुण्यातील वडापावने जेवढी क्रांती केली आहे, तेवढी कोणत्याही महाराष्ट्रीयन पदार्थाने केलेली नाही. गेली कित्येक वर्षे फक्त महाराष्ट्रीयनच नव्हे तर पक्के पुणेकर ‘जोशी वडेवाले’ यांनी वडापाव व्यवसायात उच्चांक गाठला आहे. त्यांच्या शहरात, हायवेवर असंख्य शाखा आहेत. जोशांना खरोखरच वडापावने ‘हात’ दिलाय.

जोशांच्या पावलावर पाऊल टाकून अनेकजण या व्यवसायात आले. ज्यांना ‘चव’ जमली ते टिकून राहिले. रोहित वडेवाले, एस कुमार वडेवाले, धोंडू पाटील वडेवाले, अशी कितीतरी नावं या व्यवसायात पुणेकरांचे चोचले पुरवित आहेत. सध्या ‘एस कुमार वडेवाले’ यांच्या गल्लोगल्ली शाखा दिसतात. त्यांचा जम्बो वडापाव वीस रुपयांत मिळतो आणि तो पुरेपूर आपली भूक भागवतो. वड्याप्रमाणेच त्यांचा पाव देखील जम्बोच असतो.

बालगंधर्व रंगमंदिरात नाटक पहायला गेलं की, मध्यंतरात कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या वडापाव वर प्रेक्षकांची झुंबड उडायची. गरमागरम वडापाव खाल्ला की, चहा पिण्याशिवाय आत्मा शांत होत नसे. हीच परिस्थिती भरत नाट्य मंदिर, टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, इ. ठिकाणी असायची.

चित्रपटाच्या थिएटरमध्ये देखील वडापाव तर असायचाच शिवाय त्याला ‘सवत’ म्हणून सामोसे, पाॅपकाॅर्न जोडीला उभे असायचे. सार्वजनिक बागेत पूर्वी भेळीला महत्त्व होते, आता ती जागा वडापावने घेतली आहे. तीस वर्षांपूर्वी सारसबागेत निवांत बसायला गेलं की, एखादी काकू मोठ्या पिशवीतून आणलेल्या डब्यातून वडापाव घेऊन जवळ येऊन विचारायची, ‘गरम वडापाव घेता का?’ तिच्याकडे पाहून ‘नको’ म्हणणे जीवावर यायचे.

पुण्यामध्ये काही ठिकाणी खास चवीचे वडापाव मिळतात. सहकार नगरला आपण ऑर्डर दिल्यानंतरच गरमागरम बटाटेवडे मिळतात, पावासह किंवा तसेच खाण्यासाठी चोखंदळ ग्राहक तिथे उभे असतात. शनिवार वाड्याजवळ तपकीर गल्लीत असाच चवदार वडापाव मिळतो. जेवढे तिथे उभे राहून खाणारे असतात तेवढेच पार्सलसाठी उभे राहतात. त्यांचीच एक शाखा रमण बागेच्या खालच्या चौकात सुरु झालेली आहे. बालगंधर्वकडे जाताना पुलाच्या शेवटी खत्री यांची वडापावची गाडी असते. घरातीलच चार पाचजण दुपारी गाडी लावतात. वड्याच्या भरलेल्या पराती रात्री नऊपर्यंत सतत रिकाम्या होत राहतात. आमचे कविमित्र प्रकाश घोडके यांच्या खास आवडीचा वडापाव इथे मिळतो. काही वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनी जवळ पाच रुपयांत वडापाव मिळत असे. वडा भजीच्या आकाराचा व पावही छोटाच. विद्यार्थी वर्गाची तिथे नेहमीच गर्दी दिसायची. नंतर त्याने वडापाव आठ रुपयाला केला. दोन घेतले तर पंधरा रुपये. तीन घेणार असाल तर फक्त वीस रुपये. काही महिन्यांपूर्वी ते वडापावचं दुकान बंद झालं.

शहराबरोबरच खेड्यातही वडापाव सर्वांना आवडू लागला. आठवड्याच्या बाजारात वडापावची दुकानं थाटली जाऊ लागली. काहींनी ‘फौजी वडापाव’ नावाची हाॅटेलं सुरू केली. सातारा शहरात पोवई नाक्यावर व एसटी स्टँडवर दहा रुपयांत तीन वडापाव मिळू लागले.

वडापाव हा पदार्थ सहसा सकाळी कोणीही खात नाही. दुपारी किंवा संध्याकाळी भूक लागल्यावर त्याची आठवण येते. एखाद्या आॅफिसमध्ये किंवा दुकानात जादा काम असेल अथवा उशीर पर्यंत थांबून काम उरकायचे असेल तर मालक आपल्या कामगारांसाठी ‘वडापाव’च मागवतो. दुसऱ्या खर्चिक खाण्यापेक्षा दोन वडापाव खाऊन भूक भागते. या वडापाव मुळे सर्वांची आवडती ‘खेकडा भजी’ फक्त पावसाळ्यातच आठवते. वीस वर्षांपूर्वी आम्ही मित्रमंडळी लोणावळ्याला भुशी डॅमवर गेलो होतो तेव्हा भर पावसात आडोशाला उभं राहून गरमागरम वडापाव खाण्याचा ब्रह्मानंद अनुभवलेला आहे.

आताच्या खाद्यस्पर्धेत वडापाव बरोबर कच्छी दाबेली, शेवपाव, पावपॅटीस, बर्गर, सॅण्डविच, पाणीपुरी, सामोसे, कचोरी, डाळवडा असे कितीतरी पदार्थ असले तरी ‘वडापाव’ची बरोबरी कोणीही करु शकत नाही, हेच खरं!!!

© सुरेश नावडकर.

मोबाईल ९७३००३४२८४

२५-११-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..