नवीन लेखन...

ट्रेक ऑन

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ऋतू असो कोणताही
तोचि स्वर्ग अखंड स्वराज्याचे
शिल्पकार सोबत करिती
अजुनी माणूस घडण्यासाठी ।।

ट्रेकिंगचा उगम हा महाराष्ट्रातील दख्खन भागात झाला म्हणणे वावगे ठरणार नाही. ट्रेकिंगची नाळ ही पायवाटांपासून शिखरावर, डोंगरावर, टेकडीवर, गडांवर, किल्ल्यांवर आणि हिमालयात अनेक मार्गांवर संपते. ती जरी तेथे संपत असली तरी त्याची पूर्णता ही मनातल्या समाधानावर अवलंबून असते हेही तितकेच खरे आहे. ट्रेकिंगला जाणे म्हणजे केवळ गडकिल्ल्यांवर जाणे नव्हे. पण ट्रेकिंग ह्या क्षेत्राचा कणा हे गडकिल्ले आहेत ह्यात कोणाचेही दुमत होणार नाही, ह्याची मला खात्री आहे.

स्वत:चा विकास करून घ्यायचा तर ट्रेकिंगसारखी दुसरी गोष्ट सापडणार नाही. time management पासून तर स्वावलंबीपणा, आत्मविश्वास, मनोबल, शिस्तबद्धपणा पक्के करण्यासाठी ट्रेकिंग फार उपयुक्त आहे. स्वत:चे सामान स्वत:च्या पाठीवर घेतले की, आपोआप गरज नसलेल्या गोष्टी सॅकमधून बाहेर येतात आणि वजन हलके होते. कुठे जायचे हे ठरवताना भूगोल, इतिहास, वर्तमान तसेच आपल्या विकासाचा अभ्यास पक्का होतो. सरकारी गाडी व्यवस्थापन आजमावले की, गणित पक्के होते. वाटेतली गावे ओळखीची होतात, अनेक माणसे भेटतात. संपर्क वाढतो. त्यातून संवाद साधण्याची कला दृढ होते. संध्याकाळी शेवटची बस अमुक वाजता आहे आणि ती आपल्याला पकडायची आहे, हे ध्यानी असले की, पावले पटापट पडतात आणि चालण्याची सवय लागते. किल्ला किंवा घाटमार्ग असेल तर आजूबाजूचा निसर्ग, त्यात उमलणारी फुले, वनस्पती ह्यांची माहिती होते. गडावरची वास्तू, बुरूज, तटबंदी पाहिली की, त्याकाळच्या इंजिनीअर्सची प्रगल्भता अन् चातुर्य लक्षात येते. तसेच बुद्धीला चालना मिळते. कोणत्या ऋतूत काय खावे, काय खाऊ नये ह्याची माहिती मिळते. गावागावात ओळख वाढते. माणुसकीचे खरे दर्शन तेथे होते आणि एक चांगला माणूस म्हणून घडण्यात मोलाचा वाटा येथे मिळतो. गडावरील शुद्ध पाणी प्यायल्याने पोट चांगले राहते. गडावर चूल लावताना, वारा-अंधार-धूर-दगड ह्यांची युती करताना डोके हजार मार्गाने विचार करू लागते आणि समय-सूचकता, समोर असलेल्या संधीचा योग्य उपयोग करण्याची आवड आणि योग्य संधीची निवड करण्याची दृष्टी मिळते. त्याबरोबरच आपला महत्त्वपूर्ण असा इतिहास परत एकदा जिवंत होतोच, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याने प्रसन्न वाटते आणि मनात नवी उमेद, काही तरी चांगले करण्याची भावना, बळ निर्माण होते.

ह्याबरोबरच आयुष्यात आव्हान पेलण्याची, समारे आलेल्या बिकट प्रसंगाला सामोरे जाण्याची हिंमत मिळते, हे सर्वात महत्त्वाचे.प्रथमोपचार म्हणजे काय हे समजते. थोडक्यात, माणूस म्हणून घडण्यास लागणारे सारे काही ह्या ट्रेकिंगमुळे आपल्याला मिळते.

आता ह्यात जर करिअर करायचे असेल तर मग हे सगळे करायला तयार व्हा. आणि आजच्या नव्या पिढीला ह्याचे वेड कसे लागेल ह्याचा विचार कराच.

सध्याचे बदललेले जग पाहता ट्रेकिंग ह्या विषयात खूप आमूलाग्र बदल झाले आहेत. नवनवीन साधने, प्रकार ट्रेकिंगमध्ये आले आहेत. पण ते सगळे करताना ह्या विषयातले शिक्षण घेणे मात्र आवश्यक आहे. कारण जर साहस करायचे असेल तर त्यातील सारे काही आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. खरे ट्रेकिंग सह्याद्रीच्या दुर्गम वाटा, दुर्गम किल्ले, आडवाटेवरचे किल्ले, दिवसासुद्धा प्रकाश पोहचू न शकणाऱ्या घाटवाटा हे प्रकाशात येणे गरजेचे आहे.

त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या किल्ले हरिहरला आम्ही गेलो होतो. किल्ल्याला भेटण्याची माझी काही पहिली वेळ नव्हती.

त्याआधी मी दोनदा भेट दिली होती. पण नवीन ट्रेकर्सना किल्ला पाहता यावा म्हणून त्यांच्याबरोबर मी गेलो होतो. हरिहर किल्ला त्याच्या कड्यात असलेल्या पायऱ्यांसाठी फार प्रसिद्ध आहे साधारण १०० फूट सरळसोट कड्यात असलेल्या खोदीव पायऱ्या वाऱ्याशी झगडत चढताना-उतरताना खूप आनंद मिळतो. पण त्या दिवशी तो आनंद मिळाला नाही. गडावर चढायला गेलो तसतसे ट्रेकर्सची संख्या खूप असल्याचे जाणवत गेले. त्या दिवशी ३०० ट्रेकर्स होते ! त्यामुळे कड्यातल्या पायऱ्यांच्या दोन्ही तोंडांशी अमाप ट्रॅफिक झाला होता. त्यात सोसाट्याने वाहणारा वारा, हलका सुरू झालेला पाऊस, अरुंद वाटेवर टू वे ट्राफिक… काहीही विपरीत घडू शकले असते. ट्रॅफिक कमी होईपर्यंत दोन तास शांतपणे आम्ही बसून राहिलो.

सांगायचे तात्पर्य असे की, ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा तर ट्रेकिंग म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. एखाद्या ठिकाणापर्यंत बस जाते म्हणजे ट्रेकिंगला जाणे होत नाही. अर्ध्या अर्ध्या दिवसात एखादा गड पाहणे म्हणजे ट्रेकिंग नव्हे. माझ्या पायात किती हजारांचे शूज आहेत ह्यापेक्षा मी किती वेळा पडलो आणि ह्यापुढे मी कशी सावधगिरी बाळगीन हे महत्त्वाचे. माझ्या हातातला कॅमेरा किती महागाचा आहे आणि तिची लेन्स किती स्ट्राँग आहे, ह्यावर भाष्य करण्यापेक्षा माझ्या डोळ्यांची लेन्स ही जगातली सर्वात सुंदर लेन्स असून त्यातून दिसणारा निसर्ग, सूर्यास्त, सूर्योदय, गडाची तटबंदी, गडावरील मंदिरे, हवेत उडणारे पारवे, वाऱ्याने झुलणारे मोठे वृक्ष, आपल्या पूर्वजांनी घडवलेला इतिहास, लेणी, किल्ले, बुरूज, दरवाजे, तलाव, विहिरी, पाण्याची टाकी हे सारे जास्त पक्के आपल्या मनात आणि न पुसल्या जाणाऱ्या आठवणींत कोरले  जाते हे समजणे आवश्यक आहे. climbing, rappeling, valley crossing, flying, fox, कमांडो रॅपलिंगसारखे साहसी खेळ जर करायचे असतील तर ते शिक्षण स्वतः घेणे आवश्यक आहे. ह्याबरोबरच निसर्गाच्या जवळ घेऊन जाणे हा ट्रेकिंगचा खरा हेतू आहे आणि तो साध्य करताना आपण निसर्गाची हानी न करणे हा ट्रेकिंगचा महत्त्वाचा नियम, गडकिल्ले दाखवणे, त्यांची योग्य माहिती देणे, त्यात मग काही साहसी खेळ समाविष्ट करून त्यातून ग्रुप बिल्डिंग करणे, शिवाय लोकांना ट्रेकच्या निमित्ताने आपला इतिहास उलगडून दाखवणे ह्यातून पैसे तर मिळतातच पण मानसिक समाधान जास्त मिळते. करायला खूप पण ते नियमांना धरून केले तर ट्रेकिंगसारखे क्षेत्र नाही.

ट्रेकिंग ह्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर Indian Mountaineering Institute येथे जाऊन प्रवेश घ्यावा. उत्तर काशी (उत्तरांचल) इथली Nehru Institute of Mountaineering ही संस्था असे प्रशिक्षण देते. वयोमर्यादा १८ ते ३५ अशी आहे. सर्वप्रथम बेसिक आणि मग ॲडव्हान्स असे २८-२८ दिवसांचे कोर्सेस पूर्ण करावेत. नंतर रेस्क्यू अँड ऑपरेशन्ससारखे आणखी कस पाहणारे कोर्सेस आहेत. साधारण जुलै, ऑगस्ट ते जानेवारीपर्यंत हे कोर्सेस उपलब्ध असतात. ह्यासाठी बुकिंग दोन महिने आधी करावे लागते. फी साधारण ४० ते ५० हजारापर्यंत असते. २८ दिवसांचा कोर्स पूर्ण करताना शारीरिक कस, मानसिक खंबीरता आणि दृष्टिकोण घट्ट असणे म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्रात भक्कम उभे राहण्याची पहिली पायरी. मग, वाट कसली पाहताय? इतिहास, गड-किल्ले गाजवायचे असतील आणि त्याला ट्रेकिंगची साथ असेल तर लगेच बेसिक कोर्सचे बुकिंग करा.

-सुमंत परचुरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..