नवीन लेखन...

चित्रपटातील पर्यटन

हिंदी चित्रपटसृष्टी आणि सर्वसामान्य प्रेक्षक यांचे अतूट असे नाते आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली आणि आज भारतीय चित्रपटसृष्टीचा महाकाय वटवृक्ष झाला आहे. मराठीसह तामिळ, तेलुगू, कन्नड आदींसह हिंदी चित्रपट मोठ्या संख्येने तयार होत आहेत. एकूणच चित्रपटक्षेत्र हा एक प्रचंड मोठा उद्योग झाला आहे. दर पिढीनुसार हिंदी चित्रपटांचे नायक-नायिका आणि विषय बदलत असले तरीही चित्रपटातील गाणी हा सगळ्यातील समान धागा आहे.

दोन-अडीच तासांच्या हिंदी चित्रपटात प्रेक्षक त्या चित्रपटाशी, त्यातील व्यक्तिरेखांशी समरस होऊन जातो. चित्रपटाचा नायक किंवा नायिका ज्या कुटुंबातील किंवा ज्या परिसरातील दाखविलेले असतात त्या संस्कृतीचे दर्शन आपल्याला चित्रपटातून नेहमीच पाहायला मिळते. पूर्वी बहुतांश चित्रपटातून नायक हा पंजाबी संस्कृतीमधील पाहायला मिळायचा. त्यामुळे पंजाबी संस्कृती पडद्यावर पाहायला मिळायची. अलीकडच्या काही वर्षात नायक-नायिकेची बदललेली कौटुंबिक पार्श्वभूमी पाहायला मिळत आहे. नायक-नायिका मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असतील त्याप्रमाणे त्यांच्या स्वप्नदृश्यात वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचे दर्शन प्रेक्षकांना त्या कमी कालावधीत घडते. हिंदी चित्रपटसृष्टीत आत्तापर्यतचे हिट पर्यटनस्थळ म्हणून काश्मीर, कुलु – मनाली, सिमला, दार्जिलिंग यांना प्राधान्य दिले जात होते. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटांची धावही महाबळेश्वरपर्यंतच मर्यादित होती. हिंदी चित्रपटातील नायक-नायिकांचे स्वप्नदृश्यातील हमखास ठिकाण हे काश्मीरच असायचे. पृथ्वीवरील नंदनवन, स्वर्ग अशी ओळख असलेले काश्मीर रुपेरी पडद्यावर वेगवेगळ्या रूपात आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहे. हसी वादिया, खुला आसमान, बर्फिले पहाड म्हणजे काश्मीर हे चित्र प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर आजही ठसलेले आहे.

बदलती जीवनशैली, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, पैसा, मध्यमवर्गीयांच्या हातात खुळखुळणारा फिरण्यासाठी सहज उपलब्ध असलेली वाहतुकीची विविध साधने आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विविध पर्यटन कंपन्या यामुळे आता भारतातीलच नव्हे तर परदेशातीलही पर्यटन स्थळांचे  सर्वसामान्यांना आता विशेष अप्रूप राहिलेले नाही. सर्वसामान्य नोकरदार आता वर्षातून किंवा दोन वर्षातून किमान एकदा तरी भारतातील पर्यटन स्थळांना सहकुटंब भेट देण्यासाठी जातोच जातो. याआधी रुपेरी पडद्यावर जी पर्यटन स्थळे पाहिली जात होती आता त्याच ठिकाणी प्रेक्षक जात आहे. याला आजही काही अपवाद आहेत. आर्थिक परिस्थितीअभावी परदेशातील सोडाच पण भारतातीलही पर्यटन स्थळांना सहकुटुंब फिरायला जाणे हे परवडू शकत नाही आणि असाही वर्ग खूप मोठा आहे.

हिंदी चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक यांच्यासाठी काश्मीर हे विशेष आवडते ठिकाण होते, आहे आणि यापुढेही राहील. शम्मी कपूरची ‘याहू’ ही आरोळी आणि ‘काश्मीर की कली’ आजच्या पिढीलाही भुरळ घालते. साठ ते नव्वदच्या दशकात हिंदी रुपेरी पडद्यावर काश्मीरचे दर्शन खूप मोठ्या प्रमाणात झाले. ‘रोजा’ चित्रपटातील ‘ये हसी वादिया, ये खुला आसमा’ हे गाणे आजही प्रत्येकाच्या ओठी आहे. शम्मी कपूर, जॉय मुखर्जी, शशी कपूर ते अगदी शाहरुख खान पर्यतचे नायक काश्मीरमध्ये नाचताना पाहायला मिळाले आहेत. ‘मिशन कश्मीर’, ‘लम्हा’, ‘कश्मीर की कली’, ‘रोझा’ आणि इतर अनेक चित्रपट तर काश्मीरच्या पार्श्वभूमीवरच तयार केले गेले होते. काश्मीरमधील परिस्थिती बिघडली तेव्हा पडद्यावर होणारे काश्मीरचे दर्शन काही प्रमाणात कमी झाले.

नव्वदच्या दशकात सगळीकडे जागतिकिकरणाचे वारे वाहायला लागले आणि हिंदी रुपेरी पडद्यावर परदेशातील विविध पर्यटन स्थळांचे दर्शन होऊ लागले.  अर्थात त्याआधीही ‘संगम’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘अराऊंड दी वर्ल्ड ‘इन एट डॉलर्स’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, ‘सिलसिला’ आदी चित्रपटातून स्वित्झर्लंड, लंडन, पॅरिस ते चीन यांचे दर्शन घडले होते. अलीकडच्या काही वर्षात मात्र बहुतांश हिंदी चित्रपटात परदेशी पर्यटन स्थळे आणि तेथील चित्रीकरण हा अपरिहार्य भाग झाला आहे. ‘कहो ना प्यार है’ मध्ये न्यूझिलंड, ‘जिंदगी मिले ना दोबारा’ मध्ये स्पेनची राजधानी बार्सिलोना, ‘एक था टायगर’ मध्ये इंग्लंड, थायलंड, ‘वन्स अपॉन ए मुंबई दोबारा’ मध्ये ओमान, ‘धुम २’ मध्ये ब्राझिल, ‘एजंट विनोद’मध्ये मोरक्को, ‘चांदनी चौक टू चायना’मध्ये चीन, ‘दिलवाले दुल्हनीया ले जाएंगे ‘सह इतर अनेक चित्रपटात परदेशातील ठिकाणे पाहायला मिळाली होती. तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडा, थायलंड, पोर्तुगाल, भूतान, दुबई, श्रीलंका येथीलही ठिकाणे प्रेक्षकांनी पाहिली आहेत.

हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झालेली स्थळे नंतर लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या यादीत समाविष्ट झाल्याचेही दिसून आले आहे. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण त्या पर्यटन स्थळी किंवा परिसरात झालेले नसले तरी चित्रपटातील एखाद्या गाण्याचे किंवा काही दृश्यांचे चित्रीकरण त्या त्या ठिकाणी झाल्यानंतर ती ठिकाणे पाहण्यासाठी प्रेक्षकांचा ओघ तिकडे वळल्याचे चित्र आहे. मग ते वैयक्तिक जाणे असो किंवा एखाद्या पर्यटन कंपनीबरोबर जाणे असो. त्यामुळे नवीन किंवा आहे त्या पर्यटन स्थळांना लोकप्रिय करण्यात हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही मोठे योगदान आहे. ‘रंगीला’, ‘दिल चाहता है’, ‘गोलमाल’, ‘धूम’, ‘हनिमून’ आदी चित्रपटातून गोव्यातील ॲग्वाद किल्ला लोकप्रिय झाला. ‘आप की कसम’, ‘हिना’, ‘ये जवानी है दिवानी’ आदी चित्रपटातून मनाली परिसर आणि तेथील हिडिंबा मंदिर प्रेक्षकांच्या ओळखीचे झाले. ‘जब वुई मेट’, ‘देव डी’, ‘हाय वे’ या चित्रपटातून रोहतांग पास पाहायला मिळाला होता. ‘ये जवानी हे दिवानी’, ‘रास लिला’ आदी चित्रपटातून राजस्थानमधील उदयपूर राजवाडा दिसला होता. तर सिमला येथील मॉल रस्ता ‘जब वुई मेट’, ‘थ्री इडियट’ या चित्रपटातून पाहायला मिळाला होता. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधून मुन्नार दर्शन घडले होते. तर ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातून उटीचे सौंदर्य आणि निसर्ग पाहायला मिळाला होता.

हिंदी रुपेरी पडद्याप्रमाणेच दूरचित्रवाहिन्यांवरील छोटा पडद्यावरही भारतातील विविध स्थळांचे दर्शन घडले आहे. झी मराठीवर सध्या सुरू असलेल्या ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतून राजस्थान पाहायला मिळाले. ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेच्या परदेशात चित्रीत झालेल्या पर्वात परदेशातील प्रसिद्ध ठिकाणांची झलक पाहायला मिळाली होती. ‘काहे दिया परदेस’ या मराठी मालिकेत सुरुवातीच्या काही भागानंतर वाराणसीत कथानक घडलेले दाखविल्यामुळे तो परिसर, तेथील ठिकाणे पाहायला मिळाली होती. हिंदी मालिकांमधून बहुतांश वेळा पंजाबी लोकसंस्कृतीचे चित्रण केलेले असल्यामुळे अमृतसर आणि अन्य महत्वाची ठिकाणे चित्रीकरणाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. ‘इश्क-ए-इश्क’, ‘गुरबानी’, ‘वीरा’ या मालिकेतून पंजाबी संस्कृतीचे दर्शन घडले होते. ‘रंगरसिया’, ‘बालिका वधू’, ‘पहरेदार पिया’ या मालिकांमधून जैसलमेर, जयपूर, राजस्थान पाहायला मिळाले होते. धार्मिक मालिकांच्या निमित्ताने ऋषिकेश, वाराणसी, उत्तराखंड येथील काही ठिकाणे प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळाली.

हिंदी चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे निर्माते, दिग्दर्शक प्रसारित होणाऱ्या मालिकेच्या कथानकात कधी कधी असा काही बदल घडवून आणतात किंवा मालिकेतील मुख्य भूमिका करणाऱ्या पात्रांना काही निमित्ताने भारतातील वेगवेगळ्या राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळी फिरायला गेले आहेत, असेही दाखवले जाते. हा सर्व भाग प्रसिद्ध पर्यटन कंपन्यांकडून प्रायोजितही केला जातो. यातून मुख्य दोन गोष्टी साध्य होतात. मालिकेच्या प्रेक्षकांना घरबसल्या विविध ठिकाणांचे आणि पर्यटन स्थळांचे दर्शन घडते आणि ज्या पर्यटन कंपनीबरोबर मालिकेतील ते कलाकार त्या ठिकाणी गेलेले दाखवितात त्या कंपनीलाही नवे पर्यटक मिळण्यासाठी मदत होते. भारतात गेल्या दहा ते पंधरा वर्षात पर्यटन चांगल्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे त्या त्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी लहान-मोठे व्यवसायही सुरू झाले आहेत. विविध संकेतस्थळे आणि फेसबुक, व्हॉटस अप, इन्स्टाग्राम आणि अन्य समाज माध्यमांचाही पर्यटन स्थळे लोकप्रिय करण्यात मोलाचा वाटा आहे. आपल्या कुटुंबासह किंवा वैयक्तिक केलेली सहल, त्याचे अनुभव, छायाचित्रे समाजमाध्यमावर टाकल्यामुळे इतरांनाही त्या ठिकाणांची सहज माहिती मिळणे सोपे झाले आहे. केंद्रशासनासह भारतातील विविध राज्य शासनांचे पर्यटन विभागही त्यांच्या स्तरावर वेगवेगळे प्रयत्न करत असल्यामुळे आता पर्यटनासाठी लोकही मोठ्या संख्येत बाहेर पडत आहेत. माहितीच्या महाजालामुळे देशातील आणि परदेशातील विविध ठिकाणे, पर्यटन स्थळे एका क्लिकवर आली आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात भारतातील आणि भारतातून परदेशात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निश्चितच वाढ होणार आहे. आणि या पर्यटन वाढीसाठी बॉलिवूड तसेच छोट्या पडद्याचेही महत्त्वाचे योगदान असणार आहे.

-शेखर जोशी

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..