नवीन लेखन...

चमचे

कप बशा स्टॅंडच्या दोन्ही अंगाने चमच्यांच्या रांगा झुलत असतात. यात मोठ्ठ्या चेहऱ्याचे, लांबट उभ्या चेहऱ्याचे, काही वाटोळया तर काही चपट्या तोंडाचे. उंचीही प्रत्येकाची वेगळी. कुणी लंबाडे तर कुणी मध्यम उंचीचे, काही अगदीच बुटुकलेही असतात, पण त्यांची राहण्याची जागा वेगळी असते. छान तेजस्वी बांधेसूद रूप. कुणाचं अंग संपूर्ण नितळ तर कुणाच्या अंगावर बारीक नक्षीकाम.
भातवाढणी, डाव, ओगराळी, उलथनी ही यांच्याच जातीमधली ज्येष्ठ मंडळी या लिंबू टिंबूना आपल्याजवळ फिरकू देत नाहीत. अगदी चुकुन आलाच एखादा, तर ढकलून देतात की काय कोण जाणे, पण टण् कन् पडतो खाली आणि आपली जागा चुकल्याचं त्याच्या लक्षात येतं.
चमच्यांच्या नशिबी असणारे मोकळे झोके या ज्येष्ठांच्या वाट्याला मात्र येत नाहीत. त्यांची घरंही आडवी. स्वयंपाक झाला जेवणं आटोपली की नळाखाली आंघोळ करून आणि स्वच्छ कोरडं होऊन एकमेकांसोबत आडवं व्हायचं. चमच्यांचं तसं नसतं. त्यांची चिमणीची आंघोळ झाली, अंग कोरडं झालं की आपापल्या अंगाच्या जागेत स्वतंत्रपणे छान लटकून बसायचं. कुणाचा स्पर्श नाही की कुणाचं अंगचटीला येणं नाही. कधी पाहुणे रावळे आले, की अधिक साठ्यातले चुलत चुलत, मावस, मामे बंधू बाहेर येतात, काही वेळापुरती चमचेगिरी करून पुढे पुढे करायला. आणि मग काही वेळ तरी प्रायव्हसी बाजूला ठेवून, एकेका जागेत दोघा दोघांना थटून लटकायला लागतं, तेव्हढाच काय तो त्रास. तिथेही या पाहुण्यांची जागा पुढे असते, पण ती ही थोड्या वेळासाठी. पुन्हा त्यांना आतच जायचं असतं.
प्रत्येकाची जबाबदारी, कामाची गरज मात्र वेगवेगळी. मोठ्या चेहऱ्याचे लंबाडे कोशिंबीर, पचडी, श्रीखंड वाढायला, तर लांबट उभ्या चेहऱ्याचे पोहे, खिचडी, शिरा, उपमा यापासून ते खीर, आमरस, सूप यासारखे पातळ पदार्थ खायला, खीर आमरस किंवा कोणत्याही पातळ पदार्थात साखर अथवा तत्सम काही मिसळलं, तर ते टणन् टणन् टणन् आवाज करत विरघळवण्यासाठी, महत्वाच्या कामाला निघालेल्या घरातल्या व्यक्तीच्या हातावर अगदी प्रेमाने दही ठेवण्यासाठी. पानावर चटणी, लोणचं वाढण्यासाठी इथपासून वेळेला स्क्रूड्रायव्हर सारखा उपयोग करून कीचनमधल्या हाताच्या तव्याचे, किंवा एखाद्या हाताच्या पॅनचे सैल झालेले स्क्रू घट्ट करण्यासाठी इथपर्यंत उपयोग होत असतो. टिफीनसोबत आत बसून, ऑफिसमध्ये सुद्धा पोहोचतात हे दुपारच्या जेवणासाठी. अनेकदा तर एकमेकांत घट्ट बसलेली भांडी, वाट्या मोकळ्या करण्यासाठीही यांचा पुरेपूर उपयोग होतो.
श्रीखंड, आईस्क्रीम, दही, घट्ट लस्सी खाण्यासाठी चपट्या तोंडाच्या चमच्यांची योजना असते. त्याचबरोबर पानावर तूप वाढायला, पावाला लोणी, मस्का फासायला, चहा कॉफी, दूध, यामध्ये घातलेली साखर ढवळायलाही हे उपयुक्त असतात. पूर्वी लग्नात रिसेप्शनला आईसक्रीम असे, आणि प्लेटमधील तो चौकोनी काप खायला सोबत हे चपट्या तोंडाचे चमचे. यांची देहयष्टी तशी पीचपीचीत आणि अगदीच किरकोळ. शरीराला ना रूप ना गोलाई ना सुदृढ बांधा. सगळ्या बाजूंनी तीक्ष्ण धारधार रूप. पांढऱ्याशुभ्र मिठाच्या डब्यात हाच रुतून बसलेला असतो. दुधाच्या भांड्यातली खरपुड खरवडून खायला याच्याशिवाय पर्याय नाही. कशण् कशण् आवाज करत सगळी खरपुड कवळून घेतो अगदी.
मसाल्याच्या भांड्यातल्या चमच्याचं रूपच वेगळं. निमुळता लांबट गोल चेहरा आणि निमुळतं शरीर. पदार्थांना झणझणीत चव देणाऱ्या या गरम डोक्याच्या सोबत्यांसोबत हा अगदी रुबाबात नांदतो. सगळ्यांमध्ये अजिबात मिसळून न जाता, मोजून मापून आणि जेव्हढ्यास तेव्हढं राहून स्वतःचं अस्तित्व जपून असतो. याची मूर्ती लहान पण नेमक्या मापाने पदार्थात प्रत्येकाला टाकत आपलं काम अगदी चोख बजावतो बेटा. याच्या भाळी स्वच्छ, चकचकीतपणा नाही. लाल पिवळ्या रंगात कायम न्हालेला असतो. मसाल्याच्या डब्यासोबत अधूनमधून आंघोळ घडते, आणि तेव्हढ्यापुरता काही वेळ मूळ रुपात येतो. मूळ रूपात आलेला ओळखूच येत नाही. गिरणीतला पीठ दळणारा भैय्याजी कसा दिवसभर पिठामध्ये न्हालेला असतो. रात्री आंघोळ करून आला की ओळखू येत नाही, तसच या चामच्याचं.
चहा साखरेचे छोट्या चणीचे, आणि कीलवरच्या रूपाचे चमचे. यांचंही मसाल्याच्या चमच्यासारखं डब्यात बंदिस्त आयुष्य. नशिबी मोकळ्यावर लटकत रहाण्याचं, मोकळा श्वास घेण्याचं सुख नाही. डबा उघडला की तेव्हढ्यापुरतं काय ते बाहेरचं जग बघेपर्यंत पुन्हा आपला बंदिवास. साखरेच्या चामच्याला तरी पांढरा शुभ्र रंग आणि गोडव्याचा सहवास आणि बाहेर आल्यावर चहा कॉफिमध्ये जाताना फारसे चटकेही बसत नाहीत. शिवाय प्रत्येक पदार्थाला चव येण्यासाठी साखर पेरणी सुरूच असते याची. मंगल कार्याचं निमंत्रण घेऊन आलेल्याच्या हातावर साखरेचे दाणे ठेवल्याशिवाय हा जाऊ देत नाही त्याला. पण चहा पाल्याच्या चमच्याला एकतर काळीकुट्ट साथ आणि चहा कॉफीत जाताना उकळत्या वाफेचे चटके. पुन्हा आपली काळया पाण्या….. आपलं पावडरच्या साथीची शिक्षा.
रूपा गुणांनी वेगळे असले, तरी बहुसंख्यांक या वर्गात मोडणारे हे चमचे, दिवसभर आपापल्या कामात अगदी मग्न असतात. कुणी दह्याच्या सटात, कुणी तुपात बुडलेला तर कुणी तेलाने माखलेला, कुणी कोशिंबीर चटणीमध्ये लडबडलेला तर कुणी रुबाबात इतरांकडे पहात आंब्याच्या रसात न्हालेला. रिकामा बसलेला अगदी कुणीही नाही. Day shift करून जेवण आंघोळ झाल्यावर एकदा घरी परततात आणि संध्याकाळची second shift आटोपल्यावर पुन्हा एकदा रात्री आंघोळ करून.
या सगळ्यांत पूजा धार्मिक कार्य यावेळी सगळ्यांना तीर्थ देण्यासाठी, नेहमी वापरात नसलेला ठेवणीतला बहुधा चांदीचा चमचा, घासून पुसून चकचकीत होऊन, तिर्थाच्या वाटीत विसावतो, आणि अगदी अलगदपणे समोर येणाऱ्या हातावर तीर्थ देऊन पुण्य साठवतो, तर दुसरा एखादा मात्र बाराव्या तेराव्याला, वर्षश्राध्दाला पंचगव्व्याचे थेंब विषण्ण मनाने समोरच्या हातावर ओघळून टाकत असतो…….
प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
९७६९०८९४१२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..