नवीन लेखन...

तो ची एक पाठिराखा

बबन्या. एक सर्वसाधारण हमाल. रोज हमाली करून जे मिळेल त्यात समाधानाने गुजराण करणारा एक सामान्य माणूस. आज तो एका कारखान्या बाहेर उभा होता. तो कारखाना होता मुर्त्यांचा. आज गणेश चतुर्थी. कितीतरी लोक आपण निवडलेले गणपती आज त्या कारखान्यातुन आपल्या घरी नेत होते. त्यांना गणपतीची मुर्ती उचलून देताना तो मदत करत होता. कोणी काही बिदागी दिली तर……

तर ती त्याला हवीच होती. मात्र फक्त एकानेच त्याला मुर्ती उचलून त्या एकाच्या गाडीत ठेवण्यासाठी दहा रुपये दिले होते. आतापर्यंत 30/40 मुर्त्या त्याने उचलण्यास मदत केली होती, पण कोणीच काही त्याच्या हातावर टेकवले नव्हते. त्यामुळेच तो तिथे काही काम मिळेल या आशेने घुटमळत होता.

बरीचशी लहानमोठी मुलं देखील होती तिथे. कोणाच्या घरचाच बाप्पा न्यायचा होता तर कोणी गणेशोत्सव मंडळाची मुर्ती न्यायला आलेली होती. पण त्यातही ‘ती’ दहा-बारा मुलं सहज लक्षात येत होती. बारा-तेरा वर्षांचीच होती असतील सगळी. सारखं आत बाहेर चाललं होतं त्यांचं. कसली उलाघाल चालली होती, कोणास ठाऊक.. आणि एकेकाचा अवतार तरी काय? कुठच्या तरी झोपडपट्टीतलीच वाटत होती ती मुलं. एकंदर आठ-दहा तरी असावीत. एकेकाच्या केसाच्या झिप-या याऽऽऽ वाढलेल्या. आंघोळ केली आहे की नाही याची सुद्धा शंकाच होती. त्यातल्या त्यात ‘तो’ एकटाच काय तो बरा वाटत होता. निदान आंघोळ केल्यासारखा तरी वाटत होता. आणि डोक्यावर थापून ठेवलं होतं तेल त्याने. वर्षभरात केव्हातरी तेलाचा हात लागल्यावर जसे दिसतील तसे दिसत होते त्याचे केस. स्वतःला त्या गृपचा लिडर म्हणवत असावा बहुदा तो.

बबन्याने मान फिरवली, तो दुसरीकडे काही काम मिळते का ते पाहू लागला. पण छे. कोणाला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ होता ? जो तो आपापला बाप्पा घेऊन जायच्या मागे. परत त्याची नजर त्या मुलांकडे वळली. त्यांचे चेहरे आता केविलवाणे दिसत होते. रडवेले झालेले दिसत होते.

बबन्याला काय वाटलं कोणास ठाऊक, तो सहज पुढे झाला. आणि त्यांचं बोलणं ऐकू लागला. एकंदरीत त्यांना त्यांच्या मंडळाचा गणपती न्यायचा होता, पण ही सगळीच लहान मुलं आली होती, बरोबर कोणीच मोठं माणूस नव्हतं त्यांच्याबरोबर. त्यामुळे मुर्तीवाला त्यांच्या ताब्यात मुर्ती द्यायला तयार नव्हता. बरं त्यांनी आणलेल्या हातगाडीवर पण त्यांची मुर्ती ठेवायला तयार नव्हता मुर्तीवाला. त्या मुलाची बबन्याशी नजरानजर झाली आणि का कोण जाणे पण बबन्या आपल्याला नक्कीच मदत करेल अशी खात्रीच त्या मुलाला वाटली. तो पटकन बबन्याकडे आला.

“ओ भाऊ, जरा आमची मुर्ती उचलून ठेवता काय गाडीवर ?”

” कुठाय तुमची मुर्ती. ?”

“आत हाय तितं कारखान्यात. पण उचलून न्यायला कोनीच न्हाई म्हून देत नाय तो मुर्तीवाला. तुम्ही उचलून ठेवनार काय या आमच्या गाडीवर ? तर जाऊ चला आत.”

“अरे ,किती मोठी हाय तुमची मुर्ती पहिले बघाय पाहिजे. मला झेपंल का उचलाया. तो मुर्तीवाला काय खुळा हाय काय उगाच तुम्हाला हाकलाया. ?”

त्या मुलाने बबन्याला हाताला धरुन आत नेलं आणि आपली मुर्ती दाखवली. फुटभरच ऊंच होती ती. खरं तर कोणीही मोठा माणूस ती मुर्ती उचलून त्या मुलांच्या ढकलगाडीवर ठेवू शकला असता, पण प्रत्येकाला आपलाच गणपती न्यायची घाई. कोणीच मदत करायला तयार होत नव्हतं. बबन्याला पाहून त्यांना आशा वाटत होती.

बबन्या तयार झाला तसा चटकन तो मुलगा पटकन् पुढे झाला आणि मुर्तीवाल्याला म्हणाला, ” ओ दादा, द्या आता आमची मुर्ती, ह्यो भाऊ हाय बघा आमच्या संगती. तो घेल मुर्ती उचलून. आणि हे घ्या मुर्तीचे पैशे. किती चारशे रुप्ये ना? हे धरा.”

त्याने पटकन् पाचशेची नोट मुर्तीवाल्याला दिली. मुर्तीवाल्याने त्यांना शंभर ची नोट परत दिली. ती त्याला परत देत त्याने ते शंभर रुपये सुट्टे करून मागितले. मुर्तीवाल्याने शंभर रुपये सुट्टे करुन देताच त्यातले दहा रुपये काढून त्याने त्या मुर्तीवाल्याला दिले. ” दादा, तुमची बिदागी “. मुर्तीवाला हसला. त्याने ते दहा रुपये घेतले. त्या मुलाच्या पाठीवर हलकंस थोपटलं. त्या मुलाने आता बबन्याला खुणावलं . बबन्याने मुर्ती उचलून त्यांच्या ढकलगाडीवर ठेवली. आणि गाडी थोडी पुढे न्यावी या हेतूने तो ती गाडी ढकलू लागला. झालं. इतका वेळ धीर धरुन उभी असलेली मुलं आता हातात जुने डबे, ताटं घेऊन बडवू लागली. आतापर्यंत त्यांनी हे कुठे दडवलं होतं कोणास ठाऊक . त्यातलीच काही मुलं गाडीपुढे ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ‘ चा गजर करत नाचायला लागली. बबन्या खरं तर गाडी सोडून परत यायला निघाला, पण त्या मुलाने बबन्याला अडवलं. “भाऊ, त्या तिथपावेतो ढकला ना गाडी, मीच ढकल्ली आस्ती पण मलाबी नाचायचं हाय ना. मीच तर लीडर हाय ना यांचा. मग मी नाचाया नको? ” बबन्याचा नाईलाज झाला. “हे काय, हितंच तर मंडळ हाय आमचं. ”

ती पोरं गाडीपुढे ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करत नाचत होती , आणि बबन्या निमुटपणे ती ढकलगाडी ढकलंत नेत होता..बबन्याचा अंदाज खरा ठरला. ती पोरं झोपडपट्टीतलीच होती. तिथून रेल्वे स्टेशन जवळच होतं. फुटपाथवर एक टेबल मांडलं होतं. त्याच्या तीन बाजूनी आणि छपरासाठी वरून असं प्लॅस्टिक बांधून घेऊन मंडप तयार करण्यात आला होता. आजुबाजूला झाडांच्या फांद्या तोडून , त्या मातीच्या पिशव्यात लावून हिरवाई दाखवायचा प्रयत्न केला होता. झेंडूच्या माळाही सोडल्या होत्या. आणि त्या टेबलावर बाप्पाची प्रतिस्थापना करायची होती. बबन्याने मुर्तीला हात घालून अलगद उचलून घेतलं आणि त्या ‘लीडर’ने दाखवलेल्या जागेवर ठेवली. तो जायला वळला इतक्यात त्या लीडरने त्याला थांबवलं.

” थाम जरा भाऊ. आता हितवर आलाच हायस तर आरती बी करूनच जा. आन् तसबी हितं कोन मोटा माणुस बी नाय बग आमच्या संगं. थाम थोडा वेळ अजून. आम्ही करतो समदी तैय्यारी लगीच बग. ”

” अरे, पण , भटजी येणार कधी , पुजा होणार कधी. मला जाऊदेत. अरे माझंही पोट तुमच्यासारखंच आहे. जेव्हा हमाली करणार तेव्हाच चार घास खायला मिळणार मला . जाऊदे मला.”

” असं म्हणतोस, तर मग आता तु जायचंच न्हाईस. चार घास आमच्याच संगट खा हितं. मग कुटं जायाचं तितं जा. आणि ते भटजीचं काय म्हनला तु.”

” अरे, गणपती बसवून त्याची पुजा करायला भटजी बोलावलाय का ? कधी येईल तो.?”

“भटजी ? आनी तो कशापायी ? पुजा कराया? ,अरे हट्, ह्यो आमचा गणपती हाय ना, मंग आमीच भटजी. आमीच सगळे पुजा करणार.”

“अरे, गणपती बसवताना त्याची मंत्रोपचाराने पुजा नको का करायला ? तुला येते पुजा सांगायला ? ”

खळखळून हसला तो. ” भाऊ, असा रे कसा तू ? अरे त्या भटजीनं पुजेसाटी हज्जार रुप्ये सांगितलेत. कुटून आणणार रे आमी येवडे पैशे. मुर्तीपायीच खर्च झालेले पैशे कसे जमा केलेत इचार. अरं , तो मुर्तीवाला बी लय किमत सांगत होता बग. आमच्या कडनं एवडा पैसा नवता ना जमा. अरं ही मुर्ती बी त्यानं सस्त्यात दिली कारन मागच्या सालची उरलेली व्हती ही. रंग शाप गेलेला. कुटंकुटं टवकं बी गेलेलं. पण टवके समदे भरून, नवीन रंग लावून देतो बोलला, आनी वर रंगीत खडं बी लावतु बोलला. त्याच्या कडे ती मुर्ती तशीच पडून -हान्यापेक्षा आमाला सस्त्यात देनं पटलं त्याला, आन् मग ही मुर्ती आमची झाली. कुणी भीका मागून, कुणी भंगार जमा करुन , कुणी बारीक सारीक कामं करुन जमवलेत पैशे. हिकडचा एक बी मोटा मानूस मदत करायला तयार न्हाय. तुमच्या पोरांची खुळं हायेत ना तर मग तुमचं तुमीच बगा. उगा आमच्या डोक्याला तरास नको म्हणून मोकळं झालंत बग सगलंच. आन् पुजेचं काय, ती तर आमी करणारच. आमच्या देवाला आमी केलेली पुजा चालते. आमी दाखवलेला निवेद सुद्धा आमचा देव मानून घेतो. उगाचच मोदकासाटनं हटून नाही बसत आमचा देव. जे आसल अगदी शिळंपाकंही ते सम्द चालवून घेतो आमचा देव. बगच तू. ”

बापरे. ‘त्याचा’ हा आविर्भाव पाहून बबन्या चाटच पडला. पण कोणत्याही कामासाठी , कोणावाचून अडून रहायचंच नाही, याचं बाळकडूच जणू मिळालं होतं ‘त्याला ‘. बघता बघता त्याच्या सैन्याने पुजेची तयारी केली. आरतीचीही तयारी केली. कोणाच्या तरी आईचा मोबाईल आणला होता त्यांनी. बाप्पाची आरती होती त्यात.

“ए भाऊ, होळीत म्हणतात ते येत का तुला बोलता? ”

” म्हणजे ? ”

“अरे ते , ‘व्हय म्हाराजा ‘म्हंतात ते” काय हा माणूस, असा असतो का कधी मोठा माणूस? याला तर काहीच माहित नाही ? अशाच नजरेने ‘तो’ धिटूकला बबन्या कडे पहात होता..

“हा हाय तर. गारानं म्हंतात त्येला. आता त्येचं काय? ” खरंतर बबन्याला ही ते ऐकूनच माहिती होतं पण कधी गा-हाणं घालायची पाळी आलेली नव्हती..

‘त्याचा’ चेहरा खुलला. “मंग तर बेस झालं बग. आता तु ते म्हणायचं आन् आपला गनपती बसवायचा बग हितं. भटजीची कायबी गरज नाय बग. आता तुच आमचा भटजी. ए चला रे पोरांनो. या बगू सम्दी हितं फुडं. आन् ह्यो भाऊ ते गारानं घालंल , तवा काय आरडायचं म्हायताय ना ?”

“व्हय म्हाराजा……” सगळी चिल्लीपिल्ली एका सुरात बोलली.

आता बबन्यालाही त्या मुलांमध्ये सामिल होण्यात आनंद वाटत होता. त्यालाही कुठेतरी आपण आपल्या घरी गणपती बसवावा असं मनोमन वाटतं होतं. पण परिस्थितीमुळे काही त्याची ही इच्छा पुर्ण होऊ शकत नव्हती. या मुलांमुळे त्याच्या मनातली ती सुप्त इच्छा कुठेतरी पूर्ण होणार होती. तोही मनोमनी सुखावला. त्याने नारळ हातात घेतला. बाप्पाच्या मुर्तीकडे एकवार पाहिलं आणि तो त्या मुर्तीकडे पहातंच राहिला. किती रेखीव आहे ही मुर्ती, आणि ते डोळे किती स्नेहार्द्र नजरेने पहातायत आपल्याकडे. कोण म्हणेल ही मुर्ती जुनी आहे? परत रंगवलेली आहे ? आणि पितांबर देखील किती खुलून दिसतंय ना ? छे, ही निर्जीव मुर्ती नाहीच. बाप्पा स्वतःच आहे या मुर्तीत. आणि आपली इच्छा जाणूनच तो आपल्या कडून हे सगळं करवून घेतोय जणू.
बबन्याचे डोळे भरुन आले.

” ए भावा, अरे घालतोस ना गारानं?”

बबन्या भानावर आला. “हो हो. घालतो ना. अरे, आपली ही मुर्ती लय देखनी हाय बग. आतापतुर कित्ती मुर्त्या पाह्यल्या मी. पर असी मुर्ती कवाच नाय पाह्यली मी. अक्षी खरा बाप्पाच समोर बसलाय जनू. कितीबी पाह्यलं तरी मन भरत नाय बग. नुसतं बगतंच -हावं जनू.” बबन्या मुर्तीकडे पाहून हात जोडत म्हणाला.

“मग तुला नको कोन बोलतंय. आपला गनपती पाच दिस ठेवायचा हाय. येत जा की रोजच. आनी तसबी हितं आमाला मदत कराया तु एकलाच यवड्या मान्सातनं फुडं आलास न्हवं. मंग आता रोजच ये. पन आता आधी गा रा नंऽऽऽऽ.”

बबन्या हसला. “हो रे सोन्या. करतो मी सुरवात. बग. सगळे तैय्यार हायत ना.?

“होऽऽऽऽऽऽऽऽ.” सगळ्यांचा आवाज घुमला.

” बा देवा म्हाराजा,”

“होय म्हाराजाऽऽऽऽ.”

“ह्यी तुजी मुलं, तुजी मनापासून शेवा करु बगतायत, तर ती करुन घे. त्येंच्या हातून काही चुकलं तर माफ कर त्येंना. त्येंना त्येंच्या रोजगारात बरकत मिळू देत. त्येंच्याकडचा परसाद गोड मानून घे. या लेकरांना सांभाळून घे. त्येंच्यावरची सम्दी संकट पळवून लाव . आनी त्येंना सुकात ठेवरे म्हाराजा.” बोलताना बबन्याचे डोळे पाणावले होते गळा दाटला होता.

“होय म्हाराजाऽऽऽऽ.”

“बग. झाली ना पुजा आपल्या बाप्पाची. आता आरती करुया. ए लाव रे फोनवर आरती. पटकन.”

आरती झाली. कोणी कोणी आपापल्या घरातुन काही बाही आणून नैवेद्याचं ताटही तयार केलं होतं. कोणाकडून तर दोन मोदक देखील आले होते.

बबन्यालाही ‘त्या’ हिरोने आग्रह करून जेवायला लावलं. आता बबन्या जायला निघाला. ‘त्या’ ने थांबवलं त्याला. “भाऊ, हे घे. . आज तुला आमच्यासाठी हितं थांबावं लागलं अन् तुजी मजदूरी चुकली. हे कमीच हायत पन ठेव तुज्याकडं. ” ‘त्या’ने पन्नासची एक नोट काढली आणि बबन्यासमोर धरली. बबन्या एकदा ‘त्या’च्याकडे तर एकदा त्या नोटेकडे पहात होता. बबन्याने त्याला जवळ घेतलं, त्याच्या हातातली ती नोट तशीच त्याच्या हातात परत दाबत म्हणाला, ” -हाऊदे हितंच. आपल्या गनपतीसाटी येईल कामात. मला मिळंल कायतरी काम बग. शोधतो मी काम. जाऊ आता. परत येन बघ रातच्याला.”

बबन्या तिथुन बाहेर पडला खरा. पण आता कुठून हमाली मिळणार? इतक्यात त्याला बाजुलाच दोघी तिघी वयस्कर बायका उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांच्याजवळ साताठ बोजी होती. बबन्या थांबला.

“ताई, कुटं जायाचं हाय? ठेसनला का ? घेऊ का मी बोजे ”

“नको, आम्ही टॅक्सी बोलवलीय. येईल इतक्यातच ”

“अगं, थांबव त्याला, टॅक्सीत सामान चढवेल का ते विचार. आणि स्टेशनवर पण गाडीत सामान चढवावं लागेलंच ना. आपल्याला का जमणार आहे हे एवढं सामान उतरवून घेऊन गाडीत चढवणं ? विचार त्याला. स्टेशनवर गाडीत सामान चढवून देईल का ते विचार त्याला, आणि येत असेल तर आपल्याच बरोबर घेऊन जाऊ टॅक्सीतुन त्याला. तिथे गाडीत सामान चढवेल तो. ”

सौदा ठरला. बबन्याने त्यांचं सामान त्यांच्या प्रवासाच्या ट्रेनमध्ये चढवून देण्याचं मान्य केलं. त्या प्रमाणे बबन्याने त्यांचं सामान गाडीत नीट चढवून दिलं. तिघीच जाणार होत्या त्या गावी. गणपतीला. त्यातल्या एकीने ठरल्याप्रमाणे त्याला दोनशे रुपये दिले काढून . तेवढ्यात गाठीत वडापाव विकणारा पोरगा आला. त्याच्याकडून पाच वडापाव घेतले त्यांनी. तीन स्वतःला ठेवले व बाकिचे दोन बबन्याला देत ती बोलली , ” घे रे बाबा, एक तुला आणि एक तुझ्या मुलाला दे. ”

बबन्याच्या डोळ्यापुढे ‘त्या’चा चेहरा तरळला. तो हसला आणि त्याने ते दोन्ही वडापाव तसेच कागदात नीट गुंडाळून खिशात ठेवले.

बबन्या स्टेशनच्या बाहेर आला. तिथं त्याच्यासाठी काम जणू वाटच पाहात होतं. तिथेच त्याला पाच सहा टॅक्सीत सामान चढवून देण्याचे आणखी दोन/अडिचशे रुपये मिळाले. आता मात्र कधी घरी परत जाऊन त्या मुलांना भेटतोय असं त्याला झालं होतं. तोही एका अनामिक ओढीने तडक त्या मुलांना भेटायला आला. तिथे गर्दी जमली होती. पोलिसही आले होते. रस्त्यावरच येता जाता त्रास होतो म्हणून कोणीतरी तक्रार केली होती, आणि म्हणूनच पोलिस तिथे आले होते. सगळ्या मुलांचे चेहरे उतरले होते. ते पाहून बबन्याला राहावलं नाही. तो त्या पोलिसांना विनवणी करण्यास गेला. पण त्यांचं आपलं एकंच पालुपद. “साहेब येतायत. मग बघू. आणि हा साहेब चिडलेत दोन तीन दिवस.. उगाच जास्त काही बोलू नको. तुम्हाला गणपती दुसरीकडे हलवावा लागेल. त्याची तयारी करा . जा ”

“साहेब, असं कसं होईल? आता बसवलायच गणपती तर -हाऊ देत ना. पाचच दिवस तर असनार आमचा गणपती.”

” ते काही नाही. साहेब आल्यावर सांग काय ते. ”

एवढ्यात सायरन वाजवत पोलिस व्हॅन आलीच तिथे. आतुन साहेब उतरताच अगोदरच्या दोघांनी कडक सॅल्यूट ठोकला त्यांना. तो तक्रारदार भेटला जाऊन साहेबांना. साहेबही आलेच गर्जत.

” कोण आहे रे तो? कुणी परवानगी दिली तुम्हाला या इथं गणपतीचा मंडप घालायला ? ”

“साहेब हा आगाऊपणा या मुलांचा आहे. पहा ना कसा सगळा फुटपाथ अडवलाय तो . पब्लिकने जायचं कुठून आणि कसं ? ” इति तक्रारदार.

आता बबन्या पुढे झाला. “साहेब, सगळी ल्हान मुलं हायती ती. त्यांना काय समजतंय. मंडपासमोरून जायला जागापन हाय आनि तसंबी मंडप एक्या बाजूलाच हाय. तरीबी तुमी सांगताय तर मंडप आनखी थोडा आत घेऊन रस्ता थोडा खुला कराय सांगतो मी मुलांना. पन खरंच आतमध्ये जागा नाय हाय हो. बगा तुमी हवं तर आत येऊन. आणि पाचच दिवसांनी नेणार हाओत आम्ही गणपती. तेव्हा व्हईल रस्ता रीकामा. ”

साहेबांनी एकवार बबन्याकडे पाहिलं, आणि ते आत मांडवात शिरले. खरंच आतमध्ये जागा नव्हतीच. ते आता बाहेर येण्यास वळणार तोच त्यांना त्या मुर्तीला हात जोडावेसे वाटले अन् ते परत माघारी फिरले. क्षणभर त्यांनी त्या मुर्तीकडे पाहिलं, अन् ते त्या मुर्तीकडे पहातच राहिले. त्यांचे ते दोन सहकारी देखील आता आतमध्ये आलेले होते. ते देखील साहेबांकडेच पहात होते. साहेब वळले. त्यातल्या एका कडे काही पैसे दिले आणि म्हणाले , ” जा पळ पटकन, आणि फुलं, मोदक घेऊन ये लवकर. मी स्वतःच या मुर्तीची पुजा करणार आहे. आणि तु रे पटकन या मंडळाच्या वतीने मंडपासाठी परवानगीचा अर्ज लिहून दे.” बबन्याकडे वळून म्हणाले , ” तु सही करून दे.” बबन्या म्हणाला, ” साहेब, हे मंडळ तर या बारक्या पोरांचं हाय. मी हितला नाय. फकस्त ती मुर्ती आनाय मदत केलीय मी .”

त्याला अडवत साहेब पुढे बोलले. ” मदत केलीस ना? मग आता शेवटपर्यंत निभावून ने ती. या मंडळाच्या वतीने त्या अर्जावर सही कर तु. मी परवानगी देतोय या मंडपाला. तु घाबरु नकोस .”

“साहेब, मी अडानी हाय. मला लिहाय-वाचाय येत न्हाई. मी हमाली करतुय बगा.”

“हरकत नाही. पण मग नंतर ऑफिसात येऊन त्या अर्जावर अंगठा लावून जा.” नंतर त्या तक्रार करणा-या व्यक्तीला म्हणाले, ” कायरे , तुझं मंडळ कुठे आहे ? ”

“ते काय साहेब, बाजुलाच तर आहे.”

” व्वा. कायरे तुझ्या मंडळाने तर अर्ध्या रस्त्यावरच मंडप बांधलाय . तेव्हा लोकांचा येण्याजाण्याचा रस्ता आपण अडवतोय हे तुला समजलं नाही का. ? आणि मंडळाला एवढा रस्ता अडवून मंडप बांधायला परवानगी कशी मिळाली ? येऊ का तिथे बघायला ? उगाच गरीबाला नाडायला येऊ नकोस. तुला काय वाटलं या मुलांबरोबर कोणी मोठं माणुस नाही , ती काय आपलं वाकडं करणार ? तुझा भ्रम आहे हा. मी या मुलांच्या पाठीशी आहे.. समजलं,? . उगाचंच या मुलांना सतावू नकोस. ”

एवढ्यात तो हार-फुलं आणायला गेलेला शिपाई परत आला. साहेबांनी त्या मुर्तीला हार फुलं वाहून मनोभावे पुजा केली. मोदकांचा नैवेद्य दाखवला. आणि ते सहका-यांकडे वळून म्हणाले , “आश्चर्य वाटतंय ना? गेले दोन तीन दिवस माझी सतत चीडचीड होतेय., बारिक सारिक गोष्टीत मला राग येतोय ना ? पण त्याचं कारण आहे ही मुर्ती. ही मुर्ती माझ्या सारखी स्वप्नात येतेय , पण मला या मुर्तीचा ठावठिकाणाच लागत नव्हता. आज अचानक तो लागलाय. खरंच माझ्या मनावरचं ओझं उतरल्या सारखं वाटतंय मला. खूप हलकं वाटतंय मला आज. आणि तुम्हीही जरा लक्ष द्या इथे. या मंडळाला कुणी उगाच उपद्रव देणार नाही हे पहा. आणि तु रे काय नाव तुझं ?”

“बबन्या.”

” तु आता गणपती विसर्जन होईपर्यंत इथेच रहा, या मुलांच्या सोबतीला. काय अडचण आलीच, अगदी पैशांचीही तरी ये चौकीवर. मी मदत करेन तुला. बोला रे पोरांनो, गणपती बाप्पाऽऽऽऽऽ.”

“मोरयाऽऽऽऽऽऽऽ.” सगळी मुलं एकासुरात ओरडली.

साहेब गेले. बबन्याने खिशातले वडापाव काढले. एक तुकडा मोडून बाप्पाच्या पुढ्यात ठेवला. आणि बाकिचे वडापाव दोन दोन/ तीन तीन भाग करून त्या मुलांमध्ये वाटून टाकले.

“आणि तुला रं” म्होरक्याने विचारलं

” मला नगं. मी खाल्ला.”

“न्हाई, खा माज्यातला थोडा. न्हाईतर मला बी नगं . आनी पैसं कुठून आलं रे तुज्याकडं.?”

“अरं, हितून गेल्यानंतर मला आज लय हमाली भेटली बग. पाचशे रुप्ये मिळालंत. आपला गनपती पावला बग मला. ” बबन्या बोलला आणि आपल्यातला वडापावचा घास बबन्याला भरवत ‘तो म्होरक्या ‘ बबन्याला बिलगला.

© विवेक माधव.
(`आम्ही साहित्यिक’ या मराठीसृष्टीच्या फेसबुक ग्रुपवरील लेखकांचं निवडक लेखन येथे प्रकाशित केलं जातं)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..