नवीन लेखन...

अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – ३

The History of Agriculture in America - Part- 3

अमेरिकन शेतीच्या प्रगतितील ठळक टप्पे
१९ व्या शतकातील प्रगती – मनुष्यबळ ते अश्वशक्ती – शेती हा नेहमीच एक कष्टाचा उद्योग राहिला आहे. जमिनीची मशागत, पेरणी, तण काढणे, पिकाला पाणी देणे, पिकाचे रक्षण करणे, तयार झालेले पीक काढणे, धान्य साठवणॆ किंवा धान्य बाजारात नेण्यासाठी तजवीज करणे, एक ना दोन, हजार गोष्टी. १९ व्या शतकातलं अमेरिकेतलं महत्वाचं पीक म्हणजे गहू. अमेरिकन शेतकरी जुनीपानी लाकडी अवजारं वापरून मातीतली ढेकळं फोडण्यापासून सारी कामं हाताने करायचा. अगदी पार कापणी, मळणी आणि गव्हाची साठवणी करण्यापर्यंत सारी कामं हातानेच व्हायची.

१९ व्या शतकात, जसजशी तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली, तसतसं कमी कष्टात अधिक धान्योत्पादन शक्य होत गेलं. शेतं मोठी मोठी होत गेली. वेगवेगळ्या तांत्रिक अवजारांच्या कंपन्यांनी, पेरणीची वेगवेगळी यंत्रं तयार केली. १८३० च्या दशकात, शेतातलं तयार पीक कापण्यासाठी देखील यंत्रांचा वापर सुरू झाला. घोडयांच्या जोडीमागे असं कापणीचं यंत्र लावल्यावर कापणी अधिकच सुलभ होऊ लागली. कापणीच्या यंत्रामागे फिरत शेतकरी कापलेल्या ओंब्या गोळा करून, त्यांच्या राशी बनवून शेतात सुकण्यासाठी ठेवू लागले. पुढे तंत्रज्ञानात आणखी सुधारणा झाली आणि कापलेल्या गव्हाच्या ओंब्या नीट गोळा करून त्यांच्या राशी बनवण्याचं काम देखील यंत्रच करू लागली. गव्हाची मळणी करण्यासाठी सुरवातीला बैल किंवा घोडे, खळ्यात कापलेल्या पिकावर चालून धान्य सुटं करायचे. १८४० च्या सुमारास धान्य मळणीसाठी देखील यंत्र निर्माण होऊ लागली. १८५० च्या सुमारास वाफेच्या शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरवातीला ही वाफेवर चालणारी यंत्रे एका जागी स्थिर (Stationary) असायची. नवीन शतकाचा उदय होण्याच्या सुमारास, ही वाफेवर चालणारी यंत्रे फिरती झाली होती. मळणीची कामे करण्यासाठी ठिकठिकाणी गिरण्यांची व्यवस्था होऊ लागली होती आणि त्यामुळे शेतकरी आपापल्या खळ्यात मळणी करण्या ऐवजी अशा गिरण्यांमधे आपलं धान्य पाठवायला लागले होते.

सुरवातीला शेतीच्या कामात बैलांचा वापर सर्रास व्हायचा. १८७० सालापर्यंत बैलांऐवजी सर्वत्र घोडयांचा वापर होऊ लागला होता. सन १८०० च्या सुमारास शेतकर्‍याला जे काम करायला ३॥ -४ तास लागायचे, तेच काम सन १८८० च्या सुमारास केवळ १० मिनीटांमधे होऊ लागले. १८९० साली पेट्रोलवर चालणारे इंजीन शेतीच्या वापरात आले आणि शेतीच्या यांत्रिकीकरणात एका नव्या इंधनाची भर पडली.

२० व्या शतकातील प्रगती – १९ व्या शतकातील प्रगतीमुळे, अंगमेहनतीची जी कामे त्यांचे आजोबा किंवा पणजोबा कष्टाने करत होते, तीच कामं आताची नवी शेतकरी पिढी घोडयांनी ओढण्याच्या यंत्रांत बसून करत होती.

२० व्या शतकातील शेतीच्या दृष्टीने कदाचित सर्वाधिक महत्वाची प्रगती म्हणजे ट्रॅक्टर. सुरवातीचे ट्रॅक्टर्स खूपच अवाढव्य आणि बोजड असे होते. २० व्या शतकाच्या सुरवातीच्या काही वर्षांतच ट्रॅक्टर अधिक लहान आणि सुटसुटीत होत गेले आणि त्यांचा वापर शेतीच्या बहुतेक कामांसाठी होऊ लागला.

अमेरिकन यादवी युद्धानंतर जशी परिस्थिती उद्भवली होती तशीच परिस्थिती दुसर्‍या जागतिक युद्धानंतर (१९३९-१९४५) पुन्हा उद्भवली. एक संपूर्ण तरूण पिढी मोठया प्रमाणात युद्धात कामी आली होती अथवा जायबंदी झाली होती. अमेरिकन शेतांमधे काम करणार्‍या कष्टकर्‍यांची कमतरता भासायला लागली होती. त्यामुळे ट्रॅक्टर्स आणि इतर तंत्रज्ञानाची कास पकडण्याशिवाय शेतकरी वर्गापुढे दुसरा पर्याय उरला नव्हता. तंत्रज्ञानाच्या प्रगती मधला, Combine Harvestor हा आणखी पुढचा टप्पा. या मशीन्समुळे पिकाची कापणी आणि मळणी एकाच वेळी करता येऊ लागली आणि शेतातलं उभं पीक सरळ निवडलेल्या धान्याच्या स्वरुपात शेतकर्‍याच्या हातात येऊ लागलं.

२० व्या शतकातील शास्त्रीय संशोधनाने शेतकर्‍याचे जीवन चांगलेच बदलून टाकले. रासायनीक खते वापरून जमिनीचा कस वाढवणे, पिकांच्या नवीन नवीन जाती वापरून धान्योत्पादन वाढवणे, नवनवीन औषधांचा वापर करून पिकांवरील रोगांचा सामना करणे, वगैरे गोष्टी शक्य होऊ लागल्या. Hybrid crops नी आणखी पुढचे पाऊल टाकले. त्याही पुढे जाऊन दुष्काळाला तोंड देऊ शकतील, रोगांचा प्रतिकार करू शकतील, लवकर तयार होऊ शकतील अशी विविध प्रकारची पिकं, ह्या प्रगतीच्या वाटेवरच्या आणखी पुढच्या पायर्‍या ठरल्या. या सर्व आधुनिक साधनांमुळे, शेतकर्‍याला निसर्गावर अधिक नियंत्रण ठेवता येणे शक्य होऊ लागले.

आता तर उपग्रहांच्या मदतीने शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज अधिक लवकर व अचूक स्वरूपात मिळू लागला आहे. याचा फायदा म्हणजे शेतीची कामे करण्यासाठी, हवामानाच्या लहरीवर न अवलंबून रहाता शेतकरी आपल्या सोयीनुसार त्यांचे वेळापत्रक आखू शकतो आहे. इंटरनेट देखील शेतकर्‍याच्या दैनंदिन कामाचं एक महत्वाचं अंग बनलं आहे. सारे जग ही एक मोठी बाजारपेठ बनत चालल्यामुळे, जागतिक घडामोडींचा अभ्यास करून शेतकरी आपल्या शेतात त्या अनुषंगाने फेरफार करू शकतो आहे.

अर्थात सर्वसाधारण अमेरिकन शेतकर्‍याची आणि सर्वसामान्य भारतीय शेतकर्‍याची जीवन पद्धत आणि कामाचं स्वरूप यांची सांगड कितपत घालता येईल हा मोठाच प्रश्न आहे.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..