नवीन लेखन...

नात्यांच्या बदलत्या भूमिका

शब्दांमध्ये इतकी व्यापकता, समर्थता सामावलेली असते की, ज्याप्रमाणे चिंतामणी मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो, अगदी त्याचप्रमाणे शब्दांमध्येही माणसाच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुर्या करण्याचं सामर्थ्य असतं. फक्त या शब्दांची आयोजना करण्याचं कौशल्य माणसाकडे पाहिजे. हुकमत गाजवण्यापेक्षा नम्रतापूर्वक बोलणं कधीही उपयुक्त ठरतं.


प्रत्येक माणसाला सुखद आठवणींच्या झुल्यावर झुलायला खूप आवडत असतं. वर्तमानकाळात चांगले-वाईट अनेक प्रसंग येतात. घटना घडत असतात. कधी कधी तर अतिशय कटू अशा अनुभवांना सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग’ निर्माण करणारी सुखी क्षणांची दीर्घकाळी अशी मालिकाही त्याच्या आयुष्यात येऊन जाते. सुखदुःखाच्या दोन्ही कालावधीमध्ये गतस्मृतींना उजाळा देणारे अनेक क्षण कळत-नकळत नजरेसमोर चित्रित होत रहातात. या साकारणार्या चित्रात संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर लालकेशरी होत मावळणारा आणि त्याचबरोबर मनाला व्याकुळ करणारा सूर्यास्त असतो. ज्याच्यावर आपण सर्वस्व उधळून निःस्वार्थ प्रेम करतो त्या व्यक्तीचा सहवास असतो. सगुण-निर्गुण, साकार-निराकार ज्याला आपण कधीही पाहिलेलं नाही. अशा परमेश्वराचा ध्यासही  असतो. सुरेखशा वळणावरचा प्राजक्ताचा सडा, हिरवंगार गवत, निळं निळं आकाश, मंद वार्याची झुळुक, सगळा निसर्गच आपल्याशी संवाद साधतो.

खरं तर मनुष्य या जगात येताना एकटाच येतो नि जातानाही एकटाच जातो. जीवन-मृत्यूच्या या मधल्या प्रवासात त्याला अनेकांची साथ सोबत मिळते. रहायला घर, पांघरायला वस्त्र, खायला अन्न मिळालं की माणूस हा बुद्धिप्रधान प्राणी शरीराने तग धरतो. परंतु जेव्हा त्याला रंग, रूप, नाद, गंध, स्वाद हा सगळा आनंद अनुभवायला मिळतो, तेव्हाच तो खर्या अर्थाने जगत असतो.

ऋतू बदलले म्हणुनी कां कधी
नाते बदलत जाते?
जन्मापासुनी सुरू जाहल्या
प्रवासात ते रुजले

हे जरी खरं असलं तरी आज हे नात्यांचे ऋणानुबंध टिकून राहिले आहेत का? मनाला अस्वस्थ करणारा हा प्रश्न ज्येष्ठत्वाच्या दिशेने वाटचाल करणार्या आजच्या पिढीला निश्चितच पडलेला आहे. काळाचा गतिमान प्रवाह या ओघवत्या प्रवाहातच बदल हे झालेच पाहिजेत. परंतु माणूस-माणूस अंतर वाढवणारा बदल सामाजिक स्थैर्य टिकवू शकेल का?

एकीकडे पर्यावरण संरक्षण, माणसाचं उदात्त जगणं याविषयी बोलताना माणूस माणूस जपण्याचे प्रयत्न छोट्या-छोट्या घरांतूनही होतांना दिसत नाहीत. मुंबईसारख्या महानगरात  जगताना आलेला यंत्रवतपणा, समृद्धीबरोबर आलेली मानसिक नकारात्मकता यामुळे आर्थिक-सामाजिक दुर्बलता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मनाची ‘संवेदनशीलता’ हरवत चालली आहे. जगातली सगळीच माणसे ‘भौतिक दृष्ट्या’ समृद्ध होत असताना आजूबाजूच्या सजीवतेची दखल घेण्यासही टाळाटाळ करीत आहेत.

मोबाईल, कॉम्प्युटरसारख्या यंत्रांमार्फत संपूर्ण जगाशी संवाद साधताना चिमुकल्या मुलांवर होणारा अन्याय लक्षात येऊनही तिकडे डोळेझाक करणारे पालक पाहिल्यावर होणारे परिवर्तन विधायक दिशेने घडणारे आहे का? ही शंका, हा प्रश्न आज ज्येष्ठ नागरिकांना भयग्रस्त करीत आहे. वृद्धांसाठी – त्यांची जबाबदारी टाळण्यासाठी, अनेक आश्रम उभारले जात असताना छोट्या बाळांना वेळ देता येत नाही. म्हणून चोवीस तास त्यांची जबाबदारी घेणारी पाळणाघरे सुद्धा निर्माण केली जातील का? की 25-30 माणसांचे कुटुंब छोटे-छोटे होत ते फक्त दोन माणसांपुरतेच मर्यादित राहील का? DINK Society चा प्रचार प्रसार होऊन ‘डबल इन्कम नो किड’ यावर समाज नव्याने स्थापन होईल का? अनेक प्रश्न एकातून एक नवे नवे निर्माण होणारे – विचारांच्या भोवर्यात वादळ निर्माण करणारे – आजच्या ज्येष्ठांच्या समोर अस्वस्थता निर्माण करीत आहेत.

पूर्वी 25-30 माणसांच्या कुटुंबात एखाद्या अंध-अपंग-दुर्बल माणसाला सहजपणे सांभाळले जायचे. त्यांच्या मुला-बाळांची काळजी घेतली जायची. कोणतीही उपकाराची भावना न ठेवता आपोआप ‘माणूसपण’ जपले जायचे. आज क्षणाक्षणाला घडत जाणारे परिवर्तन असुरक्षितता वाढवत आहे.  मानसिक आरोग्य ढासळत चालले आहे. ‘जगण्याचे संदर्भ बदलत चाललेत आता. भावना, संवेदना हरवत चालल्यात आता. माणसांच्या बाजारात माणूस माणूस विकत घेतो. माणुसकीच्या गप्पा फक्त म्होरक्या मारत सुटतो. भौतिकतेच्या सन्मानावर शब्द इथे खर्ची  पडतात. ‘ग्लोबलायझेशन’च्या युगात खरा आनंद विसरून जातात.

आणि हा खरा आनंद जर प्राप्त झाला नाही तर माणसांचं सगळं जगणंच निरर्थक ठरलं. ‘पैसा आवश्यक आहे. परंतु ठराविक मर्यादेतच. आपण स्वतःपुरती एक रेष आखून घेतली की, त्यापलीकडचा पैसा निदान त्यातला काही भाग गरजू लोकांना देण्याची वृत्ती आंतरिक समाधान देऊन जाते. नात्यांची नाळ ही अशी जुळू लागल्यावर केवळ रक्ताची नाती जवळची वाटण्यापेक्षा भोवतालच्या सगळ्यांना माणसांनी ऋणानुबंध जुळून येतात. एक व्यापक सकारात्मकता मनाभोवती सुरक्षिततेचा कोश निर्माण करते. समाजात हे निर्माण झालेले बदलते परिवर्तन-नात्यांच्या बदलत्या भूमिकांना सुरेखशा वळणावर नेऊन उबदार छाया देऊ शकते.

सासू-सुनेचं भांडण, नणंद-भावजयीचे वाद हे तर आजही घराघरात आढळतात. परंतु काही कुशल सासवा किंवा सुना, नणंद-भावजया यातून केवळ वाणीच्या, शब्दांच्या आयोजनातून समतोल सुवर्णमध्य शोधून चार भिंतींच्या आतली सगळीच नात्याची माणसं सांभाळताना त्यांना जपताना दिसतात.

ज्ञानदेवांनी यासाठीच शब्दांना महत्त्व दिलं आहे. माउली सांगतात –

जैसे शब्दांचे व्यापकपण।
न देखिजे असाधारण।
पहायला भावज्ञा फावती गुण।
चिंतामणीचे॥

शब्दांमध्ये इतकी व्यापकता, समर्थता सामावलेली असते की, ज्याप्रमाणे चिंतामणी मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो, अगदी त्याचप्रमाणे शब्दांमध्येही माणसाच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुर्या करण्याचं सामर्थ्य असतं. फक्त या शब्दांची आयोजना करण्याचं कौशल्य माणसाकडे पाहिजे. हुकमत गाजवण्यापेक्षा नम्रतापूर्वक बोलणं कधीही उपयुक्त ठरतं.

आज छोट्या मुलांना वाढदिवसाच्या दिवशी मोठमोठ्या किंमती भेटवस्तू नको असतात. तर आईबाबांशी बोलावं, त्याच्याकडून कौतुक करून घ्यावं म्हणून त्यांचा थोडासा वेळ हवा असतो. झोपताना आईने मायेने थोपटलं की निवांत शांत झोपही लागते. वार्धक्याकडे झुकलेल्या मुलांच्या आजी-आजोबांनाही मुलाकडून-सुनेकडून मनातलं सांगण्यासाठी किंचितसा वेळ हवा असतो. पाय दुखत नसले तरी पाच मिनिटं कुणी हळूवार चेपून दिले तर तो स्पर्श हवा असतो. परंतु आजची सगळी तरुण पिढी  त्यांना मिळालेला वेळ फेसबुक, यू ट्युब, वॉट्सअॅप, इन्स्टाग्राम अशा सोशल मिडियाच्या आभासी जगात इतकी व्यस्त झाली आहे की, त्यांना सार्या विश्वाशी संबंध प्रस्थापित करता करता घरातल्या माणसांशी संवाद साधणंही दुरापास्त  ठरते आहे. या  सगळ्यातून तरुण मुलं नको त्या अॅपद्वारे विनाशकारी खेळामध्ये गुंतत चालली आहेत. मन मोकळं करायला, मार्गदर्शन करून पाठीवरून हात फिरवायला जवळचं कुणीच नसल्याने आत्मघाताकडे वळताहेत. ‘प्रगती’ अधोगतीच्या दिशेने भरधाव,  सुसाट वेगाने पळते आहे आणि ज्येष्ठ फक्त या सगळ्या गोष्टी जाणून-उमजून काहीही करता येत नाही यासाठी हतबल होऊन बसले आहेत. अनवधानाने केलेल्या काही गोष्टी सायबर  क्राइम  म्हणून त्याची नोंद होते व त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात. सोशल मिडियावर व्यक्त होताना किंवा इतरांची मते फॉरवर्ड किंवा लाईक करताना सामाजिक भान राखणं त्याचा खरेखोटेपणा तपासणं खूप महत्त्वाचं असतं. हानिकारक गोष्टी व्हायरल होणं खूप धोक्याचं ठरतं. ‘या सगळ्याच बाबतीत जागरुक राहून मर्यादित प्रमाणात या माध्यमांचा वापर होणं गरजेचं आहे.’ हे  ज्येष्ठांचं सांगणं ऐकायला ते इतरांना सर्वांनीच पटवून द्यायला पुढाकार घेणं अत्यावश्यक आहे.

स्वतःच्या मनोरंजनात सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात पोहायला गेलेले पाच मित्र या मित्रांचा एक प्रिय मित्र गटांगळ्या खात त्या खोल पाण्यात बुडत चालला आहे. अखेरचे श्वास मोजतो आहे. इतकी गंभीर गोष्टही इतर चार मित्रांच्या ध्यानात येत नाही.  इतकी ही आजची पिढी मोबाईल नामक यंत्राच्या आधीन झाली आहे. रेल्वे स्टेशनच्या जिन्यावरून गर्दीमुळे धडाधड माणसे पडताना, त्यांचा व्हिडिओ चित्रित करून लगेच शेअर केला जातो. पण त्या माणसांना सावरण्यासाठी कुणी पुढे येताना दिसत नाही. ही उदाहरणे म्हणजे समाजातील संवेदनशीलता नष्ट होत असल्याचे द्योतक आहे.

रक्ताचे नाते, मैत्रीचे नाते, व्यावहारिक नातेसंबंध या सगळ्यांपेक्षा ‘माणुसकीचे नाते’ खूप महत्त्वाचे ठरते. हे नाते ठरवून, समजून प्रस्थापित होत नसते. तर आपोआप आपल्या संवेदनशील वृत्तीमुळे निर्माण होते. रस्त्यावर अपघात झाल्यावर केवळ बघ्याची भूमिका न घेता, त्या माणसाला तातडीने डॉक्टरकडे नेणारी माणसंही असतात. मिठाईच्या दुकानात हातात अपुरे पैसे असल्यामुळे फक्त पदार्थ न्याहाळणारी छोटी गरीब मुले दिसल्यावर त्यांना हवी ती मिठाई स्वतःचे पैसे खर्च करून त्यांच्या हातात खाऊची भेट देणारी काही माणसे आढळतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून माणुसकी जपणारे हे नातेसंबंध आजकाल दुरावत चालल्याचे दिसते. कारण समोरच्याला जाणून घेणं, त्याच्या मनात काय चाललंय हे समजून घेणं, यासाठी माणसाकडे वेळच नाही आहे. अर्थातच ज्याप्रमाणे एखादा अवयव  त्याचं कार्य करीत नसेल तर  तो शेवटी निष्क्रिय होऊन जातो. त्याचप्रमाणे माणसाचे मनही निष्क्रिय व्हायला वेळ लागणार नाही. त्याचे ‘रोबट’मध्ये रूपांतर होऊन कचरा काढण्याचे काम करणारा ‘रुम्बा’पासून माणसाच्या हृदयाची सर्जरी करणार्या डॉक्टरपर्यंत सगळीच कामे हे यंत्र करणार आहे आणि आज हे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत.

नात्यांच्या अनेक पदरांनी विणलेले माणसाचे जीवन विस्कळीत होऊ नये यासाठी आयुष्य भरजरी करणारा, हा कौटुंबिक नात्यापासून सामाजिक-माणुसकी जपणार्या नात्यांपर्यंतचा हळुवार विणलेला रेशमी गोफ जोपासला गेला पाहिजे.

जीवनाची मध्यान्ह उलटून गेली की एकटेपणाची जाणीव होत रहाते. एक एक जिवलग मित्र आपल्यापासून विविध कारणांनी दूर होऊ लागतात. त्यावेळी त्यांच्या आठवणीने मन व्याकुळ होतं. राग, अहंकार, दुरावा बाजूला ठेऊन नात्याच्या या नाजूक धाग्यांना वेळीच जपणं खूप आवश्यक ठरतं. यासाठी काळाच्या ओघवत्या प्रवाहाला ‘नात्यांच्या बदलत्या भूमिकां’कडे विधायक स्वरूपातून पाहून, त्यांचा विचार होणं आणि नात्याचं रेशमी वस्त्र नव्याने विणून घेणं गरजेचं आहे.

संत ज्ञानदेवांनी यासाठीच म्हटलं आहे,

मी अविवेकाची काजळी।

फेडोनि विवेकदीप उजळी।

तै योगिया पाहे दिवाळी।

निरंतर॥

समाजामध्ये सर्व लोकांमध्ये ‘विवेकजागृती’ करणं हे ईश्वरी कार्य आहे. ‘विवेक’ शब्दातला ‘विच्’ या संस्कृत धातूचा  अर्थ पृथ्थकरण असा आहे. सत्य-असत्य, धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, चांगलं-वाईट अशा परस्परविरोधी शब्दांमधून अचूक  निवड करण्याचं बुद्धीचं विलक्षण सामर्थ्य म्हणजे ‘विवेक’. या विवेकबुद्धीचे आचरण जेव्हा अधिकाधिक माणसे करतील, तेव्हाच समाजातील ताणतणाव, हिंसाचार, मानसिक अस्वस्थता कमी कमी होत जाईल. अविचाराची काजळी दूर होऊन विवेकाचे दिवे प्रकाशाची वाट दाखवतील आणि माणसाला दिवाळीचा आनंद फक्त चार-पाच दिवसांपुरता मर्यादित न मिळता, वर्षाचे 365 दिवस, वर्षभर अशी अनेक वर्षे-आयुष्यभर-चिरंतन तो आनंदाच्या डोही आनंदाच्या लहरींचे अनुभव होत राहील.

‘नात्यांच्या बदलत्या भूमिका’ पार पाडताना चिरंतन आनंदाची निर्मिती कशी करता येईल हे लक्षात घेऊन वृत्तीचा हळुवारपणा, मनाची भावनाशीलता जोपासणं,  जपणं-सुसंवादातून एकत्र येत, माणसाने उन्नत होऊन नव्या दिपावलीच्या प्रकाशात स्वतः उजळून इतरांनाही प्रकाशाची दिशा दाखवावी हीच सदिच्छा!—-****—-

–रेखा नार्वेकर

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..