नवीन लेखन...

द चेंज… (कथा) भाग-४

द चेंज… (कथा) भाग-४

विनोद साहेब स्वतः तागे चेक करीत होते. एक-एक डिफेक्टस पहात होते. विस्कटलेल्या केसांतून ते पुन्हा पुन्हा हात फिरवत होते. चेकिंग रजिस्टर त्यांनी बर्‍याचदा चेक केलं!

“वेद तेरे को क्या हुआ था? ये डिफेक्टस भी ऐसे हैं कि, मेंडींग में भी हम कुछ नहीं कर सकते। अब क्या जवाब दूं मैं रेमंडवालोंको?”

“सर आज भी मैं बोलता हूं कि,उस दिन मशिन में कोई खास प्रोब्लेम नहीं थी। किसी भी विवर को,या फिर भोसले को भी आप पूछलो!”

“उन लोगोंका जवाब मुझे नही चाहीये,मुझे तुम्हारी बात सुननी हैं। तुम्हारी जगह कोई दुसरा होता तो,मैं आज ही उसको बाहर का रास्ता दिखाता। पर तेरे उपर मुझे भरवसा हैं,करके तेरे को पुछ रहा हूं ना?”

नंतर विनोदसाहेबांनी सारं खातचं डोक्यावर घेतलं!

वेदच्या मते झाला प्रकार हे एक कोडचं होतं? कारण नंतरच्या शिफ्टमध्ये सर्व मशिन्स व्यवस्थित चालल्या होत्या!

सगळं झाल्यावर विनोदसाहेब वेदला बर्‍याच गोष्टी शांतपणे समजावून सांगत होते. थोड्याच अवधीत त्यांना वेदच्या कामाची पद्धत आवडू लागली होती. वीविंग मास्तर कपूरच्या कामावर ते फारसे खूश नव्हते. आणि लवकरच वेदला वर्क्स मॅनेजर पद,म्हणजे कपूरच्याही वरचं पद देण्याची तयारी चालू होती. अशातच वेदने खराब प्रोडक्शन दिलं होतं!

जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसा वेदमध्ये एक नवा जोश दिसू लागला. आता त्याची नजर होती वर्क्स मॅनेजर या पदावर! त्यादृष्टीने फॅक्टरीत त्याची पाऊले पडू लागली. ग्वॉलियरवाल्यांनी जॉब वर्क दिल्याने एक नवा उत्साह त्याच्यामध्ये संचारला होता.

विनोदसाहेब खुशीत होते,आज ना उद्या रेमंडचही जॉब वर्क पून्हा मिळेल याची त्यांना खात्री होती. पाच नव्या ऑटोमिक सुल्झर मशिन्स बसविण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं. जबाबदार्‍या वाढणार होत्या व माणसेही लागणार होती. त्यामुळे वर्क्स मॅनेजर पदाची गरज विनोदसाहेबांनी अनेकदा बोलून दाखवली होती. वीविंग मास्तर कपूर यांनाही त्या पदाची अपेक्षा होती. पण विनोदसाहेबांची मेहेरनजर वेदवर आहे याची जाणीव कपूर यांना झाली होती. जॉबर भोसलेच्या साह्याने वेदला कसा निष्प्रभ करता येईल या चिंतेत ते होते!

एका अंतर्गत राजकारणाला सुरुवात झाली होती. रेमंडचं काम केवळ वेदमुळे गेलं,या गोष्टीचं कपूर व भोसले यांनी खूप भांडवल केलं होतं! वातावरण संघर्षमय झालं होतं!

वैदेहीचं मॅनेजर म्हणून काम करणं आणि आपण मात्र साधे शिफ्ट इंचार्ज म्हणून काम करणे, वेदला कधी कधी त्रासदायक वाटायचं! याचमुळे वैदेही आपल्यावर सत्ता गाजवायचा प्रयत्न करते, अशी शंकाही त्याच्या मनात येऊन जाई! पण असं असलं तरी तिचं कर्तृत्व निर्विवाद होतं! स्वबळावर ती या पदापर्यंत येऊन पोहचली होती. तिच्या बोलण्या-वागण्यात कमालीचा सफाईदारपणा होता.

नेहमीप्रमाणे बलराम चहा घेऊन आला. रात्रपाळी असली की, चहाचं कॉन्ट्रॅक्ट बलरामकडे असे. गरीब स्वभावाचा बलराम वेदला विशेष आवडायचा! तोही वेदचा शब्द कधी खाली पडू देत नसे.

रात्रपाळीचा वेदला अलिकडे कंटाळा येऊ लागला होता, पण आता काही दिवसांचीच गोष्ट होती. एकदा का वर्क्स मॅनेजर पद मिळालं की रात्रपाळ्या थांबणार होत्या!

अचानक लाइट गेली. सगळीकडे काळोख पसरला. मशिन्सची खटखटं थांबली. सवयीप्रमाणे वेदने मनगटी घड्याळावर मुठ धरली, काटे दिड वाजल्याचं दर्शवत होते. वेदच्या छातीत उगाचचं धस्स झालं! अष्टमीची रात्र होती.
“बलराम, मेणबत्ती पेटवं!” शांत वातावरणात वेदचा घोगरा आवाज घुमला. मेणबत्तीच्या अंधूक प्रकाशात वेदला बलरामचा चेहरा खूप भेसूर वाटला. वेद ऑफिसच्या बाहेर आला. खात्याचं मागचं शटर उघडून कामगार हास्यविनोदात रंगले होते. वेदला पाहताच थोडी शांतता पसरली.

“या मास्तर बसा!” घोळक्यातून आवाज आला.

“नाही चालूद्या तुमचं!” वेद पुटपुटला व वॉचमनला टाइम नोट करायला सांगून,ऑफिस समोरील गवतावर अलगद पहुडला!

शांत पाण्यात खडा टाकावा तसा बलराम मध्येच बोलला,“मास्तर नका पडू तिथे काळोखात,उगाच जनावरं वगैरे फिरतात तिकडे!”

“काही होत नाहीरेऽ बाबा,मरायला माणसे कुठेही मरतात फक्त वेळ यावी लागते!”

बलराम निरुत्तर झाला. मख्खपणे ऑफिसच्या पायरीवर बसून राहिला. शेवटपर्यंत पॉवर येण्याची चिन्हं नव्हती. कामगार जागोजागी पेंगूळले होते. सकाळी फर्स्ट शिफ्टची माणसे आली,तसा वेद निघाला.

घरी येताच वेद फ्रेश होऊन बेडवर गेला. वैदेहीने आज सुट्टी घेतली होती.

एक सुरेख वळण घेत वेदची बुलेट पेट्रोलपंपात शिरली. वैदेहीने, वेद भोवतीची आपली हाताची पकड सैल केली. टाकी फूल होताच वेदने बिल पेड केलं. पुन्हा एकदा सफाईदार वळण घेत गाडी हायवेला लागली. लाबलचक पसरलेला रस्ता, भोवतालची गर्द झाडी आणि वैदेहीची घट्ट मिठी! वेदचा स्पीड वाढत होता. एकामागोमाग वाहनं ओवरटेक करीत, वेदची बुलेट दौडत होती. आणि अचानक ओवरटेक करताना, समोरून एक ट्रक येताना वेदला दिसला. दोन गाड्यांच्या मधून निघताना वेदचा अंदाच चूकला आणि समोरच्या गाडीचा फटका बुलेटच्या मागच्या बाजूला बसला. व दोघे दोन दिशांना हायवेवर फेकले गेले! सर्व शक्तिनिशी वेद उठला व वैदेहीच्या दिशेने धावला,पण वैदेहीने त्याच्या हातातच प्राण सोडला. हे सहन न झालेल्या वेदने गगनभेदी किंकाळी फोडली.. वैदेहीऽ!

आणि वेद दचकून जागा झाला. त्याची छाती धाडधाड उडत होती. सर्व अंग घामाने थपथपलं होतं. शेजारीच केस मोकळे सोडलेली वैदेही पाहून त्याला अक्षरशः रडू कोसळले! त्याच्या खांद्यावर हात ठेवत वैदेहीने त्याला जवळ घेतलं!

“वाईट स्वप्नं पाहीलसं का माझ्यावरुन?”

वेदने उत्तर देण्याच्या आत, त्याचा मोबाईल फोन वाजला. समोरुन वीविंग मास्तर कपूरचा फोन होता.

“वेद यारऽ गजब हुआ,अपना जॉबर भोसले..!”

“क्या हुआ उसको? जल्दी बोलो!”

“ही इज नो मोर! वॉरपिंग मशिनमें वह फस गया। उसका बॉडी पहचान के लायक नहीं रहा। तू जल्दी आ जाओ!”

वेद क्षणार्धात फॅक्टरीकडे निघून गेला.

कालची ती रात्र वादळापूर्वीची शांतता होती. बरोबर अष्टमीलाच ही घटना घडली होती. वेद अंतर्बाह्य हादरला होता. वैदेही वेदला सावरण्याचा प्रयत्न करीत होती.

“वैदेही, मी ही फॅक्टरी सोडतोय! आता मला तिथे काम करवणार नाही.”

“जे झालं तो एक अपघात होता वेद आणि असे अपघात सगळीकडेच होत असतात. तेंव्हा त्यात एवढं घाबरून आणि गोंधळून जाण्यासारखं काहीही नाही.”

“जगाच्या दृष्टीने तो एक अपघात असेल, पण आम्हा फॅक्टरीवाल्यांच्या दृष्टीने तो केवळ अपघात नाही. कोणतीतरी अदृष्य शक्ति तेथे वास करतेय. ती जागा झपाटलेय एवढं निश्चित!” वेद वैदेहीचा हात हातात घेत म्हणाला.

“उद्याच आपण अष्टविनायकला जाऊया,फॅक्टरी सोडायची की नाही ते आल्यावर निवांत ठरवू!” वैदेही त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाली.

दूरवरुन लता मंगेशकर यांच्या गाण्याचे स्वर ऐकू येत होते –
“सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची..!”

(समाप्त)

(वरील कथा ही संपूर्णतः काल्पनिक आहे.)

लेखक: श्री.सुनील देसाई
३१/०३/२०२२
मो.९९६७९६४५४२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..