7 जुलै 1967 रोजी स्थापन झालेल्या ‘आदर्श मित्र मंडळ’चे मार्गदर्शक-संस्थापक केशवराव मोरे म्हणजे ठाण्याच्या नाट्यवर्तुळातले एक बुजुर्ग नाव. केशवरावांच्या नेतृत्वाखाली श्रमिक वर्गातले काही तरुण एकत्र आले आणि आदर्श मित्र मंडळ सुरू झाले. ‘लग्नाआधी वरात’, ‘भले बहाद्दर’, ‘गौरीशंकर’ इ. कामगार क्षेत्रातली नाटके बसवून संस्थेने आपला श्रीगणेशा केला. ‘तीन चोक तेरा’, ‘खुनी पळाला काळजी नसावी’, ‘स्टील फ्रेम’, ‘असाही एक अभिमन्यू’, ‘अहो मला जगायचंय’, ‘महापुरुष’, ‘आंटी’, ‘अवघा रस्ताच विरघळलेला’, ‘शरीरसंग’, ‘अश्वत्थाची मुळे’, ‘काकस्पर्श’ अशी वेगवेगळ्या प्रकृतीची नाटके राज्य नाट्यस्पर्धेत करून आदर्श मित्र मंडळाने आपले स्थान निर्माण केले.
मार्गदर्शक केशवराव मोरे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली विलास सावंत, जगदिश राऊत, अनंत घाग, विजय मतकर, गंगाराम साळुंखे, पंढरीनाथ सावंत, हरिश्चंद्र चव्हाण, जयराम शिंदे, अनंत शिंदे, बाजीराव सुर्वे, रमाकांत पाटील, श्री. आर्गे या मंडळींनी स्थापनेपासून काम केले. पुढच्या काळाच भास्कर पळणीटकर, ज्योती पळणीटकर, सुधाकर बक्षी, माधव धामणकर, प्रकाश कुलकर्णी, चंद्रकांत वैद्य, सुषमा पराडकर-रेगे, चारुशीला मोरे, संध्या मेकडे, मधुकर पालव, मधु गोरक्ष, दिनानाथ लोंढे, काशीनाथ लेले, नंदकुमार लबडे ही मंडळी आदर्श मित्र मंडळातून रंगभूमीची सेवा करू लागली.
कामगार कल्याण मंडळाच्या अंतिम फेरीत पहिले आलेले ‘महापुरुष’ नाट्यरसिकांच्या आजही स्मरणात आहे. हिंदी नाट्यस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवणे ही आदर्श मित्र मंडळाची खासियतच. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकर कलाकारांनी सादर केलेले पहिले नाटक केशवराव मोरे यांनीच दिग्दर्शित केले होते.
साभार: ठाणे रंगयात्रा २०१६ मासिक.
Leave a Reply