नवीन लेखन...

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग २

Thanksgiving Sale in America - Part 2

आमचं सू सेंटर हे छोटं गाव, आयोवा राज्याच्या अगदी वायव्य (north west) कोपर्‍यात येतं. तिथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्याची हद्द सुरू होते. थोडं वेगळ्या दिशेने उत्तरेला गेलं की मिनेसोटा राज्याची हद्द सुरू होते आणि नैऋत्य दिशेला (southwest) गेलं की तासा दीड तासानी नेब्रास्का राज्याचा काही भाग लागतो. ही सगळी राज्यं तशी भरपूर मोठी आहेत आणि सारीच शेती प्रधान! बहुतेक वस्ती ही छोट्या गावांतून किंवा अगदी छोट्या गावकुसांतून! सू सेंटरहून सव्वा तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्यातलं सू फॉल्स (Sioux Falls) नावाचं दीड दोन लाख लोकवस्तीचं मोठं शहर आहे. साउथ डकोटा, आयोवा, मिनेसोटा आणि नेब्रास्का या चारही राज्यांच्या सीमेलगतचं असं हे सर्वात मोठं शहर. त्यामुळे दोन तीन तासांच्या अंतरावरूनही लोकं ड्राइव्ह करून सू फॉल्सला शॉपिंग करायला येतात.

या सू फॉल्समधे नऊ दहा वर्षांपूर्वी बर्‍यापैकी भारतीय वस्ती होती. साधारणपणे पन्नास सत्तर भारतीय कुटुंबे असावीत. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या वगैरे निमित्ताने या भारतीय मंडळींनी एकत्र यावं, यात काही नवल नव्हतं. आसपासच्या छोटया गावांत, चुकून माकून येऊन एकाकी पडलेल्या आमच्यासारख्या थोडयाफार भारतीयांना तर असे पन्नास शंभर भारतीय चेहरे एकत्र पाहूनच भरून यायचं. हळू हळू थोडयाफार ओळखी होऊ लागल्या होत्या. त्यातूनच सू फॉल्समधेच राहणारं गुर्जर नावाचं एक महाराष्ट्रीयन मुंबईकर कुटुंब आमच्या चांगलं ओळखीचं झालं होतं. एकमेकांकडे जाणं येणं सुरू झालं होतं.

अशाच एका भेटीमधे थॅंक्सगिव्हींगच्या सेलचा विषय निघाला होता. आम्ही आमची उत्सुकता दर्शवली आणि गुर्जरांनी आम्हाला आदल्या दिवशीच त्यांच्याकडे येऊन राहायचा प्रस्ताव दिला. पहाटे सहा वाजता, दुकाने उघडण्याच्या आधी, आमच्या सू सेंटरहून नोव्हेंबरच्या कडक थंडीमधे दीड तास ड्राईव्ह करून येण्याच्या कल्पनेने आम्ही आधीच गारठलेले होतो. त्यामुळे आदल्या रात्रीच सू फॉल्सला येऊन गुर्जरांच्या घरी मुक्काम ठोकायचा, ही कल्पना फारच भन्नाट होती. श्रीयुत गुर्जरांना स्वत:ला, पहाटे उठून थंडीत कुडकुडत शॉपिंगला जायचा उत्साह नव्हता. पण सौ. अनुपमा गुर्जर आणि त्यांची अकरा बारा वर्षाची मुलगी रश्मी मात्र एका पायावर तयार होत्या. त्यामुळे रात्रीचा मुक्काम आणि अनुपमाचे अनुभवी मार्गदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा लाभ अचानक पदरात पडला. आंधळ्याने एकाही डोळ्याची अपेक्षा केली नव्हती आणि देवाने अचानक दोन्ही डोळे दिले होते.

आम्ही थॅंक्सगिव्हींगच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता गुर्जरांच्या घरी पोहोचलो. थोडं फ्रेश होऊन स्थिरस्थावर होताच अनुपमाने वर्तमानपत्रांचा गठ्ठा पुढयात टाकला. नशीब आम्ही DVD – VCR player घ्यायचं आधीच ठरवलं होतं. नाहीतर वर्तमानपत्रांमधल्या त्या जाहिराती आणि विविध स्टोअर्सचे fliers पाहून आम्ही चक्रावूनच गेलो असतो.

– डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..