नवीन लेखन...

जागतिक महिला दिनाचा इतिहास

The History of World Women's Day

दरवर्षी ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून साजरा केला जातो. हीच तारिख का? आणि हा दिवस कधीपासून साजरा व्हायला लागला? जरा बघूया इतिहासात डोकावून.

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.

१८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला.

१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली.

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या’ व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

आता तर बँका, खाजगी कार्यालयांबरोबरच सरकारी कार्यालयांमधूनही ८ मार्चला महिला दिन साजरा व्हायला लागला आहे..

— पूजा प्रधान
(संदर्भस्त्रोत – इंटरनेट संकेतस्थळे)

2 Comments on जागतिक महिला दिनाचा इतिहास

  1. नमस्कार.
    पहिली कमेंट मोठी झाली, म्हणून थांबलो. इथे, पुढील थोडासा ऊहापोह करतो –
    # एक बाब ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, महिला हक्काची चळवळ करावी (मग ती विमेन्स् लिब् असो, किंवा मतदानाच्या हक्कासाठी समानता, हा मुद्दा असो, किंवा महिला दिन साजरा करून स्त्री-पुरुष समानतेचा उद्.घोष करणें असो) , असे महिलांना कां वाटलें ? तर त्याचें मुख्य कारण आहे की असमनतेची मध्य युगात हद्द झाली होती.
    # जेव्हां मानवांच्या भटक्या टोळ्या होत्या, व Hunter-Gathers असे सोसायटीचें रूप होते, तेव्हां ही समानता आपोआपच होती. वैदिक काळातही ती होती. धरात येणार्‍या सुनेलाही किती मान असे, हें त्याकाळातील साहित्यावरून कळतें. नंतर हळूहळू ती समानत कमी कमी होत गेली, व संस्कृती पुरुषप्रधान होत गेली.
    #पूर्वी स्वयंवर म्हणजे मुलीला स्वत:चा नवरा निवडायचें स्वातंत्र्य होतें. पण राम-कृष्णाच्या काळातही तें तेवढें राहिलें नव्हतें. सीता स्वयंवर म्हणजे काय, तर जनकाचा ‘पण’ जो पूर्ण करील त्याला सीतेनें माळ घालायची ! द्रौपदी स्वयंवर म्हणजे काय तर, मत्स्यभेदाचा ‘पण’ जो पूर्ण करील, त्याला द्रौपदीनें पती म्हणून स्वीकारायचें.
    ( आणि, अखेरीस तिला , एक नव्हे, तर पांच बंधूंना पती म्हणून स्वीकारावें लागलें. ही कुठली समानता ?) . भीष्मानें अंबा-अंबिका-अंबालिका यांना युद्ध करून , आपल्या बंधूंसाठी पळवून आणले, जणूं काहीं स्त्री म्हणजे एखादी वस्तूच आहे ! अंबेचें शाल्वावर प्रेम होते. पण काय झालें ? भीष्मानें तिला परत धाडलें, पण शाल्वानें झिडकारलें. तिनें अग्निप्रवेश केला.
    रुक्मिणीची बाब ही अपवादात्मकच. किंवा पृथ्वीराज-संजोगिता यांची.
    # राजांच्या गृहीं तर, कन्या या राजकारणासाठीच वापरल्या जात. सेल्युकसची मुलगी चंद्रगुप्ताच्या दरबारी आली, तेव्हां तिला काय वाटलें असेल ? ( त्यासाठी आचार्य चतुरसेन शास्त्री यांची हिंदी कथा वाचावी). आपल्या वंशांचा अभिमान बाळगणारर्‍या राजपुतांनी आपल्या मुली मुघलांना दिल्या, तेव्हां त्या मुलीइंच्या भावनांचा विचार केला नव्हताच ! त्या जणूं sacrificial goats होत्या ! त्यांनी आपल्या राज्यासाठी . आपल्या आप्तस्वकीयांसाठी, आपल्या जनतेसाठी हा त्याग करायचा, अशें ठरलेलेंच होते, त्यांची व्यक्तिगत इच्छा असो वा नसो. तसेच, राजपूत नारींना शीलरक्षरणासाठी ‘जौहर’ करायची वेळ आली नसती.
    # मध्य-युगातच बुरखा, पडदा, घूँघट , अशा प्रथा सुरू झाल्या. आणि, त्यांना धर्माचा, खानदानीपणाचा ‘साज’
    चढवला गेला ! मधआययुगीन युरोपनें तर हद्दच केली. स्त्रियांना Chastity Belt बांधायाला भाग पाडणें याला अमानुषपणा नाहीं तर काय म्हणायचें ?
    # पानिपतानंतर मराठी स्त्रियांचे काय झालें, फाळणीच्या वेळी स्त्रियांचें काय हालहाल झाले, याची कल्पनाही करवत नाहीं. आज बलुचिसतानात बलुचांच्यामधे ज्या काही मराठा-उपजाती आहेत, त्या कशा निर्माण झाल्या असतील, तें सांगायला नकोच. पाश्चिमात्य स्त्रियांनी, किंवा भारतातीलही स्त्रियांनी, (अगदी लग्न करून ) इराण-अफगाणिस्तान असा देशांमधे प्रवेश केला , तेव्हां त्यांचे काय हाल झाले, यासाठी त्यांची आत्मचरित्रे वाचावीत.
    # आधुनिक काळात , स्त्री-शिक्षण सुरूं झालें, तेव्हां, ‘शिशुपालाचेंइ शंभर अपराध भरलें ’ असे म्हणतात ना, तसे झाले. अती झालें की त्याची प्रतिक्रिया ही येणारच ! म्हणून या समानतेसाठीच्या चळवळी सुरूं झाल्या .
    # तरीही, समानता आली आहे काय ? तशी ती आली असती, तर मग, ‘मॅरिटल् रेऽप’ बद्दल कोर्टात चर्चा व्हायची वेळ आली नसती. हल्लीची ‘राइट टू पी’ ही चळवळ दाखवते की अजूनही समाजाला स्त्रियांच्या प्रश्नांची हवी-तेवढी जाण आलेली नाहीं; समानता ही तर पुढची गोष्ट आहे !
    # माझी दिवंगत पत्नी ही सोशल-सायन्सेस् या विषयाशी, स्वत:चें शिक्षण व academics या दोन्ही तर्‍हेनें , संबंधित होती. ती म्हणत असे की, स्त्रीच्या विशिष्ट phisiology चा , व तिच्यात शारीरिक शक्ती ( physical strength) कमी असण्याचा फायदा, पुरुष-प्रधान संस्कृतीनें शतकानुशतकें घेललेला आहे.
    # म्हणून, आज जर स्त्री-पुरुष समानता खर्‍या अर्थानें व्हायला हवी असेल, तर त्यासाठी पुरुषांनी जागृत होण्याची गरज आहे !
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष नाईक

  2. नमस्कार.
    लेख माहितीपूर्ण आहे. मला नेहमी वाटत आलेले आहे की ‘It’s tough to be a woman’. म्हणून, ‘महिला दिन’ साजरा करण्याला सुरुवात करणार्‍यांचे धन्यवाद. आणि, या विषयावर लेख लिहून माहिती पुरवल्याबद्दल तुमचेही धन्यवाद.
    #या निमित्तानें माझ्याकडून कांहीं अनुषंगिक माहिती : * अगदी पुरातन काळात, नारीला बरीच प्रतिष्ठा होती यत्र नार्यस्तु पूज्यंते , रमन्ते तत्र देवता’ हें वचन तर प्रसिद्धच आहे. तें वेदोपनिषदांच्या नंतरच्या काळातील असावे, पण तें significant मात्र नक्कीच आहे. *अगदी पुरातन काळी, भारतात मातृ-देवता पूजण्याची पद्धत होती. तशीच ती, त्या काळातील अन्य संस्कृतींमध्ये पण होती. याचा संबंध fertility शी आहे.
    * वेदोपनिषदांच्या काळातील, लोपामुद्रा , लोमहर्षिणी वगैरे ज्ञानी स्त्रिया प्रसिद्ध आहेत. * महाभारतातील द्रौपदीनें द्यूतप्रसंगी, नीती-धर्म यांच्याशी निगडित मूलभूत प्रश्न विचारूल भीष्मादि सार्‍यांना निरुत्तर केले होते. यावरून तिच्या ज्ञानाची कल्पना यावी. *इतिहासात डोकावले तर, रझिया सुल्ताना, कित्तूरची राणी चेन्नम्मा, शिवकालीन रायबागन, शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई. अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फान्सच्या इतिहासातील जोन ऑफ आर्क, असा अनेक स्त्रिया कतृत्ववान म्हणून प्रसिद्ध आहेत. *पहिल्या महायुद्धांच्या काळीं, पुरुष युद्धावर गेले असल्यानें, ब्रिटन व अन्य देशांत, स्त्रिया सिव्हिल, administrative वगैरे कामें करू लागल्या, तेव्हांपासून खरें तर महिलांच्या सबलीकरणाला आधुलिक काळातील सुरुवात झाली, असे म्हणायला हरकत नाहीं. (तरीही , दुसर्‍या महायुद्धानंतच्या काळातही, सिमॉन दि बोव्हए हिला ‘दि सेकंड सेक्स’ — जेंडर या अर्थानें — या आपल्या पुस्तकात, स्त्रियांच्या आयुष्यातील difficulties मांडाव्याशा वाटल्याच. आणि, तिचें कथन सर्वस्वी योग्यही होतें). * ‘विमेन्स लिब्’ या movement पासून स्त्रियांनी आपला दबलेला आवाज खुला करून पुढे जायला सुरुवात केली, असे म्हणायला हरकत नसावी.
    # आणि, इतकें असूनही, बलात्कार, सुनांवर अत्याचार, त्यांना जाळणें, अशा घटना’आजही घडतच असतात; आणि त्या मनाला खिन्न करतात ! याचा अर्थ एवडाच की, समाजाला अजून खूप कांहीं शिकायला हवें . खरी स्त्री-पुरुष समानता कधी येईल, कोण जाणे !
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..