नवीन लेखन...

टपाल पेटी…

 

काही कामानिमित्त एका छोट्या गावात जाणं झालं. गाव फार पुढारलेलं नव्हतं आणि मागास देखील नव्हतं, मधलंच होतं. गावाचं प्रवेशव्दार देखणं होतं. रस्ते माती आणि धुळीने माखलेले होते. रस्त्याच्या मधुनच सांडपाणी सोडलेले होते. ते सांडपाणी तुडवत गायी-म्हशी चालल्या होत्या. ग्रामस्थ आपापल्या कामाला निघाले होते शेताकडे. चालत चालत एका मोठ्या झाडाकडे लक्ष गेलं. झाड डेरदार होतं. त्यांची सावली निवांत… शांत. त्या झाडाखाली काही जीव विसावले होते. गावातले एक दोन मोकाट कुत्रे, एक दोन बकऱ्या हुंदडत होत्या. दोन तीन म्हातरबोवा गप्पा हाणत बसले होते.

त्या झाडाच्या खोडाला लाल रंगाची टपाल खात्याची एक पेटी टांगलेली होती.. पोस्टबॉक्स. त्याने लक्ष वेधून घेतलं…. गंमत म्हणजे एका घरातून धावत येत एका लहान मुलानं पोस्ट बॉक्समध्ये एक पाकिट आणून टाकलं देखील….तो लहान मुलगा तसाच पळत जाऊ लागला… झटकन पुढे होतं त्याला थांबवलं… ‘काय टाकलं रे, त्या पेटीत..’

विचारल्यावर ‘पाकिट टाकलं’ अस त्यानं उत्तर दिलं. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव इतकंपण कळत नाही का? असे झाले होते. ‘त्यात पाकिट टाकुन काय होईल रे’ असं विचारल्यावर त्याची खात्रीच झाली असणार… तरी तो म्हणाला ‘ते पाकिट माझ्या काकाला पाठवायचं हाये, बानं दिलं होतं. पाकिट काकाला भेटलं की तो तिकडून पैसे पाठवतो.. म्हणून टाकलं त्या लाल डब्यात’. असं सांगून तो आला तसाच धावत निघुन गेला….

मग बालपणाच्या आठवणींचे पक्षी मनाच्या आकाशात भरारी मारू लागले. तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा. त्याच्या गाठोड्यात कितीतरी गोष्टी तो एकाचवेळी नेत असायचा. कुणाचा तरी निरोप असायचा, कुणाची तरी याचना असायची, तर वेळा काळजीचे शब्द असायचे, काही वेळेला विचारणा असायची… आणखी बरच काही-काही असायचं त्यामध्ये… पत्रांच्या रुपात.. तो या साऱ्या पाकिटांच काय करत असेल बर हा तेव्हा पडलेला प्रश्न असायचा…

आता शहरीकरणाचा वेग वाढू लागला तसा पत्र पाठवण्याचा वेग कमी होत गेला. आता संवादाची साधने वाढली आहेत, झटपट संवाद होतो, तत्काळ रिप्लाय येतो, तत्काळ माहिती मिळते.. तेव्हाच्या तेव्हा काम होऊन जाते. त्यामुळे लाल रंगाची ती पेटी ठेवायची कशाला म्हणुन तिला हटवण्यात आले… अर्थात ही पत्रपेटी पुर्णपणे हटवलेली नाही म्हणा… जिथे संवादाची साधने पोहचू शकलेली नाही तिथे शब्दांची साथ आहेच. तिथे पत्र आहे, पाकिट आहे, कागदावरच्या हळव्या शब्दांना मायेचा ओलावा देखील आहे. कवी प्रयाग शुक्ल यांची एक छोटी कविता यानिमित्ताने आठवतेय…

इस सुदूर गाँव में
टँगी हुई पत्र-पेटी
एक पेड़ के तने से –
डालता हूँ तुम्हें चिट्ठी
पहुँचे तो
पढ़ना जरूर !

— दिनेश दीक्षित
(२१ एप्रिल २०१८)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..