नवीन लेखन...

सुभाषित रत्नांनी – भाग १

सुभाषित (सु + भाषित = सुंदर भाषेत सांगितलेली गोष्ट), किंवा जे शब्द समूह, वाक्य किंवा अनुच्छेद ज्याच्यात त्यांचे वर्णन सुंदर प्रकाराने किंवा बुद्दीमत्तापूर्ण रित्या मांडलेले असते. यास सुवचन, सुक्ती , अनमोल वचन असेही म्हटले जाते.

संस्कृत भाषा हि सुभाषित रत्नांची खाण आहे. त्यातून जितकी रत्ने शोधून काढावी तेवढी थोडीच. आपण ह्या लेखमालेत अशी रत्ने शोधून त्यांचे मराठी भाषांतर करणार आहोत. शाळेत असताना बरीच छान सुभाषिते शिकवलेली असतात ती तेव्हा पाठही होती. त्यातली आता बरीचशी आठवत नाहीत. म्हणुन ती कुठे तरी संग्रहीत करण्याची गरज असते.

प्रथम आपण सोपी सुभाषिते जी सर्वानी ऐकलेली व अभ्यासली आहेत त्यापासून आरंभ करू. विद्येची देवता सरस्वती. तर आपण तीला वंदन करून सुरवात करू.

१. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रव्रिता |
या वीणा वरा दंडमंडित करा या श्वेत पद्मासना ||
या ब्रह्मच्युत शंकरा प्रभुतिभी देवी सदा वन्दिता |
सामा पातु सरस्वती भगवती निशेश्य जाड्या पहा ||

अर्थ- बुद्धीच्या मंदपणाचा संपूर्णपणे नाश करणारी; कुंदांची फुलं; चंद्र आणि तुषाराप्रमाणे शुभ्र दिसणारी; शुभ्र वस्त्रे परिधान करणारी; श्रेष्ठ अशा प्रकारचा वीणेचा दांडा जिच्या हातात आहे अशी; शुभ्र कमलावर पद्मासन घालून बसलेली; ब्रह्मदेव; शंकर आणि श्रीविष्णू जिला नेहमी प्रणाम करतात अशी देवी सरस्वती माझे रक्षण करो.

२. पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् ।
मूढै: पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥

अर्थ – या पृथ्वीवर फक्त तीन रत्ने आहेत. पाणी, अन्न आणि सुभाषिते. मूर्ख लोक मात्र दगडाच्या तुकडयांना “रत्न” असे म्हणतात.

३. उद्यमेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथै: ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृग: ॥

अर्थ – प्रयत्न केल्यानेच कार्ये पूर्ण होतात. केवळ स्वप्ने बघून (मनोरथे करुन) नाही.
झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करत नाही. (त्यासाठी त्याला शिकार
करावीच लागते).

४. अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्|
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः||

अर्थ – कोठलेही अक्षर हे मंत्रच असते. कोठलेही (वनस्पतीचे मूळ) औषधींच असते. कोठलाही पुरुष अयोग्य नसतो. परंतु त्यांची योग्य योजकता करणारा मात्र दुर्लभ असतो.

५. शतेषु जायते शूरः, सहस्त्रेषु च पंडितः |
वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवति वा न वा ||

अर्थ – शंभरात एखादा शूर असतो, विद्वान हा हजारात एखादा असतो, चांगला वक्ता दहा हजारात एखादा असतो, परंतु दानशुर व्यक्ती मिळतेच असे नाही. (वा न वा)

६. शैले शैले न माणिक्यम्, मौक्तिकं न गजे गजे |
साधवो न हि सर्वत्र, चंदनं न वने वने ||

अर्थ – प्रत्येक दगडामद्धे माणिक (रत्न) मिळत नाही, प्रत्येक हत्तीच्या (गंडस्थळामद्धे) मौक्तिक (मोती) असतोच असे नाही, तसेच साधुही सर्वत्र नसतात, व प्रत्येक अरण्यामद्धे चंदन वृक्ष असतोच असे नाही. (सर्व मौल्यवान गुणवत्ता एकत्र असणाऱ्या वस्तू क्वचितच असतात.)

७. क्षणशः कणश्चैव विद्यामर्थं च साधयेत |
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम ||

अर्थ – क्षणा़क्षणाने ज्ञान आणि कणाकणाने धन मिळवावे. क्षणाचा त्याग केल्यास विद्या कोठुन मिळणार आणि कणाचा त्याग केल्यास धन कोठुन मिळणार?

८. शृंगार वीर करूणा, अद्भुत हास्य भयानकः|
बीभत्स रूद्र शांतःच, काव्ये नव रसा: मतः||

अर्थ – शृंगार, वीर, करूणा, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र, व शांत हे काव्याचे नऊ रस आहेत.

९. नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने।
विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥

अर्थ – सिंहावर राज्याभिषेकाचे संस्कार कोणत्याही वनात (जंगलात) होत नाहीत. स्वतःच्या विक्रमावर (कर्तृत्वावर) तो आपले जंगलाचा राजा हे पद मिळवतो.

१०. भाषांसु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाणभारती ।
तस्मात हि काव्यं मधुरम तस्मादपि सुभाषितम ॥

अर्थ – सर्व भाषामद्धे मधुर भाषा ही गीर्वाणभारती (संस्कृत) आहे. त्यामद्धेही असणारी मधुर काव्ये सुभाषितामद्धे आहेत.

११. विद्या विवादाय धनं मदाय, शक्ति: परेषां परिपीडनाय |
खलस्य साधोर्विपरीत मेतदं, ज्ञानाय दानायच रक्षणाय ||

अर्थ – दुष्ट माणसाची विद्या ही वादविवादासाठी असते.संपत्ती ही उन्मत्त होण्यासाठी असते; आणि शक्ती ही इतरांना त्रास देण्यासाठी असते. परंतु सज्जनांचे ह्याच्या उलट असते. कारण त्यांची विद्या ही ज्ञान मिळविण्यासाठी असते. संपत्ती ही दान करण्यासाठी असते; आणि शक्ती ही इतरांचे रक्षण करण्यासाठी असते.

१२. येषां न विद्या न तपो न दानं, ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म:।
ते मर्त्यलोके भुवि भारभूता, मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति ||

अर्थ – ज्या व्यक्ती विद्या, तप, दान, ज्ञान, शील, तसेच कुठच्याही सद्गुणांनी युक्त नसतात, त्या पृथ्वीवर “खायला काळ आणि भुईला भार” असतात. अशा व्यक्ती ह्या मनुष्य नसून नुसत्या चरत राहणार्‍या पशूंसारख्याच असतात.

१३. गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः।
राम रावणयोर्युद्धं रामरावणयोरिव ||

अर्थ – आकाशाची तुलना आकाशाशीच, सागराची सागराचीच. तद्वतच, राम रावणांच्या युद्धाची तुलना दुसर्‍या कोणाशी होऊ शकत नाही.

१४. उष्ट्राणां लग्नवेलायां गर्दभा: मंत्रपाठका: ।
परस्परं प्रषंसन्ति अहो रूपमहोध्वनि: ||

अर्थ – उंटांच्या लग्नाला मंत्रपठणाला बसले गाढव; एकमेकांची तारीफ करतात, (गाढव उंटाना) वा वा काय रूप आहे – काय जोडा जमलाय; (उंट गाढवाना) वा वा काय सूर लावलाय!

१५. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महादधौ,।
समेत्यच व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः||

अर्थ- दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गाठ.
क्षणिक तेवि आहे बाळा मेळ माणसांचा

(गदिमा यांचे भाषांतर)

१६. आलसस्य कुतो विद्या,अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रा:,अमित्रस्य कुतो सुखम्.।।

अर्थ- आळशी माणसास विद्या कोठून येणार, व ज्यास विद्या नाही तयास धनप्राप्ती कशी होणार, ज्याच्याजवळ धन नाही त्यास मित्र कोठून मिळणार, व ज्यास मित्र नाही तो सुखी कसा होईल?

१७. लौकिकानां हि साधूनामर्थं वागनुवर्तते |
ऋषीणां पुनराद्यानां वाचमर्थोनुधावति ||

अर्थ – सगळे सत्प्रवृत्त लोक जसं असेल – घडले – तसं वर्णन करतात. परंतु (द्रष्टे ) ऋषी जसं बोलले त्याप्रमाणेच (नंतर ) घटना क्रम घडला.
(वाल्मिकी ऋषीनी आधी वर्णन केल्याप्रमाणे नंतर रामायण घडलं)

१८. पक्षिणां बलमाकाशो मत्स्यानामुदकं बलम् |
दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् ||

अर्थ – आकाशात पक्ष्यांची ताकद काम करते. माश्यांच बळ पाण्यात असतं राजाने (केलेले रक्षण) हे दुबळ्यांचे बळ होय आणि रडणं ही लहान मुलांची ताकद असते.

१९. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ||
इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा |
क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ||
(भागवत सातवा स्कंध पाचवा अध्याय)

अर्थ – प्रल्हाद हिरण्यकश्यपुला सांगतो विष्णूची भक्ति – श्रवण (त्याच्या कथा ऐकणे) नामसंकीर्तन, मनात स्मरण करणे, पाय चेपणे, पूजा करणे, नमस्कार करणे, दास्य भक्ति (हनुमानाप्रमाणे), सख्य भक्ति (अर्जुनाप्रमाणे) आणि आत्मनिवेदन (स्वतः देव आपलं ऐकतो आहे अशा प्रकारे त्याला सर्व सांगणे) – अशी नवविधा भक्ति केली तर ते उत्तम शिक्षण होय.

२०. पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा |
तथापि तत्तूल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव ||

अर्थ – पूर्वी कवींची मोजदाद करण्याच्या वेळी करंगळी (वर पहिलं नाव) कालिदास (हे) घेऊन मोजलं. पण पुढे त्याच्या तोडीचा कवि न सापडल्याने अनामिका (जिच्यासाठी नाव नाही अशी) सार्थ नावाची झाली. (कालिदासाची अद्वितीयता सांगण्यासाठी नेहमी हा श्लोक उद्धृत करतात)

२१. परिचरितव्याः सन्तो यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम् |
यास्तेषां स्वैरकथास्ता एव भवन्ति शास्त्राणि ||

अर्थ – जरी सज्जनांनी आपल्याला उपदेश केला नाही तरी त्यांची सेवा करावी. कारण ते सहजच ज्या गप्पा मारतात ते सुद्धा शास्त्रीय वचनच असते.

२२. राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः |
लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा ||

अर्थ – राजा (प्रशासक) जर धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होते. तो दुराचारी असेल तर जनता दुराचारी होते. जर तो (सर्वाशी) सारखा वागत असेल तर ती पण तशीच वागते. माणसे नेहमी राजा प्रमाणेच वागतात.

२३. उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर्दैवं प्रधानमिति कापुरुषा वदन्ति |
दैवं विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कॉऽत्र दोषः ||

अर्थ – सिंहाप्रमाणे असणाऱ्या कामसू माणसाकडे लक्ष्मी [आपणहून] येते. मात्र घाबरट लोक नशीब महत्वाचे आहे असे म्हणतात. नशिबाचा विचार न करता स्वतःच्या सामर्थ्याने प्रयत्न कर आणि प्रयत्न करूनही जर (ध्येय) गाठता आलं नाही तर त्यात (तुझा) काय दोष आहे?

२४. लुब्धानां याचकः शत्रुश्चोराणां चन्द्रमा रिपुः |
जारस्त्रीणां पतिः शत्रुर्मूखाणां बोधको रिपुः ||

अर्थ – (काहीतरी) मागणारा हा हावरटांचा शत्रु असतो. चन्द्र हा चोरांचा शत्रु आहे. वाईट चालीच्या स्त्रियांचा पति हा शत्रु असतो आणि (चांगले) शिकवणारा हा मूर्खांना शत्रु वाटतो.

पहिल्या भागाची सांगता आपण गुरुवंदना करून संपूर्ण करू.

२५. गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||

अर्थ – गुरु हाच ब्रम्ह आहे, गुरु विष्णू आहे, गुरूच श्री शंकर आहे, गुरु साक्षात परब्रम्ह आहे अशा या गुरूला माझे वंदन असो.

डॉ. दिलीप कुलकर्णी 
मोबा. ९८८१२०४९०४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 58 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on सुभाषित रत्नांनी – भाग १

  1. छान नवीन मालिका सुरू केल्या बद्दल धन्यवाद…
    संस्कृमधील श्लोक आणि त्यांची अर्थपुर्ण माहिती…
    छान उपक्रम…
    पुनश्च धन्यवाद…???

  2. संस्कृत सुभाषित लेखमाला मनःपूर्वक आवडली.आज संस्कृत भाषा इतर भाषांचे मानाने मागे पडत असलेली दिसतानाच आपणा सारख्यांच्या या अशा प्रयत्नांतूनच तिला उज्ज्वल भवितव्य प्राप्त होईल.सर्वांसाठीच विशेषतः 5ते25 वयापर्यंतच्या मोबाईलच्या आहारी जाऊन नसुन नको त्या मार्गी लागत चाललेल्या पिढीसाठी सुसंस्कार घडविण्याची अश्या लेखमालेचा निश्चितच उपयोग होईल असे माझे ठाम मत आहे.तुमच्या आमच्या लहानपणी घरात वयस्कर माणसे व शाळेत उत्तम विद्यादान करणेची तळमळ असलेले शिक्षक होते.म्हणूनच जीवनात आपण कुठेही भरकटलो नाही याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे.पण आज अश्यांची वानवाच आहे असे दुःखाने म्हणावे लागत आहे.असो कालाय तस्मै नमः म्हणून आपले विद्यादानाचे कार्य निकराने अव्याहत चालू ठेवणे हे आद्य कर्तव्य म्हणून करत रहायचे. न जाणो कालांतराने का होईना पण संस्कारही होत चाललेल्या पिढीला व समाजालाही उपरती होऊन सुसंस्कृत समाज निर्माण होईल.पुनश्च लेख पाठवलेबद्ल धन्यवाद. इत्यलम्.

  3. अति सुन्दर , मेरी मेमोरी का टेस्ट हो गया ??

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..