नवीन लेखन...

सुभाषित रत्नांनी – भाग ४

१. अकिञ्चनः सन्प्रभवः स सम्पदां त्रिलोकनाथः पितृसद्मगोचरः |
    स भीमरूपः शिव इत्युदीर्यते न सन्ति याथार्थ्यविदः पिनाकिनः ||

कुमारसंभव पाचवा सर्ग

अर्थ : (भगवान शंकर) कफल्लक (दिसले) तरी सर्व संपत्तीचे ते जनक आहेत. स्मशानात त्यांचा वास असला तरी ते त्रैलोक्याचे स्वामी आहेत. रौद्र दिसत असूनही शिव (कल्याणकारक) असं त्यांना म्हणतात. त्यांच्या खऱ्या स्वरूपाचं आकलन कोणाला होत नाही.

२. अयि मलयज महिमायं कस्य गिरामस्तु विषयस्ते |
उद्गिरतो यद्गरलं फणिनः पुष्णासि परिमलोद्गारैः ||

अर्थ : अरे चंदनवृक्षा; तुझा मोठेपणा कोणाला बरं इतका योग्य वर्णन करता येईल? तू तर गरळ ओकणाऱ्या सापांचे सुद्धा सुगंध देऊन पोषणच करतोस. (चंदनान्योक्ती)

३. गुणवत्तरपात्रेण च्छाद्यन्ते गुणिनां गुणाः |
रात्रौ दीपशिखाकान्तिः न भानावुदिते सति ||

अर्थ : जरी (काही व्यक्ती खूप) गुणी असल्या तरी त्यांच्या पेक्षा अधिक गुणवान लोकांसमोर त्यांचे गुण झाकोळून जातात. जसं दिव्याच्या ज्योतीच तेज रात्री पडते पण सूर्य उगवल्यावर (त्याच्या प्रखर तेजापुढे ते फिके पडते आणि) दिसतच नाही.

४. गुणानामन्तरं प्रायस्तज्ञो वेत्ति न चापरः |
मालतीमल्लिकाऽमोदं घ्राणं वेत्ति न लोचनम् ||

अर्थ : त्या त्या गोष्टीतला विद्वान माणसाला त्यातले बिनचूक कळते, इतरांना ते समजत नाही. मालतीचा सुवास नाकालाच कळतो डोळ्याला नाही.

५. गङ्गा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा |
पापं तापं च दैन्यं च हन्ति साधुसमागमः ||

अर्थ: गंगे (भागीरथी) मधे स्नान केलं तर, पापे नाहीशी होतात. चन्द्र आपल्या (शीतल किरणांनी उन्हाचा) त्रास नाहीसा करतो. कल्पवृक्ष (आपण मागू ती वस्तू देऊन) गरीबी नाहीशी करतो (हे तिघं एकएक त्रासातून सुटका करतात पण) सज्जनांचा सहवास (एकटाच) ह्या तिन्ही त्रासातून सुटका करतो.

६. संपूर्ण कुंभो न करोति शब्दं अर्धो घटो घोषमुपैति नूनं I
विद्वान्कुलीनो न करोति गर्वं जल्पन्ति मूढास्तु गुणैरविहीनाः I I

अर्थ : भरलेल्या घड्यामध्ये पाणी ओतले तर तो आवाज अजिबात करत नाही पण रिकाम्या घड्यात पाणी ओतले तर खूप गडगडIट ऐकू येतो. त्याचप्रमाणे जो बुद्धिमान आहे तो बडबड करीत नाही परंतु अर्धवट शिकलेले लोक पहा कसे बडबड करीत आपले ज्ञान पाजळत असतात.

७. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्यशृंखला I
ययाबद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत I I

अर्थ : या जगामध्ये आशा नावाची एक आश्चर्यकारक साखळी आहे की जिने माणसाला बंधनात ठेवले तर तो माणूस यशप्राप्तीसाठी धावत सुटतो आणि ज्याची आशाच संपली तो मात्र पांगळ्या माणसासारखा एका जागी खिळून राहतो.

८. पादपानाम भयं वातात्पद्मानाम शिशिरात्भयम I
पर्वतानाम्भयम वज्रात्साधूनाम दुर्जानात्भयम II

अर्थ : वृक्षांना वाऱ्याचे भय असते. वा-याने ते उन्मळून पडू शकतात. कमळांना शिशिर ऋतूपासून भीती असते. वज्र कोसळून पर्वत दुभंगू शकतात त्याच प्रमाणे साधूंना दुर्जनांपासून भय असते.

९. दानम्भोगोनाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य |
यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिः सदा भवति ||

अर्थ : पैसा तीनच प्रकरणी खर्च केला जावू शकतो. एक म्हणजे दान करून किंवा दुसरा म्हणजे भोगून किंवा तिसरा म्हणजे नाश होउन फुकट जातो. जो माणूस स्वतः भोगत नाही किंवा दान धर्मही करीत नाही त्याची तिसरी गती होते. म्हणजे त्याचा पैसा त्याच्यासाठी तरी नाश पावतो. (जरी मुलाबाळांना ठेवला तरी ते आयत्यावर कोयता या नात्याने त्याची वाट लावतात.)

१०. कृपणेन समोदाता न भूतो न भविष्यति |
अस्पृशन्नेव वित्तानि यः परेभ्यः प्रयच्छति ||

अर्थ : कृपण लोकांसारखा दानी माणूस या भूतलावर अजून झाला नाही किंवा होणारही नाही कारण तो पैसा इतका सांभाळून ठेवतो की तो स्वतः खर्च करीत नाही किंवा देण्यासाठी बाहेरही काढत नाही आणि मग त्याने हातही न लावलेला हा तिजोरीतील पैसा त्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच्या हातात फुकट पडतो म्हणजेच तो त्या माणसाना तो पैसा फुकट दानच जणू करतो.

११. हतो भीष्मो हतो द्रोणो हतश्चान्ये महारथाः |
आशा बलवती राजन शल्यो जेष्यति पांडवान ||

अर्थ : हा श्लोक समजण्यासाठी थोडी इतर माहिती देणे आवश्यक आहे. कौरव पांडव, युद्धाचा सतरावा दिवस उजाडल्यावर काय घडले ही गोष्ट व्यास मुनी किंवा (सूत किंवा शौनक मुनी) परीक्षित राजाला सांगत आहेत की आता पराभव अटळ आहे असे सुयोधन किंवा दुर्योधनाला दिसत असले तरी त्याची जिंकण्याची आशा काही सुटलेली नाही. त्यामुळे आता सतराव्या दिवशी कौरव सेनेला कोणी तरी तुल्यबळ सेनापती हवा म्हणून तो शल्य राजाला सेनापती करतो. पण भीष्म, द्रोण, कर्ण आणि इतर महारथी मरण पावल्यावर आता कौरवांकडे कुणी नेतृत्व करायला लायक माणूस नाही आहे तरीही नकुल सहदेवांचा मामा शल्य हा लढवय्या नसूनही दुर्योधनाला तो योध्दा वाटतो आणि म्हणून तो त्याला सतराव्या दिवशी सेनापती करतो. (शल्याला पांडवांचा मामा असून सुद्धा कौरवांची चाकरी केल्याने व त्यांचे मीठ खाल्याने कौरवांच्या बाजूने लढावे लागले होते.)

१२. चिंतनीया हि विपदामादावेव प्रतिक्रिया |
न कुपखननम युक्तम प्रदीप्ते वह्निना गृहे ||

अर्थ : घराला आग लागू शकते या विचाराने घर बांधत असतानाच शहाणे लोक विहीर खणतात. तेव्हा आग लागल्यावर विहीर खणायला घेणे हा मूर्खपणा आहे.

१३. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा |
पंचकम ना स्मरेन्नित्यं महापातक नाशनम ||

अर्थ : हा श्लोक तसा साधा सरळ आहे परंतु सर्व सामान्य लोक याचा चुकीचा उच्चार करून चुकीचा अर्थ लावतात म्हणून मी मुद्दाम हा श्लोक समश्लोकीसाठी निवडला आहे. सामान्य लोक पंचकन्या असे म्हणतात, ते पूर्णतः चूक आहे. ते “पंचकम ना ” असे आहे. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी या सर्व पतिव्रता विवाहिता स्त्रिया आहेत. त्या पंच कन्या नव्हेत. पंचकम म्हणजे या पांच जणींचे माणसाने स्मरण करावे त्यामुळे महापातकाचा नाश होतो. असे कवीने म्हटले आहे. नृ हा शब्द माणूस या अर्थी संस्कृतात आहे. देवः देवौ देवाः हा जसा शब्द चालतो त्या धर्तीवर ना नरौ नरः हा शब्द चालतो. त्यातील प्रथम पुरुषी एकवचन ‘ ना ‘ असे आहे व ते इथे पंचकम नंतर आहे.

१४. पुस्तकं वनिता वित्तं | परहस्त गतं गतं |
यादी चेत्पुनरायाति | नष्टं भ्रष्टं च खंडितम ||

अर्थ : आपले पुस्तक कुणाला वाचायला म्हणून द्यावे तर ते फाटून किंवा खिळखिळे होवून येते. स्त्री दुस-याकडे गेली तर ती भ्रष्ट होण्याची शक्यता असते आणि वित्त म्हणजे पैसे जर कुणाला उसने दिले तर ते कमी परत येतात किंवा एक रकमी जातात पण हप्त्या हप्त्याने.

१५. अतिदानात बलिर्बद्धो, अतिमानात सुयोधन: |
विनष्टो रावणो लौल्यात, अति सर्वत्र वर्जयेत ||

अर्थ : अतिरेकी दानशूरते पायी (वचनात) बंदिस्त झाल्याने बळीराजा, अतिगर्विष्टपणाने दुर्योधन आणि अति स्त्रीलोभाने रावण नष्ट झाला. कोणत्याच गोष्टीमध्ये अतिरेक करू नये.

यात सुप्रसिद्ध उदाहरणे दिली गेली आहेत. पण आपल्या आसपास नीट पाहिले तर कोणत्या ना कोणत्या अतिरेकापायी अनर्थ ओढवून घेणारी शेकडो माणसे दिसतील. व्यसनांचा अतिरेक, छंदांचा अतिरेक, षोकाचा अतिरेक, अशा किती बाबी सांगाव्यात? मागे एकजण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काचा, खिळे अशा वस्तू खाऊन दाखवायचा. अशा निधड्या वृत्तीच्या माणसाने खरे तर सैन्यात जायला हवे. तिथे जिवावर उदार होऊन कामगिरी करायला सतत वाव असतो. पण नाही.

काम, क्रोध आदि षड्रिपूंचा अतिरेक तर पदोपदी आढळतो. विवेकशील असतात तेच खर्या अर्थाने समाजाचे आधार असतात. असे संस्कार मनावर करण्याचे काम ‘अति सर्वत्र वर्जयेत’ सारखी वचने करीत असतात.

१६. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका: |
बकास्तत्र न बध्यन्त, मौनं सर्वार्थसाधनम ||

अर्थ : (मंजूळ आवाजात) बोलण्याच्या स्वतःच्याच दोषामुळे (?) राघू आणि मैना बंदिवासात पडतात. बगळे मात्र चुपचाप राहिल्यामुळे बंदिवासात पडत नाहीत. चुपचाप बसण्याने हवे ते मिळवता येते.

पोपट बोलतो, आणि मैना मंजूळ आवाज काढू शकते. ही ईश्वरदत्त देणगीच त्यांचा दोष ठरतो. कारण शौकीन लोक त्यांचा आवाज ऐकण्यासाठी त्यांना पकडून कौतुकाने पिंजऱ्यात कोंडून आपली हौस भागवतात. याउलट बगळा बडबड न करता पाण्यात एका जागी उभा राहातो जणू ध्यानस्थ ऋषीच! यालाच बकध्यान म्हणतात. त्याच्या बडबड न करता स्थिर राहाण्याने मासे फसतात आणि त्याच्या पायांना काठी समजून आसपास फिरतात. बगळ्याला त्यामुळे विनासायास त्यांना पकडता येते. चुप बसण्यानेच त्याला हवे ते मिळवता येते. म्हणजे मौन बाळगणेच व्यवहारात अनेकदा उपयोगी पडते. ते केव्हा बाळगायचे त्याचे तारतम्य बाळगणे वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात फार महत्वाचे ठरते. अकारण बडबड करून कार्यनाश होतो.

१७. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पण्डितः श्रुतवान गुणजः ।
स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते ॥

अर्थ: ज्याच्याजवळ पैसा आहे तो कुलीन असतो, तो विद्वान असतो , तो गुणग्राहक असतो, तो वक्ता असतो आणि देखणा असतो कारण सर्व गुण (पैशाला भुलून) पैशांच्याच आश्रयाला जातात (पैशालाच चिकटतात). हे फार प्रसिद्ध सुभाषित आहे. यात पैशाची महती वर्णन केली आहे. वरील सर्व गुण असूनसुद्धा, जर पैसा नसेल तर, त्या व्यक्तीला समाजात काही किंमत नसते.

१८. यथा खरः चंदन भारवाही, भारस्य वेत्ता न तु चंदनस्य।
तदैव शास्त्राणि बहुनि अधित्य, अर्थस्य मूढाः खरवद वहन्ति॥

अर्थ: चंदन वाहून नेणारे गाढव (खर) त्याचे फक्त वजन जाणते पण त्याच्या अंगचे गूण (सुवास, शिल्पकामासाठीची योग्यता इ.) जाणत नाही तसेच जे लोक शास्त्रांचा खरा अर्थ जाणून घेतल्याशिवायच खूप अभ्यास करतात ते गाढवाप्रमाणेच शास्त्रांचे निव्वळ ओझेच वाहतात. हे आणी एक प्रसिद्ध सुभाषित.

१९. अनागत विघाताच प्रत्युत्पन्नमतिः च यः ।
द्वौ एव सुखम एधेते, दीर्घसूत्री विनष्यति ॥

अर्थ: जे संकट आलेले नाही त्यावर मात करण्याची तयारी करून ठेवणारे आणि ज्याला आयत्या वेळी देखील मार्ग सुचतो असे समयसूचक हेच सुखी राहातात. (मार्ग काढण्यात) चेंगटपणा करणारा नाश पावतो. पुस्तकी शिक्षण पूर्ण करून तीन शिष्य गुरुंचा आशिर्वाद घेऊन आपल्या गावी निघाले. दुपारच्या भुकेच्या वेळी ते राजवाडयाशी पोचले. तेथे वाटसरूंना शेवयांची खीर वाटली जात होती. तिघांनीही द्रोण भरून खीर घेतली आणि सावलीला जाऊन खाण्यास बसले.

खिरीतील लांबच लांब शेवया पाहून त्यांना ’दीर्घसूत्री विनश्यति (शब्दार्थ: लांब धागे नाशकारक असतात.) हे गुरुजींनी शिकवलेले वचन आठवले नि खीर तशीच जमिनीवर ठेऊन ते भुकेल्या पोटी पुढे निघाले. सावलीत उभ्या गाढवाने ती खीर खाल्ली आणि अधिक कांही खायला मिळेल या आशेने गाढव त्या तिघांच्या मागे मागे जाऊ लागले.

व्यावहारिक ज्ञान नसले कि अशी अवस्था होते.

विषयाचे आकलन न करता (समजून न घेता) नुसतीच पोपट पंची करतात ते सर्व व्यर्थ आहे.

२०. सत्यं ब्रुयात् प्रियम् ब्रुयात न ब्रुयात् सत्यमप्रियम् |
प्रियम् च नानॄतम् ब्रुयात एष: धर्म: सनातन: ||

अर्थ: आवडणारे सत्य (खरे) बोलावे. पण न आवडणारे खरे बोलू नये. सुखावणारे खोटे बोलू नये. हेच योग्य आचरण आहे.
जगाच्या पाठीवरील कोठल्याही धर्माच्या, वंशाच्या, रंगाच्या, लिंगाच्या, वयाच्या माणसाला उपयोगी असे हे मार्गदर्शन आहे. सुंदराला सुंदर म्हणण्यात आपण आवडणारे सत्य बोलतो. कुरूपाला कुरूप म्हणणे आपण टाळतो तेव्हा आपण ’न ब्रुयात् सत्यम(अ)प्रियम् (न आवडणारे खरे बोलू नये) पाळून त्याचे मन विनाकारण दुःखी करीत नाही. आपण कुरुपाला सुंदर म्हणालो तर ’आवडणारे असत्य’ बोलणे होय.
सत्य नेहमी कटु असते.’ असे व्यवहारी जगात लोक एकमेकाला सांगत असतात. अनेकदा व्यावहारिक शहाणपणाची शिकवण म्हणून “न ब्रूयात सत्यमप्रियम” हे संस्कृत वचन ऐकवले जाते. आणि आपल्या नेहमीच्या बोलण्यात आणि मराठी-हिंदी साहित्यातही याचा उल्लेख वारंवार येतो. हे वचन बहुतेकांना त्याच्या अर्थासह माहीत असते पण ज्या एका सुपसिद्ध सुभाषिताचा ते एक भाग आहे ते पूर्ण सुभाषित माहीत असतेच असे नाही. ते संपूर्ण सुभाषितच खूप बोलके आहे.

२१. प्रियवाक्य प्रदानेन अवघे तुष्यंति जन्तव: |
तस्मात तदेव वक्तव्यं वचने किं दरिद्रता ||

अर्थ: स्तुतीने सर्वच जण संतुष्ट होतात. असे जर आहे तर मग स्तुती करावीच. बोलण्यात दारिद्र्य (कंजुषी) कशाला दाखवायची? आणि थोड्या फार फरकाने – हस्तादपि न दातव्यं गृहादपि न दीयते! परोपकारणार्थाय वचने किं दरिद्रता!
अर्थ : हातातले किंवा घरातले कांही द्यावे लागत नसतांना निव्वळ बोलण्याने जर दुसर्यावर उपकार होत असतील तर बोलण्यात दारिद्र्यता कशाला दाखवायची?’

वचने किं दरिद्रता?’ हे संस्कृत वचन आपल्या वाचनात, बोलण्यात व ऐकण्यात वारंवार येते पण संपूर्ण सुभाषित सहसा माहित नसते.
साहेबाच्या निरोपसमारंभात त्याच्यावर त्याच्यात नसलेल्या गुणांचे हार चढवले जातात ते का? पक्षाच्या वरच्या नेत्याची अनुयायी तोंड फाटेस्तोवर स्तुति करीत असतात ते का? असे करण्यात बहुदा स्वार्थ असतो. याला कारण आहे स्तुतीने सर्वच जण संतुष्ट होतात तर मग ’वचने किं दरिद्रता?’ म्हणजे बोलण्यात दारिद्र्य कशाला दाखवायचे?

२२. दुर्जन: प्रियवादीच नैतद विश्वासकारणथ:म |
मधुतिष्ठति जिव्हाग्रे ह्रदये तु हलाहलम ||

अर्थ: दुष्ट स्वभावाची आणि (तोंडदेखले अवाजवी) गोड बोलणारी माणसे (मुळीच) विश्वासार्ह नसतात. या लोकांची वाणी मधाळलेली (गोड बोलणे) असली तरी त्यांच्या अंत:करणात विष (दुष्ट हेतू) दाटलेले असते.

खरं तर दुष्ट स्वभावाची माणसेच काय पण (कारण नसतांना) वाजवीपेक्षा अधिक (स्तुती करून नि गोड बोलून ) जवळीक साधणार्या लोकांपासूनही सावध राहायला हवे. माहीत असलेल्या दुष्ट माणसांपासून आपण सहसा सावध राहातोच पण या अशा सज्जनांच्या जाळ्यात सापडण्याचा धोकाही खूप भयानक असू शकतो. प्रवासातील सहप्रवासी, विक्रेते आणि आकर्षक गुंतवणुकीच्या योजना मांडणारे लोक यांच्यापासून म्हणूनच सावध राहावे लागते. या सर्व लोकांना गोड बोलावेच लागते. प्रत्येकजण लबाड असेलच असे नाही पण मधुतिष्ठति जिव्हाग्रे ह्रदये तु हलाहलम ही शक्यता ध्यानात ठेवावी हाच याचा अर्थ!

२३. अपि क्रियार्थम सुलभं समित्कुशं
जलान्यपि स्नान विधिक्श्यमाणि ते |
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे
शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम ||

अर्थ: शंकराला प्रसन्न करून घेऊन त्यांच्याशी विवाह करू इच्छिणार्या पार्वतीने घोर तपश्चर्या सुरु केली. तेव्हा तिची परीक्षा घ्यायला ब्रम्हचार्याच्या रूपाने आलेले शंकर पार्वतीला म्हणतात ” तुला धर्मकृत्यासाठी लागणार्या समिधा व दर्भ मिळत असतीलच. स्नानाला योग्य जलाशयही असतीलच, घोर तप करण्यासाठी लागणारे (शरीर) सामर्थ्यही तुझ्याजवळ असेलच. (कारण लक्षात ठेव की) शरीर, हेच धर्माचरण करण्यासाठीचे खरोखरीचे मुख्य साधन आहे.

‘ शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम ‘ हे वचन आपल्याला सातत्याने भेटत असले तरी जोवर आपल्याला कांही शारीरिक त्रास होत नाही तोवर आपल्याला शरीराचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. त्रास व्हायला लागला की बरे होईपर्यंत आपण त्याची जरा काळजी करतो. नंतर ‘येरे माझ्या मागल्या’.
खर तर आपली कर्तव्ये (धर्म) पार पाडण्यास शरीरस्वास्थ्याची केवढी गरज असते! बरे नसेल तर ठरवलेल्या सर्व गोष्टी बिघडतात. प्रवास, महत्वाची कामे रद्द करावी लागतात वा पुढे ढकलावी लागतात. खूप नुकसान होऊ शकते. स्पर्धेच्या ऐन मोक्याला आजारपण आल्याने संधी हुकल्याची शेकडो उदाहरणे आहेत. अशा रीतीने कर्तव्याचरणात शरीरस्वास्थ्याची फार आवश्यकता आहे हे ठसविण्यासाठी हे वचन फार महत्वाचे होय.
पण ते आले आहे ‘कुमारसंभवा’त

ह्या भागाचा शेवट आपण एका फार चांगल्या व प्रसिद्ध श्लोकाने करणार आहोत.
हा श्लोक देवाची पूजा व आरती संपल्यावर म्हणतात.

२४. अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।
देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

अर्थ : शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,
अनायासेन मरणं : मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा तर अनायासेन – सहज येणारा,
विनादैन्येन जीवनं : जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.
देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर: मृत्यू नंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा तुझे’.
ही देवाकडे प्रार्थना (मागणे) करून पूजा संपवली जाते.

डॉ. दिलीप कुलकर्णी
०९/०४/२०२३

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 65 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on सुभाषित रत्नांनी – भाग ४

  1. किती प्रगल्भ अर्थ आहेत,एक एक शुभाशित जणू संपूर्ण जीवनाचा निचोडच सांगुन जातो असं वाटत!
    धन्यवाद डॉ.कुलकर्णी साहेब तुम्ही आम्हाला श्लोकांची ओळख करून देण्यात बद्द्ल. आम्ही तुमचे पुढील लेख यायची वाट बघतोय.

  2. बरेच नवीन श्लोक व त्यांची अर्थपूर्ण माहिती कळाली.
    धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..